चिरतरुण दुबई

पांडुरंग पाटणकर
गुरुवार, 13 डिसेंबर 2018

पर्यटन
 

जगाच्या पाठीवरील काही देश अथवा नगरे यांना वृद्धत्व कधी येतच नाही, कायम चिरतरुण राहतात. संयुक्त अरब अमिरातीतील ‘दुबई’ ही अशी चिरतरुण जादुई नगरी आहे. सात वर्षांच्या अंतराने गतवर्षी नुकतेच दुबईला जाणे झाले आणि ही नवोन्मेषशाली नगरी अनेक नवीन, नवीन ठिकाणे व जुन्यांना नवेपणाचा साज लेवून भेटीला आली. आधीच्या सहलीत पाहिलेली जगातील पहिली ‘व्हर्टिकल सिटी’ बुर्ज खलिफा ही १६५ मजली उत्तुंग इमारत, जहाजाच्या शिडासारखे दिसणारे समुद्रातील ‘बुर्ज अल अरब’ हे सप्ततारांकित हॉटेल, वाळवंटातील ‘डेझर्ट सफारी,’ ‘धो क्रूझ’ नौकानयन, हत्तीची ‘ड्राय माऊंटीन्स’, प्रचंड मोठे मॉल्स हे सर्व पुन्हा पहायचे होतेच, पण त्याचबरोबर आत्ताची नवीन उभारलेली ठिकाणेही पाहायची होती.

जुन्या ठिकाणांपैकी एव्हरग्रीन ‘बुर्ज खलिफा’पासून ‘दुबई दर्शन’ला सुरवात केली. काळाच्या ओघात लोकांचे आकर्षण कायम राहावे म्हणून इथे अनेक आकर्षक बदल केलेले आढळले. अवाढव्य आठ मजली ‘कार पार्किंग’ शिवाय अतिरेकी कारवायांचा धोका लक्षात घेऊन जाण्याच्या-येण्याच्या मार्गिकांतही आता बरेच बदल झालेले आहेत. १२ हजार शिस्तबद्ध कर्मचारी ही सर्व व्यवस्था काटेकोरपणे सांभाळत असतात. धातुशोधक चाचण्या वगैरे घेऊनच पर्यटकांना गटागटाने आत सोडले जाते. अर्ध्या तासात सर्व पाहून आपण बाहेरही पडतो. या महाकाय इमारतीला ५७ इलेव्हेटर्स म्हणजे ‘लिफ्टस’ आहेत व आठ ‘एस्कलेटर्स’ म्हणजे सरकते जिने आहेत. पण काही कळायच्या आत आपण १२४ व्या मजल्यावर पोचतो आणि आख्ख्या दुबईचे विहंगम दृश्‍य पाहून हरखून जातो. बुर्ज खलिफाच्या प्रवेशपत्रिकेचे तिकीटही आता खूप आकर्षक केलेले आहे. त्यावर अनेक छोट्या सुंदर जाहिराती छापल्या असून, याच तिकिटावर ‘दोनदा सूर्यास्त’ पहा अशीही जाहिरात आहे. म्हणजे सायंकाळी जमिनीवरून सूर्यास्त पहा व लगेच इथल्या ‘लिफ्ट’मध्ये बसून १२४ व्या मजल्यावरून पुन्हा दुसरा सूर्यास्त पहा अशी संधी दिलेली आहे.

