पेलिंगच्या धुक्‍यात.....

प्रा. मुक्ता गरसोळे-कुलकर्णी, पुणे 
शुक्रवार, 17 ऑगस्ट 2018

पर्यटन
‘सकाळ साप्ताहिक’मध्ये पर्यटन या सदरासाठी लेख पाठविण्याचे आवाहन वाचकांना करण्यात आले आहे. या आवाहनाला प्रतिसाद देताना वाचकांनी पाठविलेले लेख प्रसिद्ध करीत आहोत.

हिमालयाच्या कुशीत वसलेले सिक्कीम राज्य हे पर्यटकांचे लाडके राज्य! हिमालयाचे लाभलेले सान्निध्य, आगळीवेगळी लोकसंस्कृती, बौद्ध धर्माची वैशिष्ट्यपूर्ण प्रार्थनास्थळे, उंचचउंच डोंगररांगा, बारमाही वाहणाऱ्या नद्या यामुळे या भागात फिरताना निसर्गाची वेगवेगळी रूपं सतत दिसत राहतात.

सिक्कीममध्ये सर्वत्र डोंगरातले वळणावळणाचे रस्ते असल्याने दोन ठिकाणांमधले अंतर आपल्याला किलोमीटरच्या हिशेबात कमी वाटले, तरी पोचायला मात्र भरपूर वेळ घेणारे असते. अर्थात सोबत असणारे गर्द, हिरव्या झाडांनी इंचन्‌ इंच व्यापलेले डोंगर, त्यातून धुक्‍याचे पसरलेले पडदे असल्याने वळणावळणाचा प्रवास कधीच कंटाळवाणा वाटत नाही. उलट व्यक्तिशः माझा अनुभव असा, की या रस्त्यांनी, हिरव्यागार वाटेने आणि शांततेने मला मात्र अंतर्मुख केले. निसर्गाच्या या भव्यदिव्य सौंदर्यामुळे आपण मात्र नतमस्तक होतो, हेच खरे.

हिमालयातील गंगटोकच्या निसर्गरम्य दर्शनानंतर मनाला आणि शरीराला सुखावणारी प्रसन्नता आपल्याला सतत जाणवत राहाते. आणि याच प्रसन्नतेत भर घालणारे आपले पुढचे ठिकाण असते ‘पेलिंग’ एक छोटेसे, छानसे, टुमदार, डोंगरांच्या कुशीत लपलेले गाव. तत्पूर्वी गंगटोकवरून पेलिंगला जाण्याच्या रस्त्यावरही २, ३ अल्पपरिचित ठिकाणे आम्हाला बघता आली. 

गंगटोकपासून पेलिंगला जाण्यासाठी निघाल्यापासून सुमारे दीड तासानंतर आपण ‘नामची’ या ठिकाणी पोचतो. जे ठिकाण आपल्याला एकाच ठिकाणी, एकत्रितपणे चारधामांचे आणि बारा ज्योतिर्लिंगाचे दर्शन घडवते. काही एकरांमध्ये पसरलेल्या या विस्तीर्ण जागेमध्ये भारतातील द्वारका, रामेश्‍वर, जगन्नाथपुरी आणि बद्रिनाथ या चारही दिशांच्या चार पवित्र धामांच्या हुबेहूब प्रतिकृती बनवल्या आहेत हे विशेष! आणि या केवळ प्रतिकृती नाहीत तर त्या-त्या मंदिरात त्या त्या देवतांचीही प्राणप्रतिष्ठा केली असून गाभाऱ्यात गुरुजींचे सतत मंत्रपठण चालू असते. त्यामुळे हे स्थान केवळ पर्यटनस्थळ वाटत नाही तर ते पुण्यपवित्र तीर्थस्थानाची अनुभूती येते. याशिवाय भारतातील १२ ज्योतिर्लिंगाची १२ मंदिरे पण याच परिसरात उभारली असून, त्या-त्या स्थानाचे दर्शन घेऊन आपण या बाराही स्थानांच्या एकत्रित दर्शनाचे पुण्य पदरात पाडून घेऊ शकतो. या सर्व मंदिरांच्या मध्यभागी कर्नाटकातील मुर्डेश्‍वर येथील शंकराच्या भव्य मूर्तीची उभारलेली प्रतिकृती पण लक्षवेधक आहे. याच मूर्तीच्या खालच्या बाजूला एका हॉलमध्ये शिव अवतारातील सगळे प्रसंग भिंतीवर कोरलेले आहेत.

