निसर्गसंपन्नतेला कल्पकतेची जोड

संदेश पटवर्धन
बुधवार, 28 मार्च 2018

कोल्हापूर-कोकण विशेष     

निसर्गाच्या सान्निध्यात राहणाऱ्यांसाठी मंडणगड, दापोलीचा परिसर ट्रेकिंगसाठी, साहसी पर्यटनासाठी अत्यंत योग्य आहे. दापोली हे ठिकाण  किल्ले, लेणी, गरम पाण्याची कुंडे, मंदिरे, जंगले, नारळ-सुपारीच्या बागा अशा निसर्गाने भरभरून दिलेल्या देणग्यांचा एकत्रित समुच्चय आहे. इथली भटकंती नेहमीच खास असते.

दापोलीतील पाच एकराच्या विस्तीर्ण क्षेत्रावर पसरलेल्या धनश्री नर्सरीच्या पर्यटन केंद्रात नैसर्गिक अधिवासात राहणारे मोर, लावे, पोपट, चिमणी, पाकोळी, कोकिळा, सुतार पक्षी, खंड्या पाहायला मिळतात. दापोली शहरापासून थोडे दूर आणि एकांतात असलेल्या रम्य ठिकाणी खास कोकणी नाश्‍ता आणि जेवणही मिळते. येथे चुलीवर केलेल्या तांदूळ, बाजरी आणि नाचणीच्या भाकऱ्या, कोकणी पद्धतीचे मटण आणि चिकन, माशांचे विविध प्रकार पर्यटकांच्या आगाऊ मागणीप्रमाणे तयार करून दिले जातात. लज्जतदार पदार्थांबरोबरच येथील शांतता वातावरणातील गारवा, पक्ष्यांचा किलबिलाट आणि परिसरातील स्वच्छतेमुळे मन प्रसन्न होते.

राज्यातील एक प्रमुख हिल स्टेशन म्हणून मंडणगडचा परिसर नावारूपास येऊ लागला आहे. निसर्गालाच गुरू मानून नैसर्गिक बाबींना कुठेही धोका न पोचवता येथे पर्यटकांना सुविधा उभारल्या आहेत. त्यामुळे निसर्गात राहण्याचा आनंद मिळतो. बाजूने खळाळत वाहणारी निवळी नदी, फेसाळत कोसळणारा धबधबा पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला आहे. पर्यटकांसाठी लाल मातीशी एकरूप होईल, अशी तंबूंची आणि कॉटेजची रचना करण्यात आली आहे. पर्यटकांना नैसर्गिक निवासाची खुमारी अनुभवता येते. भाजीपाला लागवडीमुळे पर्यटकांच्या ताटात सेंद्रिय अन्न मिळते. 

मंडणगड येथील एक व्यावसायिक मोरे यांनी विविध प्रकारच्या झाडांची लागवड केल्यामुळे वातावरण अत्यंत आल्हाददायक असते. पर्यटकांना मंडणगड किल्ल्यावर नेऊन तेथील सनसेट पॉईंटपासून सूर्यास्ताचा भान हरपून टाकणारा नजारा पाहायला मिळतो. किल्ल्याच्या सभोवतालच्या महादुर्ग, तुळशी धरण, मंडणगड शहर आणि अथांग पसरलेला वेळासचा समुद्रकिनारा, बाणकोट किल्ला अशी दृश्‍ये डोळ्यात साठविताना पर्यटक हरखून जातात. रात्रीच्या ट्रेकिंगचा अनुभव तर थरारक असतो. सहकाऱ्यांच्या मदतीने विजेरीच्या प्रकाशात आडवळणाच्या पायवाटेने वाटा काढत गर्द काळोख कापीत जमिनीवर पहुडत आकाशातील ग्रहताऱ्यांचा नजारा पाहण्यात सारी रात्र निघून जाऊ शकते. नदी व धबधब्याच्या मध्ये पर्यटक जाऊन उभे राहतात. त्याच जागेचे वर्णन ‘आय ऑफ मंडणगड’ असे करतात. 

रात्री कंदिलाच्या प्रकाशात पर्यटकांना खेकडे पकडण्याचा अनुभव मिळतो. अवधूत मोरे यांच्या संकल्पनेतून ‘रन फॉर नेचर... एक धाव निसर्गासाठी’ असा उपक्रम राबविला जातो. आडवळणाच्या नागमोडी वाटा, बोचरी थंडी, झाडेझुडपे, ओढे-नाले, धबधबे आणि काट्यांच्या संगतीने तुडवलेली पायवाट यामुळे सारा क्षीण संपून जातो. 

मंडणगड समुद्रसपाटीपासून ८०० मीटर अंतरावर आहे. मंडणगडनजीक असलेला परिसर अवर्णनीय आहे. शेडवई येथील केशरनाथ मंदिर आणि या मंदिराच्या बाजूने वाहणारी नदीच्या गार पाण्याची चव काही औरच आहे. येथे निरभ्र आकाशात लखलखणारे आणि चमचमणारे तारे आपल्याही मनाला उजळून टाकतात. हा अनुभव उल्हसित करणारा असतो.  