निसर्गाने दुबईला फक्त ७० किलोमीटर लांबीचाच समुद्रकिनारा दिलेला आहे. पण इथले राजेसाहेब शेख महंमद यांनी जगप्रसिद्ध वास्तुशास्त्रज्ञ वॉरेन पिकरींग यांच्या मदतीने १९९७ मध्ये समुद्रातच मूळ भूभागाला आठ पदरी रस्त्याने जोडून ‘पाम जुमेराह’ हे अवाढव्य बेट निर्माण केले आहे. या प्रकल्पातून देशाला २३ अब्ज डॉलर्सची संपत्ती निर्माण करता आली, असे राजेसाहेब अभिमानाने सांगतात. हा सगळा सागरकिनारा अहोरात्र रडार यंत्राच्या साहाय्याने निरीक्षणाखाली ठेवलेला आहे. पर्यटकांना अतिरेक्‍यांपासून पूर्ण संरक्षण दिलेले आहे. इथल्या किनाऱ्यावर शासनाने भाड्याच्या सायकली ठेवल्या असून, तेथील ‘सायकल ट्रॅक’वरून सायकलप्रेमींना मनसोक्त भटकंती करता येते. काही वर्षापूर्वी येथे सुरू झालेली मेट्रोसुद्धा पर्यटकांना खास आनंद देते.

गोल्फ क्‍लब जवळच्या ‘नखील’ मेट्रो स्टेशनजवळ पर्यटकांसाठी एक नवा प्रकल्प उभा रहात आहे. तेथे समुद्रात ३०० छोटी-छोटी बेटे तयार करून त्यावर मनोरंजन केंद्रे, हॉटेल्स वगैरे उभारणार आहेत. त्या दिवशी रात्री आम्ही दुबईचे नवे आकर्षण ठरलेले ‘दुबई कॅनॉल’ हे खास ठिकाण पहायला गेलो. सकाळी पाम जुमेरा या ठिकाणी लोकांनी समुद्रात शिरून निर्माण केलेली विस्तृत भूमी पाहिली होती. आता येथे निसर्गाने आधीपासून दिलेल्या भूमीत ‘कॅनॉल’ खोदून समुद्राला तीन किलोमीट पर्यंत आत आणलेले आहे. कॅनॉलच्या दुतर्फा मोठी झाडे लावून दुकाने, हॉटेल्स वगैरे उभारलेली आहेत. हा कॅनॉल साधारणपणे ३० मीटर्स खोल असून, त्यावर एक रुंद पूल बांधलेला आहे. पुलाच्या दोन्ही अंगांवरून पाण्याच्या पडद्यासारखे नियंत्रित केलेले पाणी धबधब्यासारखे अधूनमधून सोडले जाते. कॅनॉलमध्ये मध्यम आकाराच्या आरामदायी बोटी ठेवलेल्या असून, त्यातून तासाभराची चक्कर मारायला सध्या ५० देऱ्हाम (सुमारे आठशे-नऊशे रुपये) तिकीट ठेवलेले आहे. आपली बोट पुलाखाली आली, की तेवढ्या भागापुरता वरून पडणाऱ्या पाण्याचा धबधबा थांबतो व आपण पुढे गेलो, की तो पाण्याचा पडदा पुन्हा अखंडपणे वाहू लागतो. ‘दुबई कॅनॉल’मधली ही रात्रीची ‘वॉटर टॅक्‍सी’ पर्यटकांना खूप आनंद देऊन जाते.

सहलीचा तिसरा दिवस दुबईत नव्याने अवतीर्ण झालेले ‘बटरफ्लाय गार्डन’ व ‘मिरॅकल गार्डन’ पहायचे योजिले होते. त्याप्रमाणे सकाळी सकाळी फुलपाखरू उद्यान पहायला गेलो. दुबईसारख्या वाळवंटी प्रदेशात आणि अतिउष्ण हवामानात हे असले नाजूक प्रकल्प उभारणारे तेथील शासनकर्ते खरोखर धन्य आहेत.