हा संपूर्ण परिसरच अत्यंत स्वच्छ, देखणा, भव्य विस्तीर्ण आणि माहितीपूर्ण आहे. म्हणूनच या ठिकाणच्या पवित्र अशा देवदर्शन आणि हिरव्या निसर्गदर्शनामुळे आपल्याला आनंद, प्रसन्नता आणि भक्ती यांची एकत्रित अनुभूती आल्याशिवाय रहात नाही.

हिमालयातील चारधाम आणि बारा ज्योतिर्लिंगांच्या एकत्रित दर्शनानंतर आपण पेलिंगच्या दिशेने परत निघतो. संपूर्ण सिक्कीम राज्यात मला अतिशय भावलेली एक गोष्ट म्हणजे रस्त्याच्या कडेकडेने आणि प्रत्येक घराच्या बाल्कनीतून डोकावणारी विविधरंगी, मोहक फुले. या फुलांचे रंग, आकार आणि वैविध्य इतके, की इथे पाहू का तिथे अशी अवस्था होऊन जाते. फक्त गुलाबच नाहीत तर साध्या रानटी फुलांचेही आकार, रंग नुसते बघत रहावेसे वाटतात. आणि गाडीतून उतरून या फुलांबरोबर आपलाही फोटो काढून घेण्याचा मोह आवरत नाही.

यानंतर अर्ध्या तासाच्या प्रवासानंतर आपण १६१ फूट उंचीच्या पद्‌मसंभवाची मूर्ती बघण्यासाठी पोचतो. ‘पदमसंभव’ नावावरून मला प्रथम ही विष्णूची मूर्ती असावी असे वाटले, पण तिथे गेल्यावर दिसली ती बुद्धाचा दुसरा अवतार असणाऱ्या ‘पदमसंभवाची’मूर्ती आहे हे कळते.. सिक्कीम राज्यात बौद्ध धर्माचा प्रभाव असल्याने तिथे अनेक मॉनेस्ट्री (बौद्ध प्रार्थनागृहे) आहेत. १६१ फुटाची ही मूर्ती मुळातच एका डोंगरावर आणि नंतर एक मोठ्या चौथऱ्यावर बांधलेली असल्याने ती अधिकच उंच आणि भव्य वाटते. या मूर्तीची उंची इतकी आहे, की एका फोटोच्या फ्रेममध्ये ती मावणेच शक्‍य नाही तर आपला त्या मूर्तीबरोबरचा फोटो घेणे तर दूरचीच बाब. याठिकाणची छोटीशी बाग आणि तिथून दिसणारे दृष्यही सुंदर होते.

भव्य पदमसंभवाचे दर्शन घेऊन बाहेर पडलो, तर गर्द हिरव्या झाडीतून वरखाली जाणारे रोपवेचे हिरव्या रंगाचे छोटे डबे दिसले. मग काय, हिरव्यागार झाडीतून खोलखोल दरीच्या पोटात उतरणाऱ्या रोपवेचाही आनंद घ्यायचे ठरवले. अत्यंत स्वच्छ आणि सुरक्षेची संपूर्ण काळजी घेणाऱ्या या रोपवेचे व्यवस्थापन खरंच वाखाणण्याजोगे होते. आम्ही त्या डब्यात बसलो आणि तीव्र उतारावरचा हा प्रवास काहीकाळ हृदयाची धडधड वाढवणारा ठरतो. एकंदरीत ३ levels म्हणजे ३ दऱ्या उतरत या रोपवेने आम्हाला खाली नेऊन सोडले. खाली बघताना डोके गरगरतील असे खोल असल्याने जरा भीती वाटली. पण तसा रोपवेचा वेग कमी असल्याने आजूबाजूच्या निसर्गाचाही आनंद घेता आला. खाली फुलांनी बहरलेली एक छानशी बागही मन प्रसन्न करून गेली. काही वेळ या बागेत फिरल्यानंतर परत त्याच रोपवेने वर आलो. एकंदरीत हिरव्या छोट्या डब्यात बसून रोपवेच्या माध्यमातून हिरव्या निसर्गाच्या कुशीत शिरण्याचा हा अनुभव मस्त होता.

