केबेकचा हेरिटेज वॉक

प्रतिमा प्रदीप दुरुगकर
शनिवार, 13 जानेवारी 2018

पर्यटन विशेष
कॅनडाची टूर केबेकला भेट दिल्याशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. सेंट लॉरेन्स नदी ज्या ठिकाणी अरुंद होते, त्या ठिकाणी एका उंच कड्यावर गाव वसले आहे.

कॅनडाची टूर केबेकला भेट दिल्याशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. उत्तर अमेरिकेत प्रचंड विस्तीर्ण पात्र असलेली सेंट लॉरेन्स नदी ज्या ठिकाणी अरुंद होते, त्या ठिकाणी एका उंच कड्यावर अगदी छान नैसर्गिक कोंदणात हे ऐतिहासिक आणि तितकेच रोमॅंटिक गाव वसले आहे. 

नदीकाठावरील प्रचंड निळसर खडकाने केबेकचे दोन भाग झाले आहेत. वरचे केबेक आणि खालचे केबेक.’ royale’ हा लोअर टाऊनमधील भाग उपखंडातील अतिशय जुना डिस्ट्रिक्‍ट आहे. गव्हर्मेंटने तेथील जुन्या इमारती काळजीपूर्वक जतन केल्या आहेत. आणि त्यामुळेच  युनेस्कोने  ‘vieux quebee’ (जुने केबेक) हे जागतिक वारसा स्थळ घोषित केले आहे. सतराव्या शतकात सर्वांत प्रथम येथे फ्रेंच वसाहतवादी, फरचे व्यापारी व मिशनरी लोक ‘न्यू फ्रान्स वसवण्यासाठी आले.  

नदीकाठच्या पायऱ्या पायऱ्यांच्या या गावात फिरायला मजा येते. अप्पर टाऊन आणि लोअर टाऊन जोडण्यासाठी लोखंडी जिने आणि एस्कलेटर आहेत. लोअर टाऊन मध्ये आपण ‘फ्रेंच सभ्यता’ अनुभवतो. तर अप्पर टाऊन मध्ये ब्रिटिशांचा प्रभाव जाणवतो. केबेक मी प्रथम पाहिले सिटाडेलच्या मनोऱ्यावरुन. फ्रेंचानंतर आलेल्या ब्रिटिशांनी हा ‘सिटाडेल’ (स्टारच्या आकाराचा किल्ला) बांधला आहे. येथून वरच्या आणि खालच्या केबेकचा नजारा फार छान दिसतो. पलीकडे वाहणारी विस्तीर्ण समुद्रासारखी भासणारी सेंट लॉरेन्स नदी, तिच्या तीरावरील खालच्या केबेकमधील कौलारू घरांची रंगीबेरंगी छपरे, नदीकाठाने जाणारा उताराचा रस्ता ‘terrasse dufferin upper town चौक, बागा, स्मारके, गजबज, लगबग आणि येथून मला दिसलेले ‘fairmon le chateau front enac’ हे हेरिटेज हॉटेल. हिरव्या रंगाचे तांब्याच्या छपराचे, अप्रतिम आर्किटेक्‍चरचे हे देखणे शिल्प नजर खिळवून ठेवणारे आहे. हा पूर्वी फ्रेंचांचे लष्करी मुख्यालय असलेला किल्ला होता. 

