देखणा बल्लारी!

प्रांजल वाघ
सोमवार, 2 ऑगस्ट 2021

पर्यटन

मी बल्लारी किल्ल्याच्या पायरीवर पहिले पाऊल ठेवले अन् आ वासून ते देखणे रूपडे पाहतच राहिलो! किल्ल्याच्या महादरवाजातून आत गेल्यावर सरळ चढण सुरू होते. तटा-बुरुजाच्या पहाऱ्यात तुमचा प्रवास सुरू होतो आणि काही पावले पुढे गेल्यावर या किल्ल्याचे खरे बलस्थान समोर येते...

आंध्रमधल्या सकाळच्या कडक उन्हाची झळ सोशीत, वेडावल्यागत पाहिलेल्या घोरपड्यांच्या गुत्ती किल्ल्याची झिंग अजूनही डोक्यावर स्वार होती. तब्बल १३ दरवाजे आणि ४ टेकड्यांवर पसरलेल्या, १६ किमी परीघ असलेल्या गुत्तीने भलतीच भुरळ घातली होती. आत्मा तृप्त करणारा आंध्र स्टाइल टिफिन खाऊन, वर थंडगार ताकाचे प्याले रिचवून, ढेकर देत देत, धावतच बस पकडली आणि गरमा-गरम वाऱ्यावर ‘फिक्र को धुवे में’ उडवत आम्ही पाच पांडव बल्लारीच्या रोखाने सुसाट निघालो!

बल्लारी शहरात पोहोचायला आम्हाला साधारण दुपारचे साडे तीन वाजले. तीन तासांची बसची रपेट आणि प्रचंड गरमी यांनी डोके ठणकायला लागले होते. त्यामुळे सामान एखाद्या लॉजमध्ये टाकून, भार हलका करून किल्ल्यावर चढाई करावी असा बेत ठरला. खोलीत सामानाचा त्याग करून आम्ही रिसेप्शनला आलो, सहज म्हणून किल्ल्याची चौकशी केली, तेव्हा किल्ला संध्याकाळी साडे पाच वाजता बंद होतो, असे आम्हाला कळले. जेमतेम पावणे दोन तास हाताशी आहेत हे लक्षात येताच आम्ही त्या दिशेने धूम ठोकली. बाहेर एक रिक्षा उभी होतीच. त्या एकाच रिक्षात आम्ही पाचजण कोंबून बसलो. घासाघीस करण्याचा प्रश्नच नव्हता; इथे पैशापेक्षा जास्त महत्त्वाचा वेळ होता म्हणून रस्ता कापत आम्ही सुसाट निघालो! 

बल्लारीच्या किल्ल्याला दोन भाग आहेत. ‘लोअर फोर्ट’ आणि ‘अप्पर हिल फोर्ट’. सध्या लोअर फोर्टच्या दरवाजातून रस्ता आत जातो. आतील भागात वस्ती आहे. अप्पर हिल फोर्ट सध्या कर्नाटक पुरातत्त्व खात्याच्या अखत्यारीत आहे. सकाळी ८.३० ते संध्याकाळी ५.३०पर्यंत किल्ल्यावर प्रवेश सुरू असतो. किल्ल्याची देखरेख अत्यंत व्यवस्थित ठेवली जाते. गडमाथ्यावर सुरक्षारक्षकांची गस्त सुरू असते. गड खूपच स्वच्छ ठेवला जातो. गडावरील वास्तूदेखील सुस्थितीत आहेत. गडाखाली थंडगार पिण्याच्या पाण्याची सोय आहे, कचऱ्याचे डबे आहेत. एक लक्षणीय बाब ही आहे की गडावर कोणत्याही प्रकारचे हॉटेल, खाण्या-पिण्याच्या टपऱ्या किंवा दुकाने नाहीत! गडावर प्रवेश करण्यास प्रवेश शुल्क आकारले जाते आणि त्यातूनच (काही अंशी) येथील सुरक्षारक्षकांचे वेतन, साफसफाई, डागडुजी या साऱ्या गोष्टींचे व्यवस्थापन होत असावे. महाराष्ट्रातील काही किल्ल्यांवर हेच मॉडेल अनुसरता आले तर तिथली बरीचशी संवर्धनाची कामे अधिक गतीने होतील असा एक विचार मनाला चाटून गेला! 