अशी २, ३ छान छान सुंदर ठिकाणे बघून पेलिंगला पोचलो तेव्हा प्रचंड धुक्‍याने आणि रिमझिम पावसाने आमचे स्वागत केले. गंगटोकपेक्षा जास्त उंचीवर असणारे जास्त थंड असे हे टुमदार पेलिंग गाव मला प्रथमदर्शनीच आवडले. वरचे पेलिंग आणि खालचे पेलिंग अशा दोन भागांत विभागलेल्या या गावात नेहमीच्या हिल स्टेशनप्रमाणे एकही मार्केट नाही, ही गोष्ट विशेष भावली. नाहीतर इतर हिल्स स्टेशनच्या ठिकाणी निसर्गाची वेगवेगळी रूपं बघण्यापेक्षाही मार्केटमध्ये जाऊन खरेदी करण्याच्याच मोहात पर्यटक पडतात. पेलिंगला तसाही मोह व्हायचे कारणच नव्हते. मोह पडला तो फक्त निसर्गाचा. इतक्‍या उंचीवर असतो, की आपल्यापेक्षा कमी उंचीवर दिसणाऱ्या हिरव्या डोंगररांगा आणि त्यांच्या निम्म्या उंचीवर असणाऱ्या पांढऱ्या ढगांच्या पट्ट्यांच्या दृश्‍याचा!

पेलिंगमध्ये आम्ही अनुभवला प्रचंड वेगाने कोसळणाऱ्या पांढऱ्याशुभ्र ‘कांचनगंगा’ नावाच्या धबधब्याचे सौंदर्य. वेगाने उंचीवरून कोसळणारा आणि पांढरे तुषार अंगावरून घेताना समर्थ रामदासांच्या शब्दांचा पुन्हा प्रत्यय आला -

गिरीचे मस्तकी गंगा, तेथून चालली बने धबधबा लोटती धारा, धबधबा तोय आदळे.याच ठिकाणी रिव्हर क्रॉसिंगची पण सोय होती.पेलिंगजवळच एक वैशिष्ट्यपूर्ण ठिकाण पाहिले, ज्याला ‘wish fulfilling lake’ म्हणतात. बौद्ध धर्मीयांसाठी हे एक अत्यंत पवित्र ठिकाण आहे. म्हणूनच या तलावाजवळ अत्यंत स्वच्छता राखलेली आहे. आपल्या मनातल्या इच्छा पूर्ण करणाऱ्या या तलावापर्यंत जाण्याचा रस्ताही हिरव्या बोगद्यासारखा, हिरव्या झाडांची सतत सावली धरणारा असा डोळ्यांना सुखावणारा आणि मनालाही आनंद देणारा आहे. देवतांची वस्ती असणाऱ्या या सुंदर आकाशाच्या, स्वच्छ पाण्याचा मोह पर्यटकांनाही पडतो. इथे विकत मिळणारे सोयाबीनचे छोटे बॉल्स त्या तळ्यातल्या माशांना खायला घालताना मनातली इच्छा बोलावी म्हणजे ती पूर्ण होते अशी श्रद्धा आहे. आम्हीही आमची इच्छा तलावाजवळ व्यक्त केलीच पण एका सुंदर निसर्गरम्य ठिकाणाला भेट देण्याची इच्छा मात्र नक्की पूर्ण झाली. आवाज व कचरा कशाचेही प्रदूषण नसणारे हे सुंदर पाण्याचे तळे (khecheopalri) लक्षात राहण्यासारखेच!