सकाळी ९ ते सायंकाळी ६ हे उद्यान खुले असते. प्रवेशमूल्य ‘दुबई कॅनॉल’ प्रमाणेच ५० देऱ्हाम आहे. प्रवेशद्वार फुलपाखरांच्या आकाराचे असून त्याच्या मागच्या दोन पंखातूनच आपण उद्यानात प्रवेश करतो. हे प्रवेशद्वार मोझॅइक टाईल्सचे असून, त्यावर वाळलेल्या फुलपाखरांसारखे पंख वगैरे चिकटवलेले आहेत. या उद्यानात छोट्या-मोठ्या वृक्षांच्या छायेत अंतराअंतरावर ५ मोठे तंबू (‘डोम्स’) उभारलेले आहेत. फायबरग्लासच्या या प्रशस्त तंबूत विशिष्ट तापमानात फुलझाडे, लतावेली वाढवून त्यांत फुलपाखरांना मोकळे सोडलेले आहे. आपण तेथे फिरताना आपल्या अंगाखांद्यांवरूनही ती फुलपाखरे बागडत असतात. सर्व बाजूंनी तक्ते लावून फुलपाखरांच्या विविध जाती व त्यांची विस्तृत माहिती इंग्रजी व अरेबिक भाषेमध्ये दिलेली आहे. ही फुलपाखरे विशिष्ट हवामानात जगवून त्यांना त्यांचे खाद्य म्हणजे किडेमकोडे, वनस्पती पुरवून, पर्यटकांच्या अखंड वर्दळीत जगवून वाढवणे किती अवघड आहे, याची कल्पनाच केलेली बरी. 

दुसऱ्या क्रमांकाच्या तंबूत आपण जातो आणि आता अधिक फुलपाखरे उडताना दिसतात. काही ठिकाणी फुलपाखरांची प्रतिकृती ठेवून पर्यटकांची फिरकी घेतली जाते. येथे काही मोठी फुलपाखरे विश्रांतीसाठी म्हणून आपल्या अंगाखांद्यावरील रंगीत कपड्यांवर बसतात तेव्हा खूप मौज वाटते. तिसऱ्या तंबूत फुलांचे लांबलचक गालिचे आहेत. येथे प्रवेश केल्यानंतर अनेक जातीची फुलपाखरेही मोठ्या संख्येने उडताना दिसतात. जणू त्यांच्या घरातच आपण प्रवेश केला आहे असे वाटू लागते. आपल्या बरोबर आलेली लहान मुले, तर इथे इतकी आनंदून जातात, की पुढे जायचे नावच काढत नाहीत. सक्तीने त्यांना पुढच्या तंबूत न्यावे लागते. या उद्यानात एकूण १८९० प्रकारची छोटी-मोठी फुलपाखरे त्यांच्या जीवनप्रणालीसह जोपासलेली आहेत हे वाचून आपण स्तंभित होऊन जातो. शेवटच्या तंबूत काही कृत्रिम वृक्षही उभारलेले आहेत. त्यांच्या पानाफुलांवरही फुलपाखरे रुंजी घालत असतात.

येथे कोपऱ्यात एक उपाहारगृह असून, खाद्यपदार्थांचा आस्वाद घेत पर्यटक गप्पांत रंगलेले असतात. येथील एका पडद्यावर (स्क्रीन) फुलपाखरांची चित्रे व माहिती देणारी ‘फिल्म’ अखंड चालू असते.

