मेघालयातील गुहांचा मागोवा

सई उपळेकर
सोमवार, 28 सप्टेंबर 2020

पर्यटन

ईशान्य भारत म्हणजे प्राकृतिक सौंदर्याने ओतप्रोत भरलेला आठ राज्यांचा समूह. पूर्व-पश्चिम हिमालय रांगांच्या कुशीत वसलेल्या सिक्कीम-अरुणाचल आणि पूर्वांचल पर्वत रांगांच्या विस्तारातील नागालँड - मणिपूर - मिझोराम - त्रिपुरा - दक्षिण आसामच्या मधे वसलेला प्रदेश म्हणजे मेघालय! 

मेघालय टूरिझमचे योग्य असे घोषवाक्य आहे, ‘Halfway to Heaven’. पर्जन्य प्रदेश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मेघालयातील खळखळ वाहणारे झरे, दरीत कोसळणारे अफाट धबधबे, निखळ निळे थंडगार पाण्याचे तलाव, कधी अलगद तरंगणारे तर कधी सरसावून येणारे ढग, झाडाच्या जिवंत मुळांचे पूल, नयनरम्य हिरवे डोंगर आणि गडद जंगल, स्वर्गाचीच अनुभूती देतात. पण याच मेघालयाच्या गर्भाच्या काळोखात दडल्या आहेत तितक्याच विलोभनीय गुहा आणि लांबलचक भुयारे! 

पृथ्वीची निर्मिती होत असताना, भूकंप आणि ज्वालामुखीच्या उद्रेकातून निर्माण झालेल्या अनेक बेटांपैकी (कॉरल आयलंड) एक बेट म्हणजे मेघालयाचा गारो, जैंतिया आणि खासी डोंगरांचा भाग. भू-तबकांच्या हालचालींनंतर अनेक भाग जोडले गेले, काही भाग विभक्त झाले. अतिवृष्टीमुळे या चुनखड्याच्या दगडातून प्रदीर्घ काळ पाणी झिरपत राहिले, कमकुवत भाग फाकून तिथे भुयारे निर्माण झाली आणि त्यातून पाणी वाहू लागले. भरपूर प्रमाणात चुनखडीचा दगड, अतिवृष्टी आणि एका ठराविक उंचीवरचा डोंगराळ भाग असल्यामुळे मेघालयात ज्या प्रमाणात चुनखडी आणि वालुकाश्म खडकाची भुयारे आहेत, तेवढी भारतात इतरत्र कुठेही आढळत नाहीत.  

नैसर्गिक गुहा/भुयाराच्या अभ्यासाला स्पिलिओलॉजी असे म्हणतात. तसेच ऑस्ट्रिया, जर्मनी, ग्रेट ब्रिटन या देशांमध्ये गुहांचा शोध घेणे हा एक साहसी क्रीडा प्रकार मानला जातो आणि त्याला ‘केविंग’ म्हणतात. या गुहा अवाढव्य जरी असल्या, तरी त्यांचा शोध घेणे धोकादायक असून त्यासाठी शारीरिक, मानसिक आणि तांत्रिक पूर्वतयारी गरजेची असते.

मेघालयातील या गुहांचे गूढ रहस्य उलगडण्यासाठी १९९० पासून आवेशाने शोध घेणारा अवलिया म्हणजे ब्रायन के. डाली. शिलाँगमध्ये जन्मलेल्या ब्रायन यांनी कुतूहलापोटी सुरू केलेल्या या गुहांचा शोध आणि अभ्यासाला एक दिशा मिळावी म्हणून काही सहकाऱ्यांबरोबर १९९२ मध्ये मेघालय ॲडव्हेंचरर्स असोसिएशन(MAA)ची स्थापना केली. १९९३ पासून MAA आणि युरोप मधल्या काही केवर्सनी मिळून या गुहांना शोधण्याची आणि त्यांचे सर्वेक्षण कागदावर उतरवण्यास सुरुवात केली. या चमूने मेघालयातील साधारण १,४०० गुहांचे सर्वेक्षण केले, दस्तऐवज तयार केले आणि ते ‘केव्ह पर्ल्स ऑफ मेघालय’ या पुस्तकांमधून प्रकाशित केले. अजूनही त्यांचे कार्य सुरू आहे! भारत सरकारकडून साहसी खेळासाठी देण्यात येणाऱ्या सर्वोच्च गौरव ‘तेनझिंग नोर्गे नॅशनल ॲडव्हेंचर ॲवॉर्ड’ने ब्रायन डाली यांना २००२ मध्ये सन्मानित करण्यात आले.

