श्री माहूरगड क्षेत्र

पांडुरंग पाटणकर
गुरुवार, 5 एप्रिल 2018

धार्मिक पर्यटन

विदर्भ आणि मराठवाडा यांच्या सीमेवर वसलेले श्री माहूरगड क्षेत्र अखिल महाराष्ट्राचे श्रद्धास्थान आहे. मात्र, ते पुणे - मुंबई पट्ट्यापासून दूर असल्याने दुर्लक्षित राहाते. पण जाण्यासारखे अवश्‍य आहे, कारण महाराष्ट्रातील देवीच्या साडेतीन शक्तीपीठातील ही माहूरगडाची रेणुका मूळ पीठ मानलेले आहे. कोल्हापूरची महालक्ष्मी व तुळजापूरची भवानी ही इतर दोन पीठे असून नाशिक जिल्ह्यातील वणीची सप्तश्रृंगी देवी हे अर्धे पीठ मानलेले आहे. माहूर शब्दाची संगती लावताना ‘मा’ म्हणजे आई आणि कन्नड भाषेतील ‘हूर’ म्हणजे गाव. या अर्थाने आईचे गाव म्हणजे मातापूर अशी याची महती आहे.

नांदेड जिल्ह्याच्या किनवट तालुक्‍यात दाट जंगल्यातल्या डोंगरावर ही रेणुकामाता वसलेली आहे. हे ठिकाण नांदेडपासून ११५ कि.मी. तर खुद्द किनवटपासून ४५ कि.मी. अंतरावर आहे. किनवट हे छोटे स्टेशन दक्षिण मध्य रेल्वे मार्गावर असले तरी मोठ्या शहरातून राज्य परिवहनाच्या (एस.टी.) थेट बसेस माहूर गडासाठी मोठ्या प्रमाणावर येतात. नवरात्र, दत्तजयंती, आवस-पौर्णिमा व इतर सण उत्सव टाळून इकडे आल्यास इथला निसर्ग आणि देव दोन्हींचे आपल्याला निवांत दर्शन होते. इतर देवस्थानांच्या मानाने इथल्या निवास भोजनाच्या सुविधा सामान्य असल्या तरी सुखसमाधान, शांतता अशी फळे तेवढीच मिळतात. मुक्कामासाठी इथली कपिलेश्‍वर धर्मशाळा प्रशस्त व उत्तम आहे. रेणुका हीच माहूरची मुख्य देवता व तिच्या अनुषंगाने इतरही काही महत्त्वाची स्थाने इथे आहेत. देवीचे मुख्य मंदिर गावापासून ३ किमी अंतरावर डोंगरावर आहे. तेथे जाण्यासाठी गावातून रिक्षा, जीपगाड्या अशी खासगी वाहने भरपूर आहेत. थेट वरपर्यंत पक्का रस्ता बांधून काढलेला आहे. वाहने घाटरस्ता चढून खिंडीत येतात व तेथे आल्यावर डाव्या हाताला माहूरगड किल्ल्याची तटबंदी दिसते तर उजव्या हाताला शिखरावर श्री रेणुकामातेचे मंदिर दिसते. मंदिराकडे जाण्यासाठी घडीव दगडात सव्वादोनशे पायऱ्या बांधून काढलेल्या आहेत. पायऱ्यांच्या दोन्ही बाजूला हार, फुले, पेढे, तसबिरी यांची दुकाने थाटलेली आहेत. समुद्रसपाटीपासून हा पहाड सुमारे हजार मीटर उंच आहे.

मंदिरात देवीचा शेंदरी तांदळा भव्य असून चेहरा सर्व अलंकारांनी नटलेला आहे. डोक्‍यावर मुकुट, नाकात नथ, कानात कर्णफुले व हसरा चेहरा खुलून दिसतो. रोज हजार विड्याची पाने कुटून त्या तांबूलाचा नैवेद्य तिच्या मुखात भरविण्याची प्रथा आहे. ही भूमिदेवता आहे. (गळ्यापासून वरचा भाग दिसतो) व कर्नाटकातील यल्लम्मा देवी तिचाच अंश आहे. मातृतीर्थावर स्नान करून हिचे दर्शन घेतात. रेणुका ही जमदग्नी ऋषींची पत्नी व भगवान परशुरामांची आई आहे. आईचा वियोग सहन न होऊन परशुरामांनी गुरू दत्तात्रेयांना साकडे घातले. दत्तगुरू प्रकट झाले व म्हणाले, आईला कळवळून हाक मार, मग ती जमिनीतून वर येईल. मात्र पूर्णरूपाने वर येईपर्यंत महिना लागेल व तोपर्यंत आईचे स्मरण करायचे नाही. विस्मरणाचा प्रयत्न करूनही तेराव्या दिवशी स्मरण झाले, तोपर्यंत ती गळ्यापर्यंत वर आलेली होती. त्याच स्वरूपात गळ्यापर्यंत रेणुकेची मूर्ती दिसते. गुरू दत्तात्रेय प्रकट झाले, त्यांचेही शिखर व मंदिर पुढे गेल्यावर दिसते. तिथे जायला पायी १ तास लागतो व त्याचेही पुढे अनसूया मातेचे शिखर व मंदिर आहे. यादवांच्या काळापासून म्हणजे सुमारे ७०० वर्षांपासून हे स्थान महाराष्ट्रदेशी प्रसिद्ध आहे.

सर्व प्रकारचे सण, उत्सव इथे मोठ्या प्रमाणावर साजरे होत असतात व त्या निमित्ताने वर्षभर भाविक इथे येतच असतात. नागपूर ही महाराष्ट्राची दुसरी राजधानी असल्याने त्या अनुषंगाने इकडचे पर्यटन करताना ताडोबा राष्ट्रीय उद्यान, नवेगाव अभयारण्य, पेंच वनविभाग, नागझिरा, चिखलदरा (थंड हवेचे ठिकाण), विनोबाजींचा पवनार आश्रम (वर्धा) वगैरे ठिकाणे पाहता येतील व त्याला माहूरच्या धार्मिक पर्यटनाची जोड मिळेल.

संबंधित बातम्या