जयपूर ः एक नवा अनुभव...

प्रतिक जाधव, मुंबई
रविवार, 31 जानेवारी 2021

पर्यटन

मी  व माझे दोन मित्र कट्टर भटके. सुटी मिळाली की कुठेतरी जायचे, मनसोक्त भटकायचे. तेथील इतिहास व संस्कृती जाणून घ्यायची. तसेच तेथील भाषा, राहणीमान व पाककलेची माहिती घेत खव्वयेगिरी करायची. यातच आम्हाला असीम आनंद मिळतो. 

आम्ही तिघेही नोकरी करणारे परंतु जगभ्रमंतीचे स्वप्न बाळगणारे आहोत. सुरुवात आम्ही महाराष्ट्रापासून केली. संतांची व छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांची भूमी म्हणून जगभर ख्याती असलेला महाराष्ट्र बराचसा पिंजून काढला. खरे तर आम्हाला राजा- महाराजांच्या जीवनशैलीचे विशेष अप्रुप वाटते. त्यांचा थाट अनुभवता येत नसला तरी तो त्यांच्या पाऊलखुणांनी, वास्तूंनी अनुभवता यावा यासाठीच आमचा प्रयत्न असायचा. त्यांची रेशमी वस्त्रप्रावरणे, विशिष्ट बनावटीचे दागिने, खान-पान, छंद व पराक्रम या गोष्टींचे नेहमीच कुतूहल वाटे. 
यावेळेस मात्र आम्ही मोठी मजल मारायचे ठरवले. मोठा

नकाशा उघडून बसलो. शिक्षणानिमित्त दक्षिण भारतात असल्यामुळे मला यावेळेस नवी संस्कृती पाहायची होती. उत्तर भारताचा इतिहास फारच संपन्न आहे. आम्हाला राजा-महाराजांची भूमी असलेला राजस्थान खुणावत होता. एकमताने राजस्थानला जायचे ठरले. राजस्थान राज्य मोठे असल्याने तसेच त्याचा इतिहास विस्तीर्ण असल्याने सुरुवात कुठून करावी हेच कळत नव्हते. इतिहासाने नटलेल्या राज्याची सुरूवात आम्ही राजधानी जयपूरपासून करायची ठरवली. 

राजस्थानमधल्या थंडीची मजा काही औरच. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात जायचे ठरले. कंपनीतून एक आठवड्याची रजा घेतली. शनिवारी अर्धा दिवस भरून घरी येतानाच थोडेफार सामान घेतले व संध्याकाळी ट्रेनमध्ये बसलो. प्रवासात वेळ वाया जाऊ नये म्हणून बहुधा आम्ही असाच प्रवास करतो. त्यामुळे बराच वेळ वाचतो. जयपूर तसे फिरण्यासाठी कमालच आहे. पण त्याआधी आम्ही रणथंबोरला जायचे ठरवले. जयपूरच्या वाटेतच सवाई माधोपूर रेल्वे स्टेशन येते. तेथून रेल्वेने जयपूरपर्यंतचे अंतर फक्त दोनच तासांचे होते. आम्ही आधी रणथंबोर राष्ट्रीय उद्यानाला भेट द्यायचे ठरवले होते. त्यानुसार आधीच टायगर सफारीची बुकिंग करून ठेवली होती.

सकाळी साडेदहाच्या सुमारास आम्ही पोहोचलो. स्टेशनपासून काही अंतरावर व जंगलाच्या जवळच मोठाले बंगले होते. त्याचाच काही भाग हॉटेलसाठी वापरात होता. प्रवास थकवणारा असल्याने आम्ही त्यादिवशी आराम करायचे ठरवले. रात्री कडाक्याची थंडी पडली होती, भूकही लागली होती. हॉटेल शाकाहारी असल्याने आमचा जरासा हिरमोड झाला; परंतु पर्यायही नव्हता. टेरेसवर जेवणाची सोय झाली. ट्रिपला आलेले असताना पहिल्यांदाच आम्ही शाकाहारी जेवण जेवणार होतो. गट्टे की सब्जी, मिस्सी रोटी व बाकीचे अस्सल राजस्थानी जेवण इतके रूचकर होते की आम्ही त्यावर अक्षरशः आडवा हात मारला. अखेर जेवून तृप्त झालो. 

