मी पाहिलेले बीजिंग

रोहिणी साठे 
सोमवार, 18 मार्च 2019

पर्यटन
 

आजपर्यंत मी अनेक देश पाहिले व तेथील जीवन अनुभवले आहे. यावर्षी योग आला, तो माझ्या जावई व मुलीकडे चीनला ‘बीजिंग’मध्ये जाण्याचा. एकतर लेकीकडे जायचे, हा आनंद होताच; शिवाय पुन्हा १८ वर्षांनी तोच देश ‘आता कसा आहे’ हे पाहाण्याचादेखील होता. त्याठिकाणी झालेले बदल पाहून खूप छान वाटले. 

प्रथम दर्शनी विमानतळावर उतरल्यानंतर सबंध फरक तिथेच जाणवला. अतिशय भव्य असा हा विमानतळ आहे. विमानतळाच्या बाहेर गाडी काढताच रस्त्यामध्ये अनेक उंच उंच इमारती दिसत होत्या. प्रत्येक इमारतीच्या बांधणीची विविधता जाणवत होती. इमारती चौकोनी, पंचकोनी, अर्धगोलाकार, गोलाकार उंचच उंच होत्या. जवळजवळ प्रत्येक इमारत कमीतकमी २० मजल्यांची तरी होतीच. साधारण ४० मजल्यापर्यंत इमारती होत्या. घरांच्या खिडक्‍यांना उभ्या उंच काचा होत्या. खिडक्‍या उघड्या नसून पूर्ण बंद होत्या. तेथे उघड्या बाल्कन्या नाहीतच. त्यामुळे कुठेही गचाळपणे वाळत घातलेले लोंबते, मळके कपडे दिसत नव्हते. इथल्या टोलेजंग, भव्य इमारती पाहून अचंबाच वाटतो. आपल्याकडे एका विशिष्ट तऱ्हेने आणि शक्‍यतो एकाच रांगेत येतील अशा इमारती आपण पाहतो. पण इथे मात्र मोठमोठ्या इमारती एकाच रांगेत नसून, ज्याला जी दिशा योग्य वाटेल त्या दिशेने इमारतीचा दर्शनी भाग दिसतो. कदाचित हे इंजिनिअर ठरवू शकत असतील, असे वाटते. अति उंच इमारतीवर दोन्ही बाजूला लाल रंगाचे ‘ब्लिकिंग लाइट्‌स’ (उघडझाप करणारे) असतात. याचे कारण आकाशात उडणाऱ्या विमानांना हे ‘ब्लिकिंग लाइट्‌स’ इमारतीच्या उंचीची कल्पना देतात. त्यामुळे विमानांना मार्गदर्शन होते. भारताच्या दूतावासाची इमारतसुद्धा अतिशय सुबक, भव्य व नीटनेटकी बांधलेली आहे. तेथील प्रेक्षागृहाच्या आतील भिंतीलासुद्धा लहान लहान उभ्या संगमरवरी पट्ट्यांनी सजवलेले आहे. प्रेक्षागृहात साधारण १५० ते २०० लोक बसण्याची सोय आहे. सकाळी येथे योगासने, भारतीय नृत्य व संगीताचे वर्ग सुरू असतात. या वर्गांसाठी योग्य शिक्षकांची तरतूद केलेली आहे. यात पुरुष, बायका कोणीही येऊ शकतात. दूतावासामध्ये येणाऱ्या प्रत्येक गाडीची कसून तपासणी केली जाते. नंतरच ती गाडी इमारतीमध्ये प्रवेश करू शकते. गाडी कोणाचीही असली, तरी तपासणीची हीच पद्धत आणि हाच नियम! अनेक देशांचे दूतावास येथे आहेत. साधारणपणे या इमारती लाल रंगाच्या विटांनी बांधलेल्या दिसतात. सर्वच नाही, पण बहुतांश तरी अशाच दिसतात. 

राजदूतांची निवासस्थाने अतिशय भव्य व विस्तीर्ण परिसरामध्ये असतात. त्यात सर्व सुखसोई उपलब्ध असतात. माझे जावई गौतम बंबावाले हेच राजदूत असल्यामुळे व आम्ही भारताच्या राजदूत निवासस्थानांमध्येच राहात असल्यामुळे हे सर्व जवळून पाहण्याचा योग आला. येथेही आत शिरणाऱ्या प्रत्येक गाडीची कसून तपासणी केली जाते, त्यानंतरच ती गाडी इमारतीत प्रवेश करू शकते. 

