सॅन डिएगोतील अग्निप्रलय

प्रमिला महाजनी 
शुक्रवार, 12 जानेवारी 2018

परदेश अनुभव
कॅलिफोनिर्यातील सॅन डिएगो शहराच्या इतिहासातील हा काळाकुट्ट दिवस होता. अक्षरशः काळा... जवळजवळ २०० फूट उंचीच्या ज्वाळांनी शहराला वेढले होतं. शहरातील लाकडी घर कापराप्रमाणे भुरुभुरु जळत होती. काळ्या कुट्ट राखेने आसमंत भरून गेला होता. शहराने जणू काही काळे ब्लॅंकेटच पांघरले होते. एरवी देदीप्यमान असणारा सूर्यही ग्रहण लागल्याप्रमाणे तांबूस दिसत होता.

आम्ही अमेरिकेतील ऑस्टिनमध्ये होतो. घरात दसऱ्याचे वातावरण.. आपण अमेरिकेत आहोत हे विसरायला लावणारे... अचानक फोन खणखणला. फोन उचलला आणि आगीची भीषण वार्ता कळली. फोनवर आनंद, माझा मुलगा बोलत होता. ‘आई, सॅन डिएगोच्या वाइल्ड फायरचं कळलं का? अशुभ बातम्या कधी खोट्या ठरत नाहीत. 

फोन खाली ठेवला आणि टीव्ही चालू केला. सीएनएन वरील दृश्‍य पाहून डोळ्यांवर विश्‍वासच बसेना! उंचच उंच आगीचे लोळ, झंझावाती वारा आणि धडाधड कोसळणारे पामची झाडे व घरे! समोर अग्निप्रलयच चालला होता जणू! आग आटोक्‍यात आणण्याचे आतापर्यंतचे प्रयत्न अयशस्वी झाले होते. आनंद बाल्टीमोरला गेला होता. एअरपोर्टवरुन त्यानं कॉल केला होता. सकाळीच त्याच्याशी बोलणे झाले होते. चार पाच तासात एवढी उलथापालथ? सॅन डिएगोत गौरी (माझी सून) छोट्या नातीसह एकटीच आहे ही जाणीव झाली आणि तिला फोन लावला. ती आणि तन्वी परिचितांच्या घरी गेल्याचं समजले. काय करावे? वाटले, आताच्या आता तिथे जावे. जिवाची घालमेल होत होती. पण हातात काही नव्हते. सीएनएन चॅनेलवरील बातम्या पाहून मन अधिकाधिक चिंतित होत होतं. घर रिकामं करण्याचा आदेश मिळाला होता. मुलाची कंपनीही त्याच भागात म्हणजे घरांबरोबर कंपनीही भस्मसात होणार की काय अशी काळजी वाटली. आता कुठे स्थिरस्थावर होतात ही मुले. महत्त्वाचे कागदपत्र गौरीने बरोबर नेल्याचे समजले होते. घराच्या इन्शुरन्सचे पेपर्स त्यात असतील का? शिवाय दागिने, किंमती वस्तू घरातच राहिल्या त्याचे काय? आणि घर गेल्यावर राहायचं कुठे? प्रश्‍नांची भेंडोळी उलगडत होती आणि काळजीची तीव्रता वाढत होती. ज्या परिस्थितीवर आपला ताबा नाही, त्या परिस्थितीत काय करावे? मन शांत कसं ठेवावं? आतापर्यंत केलेला गीताभ्यास उपयोगी पडला. सुखदुःखे समे कृत्वा, लाभालाभौ जयाजयौ! हे श्रीकृष्ण वचन आठवलं. एक मन सकारात्मक विचार करायला लागलं. या परिस्थितीत सर्वांत मोठा दिलासा होता की कोणाच्याही जीविताला धोका नव्हता. आमचं कुटुंब सुरक्षित होते. 

