टिपेश्‍वरचे अभयारण्य 

राधिका टिपरे
सोमवार, 26 ऑगस्ट 2019

पर्यटन
 

ताडोबाला जाताना नेहमीच अधेमधे कुठेतरी टिपेश्‍वर अभयारण्याचा बोर्ड दिसायचा आणि हा बोर्ड मला नेहमी खुणावत राहायचा. पण प्रत्येकवेळी काही ना काही कारणानं ही गोष्ट राहून जायची. यावेळी मात्र ताडोबाला पोचायच्या आधीच टिपेश्‍वरला जायचं, असं ठरवूनच घरातून बाहेर पडलो. पुण्यातून लवकर निघालो होतो, पण काही वेळ औरंगाबादमध्ये वाया गेल्यामुळं, आडवाटेवरील टिपेश्‍वरला पोचेपर्यंत मध्यरात्र होऊन गेली. कालेश्‍वर रिझॉर्ट असं नाव सांगितलेल्या हॉटेलवर रात्री पोचता पोचता दमछाक झाली, पण शेवटी कसंबसं पोचलो. चूक आमचीच होती. हे चार खोल्यांचं नवं हॉटेल टिपेश्‍वर अभयारण्याच्या माथानी या प्रवेशद्वाराच्या अगदी जवळच एका शेतात बांधलेलं आहे. मरणाच्या गर्मीत एसी खोलीत झोपायला मिळणार होतं हेच खूप होतं खरंतर. 

यवतमाळ जिल्ह्यामधील, पांढरकवडा गावापासून वीस किलोमीटर अंतरावर असलेलं टिपेश्‍वर, घाटंजीपासून जवळ आहे. तसं पाहता आकारानं लहानसं असलं, तरी अलीकडं नव्यानंच ते पर्यटकांच्या पसंतीस उतरू लागलेलं आहे. ३० एप्रिल १९९७ मध्ये १४८.६ चौरस किमीचे क्षेत्र असलेला हा जंगलाचा परिसर टिपेश्‍वर अभयारण्य म्हणून घोषित केला गेला. आज हे जंगल पेंच वनखात्याच्या अखत्यारीत आहे. मात्र, पोषक वातावरणामुळं येथील वाघांची संख्या वाढते आहे. लहानशा जंगलात वाघांची संख्या वाढलेली असल्यामुळं पर्यटकांनाही वाघ सहजासहजी पाहायला मिळत आहे. त्यामुळं टिपेश्‍वर आता पर्यटकांच्या आवडीचं ठिकाण म्हणूनही बऱ्यापैकी नावारूपास येत आहे. बहुतांश जंगल सागाचं असलं तरी अंजन, आपटा, बहावा, बाभूळ, बेल, बिबा, धावडा, हिरडा, जांभूळ, सावर, खैर, मोह, पळस, साल, सीताफळ, सुबाभूळ, उंबर, वड हे इतक्‍या प्रकारचे वृक्ष या जंगलात आहेत. वाघांची संख्या वाढते आहे, हे लक्षात घेऊन वनखात्यानं तातडीनं पावलं उचलून हे अभयारण्य ‘टायगर प्रोजेक्ट’खाली संरक्षित केलं पाहिजे. त्यामुळे या अभयारण्याला अधिक संरक्षण मिळेलच, पण कदाचित पेंचच्या जंगलाला जोडून तयार झालेल्या मार्गिकेमुळं वाघांच्या वाढीसाठी अधिक मुक्त आणि पोषक वातावरण निर्मिती होईल आणि वाघांच्या वाढत्या संख्येला भरपूर अधिवास मिळून जाईल. हे छोटंस अभयारण्य वाघांच्या अधिवासासाठी पोषक असल्यामुळं मला मनापासून आवडलं... मनाला प्रचंड भावलं. हिवाळ्यात या जंगलाचं रूप अधिक सुंदर आणि हिरवाईनं नटलेलं असणार यात शंका नाही. परंतु, मे महिन्याच्या प्रचंड गर्मीमध्ये ताडोबा, टिपेश्‍वर आणि पेंच करण्यासाठी बाहेर पडले होते. मनात आलं, स्वतःला वांग्याप्रमाणं भाजून घ्यायची हौस आहे त्याला कोण काय करणार...? जंगल पाहायची ऊर्मी आली, की काही सुचत नाही हेच खरं...! 

