‘चादर’चा गोठवणारा अनुभव

डॉ. संगीता शिरीष कुलकर्णी, नगर
गुरुवार, 22 मार्च 2018

पर्यटन
‘सकाळ साप्ताहिक’मध्ये पर्यटन या सदरासाठी लेख पाठविण्याचे आवाहन वाचकांना करण्यात आले आहे. या आवाहनाला प्रतिसाद देताना वाचकांनी पाठविलेले लेख प्रसिद्ध करीत आहोत.

गिर्यारोहकांना हिमालयाचे अतीव आकर्षण असते. पण हिमालय जेव्हा आपली वेगवेगळी रूपे दाखवू लागतो, तेव्हा त्याच्याशी सामना करणे एक वेगळे आव्हान असते. हिमालयाच्या कुशीत वसलेला देखणा लेह-लडाखचा प्रदेश डिसेंबरच्या थंडीने गारठू लागला की येथील नद्याही गोठू लागतात. जानेवारी फेब्रुवारीमध्ये या नदीच्या प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने घट्ट बर्फाच्या चादरीवरुन केलेली चढाई म्हणजेच ‘चादर’ ट्रेक.

‘चादर’ नावातच सर्वकाही येते. उणे तापमानामुळे एरवी खळखळ वाहणाऱ्या झंस्कार नदी गोठून बर्फाच्या चादरीसारखी पसरते. प्रत्येक निसर्गप्रेमी ट्रेकरला अतिशय आव्हानात्मक वाटणारा, खडतर असा हा ट्रेक नेहमीच खुणावत असतो आणि म्हणूनच आम्ही हे धाडस करायचं ठरवले. अहमदनगरच्या गिर्यारोहक प्रशांत अमरापुरकरच्या नेतृत्वाखाली आम्ही हा ट्रेक करण्याचे ठरवले. 

या ट्रेकच्या आधी चारच महिन्यापूर्वी ‘एव्हरेस्ट बेस कॅंप’चा  ट्रेक यशस्वीरीत्या पूर्ण केल्यामुळे आमची मानसिक तयारी चांगली होती. तसेच अति उंचावरील विरळ हवामानामुळे असणारी ऑक्‍सिजनची कमतरता, कमी तापमान, रोजच्या तासनतास चालण्यामुळे येणारा थकवा व होणारी दमछाक यांना तोंड देण्यास आमची शारीरिक तयारीही उत्तम होती. म्हणूनच लेह विमानतळावरील उणे १२ अंश सेल्सिअस तापमानातही आम्ही विश्‍वासाने उतरलो. पुढील दोन दिवस वातावरणाशी व थंडीशी जुळवून घेण्यासाठी लेहमध्येच मुक्काम ठोकला. 

तिसऱ्या दिवशी लेहपासून ८५ किमी अंतरावरील ‘चिलिंग’ या गावाकडे निघालो. मुख्य रस्ता सोडून बस आत वळवल्यानंतर काही वेळातच आम्हाला ‘चादर’ची झलक दिसू लागली. डाव्या बाजूला खोलवर वाहणाऱ्या नदीत मध्येच कागदी होड्याप्रमाणेच बर्फाचे थर तरंगत होते, तर नदीच्या काठाजवळ काही भागात बर्फाची चादरच तयार झाली होती. उंचावरून खळखळत येणारी ‘झंस्कार’ नदी जिथे संथ वाहणाऱ्या ‘सिंधू’ नदीला मिळते त्या संगमाचे उंचावरून दिसणारे सौंदर्य विलोभनीय, अक्षरशः भुरळ घालणारे होते. तेथून पुढे मात्र एका बाजूला उंचच उंच भुसभुशीत दगड मातीचे डोंगर तर दुसऱ्या बाजूला खोल दरी व त्यातून वाहणारा झंस्कार नदीचा प्रवाह. यांच्यामधून जाणारी धुळीने माखलेली, दगडधोंड्यांची खडबडीत ४ फुटी वाट होती. या वाटेने पुढचा २५ किमीचा प्रवास करायचा होता. वाटेत एका ठिकाणी दरड कोसळल्यामुळे तासभर थांबावे लागले. पण ठरल्या ठिकाणी उशिरा का होईना आम्ही पोहचलो.