कॅलिफोनिर्यातील सॅन डिएगो शहराच्या इतिहासातील हा काळाकुट्ट दिवस होता. अक्षरशः काळा... जवळजवळ २०० फूट उंचीच्या ज्वाळांनी शहराला वेढले होतं. शहरातील लाकडी घर कापराप्रमाणे भुरुभुरु जळत होती. काळ्या कुट्ट राखेने आसमंत भरून गेला होता. शहराने जणू काही काळे ब्लॅंकेटच पांघरले होते. एरवी देदीप्यमान असणारा सूर्यही ग्रहण लागल्याप्रमाणे तांबूस दिसत होता. नेहमी स्नो फॉल अनुभवणाऱ्या अमेरिकनांना हा काळ्या राखेचा वर्षांव पहावा लागत होता. लॉस एंजेलिसच्या उत्तरेकडील ‘मलीबू’ भागात सुरू झालेला हा वणवा दीपाने दीप प्रज्वलीत करावा तसा आगी निर्माण करत सुटला होता. अडीच लाख लोकांना घरे रिकामी करायला सांगितले होते. लक्षावधी डॉलर्स किमतीची घरे भस्मसात होत होती. शहरातून बाहेर जाणाऱ्या वाटा वाहनांनी तुडुंब भरल्या होत्या. अग्निशामक दलाचे आणि पोलिस यंत्रणेचे प्रयत्न नामोहरम करीत अग्रिचं थैमान चालूच होते. १,४५,००० एकर जमिनीवर पसरलेला हा वणवा पॅसिफिक महासागराच्या दिशेने झेपावत होता. समुद्र तीरावरची चमचमती रुपेरी वाळूही  काळवंडली होती. पूर्वेकडील ॲरिझोनाच्या वाळवंटातून वाहणारे बेधुंद वारे आग अधिकच भडकावत होते. हे कोणत्याही भयपटातील दृश्‍य नव्हते, तर एक भयंकर वास्तव होते.

अशा जीवनमरणाच्या आणीबाणीत इथल्या स्थानिक लोकांनी ज्या जिद्दीने आणि धैर्याने या संकटाला तोंड दिले, ते प्रयत्न वाखाणण्याजोगेच होते. त्यासाठीच हा लेखप्रपंच! अर्ध्या तासाच्या अवधीत आगीनं ५० मैलाचं अंतर पार केलं होतं. आत्तापर्यंत ७०० ते ८०० घरांची आहुती पडली होती. तरीही या अग्रिकांडात मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या अगदी नगण्य होती हे आश्‍चर्य. आपल्याकडे अशा प्रसंगी किती बळी गेले असते याची कल्पना न केलेलीच बरी! काळूबाईच्या जत्रेत चेंगराचेंगरी होऊन मरण पावलेल्यांची संख्या नजरेपुढे तरळत होती. त्या पार्श्‍वभूमीवर इथल्या सुनियंत्रित प्रयत्नांना नक्कीच दाद द्यावी लागेल.

सर्वांत महत्त्वाचं होते ते बेघर लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवणे. पण कोणतेच ठिकाण संपूर्ण सुरक्षित नव्हते. कारण वाऱ्याची दिशा बदलली की आगीचा मोर्चा बदलत होता. शहरातील शाळा, मैदाने आणि बागा यांना तात्पुरते छावणीचे स्वरूप आले. कॉलकॉम स्टेडियम मोठे असल्याने बेघरांचे आश्रयस्थान झाले. यापेक्षा ही कठीण होते ते हॉस्पिटलमधल्या रुग्णांचे स्थलांतर. त्यांना योग्य ती वैद्यकीय सेवाही उपलब्ध करून द्यायला हवी होती. वाऱ्याच्या वेगाने पोलिस यंत्रणा काम करीत होती. वित्तहानी किती का होईना, प्राणहानी होता कामा नये या ध्येयाने सारी यंत्रणा कार्यान्वित झाली होती. अवघ्या चाळीस मिनिटात ५० हजार लोकांची सोय या क्वालकॉम स्टेडियमवर करण्यात आली. आश्‍चर्यानं तोंडात बोट घालावे अशी ही तत्परता! बरे बेघरांना नुसती जागाच दिली असे नव्हे तर झोपायला कॉट, गादी, पांघरून, टेबलखुर्ची आणि प्रत्येक कुटुंबाला एकेक टीव्ही देण्यात आला. खाण्यापिण्याची उत्तम सोय करण्यात आली. मॅकडोनाल्ड, पिझ्झाहट, सब वे अशा चेन रेस्टॉरंटनी अन्नपदार्थ विनामूल्य पुरवले. केवढी ही सामाजिक जाणीव. लोकांची शिस्तही प्रशंसनीय! धोक्‍याचा इशारा मिळताच १०/१५ मिनिटातच महत्त्वाचे दस्तऐवज घेऊन लोकांनी घर रिकामे केले. रस्त्यावरच्या ट्रॅफिकमध्येही लोकांनी शिस्त पाळली. कुठेही ओव्हरटेक करणे नाही की सिग्नल तोडणे नाही. या राष्ट्राच्या उभारणीत लोकांच्या नसानसांत भिनलेल्या या शिस्तीचा फार मोठा वाटा आहे हे पुन्हा एकदा आम्हाला पटलं. 

क्वालकॉम स्टेडियमवर मुलांसाठी खास व्यवस्था होती. अशा प्रकारे घर सोडल्यामुळे मुलांच्या मनावर मोठा आघात होणार हे जाणून त्यांना खेळणी, ड्रॉइंग पेपर्स आणि क्रेयॉन्स दिले. मग ही अजाण, निष्पाप मुले रंगाच्या दुनियेत हरवून गेली. 

