वनस्पतींचा खजिना-बुशार्ट गार्डन

पुष्पा जोशी, मुंबई
गुरुवार, 21 डिसेंबर 2017

पन्नास एकर जमिनीवर फुलविलेला हा ‘बगीचा’ म्हणजे मानवनिर्मित प्रयत्नांचा एक अद्‌भुत आविष्कार आहे. जेनी आणि रॉबर्ट या दांपत्याच्या अथक मेहनतीतून हा बगीचा उभा राहिला आहे. देशोदेशीचे दुर्मिळ वृक्ष, फुलझाडे, नाना तऱ्हेची क्रोटन्स, वेली याठिकाणी लावण्यात आल्या आहेत.

जगामध्ये कॅनडा आकाराने दुसऱ्या नंबरवर (पहिला नंबर रशियाचा) आहे. ९९,८४,६७० चौरस किलोमीटर्स एवढे क्षेत्रफळ कॅनडाला लाभले आहे. एकूण क्षेत्रफळापैकी ५४ टक्के भाग हा फर, पाइन, स्प्रूस अशा सूचिपर्ण वृक्षांनी भरलेला जंगलांचा भाग आहे. जगभरातील न्यूज प्रिंट पेपर व इतर पेपर्स बनविण्यासाठी लागणारे मोठमोठ्या वृक्षांचे ओंडके तसेच पेपर पल्प यांचा कॅनडा सर्वांत मोठा निर्यातदार आहे.

यंदाच्या आमच्या कॅनडा भेटीत ’बुशाट गार्डन’ या मानवनिर्मित बगीचाला भेट देण्याचा बेत ठरला होता. त्यानुसार, कॅनडाच्या पूर्व भागातील हरतऱ्हेचे नैसर्गिक सौंदर्य, सोयी, स्वच्छता यांचा अनुभव घेऊन, कॅनडाच्या पूर्व भागातील मॉन्ट्रीयल इथून विमानाने पाच तासांचा प्रवास करून कॅनडाच्या पश्‍चिम टोकावरील व्हॅन्क्रव्हर इथे पोचलो. या भागाला ब्रिटिश कोलंबिया असे म्हटले जाते. पूर्वेकडे रॉकी माऊंटन्स आणि पश्‍चिमेकडे पॅसिफिक महासागर अशा देखण्या कोंदणात व्हॅन्क्रव्ह वसले आहे. 

दुसऱ्या दिवशी व्हॅन्क्रव्हर पोर्टला जायला निघालो. वाटेत दोन्ही बाजूंना गव्हाची प्रचंड मोठी शेती आहे. शिवाय बदामाची झाडं, स्ट्रॉबेरी, ब्लू बेरी, चेरी यांचेही मोठमोठे बगीचे आहेत. गाइड म्हणाला की, 'ही सर्व शेती भारतातून आलेल्या शीख लोकांच्या मालकीची आहे.' हे ऐकून आश्‍चर्य व आनंद वाटला. शंभराहून अधिक वर्षांपूर्वी ही पंजाबमधील शीख कुटुंबे इथे येऊन स्थिरावली आहेत. धाडस, मेहनत व स्वकर्तृत्वाने त्यांनी हे वैभव मिळवले आहे. अनेक शीख बांधव आज कॅनडामध्ये उद्योगपती, उच्चपदस्थ, सिनेटर्सही आहेत. आता कॅनडामध्ये दिल्लीपासून तमिळनाडूपर्यंत अनेक भारतीय हॉटेल बिझिनेसमध्ये कार्यरत आहेत.

व्हॅन्क्रव्हर पोर्टहून व्हॅन्क्रव्हरच्या दक्षिणेला असलेल्या व्हिक्‍टोरिया आयलंडला जायचे होते. अवाढव्य क्रूझमध्ये आम्ही आमच्या बससह प्रवेश केला. एकूण सहाशे मोटारी व २२०० माणसे आरामात प्रवास करू शकतील अशी त्या महाप्रचंड क्रुझची क्षमता होती. बसमधून लिफ्टने बोटीच्या सहाव्या मजल्यावर गेलो. अथांग सागरातून बोट मार्गक्रमण करू लागली. दूर क्षितिजावर निळसर हिरव्या पर्वतरांगा होत्या. पांढरे शुभ्र सीगल्‌स बोटीला सोबत करीत होते. दीड तास मजेत प्रवास करून व्हिक्‍टोरिया आयलंडवर उतरलो. व्हिक्‍टोरिया आयलंड हा पाच सहा बेटांचा समुदाय आहे. पॅसिफिक महासागराच्या या भागाला ’Strait of Juan de Fuca‘ असे म्हणतात. सागरी सौंदर्य आणि इतिहास यांचा वारसा या बेटाला लाभला आहे. पार्लमेंट हाउस, सिटी हॉल, म्युझियम या इमारतीवर ब्रिटिश स्थापत्यकलेची छाप आहे. व्हिक्‍टोरियाचा भव्य पुतळा पार्लमेंटसमोर आहे. गहू, मका, अंजीर, स्ट्रॉबेरी अशी शेतीही आहे.