या विलक्षण चमूबरोबर या मेघालयातील गुहांचे अलौकिक जग अनुभवण्याची मला संधी मिळाली. दर वर्षी फेब्रुवारीमध्ये ही मोहीम असते आणि युरोपातील काही अनुभवी केवर्स येतात. फेब्रुवारीमध्ये मेघालयमध्ये पाऊस नसल्याने भुयारे कोरडी असतात आणि सुरक्षितपणे सर्वेक्षण करता येते. इतक्या दिग्गज मंडळींबरोबर वावरताना  मोहिमेच्या सुरुवातीला थोडे दडपण जाणवत होते. पण त्यानंतर या अनुभवी लोकांबरोबर काम करताना फक्त आणि फक्त मजा आली. कडक शिस्तीचे वातावरण नव्हते, तरी केविंगच्या आवडीने झपाटलेल्या या केवर्समध्ये एक अंगभूत शिस्त होती. जैंतिया डोंगररांगेतल्या श्नोग्रीम रिजजवळ गावातल्या प्रमुखाची परवानगी घेऊन एका पठारावर तंबू ठोकले आणि पुढच्या एक आठवड्यासाठी ते आमचे घर झाले. बरोबर किचन स्टाफ असल्याने खाण्याची चिंता नव्हती.

या सुरुवातीच्या आठवड्यातच मला एका उभ्या गुहेत उतरण्याची संधी मिळाली. गिर्यारोहणाची आवड आणि त्याचे मूलभूत तांत्रिक शिक्षण घेतले असल्याने अशा भुयारात दोर, उपकरणे आणि सर्वेक्षणाचे सामान घेऊन चढणे आणि उतरणे सुकर होते, पण तितकेच दमछाक करणारे होते. केविंगसाठी अंगावर केविंग सूट, डोक्यावर हेल्मेट आणि त्यावर चांगल्या प्रतीचा हेड टॉर्च, हातात ग्लोव्ह्ज, पायात गमबूट्ससारखे दिसणारे वेलीस आणि निमुळत्या भागांमध्ये चढाई-उतराई करण्यासाठीची उपकरणे अत्यावश्यक असतात. सर्वेक्षण करण्यासाठी GPS, पर्सनल डिजिटल असिसटन्ट, डिस्टो हे वापरले जातात. यांच्या साह्याने भुयाराचे मोजमाप करून नकाशा तयार करता येतो, तसेच काही ठळक वैशिष्ट्यांची नोंदणी करता येते. 

