पर्यटकांचे सुखनिधान

पांडुरंग पाटणकर 
गुरुवार, 22 मार्च 2018

धार्मिक पर्यटन

आरक्षणासाठी पत्ता ः पार्क गेस्ट हाउस श्री अरविंद आश्रम, गोबर्ट अव्हेन्यू, पाँडिचेरी ६०५००२.
अरविंद आश्रमाची वेबसाइट ः www.sriaurobindoashram.org, 
दूरध्वनी ः ०४१३२२३३६०४

निसर्गरम्य ठिकाणांचे पर्यटन आणि धार्मिक पर्यटन यांचा सुंदर मिलाफ ‘पाँडिचेरी’त झालेला आहे. एका अंगाला बंगालचा उपसागर आणि उरलेल्या तीनही बाजूंनी तमिळनाडूच्या अर्काट जिल्ह्याने वेढलेले पाँडिचेरी पर्यटकांना खरे विश्रांतीस्थान वाटते. पाँडिचेरी आणि तेथील योगी अरविंद आश्रम हे समीकरण भारतवासीयांच्या स्मरणात कायमचे कोरले गेलेले आहे. ज्यांनी योगी अरविंदांचे चरित्र वाचले असेल किंवा शिवाजीराव भोसले यांचे अरविंदांवरील प्रभावी व्याख्यान ऐकले असेल ते पाँडिचेरीला भेट दिल्याशिवाय राहूच शकत नाहीत. इतर पर्यटकांच्या दृष्टीने भारतातील मोडक्‍या सुनियोजित शहरांमध्ये पाँडिचेरी अग्रगण्य आहे व तेथील २ किमी लांबीचा सुंदर समुद्रकिनारा आणि निसर्ग एकमेवाद्वितीय आहे हे सांगणे पुरेसे आहे.

सुमारे ३०० वर्षांच्या फ्रेंच राजवटीनंतर १ नोव्हेंबर १९५४ मध्ये तत्कालीन लोकप्रतिनिधींच्या संमतीने पाँडिचेरीची फ्रेंच वसाहत भारतीय संघराज्यात विलीन झाली. आजच्या येथील केंद्रशासित राज्यात कारिकल, यानम, माहे अशा इतर भूतपूर्व फ्रेंच वसाहतीही आहेत. मूळची ही अगस्ती ऋषईंची भूमी तमीळ भाषेतील ‘पुड्डू चेरी’ म्हणजे नवनगरी अशा अर्थाने ओळखली जात असे. येथील वर्चस्वाकरिता फ्रेंच व इंग्रजांमध्ये अनेक लढाया झाल्या होत्या पण फ्रेंच टिकून राहिले. गोव्यावर जशी पोर्तुगीज राजवटीची छाप आढळते तसे इथे सर्वत्र फ्रेंचांचा चेहरामोहरा आढळतो. मध्यवर्ती चौकापासून समुद्रकिनाऱ्याकडील रस्त्यांना, इमारतींना फ्रेंच नावे आढळतात व बांधणीही त्यांच्या पद्धतीची आहेत. अगदी किनाऱ्यावर आजही फ्रेंचांनी स्फूर्तीदेवता ‘जोन ऑफ आर्क’ हिच्या नावाचा चौक आहे. शहराच्या मध्यावरून स्वच्छ पाण्याचा मोठा कालवा वहात आहे व त्यावर सुंदर पूल आहेत. या कालव्यामुळे शहराची पूर्व व विस्तृत अशा पश्‍चिम भागात विभागणी झालेली आहे.

आजच्या पाँडिचेरीवर फ्रेंचांपेक्षासुद्धा जास्त अशी योगी अरविंदांची छाप पडलेली आहे. एखाद्या मोठ्या उद्योगसमूहासारखे अरविंद आश्रमाचे शेकडो प्रकल्प शहरभर राबविले जाताना दिसतात. आपल्यासारख्या पर्यटकांचीसुद्धा राहण्याची, जेवणाखाणाची उत्तम सोय या आश्रमसंस्थांमार्फत केली जाते. त्यांची १७ छोटी मोठी अतिथिगृहे असून त्यांचे नियंत्रण ‘कॉटेज गेस्ट हाउस’ येथून चालते. तिथे आपण गेलो की उपलब्धतेनुसार आपल्याला अतिथिगृह दिले जाते. अत्यंत माफक किमतीत राहण्यापासून न्याहारी, भोजन यांची कुपन्स सकाळीच दिली जातात. तीन दिवसांपर्यंत मुक्काम करता येतो व साइट सींईगच्या सहली सुद्धा त्यांच्यामार्फत नेल्या जातात. गोबर्ट अव्हेन्यू या आलिशान रस्त्याच्या टोकाला समुद्रात घुसलेल्या जेट्टीच्या अलीकडे अरविंद आश्रमाचे अतीव सुंदर पार्क गेस्ट हाउस समुद्राला खेटून बांधलेले दिसते. देशीविदेशी प्रवाशांनी ते कायम गजबजलेले दिसते. याच रस्त्यावर पाँडिचेरी टुरिझम डेव्ह. कॉर्पोरेशनचे शासकीय कार्यालय व अरविंद आश्रमाचा मोठा छापखाना आहे. एच. एम. कासिम मार्गावरील ब्युरो सेंट्रल (अंबर) इथेही आरक्षण इ. होते. गावात पाहण्यासारखी जवाहर टॉय म्युझियम, पुरातत्त्व विभागाचे गर्व्हन्मेंट म्युझियम, बाराथी मेमोरिअल म्युझियम अशी वस्तुसंग्रहालये, गॉथिक शैलीतील अनेक चर्चेस, फ्रेंच वॉर मेमोरिअल, दीपगृहे, मंदिरे, अँग्लो-फ्रेंच टेक्‍स्टाईल शोरूम, चिल्ड्रेन्स पार्क व बगीचे अशी अनेक ठिकाणे आहेत. पण मनावर कायमचे कोरले जाते ते अरविंद आश्रमाचे ऑरोव्हिले अर्थात मातृमंदिर. ५ हजार एकर जमिनीवर घनदाट वृक्षराजी साकारलेला हा भव्य प्रकल्प साऱ्या जगाला मार्गदर्शक आहे. ‘वसुधैव कुटुंबकम’ कल्पनेवर आधारित या नगरीत जगभरातले लोक देश, भाषा, धर्म, लिंग, पंथ अशा साऱ्या भेदांपासून मुक्त होऊन सुखाने नांदत आहेत इथल्या अप्रतिम ध्यानमंदिरात कोणीही डोळे मिटून शांत बसल्यास त्याला पाच दहा मिनिटांत दैवी अनुभूती आल्याशिवाय राहात नाही. मात्र, ध्यानमंदिरात व परिसरात निःशब्द राहायचे असते. पाँडिचेरीला येण्यासाठी चेन्नईहून राज्य परिवहन व खासगी बसेस भरपूर आहेत. मदुराईसारख्या मोठ्या शहरातूनही थेट बसेस आहेत. बेंगलोरहून राज्य परिवहनच्या रात्री ९ च्या बसने निघाल्यास पहाटे ५ ला पाँडिचेरी येते.

फोटो फीचर

संबंधित बातम्या