दुसरा दिवस उजाडला. सफारीची वेळ जवळ येत होती. स्टेशनपासून हॉटेलवर ज्या रिक्षावाल्याने सोडले होते त्यानेच आम्हाला उद्यानाच्या गेटपर्यंत सोडले. त्याच्याशी आमची आता मैत्री झाली होती. माझी उत्सुकता वाढत होती. मी याआधी जंगली प्राणी कधीही असे मोकळे पाहिले नव्हते आणि वाघ तर नाहीच नाही. रणथंबोरचे उद्यान वाघांसाठी प्रसिद्ध आहे. जीप नंबर मिळताच आम्ही जीपमध्ये जाऊन बसलो. आमच्यासोबत तीन परदेशी पर्यटक होते. यावरूनच जागेची ख्याती लक्षात येते. गाडी जंगलाच्या दिशेने निघाली. जसजशी गाडी पुढे जात होती तसतशी शांतता वाढत होती. थोडा भीतीने घसाही सुकत होता कारण सफारीत वाघाच्या हल्ल्यांच्या घटनाही घडतात, असे आम्ही ऐकून होतो. जंगलाचे स्वतःचेच संगीत असते. झुळझुळणारे पाणी, पक्ष्यांचा मधुर आवाज, सरसरणारी पाने व रातकिड्यांचा आवाज असे मिश्र आवाज ऐकू येत होते. 

आमची जीप थांबली. समोरच हरणांचा एक मोठा कळप होता. मी हे सगळे पहिल्यादांच अनुभवत होतो. कॅमेरामध्ये सर्व टिपत होतो. पुढे काही अंतरावर खूप मोर- लांडोर एकत्र दिसले. जणू त्यांची मैफिलच जमली होती. त्यांचे विविध रंग म्हणजे निसर्गाची किमयाच. हिरवी, पिवळी, गुलाबी, तपकिरी रंगाची झाडांची पाने वेगळ्याच दुनियेत आल्याचे भासवत होते. पुढे काही अंतरावर एक तलाव होता. तिथे वाघ व अन्य प्राणी कधीतरी पाणी पिण्यासाठी येत असतात. कोणालाही त्या जंगलात पायी फिरण्याची परवानगी नव्हती. आम्ही तलावापाशी गेलो. तो कमळाच्या फुलांनी भरलेला होता. कोवळ्या उन्हामुळे चमकणारा तो तलाव एखाद्या स्वप्ननगरीत असल्यासारखा भासत होता. थोडी विश्रांती घेऊन आम्ही पुढे निघालो. बरेच अंतर कापल्यावर वाघोबांच्या पायाचे ठसे दिसले. गाईडच्या मते ते ताजे होते. काही वेळ शांत राहून आम्ही वाट पाहिली. वाघोबा तेथे नसावेत असे मानून जीप पुढे सरकली. आता सन्नाटा वाढत होता. आम्ही मोकळ्या मैदानात येऊन पोहोचलो आणि गाईडची नजर वाघोबांवर पडली. जीपपासून दूरवर दोन वाघ दिसले. लांब असल्याने त्यांची हालचाल दिसली नाही. वेळ मर्यादित असल्याने जीप परत फिरली. वाघोबांचे दर्शन जवळून न झाल्याने जरा वाईटचे वाटले. पण पुढच्या दिवशी जयपूरला जायची ओढ होतीच. 

पुढच्या दिवशी सकाळी ट्रेनने जयपूर गाठले. बाहेर पडताच हा एक नवा अनुभव असणार असे वाटू लागले. बरीच शोधाशोध केल्यावर हॉटेल मिळाले. कपडे बदलून बकेट लिस्टमधील पहिलं ठिकाण हवामहलच्या दिशेने निघालो. आतापर्यंत फोटोमध्ये पाहिलेला तो महाल बाहेरून बघताच मी चक्रावून गेलो. आता राजस्थानमध्ये आल्यासारखे वाटत होते. त्याचे विशिष्ट शैलीचे बांधकाम व श्रीकृष्णाच्या मुकुटाचा आकार भारावून टाकणारा होता. महाराजा सवाई प्रतापसिंह यांनी १७९९ मध्ये बांधलेला होता तो महाल अतिशय भव्य आहे. या महालाला आकाराने लहान व रंगीत काचा असलेल्या ३६५ खिडक्या आहेत. महालात अनेक मंदिरे आहेत व महाराजांचे खासगी प्रतापमंदिर आहे. त्याकाळी सिटी पॅलेसला जाण्याचा तो मार्ग होता. राजपरिवारातील स्त्रिया, दासी खिडकीमध्ये सवारी बघण्यासाठी येत असत. हवामहलच्या चारही बाजूला बाजार आहे. तिथेच ‘घेवर’ही प्रसिद्ध मिठाई चाखली. 