मी किल्ल्याच्या पायरीवर पहिले पाऊल ठेवले अन् आ वासून ते देखणे रुपडे पाहतच राहिलो! कर्नाटकातील आणि आंध्रमधील डोंगर सह्याद्रीपेक्षा पूर्णतः वेगळे. आपल्याकडे कठीण बेसॉल्टचे उभेच्या उभे, अनगड कडे असतात. त्या निमुळत्या, नागमोडी, धारदार काळ्या कड्यांच्या डोईवर हिऱ्यासारखे अभेद्य दरवाजे आणि तटा-बुरुजांच्या झालरींनी सजवलेले शिरपेचच जणू अनामिक हातांनी मोठ्या शिताफीने बांधून काढले आहेत! शतकानुशतके ऊन, पाऊस, वाऱ्यासोबतच अनेक नैसर्गिक आणि मानवी आपत्तींना तोंड देत हे गड-कोट-दुर्ग आजही उभे आहेत. कन्नड देशात तुम्ही गेल्यावर सारा भूगोलच बदलून जातो! जेव्हा बेसॉल्टची जागा ग्रॅनाईट घेतो, गर्द झाडी आणि गच्च रान काटेरी झुडपांना वाट मोकळी करून देतात, उभे उभे चढ, सहज सोपे होऊन जातात तेव्हा समजून जायचे - आपले आगमन ‘नम्मा’ कर्नाटकात झालेले आहे! 

इतिहास हा भूगोलाच्या आधारे लिहिला जातो. ज्या राज्याला भूगोलाचे महत्त्व समजले नाही ते राज्य जास्त काळ टिकत नाही. सह्याद्रीतील किल्ल्यांवर अनेकदा तुटपुंजी तटबंदी आढळते कारण तिथे प्रत्यक्ष सह्याद्रीचा कडाच छातीचा अभेद्य कोट करून उभा असतो. भूगोलाच्या साथीने लढाऊ किल्ले बांधून म्हणूनच इतिहास रचला गेला. पण कर्नाटकातील ग्रॅनाईटचे डोंगर कमी उंचीचे, चढायला सुकर! नैसर्गिक संरक्षण तसे कमी! मग काय करावे? दगडाच्या भिंती-बुरूज-दरवाजे यांचा अक्षरशः चक्रव्यूह रचायचा! एकतर ते कवच फोडून शत्रू आत येणे महाकठीण आणि चुकून जर शत्रू आत आलाच तर त्याच्यावर चहूबाजूंनी तुफान मारा करण्याची इतकी चोख व्यवस्था करून ठेवायची की आत आलेला शत्रू जिवंत बाहेर जाणे निव्वळ अशक्यच. 

 अगदी तसाच हा बल्लारीचा किल्ला रचलेला पाहून मी केवळ थक्क झालो! किल्ल्याच्या महादरवाजातून आत गेल्यावर सरळ चढण सुरू होते. तटा-बुरुजाच्या पहाऱ्यात तुमचा प्रवास सुरू होतो आणि काही पावले पुढे गेल्यावर या किल्ल्याचे खरे बलस्थान समोर येते. ग्रॅनाईटच्या मोठाल्या पाषाणांची नैसर्गिक रचना वापरून, त्यांचेच बुरूज आणि छत करून, त्याखालून भुयारी मार्गच काढलाय आणि वरील दगडांच्या फटींमधून खालच्या शत्रुसैन्यावर बाण, दगड, गोळ्या यांचा तुफान वर्षाव करण्याची व्यवस्था करून ठेवलीय! हे कुणाचे अफाट डोके? 