चार लोकांची एक टीम होती, दोन व्यक्ती सर्वेक्षण करायला आणि बाकी गुहेची पुढची वाट शोधायला व लागल्यास दोर लावायला. पहिलीच गुहा असल्याने खूप कुतूहल होते. न येणाऱ्या गोष्टींबद्दल माहिती आणि विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर खेळीमेळीत मिळत होते. या गुहेच्या तोंडाशी स्थानिक लोकांनी बांबू लावून गुहेतील वटवाघळे पकडण्यासाठी जाळी टाकली होती. ती चुकवत खाली उतरल्यावर थोडे वाकून आणि सरपटत, धारदार चुनखड्याच्या दगडांवर अलगद पाय टाकत, लटकत, तर कधी निमुळत्या दगडांच्या कपारीतून जाताना आपण नक्की काय शोधतोय हे सुरुवातीचा काळ तरी कळले नाही. गुहेतले तापमान १८-२० डिग्री सेल्सिअस होते आणि ऑक्सिजनचा अभाव जाणवला नाही. पण काही वेळाने समोर जे पहिले ते अवाक करणारे होते. गुहेचा निमुळता भाग संपला होता आणि आता भव्य सुरुंगाची सुरुवात झाली होती. हेड टॉर्चच्या प्रकाशात चुनखड्याची स्फटिके ताऱ्यांसारखी चमकत होती. गुहेच्या छतातून वर्षानुवर्षे झिरपणाऱ्या कॅल्साइटमुळे तयार झालेले स्तंभ, काही उदबत्तीएवढे बारीक तर काही झाडाच्या खोडाएवढे भव्य, पडदे, मशरूमसारख्या रचनांची एक सुंदर खोली होती. या सुंदर रचनांना डोळ्यात साठवून पुढे गेलो, तर ८० फूट खोल असे उभे भुयार होते. या गुहेचा थोडा भाग कमांडो शिडीच्या साह्याने उतरलो. झुलणाऱ्या शिडीवरून उतरणे जोखमीचे होते. पुढचा भाग दोराच्या साह्याने रॅपलिंग करत उतरलो. भुयारात उतरल्यावर कळले, की हा ‘क्रेम लियात प्राह’, जी दक्षिण आशियातील सर्वांत लांब (३० किमीचे सर्वेक्षण) चुनखड्याची गुहा आहे, त्याचाच एक भाग असावा. ८० फूट भुयारात एका दोरावर लटकून लेझरच्या मदतीने गुहेचे मोजमाप करताना जाणवले, आपण पृथ्वीच्या गर्भात शिरलो आहोत! हेच ८० फूट आता ‘जुमारिंग’ करत वर चढत असताना पुढे चालायला आणि चढायला अंगात त्राण उरतील का, आज मी बेस कॅम्पपर्यंत पोचू शकीन का, असा विचार मनात येऊन गेला! पण जिथे शरीराची क्षमता संपते, तिथे सकारात्मक मानसिक शक्तीचा प्रभाव जाणवतो आणि पुढे जात राहण्याची ऊर्जा मिळते!

गुहेला बरेच फाटे फुटतात त्यामुळे वाट चुकू नये म्हणून जातानाच काही ठिकाणी छोट्या दगडांचे मनोरे रचून गेलो होतो. जाताना पुढे काय वाढून ठेवले होते याचा अंदाज नसल्याने थकवा जाणवला नव्हता. पण परत येताना प्रत्येक निमुळत्या खाचांतून चढणे आता अवघड वाटू लागले होते. आपण ज्या मार्गाने सकाळी आलो त्याच मार्गाने परत जाताना इतका संघर्ष का करावा लागत होता कळत नव्हते. निमुळत्या ठिकाणी, एका खाचेत उजवा पाय तर दुसऱ्या खाचेत डावा हात अडकवून चढत असताना मधेच अडकायला झाले. हात पाय हलवायची सोय राहिली नाही. येणाऱ्या दोन आठवड्यांच्या मोहिमेसाठी मला तयार करायचे म्हणून की काय टीममधले इतर जण मी प्रयत्न करत राहावे म्हणून कसे यायचे सांगत होते. फारशी जागा नसल्याने ना वरच्यांना मदत करता येत होती, ना परत खाली उतरायची सोय होती! खूप वेळ प्रयत्न केल्यावर, मागच्या दगडावर पूर्ण पाठ टेकवून पायांच्या ताकदीने स्वतःला वर खेचले आणि सुटकेचा निःश्वास सोडला. यापुढे फक्त मजा नसून असे बरेच किस्से घडणार आहेत याची जणू नांदीच होती ही! पुढच्या गुहांमध्ये कधी ग्लोव्ह तर कधी बूट दोन दगडांमध्ये, चिखलामध्ये अडकणे, घसरून पडणे असे बरेच प्रकार घडले. पण टीम नेहमीच मदतीला होती!