असो, सकाळच्या सफारीसाठी पहाटे पाच वाजताच उठून तयार झालो. सहा वाजता जंगलाच्या आतमध्ये प्रवेश करावयाचा होता. नेमकं आमच्यासाठी सर्वांत चांगली म्हणून जी जीप ठरवलेली होती तिच्यातून पेट्रोल गळती होतेय हे लक्षात आलं. दुसरी जीप तयार करेपर्यंत पाचदहा मिनिटं वाया गेली. जंगलात जायचं म्हटलं, की मी अक्षरशः एखाद्या लहान मुलीसारखी अधीर होऊन जाते. कधी एकदा जंगलात जाते असं होऊन जातं मला! प्रवेशद्वाराजवळचे सोपस्कार पूर्ण करताच आम्ही जंगलात प्रवेश करायला तयार झालो. प्रवीण नावाचा आदिवासी तरुण आमचा मार्गदर्शक होता. जंगल खऱ्या अर्थानं अनुभवायचं असेल तर गाइड आणि जीपचा ड्रायव्हर चांगला असायला हवा, नाहीतर पैसे वाया गेलेच समजा! प्रवीण हा गाइड खरोखर हुशार होता, पण ड्रायव्हर मात्र मठ्ठ होता. जंगलात असूनही सारखा फोनवर बोलायचा आणि फोटो काढायच्या आधीच याच्यामुळं पक्षी उडून जायचे. माझं तर डोकंच सटकलं होतं, पण कधी कधी अडला हरी... अशी परिस्थिती असते आणि काही करता येत नाही. टिपेश्‍वरचं जंगल पाहायला पहिल्यांदाच गेले होते त्यामुळं काय पाहायला मिळेल याचा अंदाज येत नव्हता. पण जंगलाचं रूप मात्र रूक्ष झालेलं होतं. संपूर्ण जंगल शुष्क पानगळीचं जंगल असल्यामुळं उभ्या जंगलात डोळ्यात घालायलासुद्धा कुठं हिरवं पान दिसत नव्हतं. बहुतांश जंगल सागाचं असल्यामुळं फक्त आणि फक्त वृक्षांचे ओके बोके बुंधे आणि तुरकाट्यांची झुडुपं नजरेला पडत होती... आणि उन्हाची तलखी सकाळी आठवाजेपर्यंत अशी वाढली होती, की डोळे चुरचुरायला लागले. मधूनच एखादं मोहाचं झाड नजरेला सुख द्यायचं, कारण गुलाबी पानांची पालवी फुटल्यामुळं शुष्क रखरखाटात ते उठून दिसत होतं. इथं तिथं मधेच पिवळ्या धम्मक मुंडावळ्या बांधून नटलेला बहावा नजरेस पडायचा. पण तेवढंच... बाकी भगभगीत शुष्कपणाच जाणवत होता नजरेला. हे सगळं सहन करायची तयारी ठेवूनच या दिवसांत जंगलात जायचं असतं, कारण मनातून आस असते ती राजाचं दर्शन व्हावं हीच... हो ना..! ताकाला जाऊन भांडं लपवण्यात काय अर्थ? एवढ्या मरणाच्या उन्हाळ्यात तिकडं तडफडायचं ते उगाच का? पण फक्त त्यांचंच दर्शन व्हावं असंही नसतं बरं का.... इतरही कितीतरी प्राणीपक्षी असतातच की! 

असो, प्रवीणबरोबर जंगलात शिरलो आणि काही मिनिटांतच त्यानं एका झाडाच्या फांदीवर बसलेला ‘नाइट जार’ म्हणजेच रातवा दाखवला. हा बऱ्याचवेळा जमिनीवर बसलेला पाहायला मिळतो. पण उन्हाळ्यामुळं की काय, चक्क दिवसाढवळ्या झाडाच्या फांदीवर बसलेला होता... छान फोटो मिळाला. प्रवीणला विचारलं, काय रे बाबा, वाघांचं सायटिंग वगैरे काही होतंय का सध्या? त्यावर मान डोलावीत तो म्हणाला, ‘हाव ना मॅडम, रोज होतंय... एक फिमेल हाय. तिला तीन बच्चे हायेत. तिचा ठेपा हाय पाण्याच्या टाक्‍यावर. आपण तिथं जाऊन पाहूया...!’ 