वास्तविक बल्लारीचा प्रदेश मौर्य, सातवाहन, पल्लव, कदंब, कल्याणी चालुक्य, होयसळ इत्यादी राजवटींच्या अमलाखाली असलेला प्रदेश. त्याच राजवटींत तो भरभराटीला आला आणि समृद्ध झाला. पुढे विजयनगर साम्राज्याचा एक मांडलिक असलेला हनुमप्पा नायक याने हा बल्लारीचा अप्पर हिल फोर्ट बांधला. सोळाव्या शतकात तालीकोटच्या लढाईत विजयनगर साम्राज्याचा पराभव झाल्यावर हे नायक आदिलशाहीचे मांडलिक झाले. छत्रपती शिवरायांनी दक्षिण दिग्विजय मोहिमेत हा किल्ला जिंकून स्वराज्यात आणला. पुढे नायकांना तो किल्ला परत सुपूर्द करून त्यांना आपले मांडलिक केले. मराठा साम्राज्याचे आणि बल्लारीचे हे असे जवळच नाते आहे!

औरंगजेबाने १६८५मध्ये आदिलशाही संपवताना हा किल्ला जिंकला. त्याच्या मृत्यूनंतर निजामाचे प्रस्थ वाढू लागले. पण नायकांनी निजामाचे मांडलिकत्व नाकारले. निजामाने चाल करून बल्लारीचा ताबा घेतला. नायकांनी मदतीसाठी हैदर अलीकडे धाव घेतली. हैदर टपून बसलेलाच होता. त्याने बल्लारी किल्ल्यावर आक्रमण करून तो जिंकून घेतला, नायकांना मांडलिक केले. ही घटना साधारण १७६९ची. त्यानंतर टिपू सुलतानचा बाप हैदर अली याने फ्रेंच इंजिनिअर कामाला लावून हा किल्ला पुन्हा बांधून काढला. त्याचीच ही फलश्रुती! 

इतके सगळे दिव्य पार पडून जर शत्रू जिवंत वाचलाच तर समोर उभा ठाकतो तो एक भलामोठा अभेद्य असा महादरवाजा! आजही हा दरवाजा अगदी सुस्थितीत आहे! दरवाजावरील चर्या तर सुबक नक्षीकामाने सजवलेल्या आहेत. 

महादरवाजातून आत गेल्यावर विस्तीर्ण मैदानी पठार लागते - संपूर्णतः दगडी! आणि मधोमध उभा आहे तो बलाढ्य असा बालेकिल्ला! याच्या पायऱ्याची रचना फारच वेगळी आहे. दर तीन-चार पायऱ्या सोडल्या की एक रॅंप लागतो. बहुधा तोफा चढवण्यासाठी असावा. इतकेच नव्हे, आतील बुरुजावर तोफा चढवायला पण असेच रॅंप आहेत. पाश्चिमात्य संस्कृतींच्या संपर्कात आल्यामुळे भारतीय किल्ले स्थापत्यशास्त्रातील ही सुधारणा म्हणावी की जुन्या सिद्धांतांची उजळणी? कारण कौटिलीय अर्थशास्त्रात तटावरून रथ सहज धावतील इतके रुंद तट बांधावेत असे म्हटले आहे. त्यामुळे ते रथ वर चढवायला रॅंप आलेच! पण हैदर अलीने फ्रेंच अभियंत्यासोबत पूर्व-पश्चिम यांचा जो काही मेळ साधलाय या किल्ल्यावर त्याला तोड नाही! 