सुमारे सात तास गुहेत राहिल्यावर, केलेल्या सर्वेक्षणाची नोंद करून परत निघालो. थकून बेस कॅम्पला पोचलो तेव्हा जेवण तयार होते. रात्री बॉनफायरजवळ गप्पा मारण्यात आणि दिग्गजांचे अनुभव ऐकण्यात शरीरात आलेला शीण नाहीसा झाला. रात्री शांत झोप लागली. पुढचे काही दिवस वेगवेगळ्या रचनांच्या गुहांना शोधण्याची संधी मिळाली. काही चिखलाने माखलेले तर काहींमध्ये मोठमोठे दगड रचलेले. पण दर वेळी एक नवीन आव्हान असायचे!

त्यांनतर मुख्य मोहिमेसाठी आमचा बेस कॅम्प मुलियन नावाच्या गावी हलवण्यात आला. आसाम, मेघालय आणि बांगलादेशच्या सीमेवर वसलेले हे एक छोटे गाव. मार आणि बीआते या जमाती इथे राहतात. जंगलात प्रामुख्याने बांबूची झाडे असल्याने झाडू तयार करणे आणि तो विकणे हा एकमेव व्यवसाय. या गावी पोचण्यासाठी पक्का रस्ता नसल्याने पावसाळ्यात संपर्क तुटतो. शाळेला सुटी असल्याने शाळेच्या छतावर आमचे टेंट उभारले. मोहिमेचे आठवडाभराचे नियोजन केल्यावर सकाळी नाश्ता करून ४-५ लोकांची टीम करून वेगवेगळ्या दिशेने स्थानिक लोकांच्या मदतीने नवीन गुहा शोधण्यासाठी निघालो. जंगलातून २ तास उतराई करताना तिथले काही स्थानिक प्राणी जसे हॉग बॅजर, पक्षी आणि रानफुले पाहावयास मिळाली. बऱ्याच वेळाने एक झरा दिसला. झऱ्याकाठी आमचे सामान ठेवून गुहा शोधू लागलो. बराच काळ काहीही दिसले नाही. शेवटी एका छोट्या कपारीतून उतरल्यावर एक भव्य भुयार दिसले. या भुयारात पोहावे लागत होते. काळोखात पाणी किती खोल आहे याचा अंदाज नव्हता. आत हेडटॉर्चच्या प्रकाशात चमकणाऱ्या चुनखड्याच्या दगडावरून वाहणारे धबधबे एक अद्‍भुत दृश्य होते! तसेच मधे मधे काही अवघड जागेतून चढणे उतरणे म्हणजे शारीरिक आणि मानसिक परीक्षा वाटत होती. गुहा लांबलचक आणि भरपूर पाणी असल्याने या गुहेचे सर्वेक्षण करण्यासाठी बेस कॅम्पला परत न जाता जंगलातच राहायचे  ठरवले. उंच बांबूच्या झाडांवर ताडपत्री टाकून एक छोटे बेसकॅम्प केले. उंच उंच बांबूच्या झाडांच्या जंगलात फारसे प्राणी कधी दिसले नाहीत, असे अनुभवी लोकांनी सांगितले. प्राण्यांची आता भीती नाही, म्हणून रात्री गाढ झोप लागली. दुसऱ्या दिवशी परत त्याच गुहेत गेलो. सर्वेक्षण करणे हे चिकाटीचे काम आहे, त्यामुळे एका दिवसात फार तर फार ६० मीटर सर्वेक्षण करता येते. या कपारीतून पुढे काही नसेल आणि इथे गुहा संपते असे मला वाटत असतानाच तिथून सरपटत पुढे जायला सांगितले असता समोर एक सुरुंग दिसायचा! त्यामुळे भुयार किती लांब असेल हे सांगणे अवघड असते.