फुलपाखरू उद्यानाशेजारीच ४ वर्षांपूर्वी ‘व्हॅलेंटाइन डे’च्या उत्साही पर्वात ‘मिरॅकल गार्डन’ हे आणखी एक नवे उद्यान इथे उभारण्यात आले. ७,२१,००० चौरस फुटावर उभारलेली ही अद्‌भुत नगरी पर्यटकांना दोन-तीन तास सहज खिळवून ठेवते. इथे येण्यासाठी गावातील ‘दुबई मॉल’पासून दर वीस मिनिटाला बससेवा उपलब्ध केली आहे. मिरॅकल गार्डनच्या शेजारील टेकडीवर रंगीबेरंगी फुलझाडांच्या सान्निध्यात झाडांचेच कटिंग करून पोपट, काकाकुवा यांच्या मोठ्या प्रतिकृती उभारलेल्या आहेत. या लक्षवेधी पक्षांच्या दर्शनानेच ‘मिरॅकल गार्डन’ची सुरवात होते. प्रवेशमूल्य प्रौढांसाठी ४० देऱ्हाम व ३ ते १२ वर्षांच्या मुलांसाठी ३० देऱ्हाम असे आहे. तीव्र उन्हाळ्यामुळे मे ते सप्टेंबर या कालावधीत हे उद्यान बंद असते. हे ‘मिरॅकल’ खरोखर डोळ्यांचे पारणे फेडते. मध्यवर्ती वर्तुळाकार प्रांगणाच्या कडेने दोन रस्ते दूरवर वृक्षवल्लरीत गेलेले दिसतात, तर मागील बाजूस रुंद पायऱ्यांचा एक प्रशस्त सोपान भव्य पक्षी ठेवलेल्या टेकाडावर गेलेला आहे. सुमारे २० पायऱ्या चढून गेले, की थोडी सपाटी व पुन्हा २० पायऱ्यांचा दुसरा सोपान चढून गेल्यावर आपण काकाकुआ, पोपट इ. त्या चार भव्य पक्षांच्या प्रतिकृतींपाशी पोहोचतो. तेथून ‘मिरॅकल गार्डन’चे विहंगम दृष्य खूप आनंद देते. या उद्यानातील मोठे ‘मिरॅकल’ म्हणजे टेकडीच्या एका बाजूला उंचवट्यावर ‘एमिरेटस एअरवेज’चे एक खरेखुरे प्रवासी विमान जिवंत फुलझाडांनी व्यापून सजवलेले आहे. ‘गिनेज बुक ऑफ वर्ल्डस रेकॉर्ड’ने या ‘मिरॅकल’ला मान्यता देऊन, तसेच त्यांचे सर्टिफिकेट (२ डिसेंबर २०१६) येथे लावलेले आहे. उद्यानातील इतर ‘मिरॅकल्स’मध्ये असेच एक जहाजही सजवून ठेवलेले आहे. हिरवळीच्या उतारावर ठेवलेले पानाफुलांचे एक मोठे घड्याळही लक्ष वेधून घेते.

 उद्यानाचा एक भाग ‘व्हिंटेज कार’च्या निमित्तानेही सजविलेला आहे. पुण्याच्या पेशवे बागेतील ‘फुलराणी’ सारखी एक छोटी रेल्वे गाडीही मुलांना सबंध गार्डनमध्ये फिरवून आणण्यासाठी ठेवलेली आहे. शिवाय मुलांसाठी एक स्वतंत्र बालोद्यान असून, त्यात झोपाळे, घसरगुंडीसह ‘मिरॅकल जंप,’ ‘ट्रॅम्पोलाईन पार्क,’ ‘स्प्रिंग प्लॅटफॉर्म्स’ असे आधुनिक क्रीडाप्रकारही आहेत.

उद्यानात फिरताना पर्यटकांच्या कुटुंबातील कोणाची चुकामूक झाल्यास ध्वनिवर्धकावरून त्यांच्या नावाच्या सूचनाही दिल्या जातात.

दुबईच्या या मायानगरीत अलीकडेच सामील झालेले ‘ग्लोबल व्हिलेज’ही पाहण्यासारखे आहे. तंत्रज्ञानामुळे जग इतके जवळ आलेले आहे, की त्याचे आता एक ‘व्हिलेज’ झालेले आहे. ही संकल्पना मान्य करून जगभरातले इंग्लंड, अमेरिकेपासून अनेक देश सामील होऊन त्यांनी आपले भव्यदिव्य ‘स्टॉल्स’ या ग्लोबल व्हिलेजमध्ये उभारलेले आहेत. आपापल्या देशातील वैशिष्ट्यपूर्ण वस्तू, पर्यटनस्थळे इ. चे प्रदर्शन त्यांनी मांडलेले आहे. आपल्या देशातील ‘कल्याण ज्वेलर्स’ने ‘स्पॉन्सरशिप’ म्हणून इथल्या प्रवेशपत्रिका छापून दिलेल्या आहेत. त्यावर ‘लकी ड्रॉ’ नंबर काढून दर आठवड्याला १ लाख देऱ्हामचे बक्षीसही दिले जाते.

फोटो फीचर

संबंधित बातम्या