बीजिंगमधील दुकाने पाहिली, तर ती अगदी अद्ययावत आहेत. माल खच्चून भरलेला असतो. येथील फर्निचरची दुकाने लहान-मोठी आहेत. अगदी लहान दुकानात काम करणाऱ्या व्यक्तीकडेदेखील लाकूड कापण्यासाठी अद्ययावत यंत्रसामग्री दिसते. फर्निचरचे विविध व नवनवीन प्रकार दिसतात. त्याचे लाकूड उत्तम प्रतीचे असते व त्यावरील कोरीव काम अतिशय रेखीव, सुरेख व मनात भरणारे असते. फर्निचरवरील कोरीव कामावर चिनी ठसा पूर्णपणे जाणवतो. एक वैशिष्ट्य असे वाटले, की गिऱ्हाईकांच्या आवडी व सोयीप्रमाणे वस्तूंमध्ये फेरबदल करण्यास दुकानदार तयार असतो. तिथे आडमुठेपणाचे वागणे दिसत नाही.  

अनेक देशांचे लोक इथे वावरताना दिसतात व मोठमोठ्या वस्तू खरेदी करताना दिसतात. बऱ्याच वेळा दुकानदार स्वतःच मालक असल्यामुळे त्यांचे जेवणही कुटुंबासह व्यवस्थित दुकानात बसूनच होते. दुकानात आई-वडिलांबरोबर येणारी लहान मुले मोकळेपणाने वावरताना दिसतात. कुठेही चुकण्याची, हरविण्याची भीती वाटत नाही. एवढी ती सुरक्षित असतात. 

येथील फुलांचे जंगी मार्केट पाहिले. तेथील फुले, फळे, झाडे व त्यांची पुष्परचना पाहून डोळ्यांचे पारणे फिटले. या मार्केटमध्ये बऱ्याच ठिकाणी बायकाच काम करताना दिसत होत्या. पण त्या स्वत:च त्या दुकानांच्या मालकिणी असाव्यात असे वाटत होते. मोठमोठ्या फुलझाडांबरोबरच छोटे छोटे ‘कॅक्‍टस’चे (निवडुंगाचे) प्रकार मन मोहून घेत होते. छोट्या छोट्या वाटीएवढ्या चिनी मातीच्या दगडामध्ये ‘कॅक्‍टस’चे ३०-३५ वेगवेगळे प्रकार पाहायला मिळाले. ते सुशोभित तर दिसत होतेच, पण मनात कौतुक वाटले, की प्रत्येक इवल्याशा रोपाची निगा राखणे हे काही सोपे काम नाही. तिथे असलेले ‘कॅक्‍टस’ आणि ‘ऑर्किड’ इतके अप्रतिम होते, की मन व दृष्टी त्यावर खिळून राहते व त्याठिकाणाहून पायच निघत नाही. त्या स्त्रिया रोपांची पटापट, पण नीट अदलाबदली करतात. त्यांना मुळासकट एका बाटलीतून काढून दुसऱ्या बाटलीत ठेवतात. ही कामे त्या इतक्‍या चटचट करतात, की आश्‍चर्यच वाटते. या सर्व कामात पुरुष त्यांना बरोबरीने मदत करतात. 

निसर्गामध्ये व फुलझाडामध्ये किती सौंदर्य साठवलेले आहे ते प्रत्यक्ष पाहिल्याशिवाय समजत नाही. रंग, रचना, आकार व विविधता हे सर्व त्या फुलांच्या बाजारात फिरल्यावर कळते. आणखी एक गोष्ट लक्षात आली, ती म्हणजे फुलांसारखीच फळांची दुकाने पण फार नीटनेटकी ठेवलेली असतात. येथे बरीच फळे आपल्या प्रकारची आहेत व काही फळे केवळ इथलीच आहेत. फळांची मांडणी व रंगसंगती फार सुबकपणे केलेली असते. फळे अगदी रसरशीत असतात. सफरचंद, पेअर्स वगैरे फळे क्‍लिंगरॅपसारख्या कागदात गुंडाळून ठेवलेली असतात. त्यामुळे ती हाताळली जात नाहीत व चकचकीत, नीटनेटकी दिसतात. 

आता येथील रहदारी पाहिली, तर अत्यंत शिस्तबद्धपणे चाललेली असते. लहानमोठ्या सर्व तऱ्हेच्या गाड्या येथे दिसतात. एकंदरीत मोठ्या रहदारीतसुद्धा कुठेही तुम्हाला भांडणतंटा, वादावादी दिसत नाही. गाड्यांच्या चार-चार आडव्या रांगा लागल्या, तरी सर्व रहदारी बिनबोभाट होताना दिसते. रस्त्यात जागोजागी फुलांच्या कुंड्या, छोटी रोपे लावलेली असतात. पण त्याला कोणीही हात लावत नाही. नासधूस, पान खाऊन थुंकणे असे प्रकार इथे दिसत नाहीत. त्यामुळे रस्ते स्वच्छ असतात व त्यांचे सौंदर्यही वाढते. लोकांच्या सोयीकरिता छोटे छोटे ओव्हरहेड पूलही बांधलेले आहेत. पादचारी मार्ग चांगल्या तऱ्हेने लोक वापरताना दिसतात. त्यामुळे मोठ्या रहदारीत लोकांची धावपळ, वादावादी, तंटा, झगडा, मारामारी होताना दिसत नाही. रस्ता ओलांडणारी माणसे फार कमी दिसतात. मोठमोठ्या हायवेवर एक वैशिष्ट्य म्हणजे ‘इमर्जन्सी व्हेहिकल लेन’ असते. म्हणजे अँब्युलन्ससारख्या वाहनाला खोळंबा न होता पुढे जाता येते. ही खरोखरच फार सुंदर योजना आहे, असे वाटते. येथे जवळजवळ प्रत्येक कुटुंबाकडे स्वतःचे वाहन आहे. पण ज्यांच्याकडे नाही त्यांनाही अतिशय सुखकरपणे प्रवास करता येईल अशा बसेस आहेत. त्या अत्यंत सुस्थितीत असतात. आतून बाहेरून अगदी कोऱ्या दिसतील अशा! ‘पब्लिक ट्रान्स्पोर्ट’ जो आपण म्हणतो तो अत्यंत सुखकर, सोईस्कर व परवडणारा असतो. रस्त्यावरून जाताना एकही भिकारी भीक मागताना दिसत नाही. गलिच्छ वस्त्या व झोपडपट्याही दिसत नाहीत. 

