सिंगापूरच्या नाळेतून

रोहित हरीप 
शुक्रवार, 12 जानेवारी 2018

घाटवाटा
देश आणि कोकण यांना जोडणाऱ्या या घाटवाटाची भ्रमंती म्हणजे एक सुखद अनुभव असतो. मात्र ही भ्रमंती करताना मजबूत तंगडतोड करण्याची तयारी हवी. सिंगापूरची नाळ ही अशीच एक नितांत सुंदर घाटवाट.

सिंगापूर.....  राजगडावरच्या एका मंतरलेल्या संध्याकाळी, पद्मावती मंदिरासमोरच्या पटांगणात रंगलेल्या गप्पांमध्ये एक अनामिक वाटसरू या वाटेची माहिती देऊन गेला.
जेव्हापासून सिंगापूरचे नाव कानावर पडले तेव्हापासून या वाटेचे वेध लागले होते. सिंगापूरच्या आजूबाजूला, इकडे तिकडे, जवळपास, खाली वर, मागे पुढे सगळीकडे जाणे झाले होते, पण सिंगापूरपर्यंत पोहचता येत नव्हते. सिंगापूरची जागाच अशी अडचणीची आहे. सह्याद्रीच्या अगदी गाभ्यात वसलेले हे बारीक खेडे जगाच्या खिजगणतीही नव्हते. आजही नाही. सिंगापूरच्या मागे पसरलेले रायलिंगचे विस्तीर्ण पठार, मधली शे-दोनशे फुटाची दरी आणि दरी ओलांडली कि सह्याद्रीचे वैभव असलेला, रायगडाचा राखणदार बेलाग लिंगाणा किल्ला आणि त्याच्या मागे दिसणारा दुर्गेश्वर रायगड! हा सगळाच नजारा अप्रतिम! या सगळ्या पर्वतरांगांच्या जंजाळातून खाली उतरणाऱ्या असंख्य घाटवाटा! पार बोचुघोळच्या नाळेपासून ते मढे घाटापर्यंत! या घाटवाटा म्हणजे सह्याद्रीच्या धमन्या जणू.

देश आणि कोकण यांना जोडणाऱ्या या घाटवाटाची भ्रमंती म्हणजे एक सुखद अनुभव असतो. मात्र ही भ्रमंती करताना मजबूत तंगडतोड करण्याची तयारी हवी. सिंगापूरची नाळ ही अशीच एक नितांत सुंदर घाटवाट. म्हणाल तर सोपी, म्हणाल तर दमवणारी. सिंगापूर गावात मुळात पोहोचणं हेच मुळात एक दिव्य आहे. मुळात ज्या गावात जाण्यासाठी रस्ताच नाही तिथे एसटी नाही. त्या गावात पोहोचण्यासाठी चौदा ते पंधरा किलोमीटरची पायपीट करावी लागते. अर्थात हे भटक्‍यांसाठी. ज्यांची आर्थिक कुवत आहे ते थेट ’एसयुव्ही’सारखी वाहने घेऊन सिंगापुरात उतरू शकतात किंवा मोठा ग्रुप असेल तर वेल्ह्यातून तशी गाडी भाडे तत्त्वावर करता येते. तेवढा कच्चा रस्ता झाला आहे.

पुण्यातून सुरू झालेली आमची भटकंती रंग भरणार होती. कागदावरच गृहपाठ पक्का झाला होता. आता प्रात्यक्षिकांची वेळ होती. पुण्याहून सकाळी वेल्ह्याला पोहोचल्यानंतर चहा नाश्‍ता करून पुढे जाण्यासाठी कुठली गाडी मिळते याची वाट बघत वेल्ह्यात थांबलो.