गुहेत एके ठिकाणी सर्वेक्षण करत असताना एका छोट्या डबक्यात मासा दिसला. काळोख असल्याने गुहेतल्या माशांना डोळे नसतात आणि ते रंगहीन असतात. पण हा मासा गुहेतला वाटत नव्हता. बाहेरच्या झऱ्यातून वाहून आत आला होता. एवढ्या छोट्या डबक्यात या काळोखात तो फार जगेल अशी आशा नव्हती. गुहेत कोळ्यांचे प्रकार, श्रीम्प......, वटवाघळे दिसली. या गुहेत पाणी असूनही काही भागांमध्ये गरम हवा जाणवत होती. लागोपाठ तीन दिवस पाण्यातून पोहत आणि चालत सर्वेक्षण केल्यावर गुहेचे दुसरे मुख सापडेल अशी अपेक्षा होती, पण गुहेचा शेवट एक उंच भिंत होती. आमच्या हेड टॉर्चच्या प्रकाशात छत दिसत नव्हते इतकी उंच! या भिंतीतून पाणी पाझरत होते. गुहेची एक बाजू सर्वेक्षण करून संपली होती. असे अनेक फुटणाऱ्या फाट्यांचे सर्वेक्षण इतर टीम्स करत होत्या.

दिवसभर गुहेत राहून आल्यावर रात्री झऱ्याकाठी जेवण करून गप्पा गोष्टी करत दिवस आणि या गुहेचा अध्याय संपला.

बेसकॅम्पहून परत बोजा घेऊन सुमारे तीन तास चढून गावात आलो, तर गावातल्या काही लोकांनी एक भाबडा प्रश्न विचारला, ‘आम्ही सुटीचा काळ घालवायला शहरात जातो. पण तुम्ही शहरातले लोक सुट्या काढून गुहा शोधण्यासाठी एवढा खटाटोप का करता?’ ‘स्वांतः सुखाय’ या पलीकडे माझ्याकडे काही उत्तर नव्हते!

पंधरा दिवस या मोहिमेचा भाग असल्यावर परतणे खूप अवघड होते. गुहा शोधण्याचे आणि सर्वेक्षण करण्याचे काम शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या आव्हानात्मक असले, तरी त्यातून मिळणारे समाधान अतुलनीय आहे!

या गुहांच्या अभ्यासाला बरेच पैलू आहेत. पृथ्वीच्या निर्मितीपासून ते आत्तापर्यंतचा काळ यात पृथ्वीवर होणाऱ्या बदलांमुळे भूगर्भशास्त्रीय कालगणनेत तीन कालखंडात विभागले आहे, ग्रीनलॅंडिंयन, नॉर्थग्रीपियन आणि आपण राहतो ते मेघालयन युग! हिमयुग आणि अतिउष्णतेनंतर ४,२०० वर्षांपूर्वी २०० वर्षांच्या दुष्काळानंतर पृथ्वीवर स्थिर वातावरण निर्माण झाले, त्याला मेघालायन युग म्हणतात. गुहेत सापडणाऱ्या लवणस्तंभाच्या थरावरून भूतकाळात असलेल्या हवामानाचा आणि येणाऱ्या १० वर्षांच्या हवामानाचा अंदाज बांधू शकतो. मेघालयातील मॉम्लूह नावाच्या गुहेत असे लवणस्तंभ मिळाल्याने, या कालखंडाला मेघालायन युग नाव देण्यात आले. तसेच मोसासौरस नामक डायनासॉर आणि शार्कचे काही जीवाश्म मेघालयाच्या गुहांमध्ये सापडले आहेत! जगातील सगळ्यात लांब सँडस्टोन गुहा ‘क्रेम पुरी’ ही मेघालयाच्या खासी डोंगरांमध्ये आहे. तसेच गुहेच्या काळोखात  राहणाऱ्या कीटक, मासे, बेडूक यांच्या जैविक रचनेत बदल झाले आहेत. शोधावे तेवढे कमी अशी आहे, ही गुहांची दुनिया!

या गुहांचे आतले विश्व अनुभवता यावे, म्हणून सर्वसामान्य पर्यटकांसाठी मावसमई, अर्वाह अशा काही गुहा मेघालय पर्यटनातर्फे प्रकाशयोजना आणि शिड्या टाकून सुरक्षित पाहावयास खुल्या आहेत. तसेच YHAI तर्फे काही गुहांमध्ये केविंग करता येते. 

संबंधित बातम्या