आमच्या मागील गाडीतून आमच्या बरोबर सर्व ताफा, पोर्टर, गाइड, खानसामा यांची १६ जणांची टीम जय्यत तयारीनिशी उतरली. अगदी स्टोव्ह, रॉकेलपासून ते मीठ-मोहरीपर्यंत आमचे राहण्याचे तंबू व सामान सर्व काही घेऊन ते आमच्या बरोबरीने चालणार होते. सर्व सामानाची जुळवाजुळव करून ४ फळकुट जोडून त्याला खालून रबरी टायरचा तुकडा लावून तयार केलेल्या ‘स्लेज’ या ओढगाडीवर सामान टाकून ते तरातरा बर्फावरुन चालू लागले. आम्ही सर्वजण मात्र त्या बर्फावर पहिले पाऊल कोण टाकणारी याची वाट पहात होतो. त्यात आमच्या रबरी बुटांना अजिबातच पकड नव्हती. आमची समस्या आमचा गाइड ‘ग्यात्से’च्या लक्षात आली. चटकन तो पुढे आला. प्रत्येकाला हातातला धरून बर्फावर उतरवले व एकेक पाऊल टाकत बर्फावरुन कसे चालायचे ते शिकवले. बालपणी आई-बाबांनी बोट धरून शिकवले असेल तसेच.

आज फक्त पाचच किमी चालायचे होते. पण बर्फावरुन पाऊल मोजून टाकत असताना भारीच कसरत होती. मध्येच कुणी घसरून पडत होते, तर कुणी पडण्याच्या भीतीने चालतच नव्हते. वेळ खूप लागत होता. सूर्य डोंगराआड जाण्याच्या तयारीत होता. गारठा वाढत चालला होता. पण बर्फावरुन चालताही येत नव्हते. भीतीने एरवी घाम फुटतो म्हणतात. पण मात्र सर्व स्नायू गोठून गेले होते. कसेबसे ३ तासानंतर साडेचार वाजता मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचलो. पोहोचताक्षणी हातात आयत्या आलेल्या गरमागरम कॉफीची किंमत काय ते इथेच समजले.

पाच वाजताच अंधारू लागले. इथे सूर्य मावळतीला क्षितिजाकडे जाण्याचा विषयच नव्हता. उंच डोंगराकडे एकदा का तो दिसेनासा झाला की थंडीचा झपाटा सुरू व्हायचा. मिनीटागणिक तापमान कमी होत जाते. तासाभरात रक्त गोठवून टाकणाऱ्या थंडीत इथल्या खडतर आव्हानांची जाणीव होऊ लागली. लक्षात येऊ लागले की इथली लढाई फक्त प्राणवायूच्या कमतरतेशी नाही, तर खरी लढाई आहे. रक्त व हाडे गोठवणाऱ्या अतिशीत तापमानाशी व गोठलेल्या नदीवरून येणाऱ्या बोचऱ्या वाऱ्याशी. शिवाय हातापायाला सतत येणाऱ्या मुंग्या व डोकेदुखी हा त्रास वेगळाच.