आम्ही नदीवरील ‘आल्हाददायक बोचरे’ वारे अंगावर घेत मुख्य चौकात आलो. येथूनच आम्ही वैशिष्ट्यपूर्ण लोखंडी जिन्याने खालच्या केबेकमध्ये उतरणार होतो. पण त्यापूर्वी या चौकातील ‘rue du tresor’ या अरुंद गल्लीत आम्हाला जायचे होते. ही गल्ली ‘कलाकारांची गल्ली’ म्हणून ओळखली जाते. अनेक कलेच्या वस्तूंची दुकाने, रस्त्यावर कलावस्तूंची विक्री करणारे दुकानदार, पोट्रेट काढत बसलेले चित्रकार, वाद्ये वाजविणारे वादक यांनी ही गल्ली गजबजून गेली होती. आम्ही आत शिरलो. कलेचे विविध नमुने बघत पुढे निघालो. एके ठिकाणी खूप वेगळे तंत्र वापरून काढलेले पेंटिंग्ज दिसले. चौकशी केली तेव्हा ते ‘copper etching aquatint technique’ आहे असे समजले. आता आम्ही मागे वळून पुन्हा चौकात आलो आणि पोचलो ’escatier casse cou‘ जवळ. वरच्या आणि खालच्या केबेक शहराला जोडणारा हा जिना १८९३ मध्ये सिटी आर्किटेक्‍ट चार्ल्स बेलरिग यांनी बांधला. याला ’ब्रेकनेक’ म्हणतात. १७० पायऱ्यांचा हा वैशिष्ट्यपूर्ण जिना १७ व्या शतकातील जिन्याच्या जागी बांधला आहे. जुन्या जिन्याचे काही अवशेष बाजूला जतन करून ठेवले आहेत. ते आम्ही जवळ जाऊन बघितले. आणि जिना उतरण्यास सुरवात केली. हा काही सरळ खाली येणारा जिना नाही. तो दिशा बदलतो. मध्येच तुटतो. पुढे सपाट जागा लागते, मधेच खालच्या रस्त्यावरील पूल येतो. मग जिना दिशा बदलून वेगळ्याच दिशेने तुम्हाला खाली घेऊन जातो. जिना संपला आणि आम्ही थांबलो. उजव्या बाजूला दिसले केबेकमधील सर्वांत जुने घर. १६८३ मधे आलेल्या पहिल्या फ्रेंच माणसाचे हे घर !  आता आमच्या उजव्या बाजूला जुने घर होते. समोर एक सरळ गल्ली उतरत नदीला समांतर पुढे गेली होती, तर डाव्या बाजूला एक सुंदर रस्ता नदीकडे गेला होता. रस्त्याच्या दोन्ही बाजूला कलात्मक सजविलेली फ्रेंच पद्धतीची दुकाने आहेत. या रस्त्याचे नाव आहे rue du petil nmomplain. या रस्त्यावर त्याकाळी महत्त्वाची व्यापारी केंद्रे होती. आणि श्रीमंत व्यापाऱ्यांची घरेसुद्धा. प्रत्येक बुटीक, कॅफे यांची रचना, लाकडी दारे, खिडक्‍या, रंगसंगती अप्रतिम आहे. फ्रेंच प्रभाव सर्वत्र जाणवतो. तेथे आम्ही खूप फोटो काढले. हा रस्ता संपला आणि यू. टर्न घेऊन आम्ही खालच्या केबेकच्या सर्वांत खालच्या नदीतीरावरील रस्त्यावर आलो. आता नदीवरील बोचरे वारे जास्त जाणवू लागले. मे महिन्यातही हवा थंड होती. हिवाळ्यात तर केबेक पूर्ण गोठलेले असते. गावाने बर्फाचे ब्लॅंकेट पांघरलेले असते आणि लॉरेन्स नदीवर बर्फाचा पातळ थर जमतो. तेव्हा केबेक ‘चित्रातील देखणे गाव’ बनते. 

आता या रस्त्यावर आम्ही पोहोचलो. maison chevalier जवळ १७५२ मध्ये बांधलेली ही भव्य हवेली न्यू फ्रान्समधील क्‍लासिक फ्रेंच आर्किटेक्‍चरचा उत्तम नमुना आहे.  

यानंतर आम्ही पोहोचलो ’प्लेस रॉयल’ (place royale) येथे. हा भाग म्हणजे केबेकच्या कोंदणातील हिराच आहे. १६०८ मध्ये (samuel de chaplain) सॅम्युअल दि चॅप्लिन या फ्रेंच वसाहतवाद्याने या भागाचे महत्त्व ओळखून त्याने ’प्लेस रॉयल’ या ठिकाणी किल्ला बांधला. नंतर हा भाग फरचे आणि जहाज बांधणीचे मोठे व्यापारी केंद्र बनला. पुढे ब्रिटिशांनी १७५९ मध्ये फ्रेंचाचा पराभव केला. ब्रिटिश आले आणि त्यांची व्यापारी वृत्ती आली. आता येथील व्यापार फळफळला. येथील त्या काळातील अतिश्रीमंत व्यापाऱ्यांची घरे खूप छान आहेत. सॅम्युअल दि चॅप्लिनचे १६०८ मध्ये बांधलेले घर आता ‘चर्च’ बनले आहे. त्याचे नाव आहे eglise notre dame des victoires (our lady of victory church.) याच चौकात एक काळे पांढरे भौमितिक आकाराचे शिल्प लक्ष वेधून घेते. त्याचे नाव आहे ‘dialogue avec i`histoire’ (इतिहासाशी संवाद) किती अर्थपूर्ण नाव! येथे फ्रेंच प्रथम उतरले म्हणून फ्रान्सने केबेकला दिलेली ही भेट आहे. 

आता आम्ही आमच्या हेरिटेज वॉकच्या शेवटच्या टप्प्यावर आलो होतो. सूर्यास्त झाला होता. आम्ही vieux port de quebec वर उभे होतो. ७२ एकर जागेत पसरलेले, १७ व्या शतकातील ते बंदर न्याहाळत आम्ही बराच वेळ लॉरेन्स नदीकाठी थांबलो. माझ्या कल्पनेत त्या बंदरात फ्रेंच जहाजे आली, फ्रेंच पेहरावातील खलाशी, व्यापारी, नोकर आले. जहाज बंदराला लागले. फर, मासे इ. सामान बंदरावर उतरू लागले. त्यांचा फ्रेंच भाषेतील गलबला ऐकू येऊ लागला. केबेक त्या काळात कसे वाटत असेल ते मी माझ्या कल्पनेतच रेखाटले आणि त्यात रमले. 

फोटो फीचर

संबंधित बातम्या