 एकंदरीत पाहाता मध्यमवर्ग समृद्ध व सुखी दिसतो. आणखी एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली, ती म्हणजे रस्त्यातून जाताना सहज एखादे स्मितहास्य व ‘नी हाव’ असे म्हणणारी बरीच माणसे भेटली. तसा त्यांचा आणि आपला सुतराम संबंध आलेला नसतो. येथे लोकवस्ती भरपूर आहे. रस्ते माणसांनी फुललेले दिसतात. आता हे सर्व येथील समृद्ध भागाचे जीवन झाले. पण येथील अंतर्भागात असेच दृश्‍य असेल, असे म्हणता येत नाही. कदाचित इथल्यापेक्षा तिथले दृश्‍य वेगळे असू शकते. परंतु माझ्यासारखी मंडळी, जी या देशात फिरायला आली आहेत, त्यांना मात्र हा देश नक्कीच आवडेल. कारण ऐतिहासिक स्थळे, प्रेक्षणीय बागा व खरेदी करण्याजोग्या वस्तूंची इथे रेलचेल आहे. पण ज्यांना देशाचा अभ्यास करावयाचा असेल किंवा काटेकोरपणे विचार करावयाचा असेल त्यांचे मत वेगळे असण्याची शक्‍यता आहे. 

आपण इथली झाडे, फुले, फळे पाहिली. पण पक्षी जर बघितले, तर काही पक्षी आपल्या देशातील पक्ष्यांसारखेच असून त्यांचे रंग मात्र थोडेथोडे वेगळेच आहेत. एक कावळ्याच्या आकाराचा पण काळा पांढरा पक्षी, कबुतराप्रमाणे जरा गुबगुबीत पण राखट, तपकिरी असा पक्षी व चिमणीसारखा दिसणारा पक्षी पण दिसला. पण, आपल्याकडे असणाऱ्या कोकिळेसारखा मधुर आवाजाचा पक्षी मात्र दिसला नाही. कदाचित हवामानाप्रमाणे इतर हंगामात ते दिसत असतील असे वाटते. 

आता इथे येणारा नोकरवर्ग पाहिला, तर तो अगदी वेगळा आहे. सर्वसाधारण काम करणाऱ्या स्त्रिया लहान चणीच्या असतात. पण त्या अतिशय नीटनेटक्‍या, स्वच्छ, नीट कापलेले केस, रंगाने गोऱ्या व कामाला अतिशय हुशार, कष्टाळू, काटक असतात. पडेल ते काम करण्याची तयारी व क्षमता त्यांच्यात दिसते. बोलण्यातही आदबशीरपणा असतो. कुठलेही काम त्या व्यवस्थितपणे करतात. झाडपूस वगैरे सर्व काही एकदा सांगितल्याप्रमाणे चालू असते. आपल्याकडे असणारा कामचुकारपणा व उर्मटपणा येथे दिसत नाही. जरी तो काम करणारा वर्ग असला, तरी लक्षात येण्याजोगे वागणे असते, हे नक्कीच म्हणावे लागेल. या काम करणाऱ्या बायकांना ‘आई’ म्हणतात. आई या शब्दाचा अर्थ ‘आण्टी’ असा आहे. त्यातसुद्धा वयाने मोठ्या असणाऱ्या आईला ‘लाव आई’ व तरुण आईला ‘शाव आई’ असे म्हणतात. हे दोनच शब्द नेहमी ऐकल्यामुळे पाठ झाले आहेत. परंतु एकंदरीत ही भाषा शिकणे कठीणच आहे...आणि लिपी तर भरपूर प्रयत्न केल्याशिवाय शिकणे अशक्‍यच आहे, हे नक्कीच!

एकंदरीत पाहता येथे शिकण्यासारखे, घेण्यासारखे व पाहण्यासारखे बरेच काही आहे...आणि त्याकरता प्रवास प्रेमींनी हा देश जरूर पाहावा.

फोटो फीचर

संबंधित बातम्या