संध्याकाळी ६ वाजताच येथे मिट्ट काळोख पसरतो. ८-१० जण कसेबसे बसू शकतील अशा ‘प्रशस्त’ तंबूत आम्ही जेवणासाठी एकत्र जमलो. स्टोव्ह पेटवून थोडीशी ऊब निर्माण केली आणि गरमागरम जेवणावर ताव मारला. फार काळ तिथेही बसणे शक्‍य नव्हते. त्यामुळे टॉर्चच्या प्रकाशात प्रत्येकजण आपापला तंबू शोधण्याच्या प्रयत्नात असतानाच अचानक वर आकाशाकडे लक्ष गेले. पाऱ्याप्रमाणे चकाकणारा पूर्णाकृती चंद्रमा व चौफेर विखुरलेल्या कोट्यवधी तारका ते विलोभनीय दृश्‍य डोळ्यांच्या कॅमेरात बंदिस्त करताना कोणी त्या उणे तापमानालाही जुमानत नव्हते. अति गारठ्याचा त्रास झाला, तर दुसऱ्या दिवशी चालणं कठीण होणार होतं. म्हणून चटदिशी सर्वजण तंबूत शिरले व स्लिपिंग बॅगमध्ये घुसून झोपण्याचा प्रयत्न करू लागले. एवढ्या थंडीत कोणी गाढ झोपू तरी कसा शकणार? दुसऱ्या दिवशी सकाळी ९ वाजेपर्यंत सर्वजण गरमागरम कॉफी व नाश्‍ता घेऊन ‘चद्दर’ तुडवण्यासाठी सज्ज झाले होते. या जीवघेण्या थंडीचा सामना करण्यासाठी सगळ्यांनी कपड्यांचे एकावर एक चार थर, हातमोजे, टोप्या, कानपट्टी, नाकपट्टी, मफलर असा जामानिमा चढवला होता. या तयारीनंतर रात्रीच्या -२८ अंश सेल्सिअस तापमानानंतर -१८ अंश सेल्सिअस तापमानात चक्क उबदार वाटू लागले होते. चालताना शरीरात ऊर्जा निर्माण होते त्यामुळे दिवसा बर्फावरुन चालताना गारठा त्रासदायक वाटत नव्हता. पण ‘थांबला तो संपला’ या म्हणीनुसार चालताना थांबले की लगेच शरीर गारठ्याने थरथरु लागायचे. या गोठलेल्या नदीची कितीतरी रूपे बघायला मिळाली. कुठे स्वच्छ, नितळ, काचेप्रमाणे पारदर्शक, तर कुठे संगमरवराप्रमाणे शुभ्रधवल व टणक !  वरच्या गोठलेल्या थराखालून वेगाने वाहणारा प्रवाह दिसायचा व आवाजही यायचा. तिथे पाय ठेवताना मात्र काळजाचा ठोका चुकायचा. मार्गदर्शक पुढे लोखंडी सळईने बर्फावर ठोकून अंदाज घेत मार्ग काढत असला, तरी ‘नजर हटी, दुर्घटना घटी’ असे होते. आमच्यातल्या एकाचा तो अनुभव घेऊन झाल्यामुळे सर्वांनी जीव मुठीत घेऊनच हा पट्टा पार केला. एखाद्या ठिकाणी मोडलेल्या चद्दरवरुन नदी ओलांडताना लांब उडीचीही सवय हवीच. या सर्व थरारातही एक विलक्षण मज्जा होती, वेगळाच अनुभव होता. निसर्गाची ही किमया आम्ही अनुभवत होतो. दोन्ही बाजूंनी उभ्या पर्वतरांगा व त्यामधून जाणारी ही गोठलेली पांढरीशुभ्र नदी. पर्वतही अक्राळविक्राळ, अतिभव्य पण राकट, उघडे-बोडखे, रुक्ष,  झाडाझुडपांच्या हिरवाईचा लवलेशही नसणारे. पण काही ठिकाणी मात्र विविधरंगी पिवळसर, तांबूस, सोनेही छटा असणारे. बहुस्तरीय खडकांचे असल्यामुळे अजबच भौमिकित आकृत्यांचे भास त्यात होत होते. सर्वदूर इथे मात्र कायम एक भयाण शांततेचा पगडा होता. जीवंतपणाचे एकही लक्षण इथल्या निसर्गाला नव्हते. ना हिरवी झाडे, ना पान फुले, त्यामुळे ना पक्ष्यांचा किलबिलाट ना प्राण्यांची चाहूल.  या वर्षाचा आमचाच पहिला ग्रुप असल्यामुळे आम्हाला ट्रेक संपेपर्यंत एकही व्यक्ती भेटली नाही. संध्याकाळी मुक्कामी पोहोचलो की मात्र आजूबाजूला आमचा संपूर्ण ताफा असायचा. खाली साचलेला बर्फ सरकवून ठोकलेल्या लाल-पिवळ्या तंबूत सामान सरकवले की निसर्गाचा मनमुराद आनंद लुटायचा. सूर्यास्तापर्यंत समोरच उभ्या विविधरंगी डोंगररांगा, त्यांच्या पल्याड जाणारा सूर्य, मध्येच डोकावणारी त्याची किरणे, कुठे खळखळ वाहणारी तर कुठे गोठलेली नदी, एकदाच दृष्टीस पडलेला २५ हजार फूट उंचावरील हिमालयीन मेंढ्यां ‘ताहर’ चा कळप. हे सौंदर्य न्याहाळताना थंडीची जाणीवदेखील होत नसे. पण हुडहुडी भरू लागली की मावळतीची जाणीव व्हायची. पुढे अगदी नकोसी वाटणारी रात्र आ वासून उभी असायची.

एवढ्या सगळ्या खडतर आव्हानांना सामोरे जातही पुढे जायचेच. त्यात एक जिद्द होती. असंख्य मोठमोठे गोठलेले धबधबे व त्यातील बर्फाचे जाळे पाहून सर्व थकवा दूर पळाला. ही सगळी दृश्‍यं कॅमेरात टिपून परतीच्या वाटेवर निघालो. 

हा प्रवास डोळ्यात साठवून अजिबातच त्रासदायक वाटत नव्हता. एकतर त्या थंडीची, बर्फावरुन चालण्याची व घसरून पडण्याची आता सवय झाली होती. ट्रेक पूर्णत्वाला नेऊ शकलो याचा अतीव आनंद होता. स्वतःलाच मानसिक व शारीरिक क्षमता चाचणी परीक्षेत उत्तीर्ण झाल्याचा अभिमान होता.असा हा आगळा वेगळा अविस्मरणीय अनुभव. पण एक गोष्ट मात्र नक्की की अगदी सहज, तयारी न करता, गंमत म्हणून करण्याचा हा ट्रेक नाही. मानसिक व शारीरिक तयारीबरोबरच कडाक्‍याच्या थंडीशी चार हात करण्याची तयारी असेल, तरच हा ट्रेक करावा.

फोटो फीचर

संबंधित बातम्या