पेलिंगमध्येच एका बौद्ध मॉनेस्ट्रीलाही भेट देण्याचा योग आला. जुन्या पोथ्या जतन केलेली, पदमसंभवाचे विविध अवतारांची मूर्ती असणारी ही मॉनेस्ट्री बघतानाच बाजूच्या मोठ्या हॉलमध्ये छोटे-छोटे भिक्षू त्यांच्या भाषेत त्यांच्या धार्मिक मंत्रांचे पठण करताना आपल्या येथील वेदपाठशाळेतील वेदमंत्रांचे पठण करणाऱ्या छोट्या बटूंची प्रकर्षाने आठवण झाली. संध्याकाळी साडेचारच्या सुमारास म्हणजे तिथल्या सूर्यास्ताच्या वेळेस आम्ही तिथल्या एका हेलिपॅडवर पोचलो. हे हेलिपॅड म्हणजे पाचगणीच्या टेबललॅंडची आठवण करून देणारे होते. चहूबाजूंनी खोल दऱ्या, दऱ्यांमधून आपल्यापर्यंत वाहत येणारे ढग, अंगाला झोंबणारा गारेगार वारा हा अनुभव केवळ अविस्मरणीय होता.

सिक्कीम व पश्‍चिम बंगालमधील गंगटोक, दार्जिलिंग या प्रसिद्ध पर्यटनस्थळांबरोबरच पेलिंग आणि त्यांच्या जवळपासच्या या अल्पपरिचित ठिकाणांनाही जरूर भेट द्यावी व निसर्गानुभूती घ्यावी!

सिक्कीम उत्तर - पश्‍चिम बंगालसारख्या राज्यांमध्ये सतत वळणावळणाचे आणि डोंगरदऱ्यांचे रस्ते पार करावे लागतात. यावेळी तिथल्या ड्रायव्हर लोकांच्या कौशल्याला खरंच दाद द्यावीशी वाटते. अत्यंत अरुंद रस्त्यावरून, एका बाजूला खोल दऱ्या, दुसरीकडे उंच डोंगरावरून कोसळणाऱ्या दगडी या सगळ्यातून ते मोठ्या कौशल्याने वाट काढतात. साऱ्या प्रवाशांचे प्राण खरोखर त्यांच्या हातात असतात. विशेषत्वाने जाणवलेली गोष्ट म्हणजे हे ड्रायव्हर लोक वाहतुकीचे सर्व नियम व्यवस्थित पाळतात. अरुंद रस्त्यांवर घुसून करून रस्ता अडवत नाहीत, चढावरून येणाऱ्या गाडीला प्राधान्य देतात, कुठेही बाचाबाची, वादविवाद, भांडणे करताना दिसले नाहीत. उलट एकमेकांची सोय बघून मार्ग मोकळा करून देणारे ड्रायव्हर बघून अगदी कौतुक वाटले.

याच सहलीत गंगटोक येथील निसर्गरम्य पर्यटनस्थळे (बर्फाच्छादित छांगु लेक, याकला लेक, बाबा हरभजनसिंग यांचे स्मरणस्थान, गंगटोक शहरातील फ्लॉवर शो, लंकेला संजीवनी वनस्पती घेऊन जाताना हनुमानाने ज्या ठिकाणी विश्रांती घेतली ते हनुमानटोक, गणेशटोक) यांचाही आनंद घेऊ शकतो. तसेच दार्जिलिंग येथील सुप्रसिद्ध टायगर हिल येथील डोळ्यांचे पारणे फेडणारा सूर्योदय, चहाच्या बागा, सुप्रसिद्ध झुलॉजिकल पार्क, देशभरातल्या गिर्यारोहकांना प्रशिक्षण देणारी हिमालय माऊंटेनियरिंग इन्स्टिट्यूट यांनाही जरूर भेट द्यावी.

गंगटोक (उंची) : १६५० मीटर
पेलिंग (उंची) : २१५० मीटर
दार्जिलिंग (उंची) : २०४२ मीटर
गंगटोक ते पेलिंग अंतर : १३१ कि.मी.
गंगटोक ते नामची : ८० कि.मी.
पेलिंग ते खेचोपालरी (wish fulfilling lake) : २१ कि.मी.
पेलिंग ते कांचनगंगा धबधबा : २५ कि.मी.

पुणे ते पेलिंग कसे जावे
पुणे ते बाण डोग्रा : विमानाने (५ तास)
बाणडोग्रा ते गंगटोक : मोटारने (५ तास)
गंगटोक ते पेलिंग : मोटारने (६ तास)

फोटो फीचर

संबंधित बातम्या