पण वाघ दिसणं हा खरंच नशिबाचा खेळ असतो...! पाणवठ्यावर ती वाघीण साडेआठ-नऊ नंतर येते असं प्रवीणचं म्हणणं असल्यामुळं आम्ही जंगलातील इतर भागात चक्कर मारण्यासाठी पुढे गेलो. पण वाटेवरती असणारं पाण्याचं प्रत्येक टाकं पाहूनच पुढे जात होतो. टिपेश्‍वरच्या जंगलात उन्हाळ्याच्या दिवसात बऱ्यापैकी पाण्याचं दुर्भिक्ष असतं, कारण टिपेश्‍वर तलाव सोडल्यास इतर कुठलाही तलाव या भागात नाही आणि वाहत्या नद्या नालेही नाहीत. त्यामुळे जनावरांना पिण्यासाठी पाणी उपलब्ध नसल्यामुळं वनखात्यातर्फे बऱ्याच ठिकाणी गोल आकाराचं सिमेंटमध्ये बांधलेलं टाकं तयार केलेलं असतं. काही ठिकाणी सोलरवर चालणारे पंप असतात ज्यामुळं या टाक्‍यांमध्ये आपोआप पाणी जमा होत राहतं. काही ठिकाणी टॅंकरनं पाणी नेऊन टाकावं लागतं. सकाळची वेळ असूनही इतकं रणरण करणारं ऊन होतं, की जीव कासावीस होत होता. वनखात्यानं तयार केलेल्या टाक्‍यांवर नजर टाकून आम्ही पुढं जात होतो. पण या ठिकाणी वाघ नसला तरी वेगवेगळी पाखरं पाणी पिण्यासाठी पाण्यावर आलेली पाहायला मिळत होती. यामध्ये मोर, साळुंख्या, ठिपके असणारे होले, कबुतरं, कोतवाल, खंड्या, तर कधीमधी शिक्रा असे पक्षी पाहायला मिळत होतेच. त्यांच्या गमतीजमती पाहणं हासुद्धा नजरेला आनंद देणारा एक सुंदर सोहळाच होता. पाण्यात डुबकी मारून पंख ओले करीत स्नान करून थेंबाची नक्षी काढीत पंख फडफडत उडणारे इवले इवले सुंदर पक्षी पाहून मन सुखावत होतं. एका ठिकाणी बरेच मोर आणि लांडोर जमा झाले होते. अचानक समोर असणाऱ्या मोरानं लांडोरीला पाहून आपला सुंदर पिसारा फुलवला... किती सुंदर दृश्‍य असतं हे! अर्थातच हा सुंदर क्षण कॅमेऱ्यात टिपण्याची संधी सोडणं अशक्‍यच होतं म्हणा...! एका पाणवठ्यावर सर्पंट गरुड पाणी पिण्यासाठी आला होता. त्याला पाणी पिताना पाहून मनस्वी आनंद झाला. मला पक्षी टिपण्यात अधिक आनंद मिळतो हे पाहून प्रवीण आम्हाला घेऊन अशा भागात गेला जिथं एका मोठ्या हिरव्यागार जांभूळ वृक्षाच्या बेचक्‍यात दोन ‘मॉटल्ड वूड आऊल’ राहतात असं त्यानं सांगितलं. भर दिवसा घुबड बघायला मिळेल अशी खात्री तो देत होता त्यामुळं मी थोडी नवल करत होते, पण खरोखरच त्या झाडावरच्या बेचकीत दोन घुबडांची जोडी होती. छान फोटो मिळाले. 

घड्याळावर नजर ठेवीत पुन्हा एकदा वाघीण ज्या पाणवठ्यावर येण्याचा ठेपा होता त्या ठिकाणी परतलो. त्यानंतर तिथंच जीप उभी करून वाट पाहिली, पण वाघीण काही आली नाही. वेळ संपत आली तशी ती जागा सोडून निघावं लागलं. हल्ली जंगलातील वाघसुद्धा शहाणे झालेत. दोन पायांची जनावरं भरलेल्या गाड्या परत जायची वेळ होईपर्यंत पाण्यावर येत नाहीत! खरंतर त्यांच्या जीवनात माणसाची नको इतकी लुडबुड सुरू असते नाही का? 