येथे पन्नास एक जमिनीवर फुलविलेले ’बुशार्ट गार्डन’ हा स्वर्गीय बगीचा जेनी आणि रॉबर्ट या दांपत्याच्या अथक मेहनतीतून उभा राहिला आहे. देशोदेशीचे दुर्मिळ वृक्ष, फुलझाडे, नाना तऱ्हेची क्रोटन्स तिथे आहेत. मांडवांवरुन, कमानीवरुन सोडलेले वेल नाना रंगाच्या, आकाराच्या फुलांनी भरलेले होते. बुशार्ट पती-पत्नीने जगभर हिंडून गोळा केलेली ही झाडे, त्या त्या हवामानाप्रमाणे निगुतीने वाढविलेली आहेत. एखाद्या मोठ्या फ्लॉवरपॉटसारखी फुलांची रचना अनेक ठिकाणी होती. बुशार्ट यांच्या जुन्या वास्तूंचे खांब गुलाबाच्या झाडांनी सजलेले होते. पोर्चमधील लटकणाऱ्या कुंड्यातून देशी-विदेशी पक्षांसाठी घरटी तयार केली आहेत. एका वाटेच्या दोन्ही बाजूला अर्जुन वृक्ष आहेत. मंद-मधुर संगीत गुणगुणणारे झरे, तऱ्हेतऱ्हेची उसळती कारंजी, ठिकठिकाणची अनेक सुंदर शिल्पे यांनी बागेच्या सौंदर्यात भर घातली आहे. पंचधातूची एक मोठा घोडाही आहे. जपानी बागेत बांबूंचे वन आहे. इटालियन पद्धतीची बाग आहे. गुलाबांच्या बागेत देशोदेशीचे विविध आकाराचे रंगागंधाचे गुलाब, सुवासाची, सौंदर्याची उधळण करीत असतात. अमलताशची हळदी रंगाची झुंबर वाऱ्यावर डुलत होती. हिमालयात उगवणाऱ्या ब्ल्यू-पॉपीजची झुडपे होती. 

ताऱ्यांच्या आकारातील पाँडवर बेडकांच्या तोंडातून उसळणारे कारंजे होते. तर ड्रॅगनच्या आकारातील कारंजेही होते. सारे सौंदर्य डोळ्यात साठविताना पाय दमले. पण बाग संपली नव्हती.

बुशार्ट पती-पत्नीने आपल्या या खासगी बागेत साऱ्यांचे स्वागत केले. आजही या उद्यानाची मालकी बुशार्ट वंशजाकडे आहे. अनेक कुशल कर्मचाऱ्यांच्या मेहनतीमुळे बाग सदा स्वच्छ, नीटनेटकी, प्रफुल्लित राहिली आहे. लक्षावधी प्रवासी येथे आवर्जून येतात. कॅनेडियन सरकारने या नितांत सुंदर बगीच्याला ‘नॅशनल हिस्टॉरीक साइट ऑफ कॅनडा’ असा गौरवपूर्ण किताब दिला. जुलै- ऑगस्ट महिन्यात दर शनिवारी इथे फटाक्‍यांची आतषबाजी होते.

व्हिक्‍टोरिया पोर्टला येऊन पुन्हा बससह क्रुझमध्ये गेलो. आम्हाला त्यावेळचे ऊन कडक वाटत होते. पण बोटीवर अनेकजण सूर्यस्नानाचा आनंद घेत होते. बोटीतून अमेरिकेतील उंच इमारतींची स्काय लाइन दिसत होती. व्हन्क्रुव्हर बंदराला क्रूझ लागली तेव्हा आमच्या बसचा बाहेर पडण्यासाठी पहिला नंबर होता. त्यामुळे बंदरावरुन क्रुझवर प्लॅटफॉर्म लावणाऱ्या कुशल कर्मचाऱ्यांची शिस्तशीर धावपळ बघायला मिळाली. आमच्या डेकचा प्लॅटफॉर्म व्यवस्थित लावल्यानंतर वरच्या मजल्यावरील डेकचा प्लॅटफॉर्म जोडला गेला आणि बसेस व गाड्या आपापल्या स्वतंत्र मार्गांनी मार्गस्थ झाल्या. 

फोटो फीचर

संबंधित बातम्या