समुद्र किनाऱ्यापलीकडे कोकणात निसर्गाचा अद्‌भुत खजिना पसरलेला आहे. डोंगरदऱ्या, धबधबे, रानवाटा, टेकड्या, जंगले तुडवायची असतील तर जंगलवाटा, निसर्गाची वेगवेगळी रूपे, जोडीला फळांचा राजा हापूससह फणस, काजू, जांभळे, डोंगरची मैना अशांनी समृद्ध असलेली कोकण खाद्य संस्कृती. पावसाळ्यातील कोकण तर वेगळेच असते. बागेतील आंबे काढण्याचा आनंद वेगळाच. जमिनीवर बसकन मारून फणस खोडून खाल्ला तरच कोकणात आल्यासारखे वाटेल. जोडीला कोकणी मेव्याचा स्वाद डोंगरदऱ्यात फिरून चाखण्याची इच्छा हवी. कोकण म्हणजे बाराही महिने हिरवाईने आच्छादलेला निसर्गरम्य परिसर, धुक्‍यात गडप झालेल्या डोंगरदऱ्या, पावसाळ्यात डोंगरमाथ्यावरून फेसाळत कोसळणारे नयनरम्य धबधबे, आल्हाददायक हवा आणि निसर्गाच्या पराकोटीच्या विभ्रमांचे दर्शन घडविणारा पृथ्वीतलावरील सौंदर्याचा खजिना. कोकणातल्या अनेक नावाजलेल्या पर्यटनस्थळांच्या यादीत दापोली आपल्या वैशिष्ट्यपूर्ण भौगोलिक रचनेमुळे केंद्रस्थानी आहे. घनदाट झाडी, नागमोडी रस्ते, त्याच्या आसपास दिसणारे ससे, मोर, माकडे यासारखे प्राणी आणि पक्ष्यांची किलबिल आणि फुलपाखरांच्या रंगीबेरंगी जाती, गर्द वनराई यांनी कोडजाई नदीचा परिसर निसर्गसंपन्न आहे. या जोडीला आकर्षण म्हणून पर्यटकांना कोकम सिरप, काजू सिरप आणि आंबा सिरप यांचा स्वाद नैसर्गिक रसाच्या स्वरूपात देण्यात येतोच. शिवाय सोबत ही सरबते बनविण्याची सोपी पद्धत समजावून दिली जाते. 

फणस सर्वांनाच आवडतो. मात्र बरेचदा तो कापण्याची पद्धत माहीत नसते. सीरीन रेव्हाइनसारख्या व्यावसायिकांकडून पर्यटकांना फणस कापण्याची कला समजून दिली जाते. शिवाय पर्यटक स्वतः फणस कापण्याचा (फोडण्याचा) आनंद घेऊ शकतो. पावसाळ्यात भातरोपांची लागवड प्रत्यक्षात अनुभवण्याची संधी मिळते. शेतातून दमून भागून आलेल्या पर्यटकांसाठी रात्री ‘बारबेक्‍यू’ भोजनाची मेजवानी असते. दोन दिवस आणि एक रात्रीचे भात लावणी स्पेशल पॅकेजमध्ये भर पावसात भात लावणी करून ‘मड थेरपी’चा अनुभव पर्यटकांना घेता येतो. पर्यटकांनी लावणी केलेल्या भाताचा सॅम्पल तांदूळ घरपोच पाठविण्याची व्यवस्था तुळपुळे यांच्यासारख्या कल्पक व्यावसायिकाने केली आहे. येथील ‘फिश फेस्टिव्हल’ म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या माशांची आणि मत्स्यपदार्थांची मेजवानी असते. पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळी इनोव्हेशन हेही आता वैशिष्ट्य ठरत आहे.

फेब्रुवारी, मार्च, एप्रिल महिन्यांत फुलपाखरे आणि पक्षीप्रेमींसाठी हा परिसर म्हणजे अनोखी पर्वणी असते. या महिन्यात जंगलात पळस पांगारा यांना फुले येतात. याच कालावधीत हॉर्नबिल, इंडियन पीटा, ओरिएंटल ड्‌वार्फ, किंगफिशर, सर्पंट इगल, गोल्डन ओरीयल आणि इतर तब्बल ५२ प्रकारचे पक्षी आणि सुंदर फुलपाखरे परिसरात आढळतात. खास पर्यटकांसाठी सर्वसाधारणपणे २५ एप्रिल ते ५ जून या काळात मॅंगो फूड फेस्टिव्हलचे आयोजन या फेस्टिव्हलमध्ये आंब्याचे ३० पेक्षा जास्त पदार्थ चाखायला मिळतात. पर्यटक थेट आंब्याच्या बागेत जाऊन तेथे आंबे काढण्याचे, पॅकिंग करण्याचे कामकाज पाहू शकतो. हौस असेल तर झाडांशी सलगी करू शकतो.

संबंधित बातम्या