दुपारपर्यंत हवामहल पाहून आम्ही सिटी पॅलेसला निघालो. रस्त्यांमध्ये छोटी- मोठी द्वारे येत होती. आता तिथे पक्के रस्ते आहेत; परंतु त्याकाळी तो रस्ता मातीचा असावा. आत शिरण्याआधी एक भव्य दरवाजा आहे. त्यावर सुरेख नक्षीकामही केलेले आहे. त्या भव्य परिसरात प्रवेश करताच महाराणी गायत्रीदेवी यांचा पॅलेस दिसतो. परंतु मधे एक मोठी भिंत आहे. तिथे जाण्यासाठी वेगळे तिकीट लागते. पॅलेसमध्ये राजपरिवार अजूनही वास्तव्यास आहे. तो सोडून पॅलेसचा उरलेला भाग पर्यटकांना पाहता येतो. (अर्थात त्यालाही तिकीट आहे, बरं का) पॅलेसच्या भिंतीवर, छतांवर केलेले बारीक नक्षीकाम, त्याची विशालता, भव्य द्वार, त्यातल्या छोट्या- मोठ्या खोल्या, झुंबर यावरून तिथल्या ‘रॉयल’ जीवनशैलीचा अंदाज येत होता. सिटी पॅलेसच्या परिसरात मनसोक्त फिरल्यावर संध्याकाळच्या सुमारास आम्ही पुन्हा हॉटेलवर परतलो. थंडीसोबत आता ट्रिपलासुद्धा रंग चढला होता. 

दुसऱ्या दिवशी सकाळी आमेरचा किल्ला पाहण्यासाठी पोहोचलो. गाडीतून बाहेर पडताच लक्षात आली ती त्या किल्ल्याची डोळ्यांत न मावणारी भव्यता. त्या प्रशस्त पॅलेसवर पडलेली सूर्याची किरणे त्याचे सौंदर्य अजूनच वाढवत होती. आम्ही चढणीला लागलो तसा किल्ला मोठा होत आहे असा भास होत होता. मुख्य दरवाजापाशी पोहोचल्यावर तिथून मखमली कपड्यांनी सजवलेले चार हत्ती कान हालवत खाली उतरत होते. त्याकाळी राजपरिवार हा मार्ग वापरत असे. बाकीच्या स्वाऱ्यांसाठी वेगळा रस्ता असे. यावरून त्यांच्या उदात्त जीवनशैलीची प्रचिती येते. इ.स. १५९२ मध्ये महाराजा मानसिंग पहिले यांनी या परिसरावर राज्य केले. डोंगरांनी वेढलेल्या या किल्ल्याला शत्रूला सहजासहजी पोहोचता येऊ नये अशी तटबंदी आहे. आतूनही तो इतका प्रशस्त आहे की एका नजरेत संपूर्ण किल्ला डोळ्यांमध्ये सामावून घेणे केवळ अशक्य. तिथला शिशमहाल तर अतिशय सुंदर व कोरीव आहे. रात्री दिव्यांच्या उजेडात तो काजव्यांसारखा लुकलुकतो, असे तिथल्या गार्डने सांगितले. वर पोहोचल्यावर पॅलेस समोरील तलाव मोहून टाकतो. त्याकाळी तो पॅलेससाठी पाण्याचा मुख्य स्रोत असे. किल्ल्याला चारही बाजूने वेढणारे डोंगर छाती ताणून पहारा देत उभे आहेत असे वाटते.तेथूनच आम्ही जयगड किल्ल्यावर गेलो. तिथे जगातली सर्वात मोठी तोफ पाहण्याचा योग आला. जयगड किल्ल्यावर ‘पद्मावत’ या चित्रपटाचे शूटिंगदेखील झले आहे. सूर्य मावळताना वाटेत आम्ही जलमहाल पाहिला. त्याकाळी राजा व राजपरिवार तिथे एकांतासाठी जात असे. तो खासगी असल्याने तेथे मात्र जाता आले नाही.

नंतरचा टप्पा होता नाहरगड. तिथेसुद्धा अस्सल राजस्थानी संस्कृतीचे दर्शन झाले. गडाखालील दृष्य खूपच सुखद होते. काही वेळ आम्ही अल्बर्ट हॉल म्युझियमसाठी दिला. तिथे खेळ, संगीत, मूर्तिकला, विणकाम इत्यादी कलांविषयी बरीच माहिती मिळाली. हजारो वर्षे जुनी शिल्पेही पहायला मिळाली. 

शेवटचा दिवस आम्ही प्रसिद्ध बापू बाजार येथे खरेदीसाठी राखून ठेवला होता. दिवसभर भरपूर खरेदी करून झाल्यावर शेवटचा दिवस असल्याने पुन्हा हवामहलला भेट दिली. दिव्यांच्या प्रकाशात तो सोनेरी मुकुटासारखा दिसत होता. तिथे काही वेळ घालवून आम्ही हॉटेलमध्ये परतलो. परतीच्या प्रवासाला निघण्याची वेळ जवळ येत असल्याने थोडे उदास वाटत होते. पण जयपूरची ट्रिप मनासारखी झाल्याचे समाधानही होते. हा अनुभव खूप सोनेरी आठवणी देऊन गेला. पुढची ट्रिप जोधपूर, उदयपूर करणार हे नक्की!

संबंधित बातम्या