हे टिपेश्‍वर नाव या अभयारण्याला मिळालं आहे ते टिपाई नावाच्या देवीच्या मंदिरामुळंच! पूर्वी टिपेश्‍वर नावाचं खेडं होतं जंगलात, पण आता ते उठवलं आहे. जंगलाच्या मध्यावर एक लहानसा तलाव आहे. उन्हाळ्यातही बऱ्यापैकी पाणी होतं. या तलावाच्या आजूबाजूला तीन पिलं असलेली वाघीण असते असं प्रवीण म्हणत होता. पण आम्हाला काही तिला पाहता आलं नाही. टिपेश्‍वरच्या जंगलामध्ये नीलगाई आणि रानडुक्कर भरपूर प्रमाणात आहेत. त्यामानानं सांबर आणि चितळ कमी आहेत. कारण एकतर जंगलाचा बराचसा भाग डोंगराळ आहे आणि दुसरं म्हणजे गवताळ कुरणं फारशी नाहीत. असो, एका जागी नीलगाय पाहायला मिळाली. फारसं काही न पाहताच आमची सकाळची सफारी पटकन आटोपली. दुपारची सफारी ठरवलेली होती. जेवून थोडी विश्रांती घेतली. आदल्या रात्री पुरेशी झोप मिळाली नव्हती. त्यात उन्हामुळं डोळे लाल झाले होते. तरीही दोन वाजताच तयार झालो. पण मला दुसरा ड्रायव्हर हवा होता. सकाळचा ड्रायव्हर सारखा मोबाइलवर बोलत राहायचा. पण ऐनवेळी दुसरा कुणी ड्रायव्हर नसल्यामुळं विनाकारण उशीर झाला, असो. सकाळप्रमाणंच जंगल फिरून झाल्यानंतर एका ठिकाणच्या पाणवठ्यावर पोचलो. या टाक्‍यावर पाचनंतर वाघीण येते असं प्रवीणचं म्हणणं होतं. काही झालं तरी तिथून हलायचं नाही असं त्यानं ठरवल्यामुळं तिथंच थांबून राहिलो. त्याचा अंदाज चुकीचा नव्हताच! काही वेळातच अलार्म कॉल ऐकू यायला लागले. जवळपास मोठं जनावर होतं नक्की... पण ते पाण्यावर कधीपर्यंत येईल याचा भरवसा नव्हता. अशावेळी शांतपणे वाट पाहणं एवढंच आपल्या हातात असतं. जंगलात ठिय्या मारून एकाच जागी थांबलो, तर नक्कीच फायदा होतो. एका पाठोपाठ एक इतर जिप्सीही येऊन थांबल्या. हरणांचे कॉल येणं बंद झालं होतं. बहुधा वाघ कुठंतरी सावलीला बसला होता. वेळ संपत आली होती, पण वाघ जागचा हलायला तयार नव्हता. अचानक पुन्हा एकदा अगदी जवळून कॉल यायला लागले. पॉक्‌ पॉक्‌... असा आवाज काढून चितळ वाघ जवळपास असल्याची सूचना वारंवार देऊ लागलं होतं. हो, तो चितळ हरणांचा कॉल होता... सांबर हरणांचा कॉल आणि चितळ हरणांचा कॉल यात फरक असतो. काही वेळातच कंटाळून तीन चार जिप्सी निघून गेल्या. आता फक्त तीन जीप राहिल्या होत्या. अशातच ज्या बाजूनं कॉल येत होते, त्याबाजूनं अगदी एकापाठोपाठ कॉल यायला लागले... आणि एक अतिशय देखणी वाघीण काट्याकुट्याच्या त्या शुष्क जंगलातून हळुवार पावलं टाकत अतिशय शांतपणे पाणवठ्याकडं येताना दिसली. पण ती अशा वाटेनं आली, की जिथून तिचा फोटो घेणं मला शक्‍य होईना. कारण बरीच झाडं आडवी येत होती. साध्या नजरेला अतिशय सुस्पष्ट दिसणारं ते देखणं जनावर लेन्सच्या टप्प्यात काही केल्या येत नव्हतं. शेवटी दोन वृक्षांच्या मधील फटीतून, पाणी पिणाऱ्या त्या वाघिणीवर कसंबसं कॅमेरा फोकस करून, तिला कॅमेऱ्यात पकडण्याचा प्रयत्न केला. अगदी दोन अडीच वर्षांची तरुण वाघीण होती ती. तिच्या डाव्या गालाजवळ काळ्या पट्यांचा इंग्रजी ए असल्यामुळं ए फॉर आर्ची असं म्हणून तेथील गाइड मंडळींनी तिला सैराटमधील आर्चीचं नाव दिलं आहे असं आम्हाला सांगण्यात आलं. फारसा वेळ उरला नव्हता. त्यामुळं तिथून आता निघायलाच हवं होतं. काही का असेना, सरते शेवटी आर्चीबाईंचं ओझरतं का होईना दर्शन झालं आणि आमची जंगलातील वारी सुफळ संपूर्ण झाली होती. आता आम्ही आनंदानं टिपेश्‍वरच्या जंगलातून बाहेर जाण्यासाठी तयार होतो. 

वाघ दिसला की मनाला समाधान मिळतं. मग ते भलं दुरून असो अथवा जवळून, पण जंगलात जाऊन रिकाम्या हाती परत आल्यानंतर मात्र मन उदास होतं हे नक्की!
 

संबंधित बातम्या