सोमवार आणि शुक्रवार हे वेल्ह्याच्या बाजाराचे दिवस असल्याने त्या दिवशी सिंगापूर, मोहरी, निसणी, हरपूड, केळद, कुंबळे दूरदूरच्या गावात मंडळी खरेदीसाठी वेल्ह्याला येतात. एरवी ही गाव गपगुमान पडून असतात. त्या दिवशी बाजाराचा दिवस नसल्याने आमचा बराच वेळ गाडीची वाट बघण्यात गेला. अखेरीस एक मालवाहतूक करणारा वाहकाने आम्हाला कुसारपेठच्या खिंडीपर्यंत सोडण्याचे कबूल केले.  

गाडी धुरळा उडवत निघून गेली. समोर धुळीने भरलेला सिंगापूरचा रस्ता निपचित पडून होता.उजव्या हाताला तोरण्याचा झंजारपासूुन ते बुधल्यापर्यंतचा विस्तार डोळ्यात मावत नव्हता. दुपारचे बारा- साडेबारा झाले होते. पाठीवरचे पिठ्ठू घट्ट केले आणि  सुरवात केली. काहीसे मीटर गेल्यानंतर डाव्या हाताला नाजूकशा हिरव्यागार हरणटोळ सापाने दर्शन दिले. हरणटोळचे मनसोक्त फोटो काढून झाल्यानंतर दोघंही आपापल्या वाटेला लागलो. डोंगराच्या माथ्यावरून बनवलेला हा रस्ता सरळ सिंगापूर आणि मोहरी गावात जातो. या वाटेवर बिलकूल वस्ती नाही. मध्ये फक्त कुसारपेठ नावाचा धनगरांचा पाडा लागतो. कुसारपेठवरुन पुढे गेले की डोंगराला वळसा मारून पुढे आलो की लिंगाण्याचे पहिल्यांदा दर्शन घडते. दुपारी साडेचारपर्यंत आम्ही सिंगापूरच्या डोक्‍यावरच्या डोंगरापर्यंत पोचलो होतो. खाली सिंगापूर गाव दिसायला लागले. इथून फुटणारा एक फाटा सरळ वर मोहरी गावात जातो. आमचा मुक्काम सिंगापुरात असल्यामुळे आम्ही गावाची वाट पकडली. 

सिंगापुरात पोचेपर्यंत पावणेपाच वाजले होते. जानेवारीचा महिना असल्यामुळे सुर्यास्ताला तास दीडतासच उरला होता त्यामुळे गावात पाठ टेकणे शक्‍य होणार नव्हते. त्यामुळे पाठपिशव्या मोरेच्या घरातच सोडून आम्ही रायलिंगच्या पठाराकडे उधळलो. सिंगापूरच्या गावाच्या मागून जाणारी वाट रायलिंग पठारावर उतरते. हे अंतर अंदाजे दोन सव्वा दोन किलोमीटरचे आहे. वाटेत दोन पट्टे जंगलाचे लागतात. इतक्‍या उंचीवर टिकून राहिलेले हे जंगलाचे सदाहरित पट्टे दुर्मिळ होत चालले आहेत.

आता लिंगाणा दर्शनाचे वेध लागले होते. वीस पंचवीस मिनिटांत पठाराच्या मागून हाताच्या बाजूने वर येणारा लिंगाण्याचा सुळका दिसला आणि आता सुर्यास्ताचा मुहूर्त चुकत नाही या भावनेने निर्धास्त झालो. रायलिंगच्या पठाराला निसर्गाने भरभरून सौदर्यं दिले आहे. आम्ही रायलिंग पठारावर पोचलो तेव्हा लिंगाणा या सोनसळी सूर्यप्रकाशात न्हाहुन निघाला होता. लिंगाणाच्या मागे उभा असलेल्या बलदंड रायगडाच्या डोक्‍यावर सूर्य पोहचला होता. लिंगाण्याचे सरळ सोट उभे ताशीव कडे धडकी भरवणारे होते. आजमितीला या लिंगाण्याच्या डोक्‍यावर पोचण्यासाठी कातळरोहणाचे साहित्य आवश्‍यक आहे. या लिंगाण्याच्या पोटाशी गुहा आहेत. तिथपर्यंत पोहचता येते. त्याच्या आधी लिंगाणामाची नावाचे अगदी छोटे गाव आहे.