बालेकिल्ल्यात प्रवेश केल्यावर आपण जागीच थबकतो. कारण समोर उभी असलेली कचेरी/सैनिकांची राहण्याची इमारत आणि किल्लेदाराचा वाडा इतका ‘नवीन’ वाटतो की जणू कालच सैनिकांचे इथे वास्तव्य होते आणि आजच ते किल्ला उतरून खाली गेले आहेत. या कचेरी आणि वाड्याच्या मागे आहेत ते दगडातील नैसर्गिक खळगे वापरून तयार केलेले पाण्याचे साठे. बालेकिल्ल्यातच नव्हे तर किल्ल्याच्या पश्चिम आणि दक्षिणेकडील पाषाणी उतारावर असे अनेक खळगे वापरून पाण्याच्या टाक्या तयार करण्यात आल्या आहेत. उन्हाळ्यात किल्ल्यावर पाणी राहतेच पण बालेकिल्ल्याला काही प्रमाणात एका खंदकाप्रमाणे संरक्षणदेखील मिळते. वेळेअभावी माझी नजरचूकही झाली असेल कदाचित पण माथ्यावर आणखी कोणता बारमाही पाण्याचा साठ सापडला नाही. बल्लारी लोअर फोर्टच्या आवारात नक्की कुठेतरी एखाददुसरी बाव (बावडी) असायला हवी. कारण ‘पाण्याविना किल्ला न चाले! पाणी गेल्यास किल्ला दुष्मनाच्या हाती पडे!’

 बालेकिल्ल्याच्या दक्षिण दरवाजातून बाहेर पडले की मागे विस्तीर्ण दगडी पठारावर काही घरटी आणि एक ढासळलेले सुबक शिवमंदिर आहे. जाडजूड तटांचे संरक्षक रिंगण लाभलेले हे अवशेष मात्र बालेकिल्ल्यातील इमारतींपेक्षा कमी भाग्यवान म्हणावे लागतील. हे अवशेष पंचतत्त्वांचा मारा सहन करीत कसे बसे तग धरून उभे आहेत. वाईट वाटते ते ढासळलेल्या अवस्थेत असलेल्या शिव मंदिराकडे बघून – सुबक नक्षीदार बांधकाम आज मातीच्या ढिगाऱ्यात लुप्त होत चालले आहे. पुरातत्त्व खाते लवकरच तिथे लक्ष घालून त्याचा जीर्णोद्धार करेल ही आशा मनी बाळगून परत फिरलो. सूर्य क्षितिजाकडे झुकू लागलाय हे लक्षात येताच पावले भरभर पडू लागली आणि आम्ही मोर्चा किल्ल्याच्या पश्चिमेकडे वळवला. बालेकिल्ल्याला वळसा घालून विचारांच्या तंद्रीत किल्ल्याचे महाद्वार ओलांडून जवळ जवळ पायथाच गाठला. समोर गार्ड उभा होताच. त्याला म्हटले, ‘पाच मिनिटं दे बाबा, जरा बसवण्णा मंदिर बघून येतो!’ त्यानेही, ‘आरामात या! काही टेन्शन नाही!’ अशी हातानेच खूण केल्यावर आम्ही जरा जास्तच खूश झालो!  

बल्लारीच्या किल्ल्याच्या पायथ्याशी, छोट्या दगडी तटामध्ये टुमदार बसवण्णा मंदिर दिमाखात उभे आहे. संपूर्ण दगडी बांधकाम असलेले हे मंदिर आहे बसवण्णाचे. बसवण्णा म्हणजे शंभुमहादेवाचे वाहन, ‘नंदी’. कर्नाटकात अशी अनेक ठिकाणी बसवण्णा मंदिरे पाहायला मिळतात. बल्लारीचे मंदिर जरा खासच आहे. कुठे जास्त शिल्पकला नाही, कुठे जास्त नक्षीकाम नाही की कुठे कोरलेल्या पुराणकथा नाहीत! सूर्य क्षितिजाजवळ पोहोचत आलेला होता. पाय निघत नव्हता पण निघणे अपरिहार्य होते. आज बल्लारीचा किल्ला पाहून दोन वर्षे झाली. तरीही तिथला प्रत्येक चिरा स्पष्टपणे आठवतो. त्या किल्ल्याचे स्थापत्य वेड लावते. नुसता विचार करू जाता अंगावर रोमांच उभे राहतात!

संबंधित बातम्या