सॅन डिएगोची ‘वाइल्ड ॲनिमल पार्क’ प्रसिद्ध आहे. हजारो जातीचे प्राणी आणि पक्षी येथे सुखेनैव नांदताना दिसतात. त्यातील अनेक जाती दुर्मीळही आहेत. वणव्याची आग या परिसराच्या जवळ येऊन पोचली होती. या मुक्‍या प्राण्यांचे स्थलांतर करणे गरजेचे होते. इथळे सेवक त्यांना वाचविण्यासाठी आटोकाट प्रयत्न करीत होते. खरं तर या सेवकांच्या घरांनाही आगीपासून धोका होता. कित्येकांची घरे आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याची खबर होती. कित्येकांची कुटुंबे निर्वासित होऊन स्थलांतरित झाली होती. काहींना आपल्या घराचं काय झालं हे ही कळेल नव्हतं. पण इतकं असतानाही हे सेवक प्राण्यांना वाचवण्याचा काम आत्मीयतेने करत होते. हे आपले काम, हे दुसऱ्याचं काम असा कोणताही भेद न ठेवता इथं प्राण्यांचं स्थलांतर चालू होतं. जणू इथल्या ‘सजीवांचं’ वेगळं कुटुंब होतं व सेवक त्याचा भाग होते. आपल्या कामाविषयी अशी निष्ठा ज्या देशवासीयांमध्ये आहे तो देश का नाही मोठा होणार?

तसं पाहिल तर सॅन डिएगोच्या रहिवाशांना अशा वणव्याचा अनुभव काही नवा नव्हता. शहराच्या पूर्वेकडील ॲरिझोनाच्या वाळवंटात या दिवसात कमी दाबाचा पट्टा निर्माण होतो. त्यामुळे उष्ण वारे वाहू लागतात. या वाऱ्यांना स्पॅन्टाॲना विंडस म्हणतात. सॅन डिएगोकडील पर्वत उतारावरून वाहताना तेथील हवा दबली जाते आणि गरम होते. त्यामुळे हवेतील आर्द्रता कमी होऊन शुष्कता वाढते. टेकड्यांवरील कोरडे गवत पेट घेते. चिंचोळ्या दऱ्यांमध्ये अशा प्रकारे आगीचे लोळ निर्माण होतात. वाऱ्यामुळे हा वणवा पसरत जातो. खरंतर ही नेहमी घडणारी भौगोलिक घटना. पण यावेळी हे वारे उष्णता आणि शुष्कपणा यांचे मिश्रण भलतेच संहारक होते म्हणून हा वणवा भीषण व अभूतपूर्व ठरला. 

निसर्गाच्या या कोपात हजारो घरे जळून गेली. मालमत्तेची अपरिमित हानी झाली. इन्शुरन्स कंपनीकडून त्याची थोडीफार भरपाई झालीही असेल. पण घराशी निगडित असलेल्या आंबटगोड स्मृती त्यांचं काय? घरामध्ये जपलेल्या भूतकाळाचं काय? हे नुकसान भरून येणारं होतं का? काल जिथे दिवाणखाना, शहयगृह, स्वैपाकघर होतं तिथं आज होता फक्त राखेचा ढीग! आपल्या घराची ही अवस्था बघून कोणत्या डोळ्यात पाणी तरळणार नाही? अग्निशामक दलाची तत्परता, हेलिकॉप्टरमधून मारलेले अग्निप्रतिबंधक फवारे या कशालाही दाद न देता अग्निदेवानं आपलं काम साधलं होते. 

अमेरिकेत या वेळी ‘थॅंक्‍स गिव्हिंग’ चा सण असतो. परमेश्‍वराने आपल्याला जे जे काही दिले त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस! आमच्या घराच्या परसदारी आलेली ही आग, घराला स्पर्शही न करता परत गेली होती. आम्ही नशीबवान ठरलो होतो. घरावर आलेले हे संकट टळल्याबद्दल आम्ही थॅंक्‍स गिव्हींगचा सण नक्कीच साजरा करणार होतो. पण ज्यांच्या डोक्‍यावरचं छप्परच अग्नीने हिरावून घेतलं होतं ते हा सण कसा आणि कुठे साजरा करणार? या विचारानं माझ्या काळजात कळ उठली, डोळे पाणावले. नाहीतरी त्यांच्यासाठी दोन अश्रू ढाळण्यापलीकडे माझ्या हातात काय होतं.

फोटो फीचर

संबंधित बातम्या