पूर्वी लिंगाण्याचा वापर कारागृह आणि रायगडाच्या राखणदार किल्ला म्हणून केला जात असे. या किल्ल्याच्या माथ्यावर असणाऱ्या गुहेत कैद्यांना ठेवले जात असे आणि खाली उतरणारे दोर काढून टाकले जात अशी माहिती सांगितली जाते.

जानेवारीचा महिना असल्याने पठारावर गवत बेसुमार वाढले होते. रायलिंगवरून लिंगण्याकडे जात असतानाच डावीकडची एक वाट बोराट्याच्या नाळेत उतरते. ही धडकी भरवरणारी  बोराट्याची नाळ उतरायला अवघड आहे. इथे दोर ना लावता उतरत येणं शक्‍य आहे पण त्यासाठी तुम्हाला सराव आवश्‍यक आहे. बोराटीच्या भेदक नाळेची वाट निम्म्यात उतरून पाहिली आणि माघारी घेऊन आम्ही रायलिंग पठारावर अस्तावस्त पसरलो. रायगडावरच्या जगदीश्वरामागे  सूर्य लयास पावत होता. हे मनोहारी आणि दुर्मिळ दृश्‍य कॅमेरात टिपण्यासाठी सकाळपासून केलेली पायपीट सार्थकी लागली होती. एक अमूर्त अनामिक समाधान मनात उतरले होते. काही सुंदर छायाचित्र गाठीशी जमा झाली. मावळत्या सूर्याच्या तप्तशार आणि लालभडक गोळ्याखाली जगदिश्वराचे मंदिर अशी एक दुर्मिळ आणि उकृष्ट फ्रेम मिळाली.

सह्याद्रीच्या त्या अफाट नजऱ्यात हरवून जात, स्वतःचे अस्तित्व विसरून जात, कड्यावर बसून सूर्योदय किंवा सूर्यास्त पाहण्याचे भाग्य मिळणे हीच या सह्यसमाधीची अनुभूती असते. हळूहळू अंधार असा पसरत गेला आणि खालच्या कोकणातल्या गावातले दिवे लुकलुकू लागले. लिंगण्याच्या डावीकडे दापोली तर उजवीकडे पाने गाव आम्ही बसलेल्या जागेवरून दिसत होते. या गावामधून नागमोडी वळसा मारून पळणाऱ्या काळ नदीच्या पात्रातले पाणी चमचमत होते.

दिवस मावळला होता, उद्या आम्हाला दापोलीला उतरायचे होते. अंधारातून आम्ही सिंगापूरला परतलो. मोरे काकांच्या घरातच आमची आणि त्यांची अंगत पंगत झाली. त्यांच्या घराशेजारीच असलेल्या स्वच्छ गोठ्यात आम्ही आमच्या पथाऱ्या पसरल्या. दुसरा दिवस खुणावत होता. त्याच्याच स्वप्नात रममाण होत कधी पांघरूणात गुरफटलो पत्ताच लागला नाही.

दुसरा दिवस उजाडला तोच गोठ्यातल्या जनावरांच्या हाकेने. मोरे काकांनी रात्रीच वाट दाखवायला यायचे कबूल केले होते. सकाळीच ते आवरून तयार होते. कमरेला अडकवलेला कोयता. पायात कोल्हापुरी वहाण, गळ्यात पंचा, तंबाखूची चंची आणि हातात काडतूस लावलेली दणकट काठी असा त्यांचा डोंगरी लवाजमा तयार होता. आमचे चहा पाणी होईपर्यंत काकांनी एक सुरेख बांबूची काठी आमच्यासाठी तयार करून दिली. पुढे ओढ्यातल्या डोहाला पाणी मिळेल असे सांगून पाण्याचे कष्ट वाचवले.

सिंगापूरला जाणारी वाट सोपी जरी असली तरी पहिल्या टप्प्यात रायलिंग पठारावर ही वाट माहितगारशिवाय सापडणे थोडे अवघड आहे. कारण रायलिंग पठारावर असंख्य गुरवाटा पसरल्या आहेत त्यात ही वाट हरवून जाते. त्यामुळे सुरवातीलाच ही वाट शोधणे गरजेचे आहे. एकदा का वाट सापडली की मग चुकण्याची शक्‍यता कमी आहे. मोरे काकांमुळे ही वाट सापडणे अजिबात अवघड गेले नाही. जी वाट रायलिंग पठाराकडे जाते त्या वाटेला समांतर डावी वाट सिंगापूर गाव सोडला कि खाली उतरत जाते. सिंगापूर गाव सोडला कि पंधरा ते वीस मिनिटात ही वाट सुरू होते. या वाटेने उतरले कि अर्ध्या पाऊण तासाच्या चालीवर एक मोठा कोरडा ओढा आडवा लागतो. ही वाटेवरची खूण म्हणून लक्ष्यात ठेवावी. फेब्रुवारी अखेरपर्यंत या ओढातल्या डोहामध्ये पाणी असते. नंतर मात्र संपूर्ण वाटेवर कुठेही पाणी नाही.

पहाटे लवकर निघाल्यामुळे ओढ्यात छोटी विश्रांती घेण्यात आली. ओढ्याच्या मागच्या बाजूला आग्या नाळ खुणावत राहते. हा ओढा म्हणजे रायलिंग पठाराची बरोबर खालची बाजू. ओढ्यावर विश्रांती घेऊन झाल्यावर आता सुरू होतो तो सिंगापूरच्या नाळेचा सर्वांत थरारक पट्टा. ओढा पार केला कि सह्याद्रीचा माथा संपतो आणि उताराचा भाग सुरू होतो. या उताराची सुरवातीची वाट ही डोंगराच्या कातळावरून काढण्यात आली आहे. ही वाट जीवघेणी जरी नसली तरी वाटेला दृष्टीभय नक्कीच आहे. त्यामुळे हा पट्टा काळजीपूर्वक पार करावा. चार पाच वळणे ओलांडली कि सिंगापूरच्या नाळेचा प्रत्यक्ष भाग सुरू होतो. सिंगापूरची नाळ ही लौकिक अर्थाने पाण्याच्या प्रवाहाच्या वाटेतून ना जाता डोंगराच्या उभ्या दांडावरून उतरवण्यात आली आहे. या वाटेवर पोहचला कि मागे रायलिंगचे पठार आणि लिंगाणा मागे उभा दिसतो. इथे आमची न्याहारी उरकली. मोरे काकांना इथे निरोप दिला. तोपर्यंत सूर्य डोक्‍यावर आला होता. मधल्या वाटेत फारशी गर्द झाडी नसल्यामुळे आता उन्हाचे चटके बसत होते. इथून वाट सरळ खालच्या दापोली गावात उतरते. मागे वळून बघितले तेव्हा लिंगाणा आणि त्याला चिकटून उतरणारी बोराट्याची नाळ मागे सरळ उठवली होती.

काळ नदीचे कोरडेठाक आणि काळ्याशार गोट्यांनी भरलेले हे पात्र हे या वाटेवरचे पुढचे आकर्षण होते. कदाचित या काळ्याशार खडकांनी भरलेल्या या नदीला ’काळ’ नाव देखील या काळेभोरपणामुळेच मिळावे असावे. जानेवारीमध्ये कोरडीठाक पडलेली ही नदी पावसाळ्यात जेव्हा फुगत असेल तेव्हा तिचे ते रूप नक्कीच धडकी भरवणारे असेल.

सिंगापूर गावातून निघाल्यापासून दापोली गावात पोचायला चार साडे चार तास लागले होते. दापोलीत गेल्यानंतर गावातली लोक कुतूहलाने बघत होती. गावातल्या एका ओसरीवर क्षणभराच्या विश्रांतीसाठी थबकलो. घरातल्या माउलीने पाण्याची कळशी आणि गुळाचा खडा अगत्याने पुढे केला. इतक्‍या लांबून डोंगर तुडवत कशा पायी येता ? हा त्यांचा परवलीचा प्रश्न होताच. ज्याचे उत्तर आमच्याकडे नव्हते.

वाळणडोहचा चमत्कार
आता वाळणडोहचे वेध लागले होते. सह्याद्रीच्या कुशीतून वाहणाऱ्या ’काळा’च्या उदरात दडलेले ते अद्भुत आश्‍चर्य बघण्यासाठी आम्ही आतुरलेले होते. दापोली गावापासून सहा ते सात किलोमीटर असलेले हे ठिकाण म्हणजे स्थानिकांचे मोठे जागृत श्रद्धास्थान.

इथे बारा महिने पाणी असणाऱ्या डोहाच्या बाजूला वरदायिनी देवीचे ठाण आहे. इथल्या डोहात हातभर लांबीचे कॅट फिश (शिंगाडा) आहेत. या माशांना ‘देवीचे मासे’ ओळखले जात असल्याने त्यांना कोणी हात लावत नाही. या डोहात तुम्ही काहीही पदार्थ फेकला कि शेकडोंच्या संख्येने हे मासे जमा होतात. इथला पुजारी तर नुसता शीळ घालून या माशांना बोलावतो.  क्षणार्धात त्या पाण्यात जिवंत होणारी हजारो माशांची खळबळ फार बघण्यासारखी असते.

या शिवाय काळ नदीचे पत्र इथे फारच सुंदर दिसते, सह्याद्रीच्या रंगामधून खळाळत येणारी ही सरिता त्याच्या वेगवान प्रवाहामुळे इथल्या कातळाला चिरत पुढे सरकते. त्यामुळे या नदीच्या पात्रात मोठ्या प्रमाणात रांजणखळग्यांची (POTHOLES) निर्मिती झाली आहे. दोन दिवसापासून सुरू असलेली पायपीट या नितांत सुंदर ठिकाणी संपत होती. काळ नदीच्या पाण्यात निवांत आणि शिणवटा घालवणारा  मनसोक्त असा जलविहार झाला. मागे पसरलेल्या सह्याद्रीच्या अजस्र रांगा, डोकावणारा लिंगाणा, समोर उठावलेला रायगड, काळ नदीचे पात्र हे सगळे दृश्‍य डोळ्यात साठवून घेत आम्ही माघारी निघालो.

दापोली - बिरवाडी- वरंधा - हिर्डोशी मार्गे आम्ही भोर स्टॅंडला पोचलो तेव्हा संध्याकाळची कातर वेळ झाली होती. पुण्याला जाण्याची अजिबात इच्छा होत नव्हती. मन अजूनही त्याच दऱ्याखोऱ्यात रेंगाळत होते. गेल्या दोन दिवसात तुडवलेल्या रानवाटा, उतरलेल्या घाटवाटा, रायलिंग पठारावरची हळवी करून जाणारी संध्याकाळ, सिंगापूरच्या नाळेतील काळजाचा ठोका चुकवणारी घसरडी वाट, काळ नदीचे अद्भुत पात्र, वाळणडोहाचे चमत्कार, मोरे दाम्पत्याची आपुलकी, पाठीवर वाहिलेले जड पिठ्ठू, भरून आलेल्या पाय, सिंगापुरातून मध्यरात्री पाहिलेले काळेशार चांदणं पुढचे काही आठवडे निश्‍चितच पुरणार होते...

हे सगळे क्षण, सह्याद्रीची अद्भुत रूपं सगळा मनात साचून राहिला आणि पुण्याकडे जाणाऱ्या एसटीमध्ये अत्यंत जड पावलाने आम्ही बसलो...अर्थात या दऱ्या खोऱ्यामध्ये पुन्हा परतण्यासाठी...

फोटो फीचर

संबंधित बातम्या