नितांत रमणीय स्वित्झर्लंड 

सीमा चितळे
सोमवार, 9 सप्टेंबर 2019

पर्यटन
 

नुकताच स्वित्झर्लंडला भेट देण्याचा योग आला. प्रत्येकाने आयुष्यात एकदा तरी बघावाच असा हा देश आहे. मुख्य म्हणजे येथील हवामान नेहमी सुखद थंड असते. चहूबाजूंनी आल्प्स पर्वतरांगा दिसतात. व्हॅलीमध्ये छोटी छोटी गावे वसली आहेत. ठिकठिकाणी तळ्याच्या दोन्ही काठांनी हिरवीगार कुरणे आणि त्या कुरणांवर चरणाऱ्या गाई दृष्टीस पडतात. गावे श्रीमंत आहेत. किमान तापमान चार ते सात आणि कमाल तापमान १६ अंश सेल्सिअसपर्यंत असते. त्यामुळे कायम आल्हाददायक वातावरण असते. आपल्याला रोज प्रवास करूनसुद्धा दमायला होत नाही. दिवसभर हिंडलो तरी फ्रेश वाटते. 

इथले मोठे मोठे तलाव पुढील गाव येईपर्यंत आपली साथ करतात. तलावांच्या मागे बर्फाच्छादित डोंगर, उंच उंच शिखरे, त्यावर पडलेल्या सूर्यकिरणांचा मुकुट ल्यालेले शिलथॉर्न (२९७० मी.), माऊंट टिटलिस (१०,००० फूट), मॅटरहॉर्न (१४,६९० फूट), युंग फाऊ योक टॉप ऑफ युरोप (१३,००० फूट), माऊंट ब्लँक (४८१० मी.), माऊंट रोजा (४६३४ मी.) अशी खूप ठिकाणे आपल्याला साद घालतात. 

इथे येण्यासाठी मुंबईहून आठ तासाच्या विमान प्रवासाने आपण झुरिकला येतो. तेथून सगळीकडे ट्रेन आहेत. पुण्यातून निघताना आपण स्विस पास काढला, की कोठेही तिकीट काढायला रांगेत उभे रहावे लागत नाही. तो पास सगळीकडे चालतो. त्यातल्या त्यात मुक्कामाकरिता इंटर लेक सर्वदृष्टीने मध्यवर्ती पडते. येथे स्टेशनजवळच युथ हॉस्टेलचीपण सोय आहे. येथून आपण राजधानीचे ठिकाण जिनिव्हा, झुरिक अशी जा-ये करू शकतो. 

जिनिव्हामध्ये युनायटेड नेशन्स, तलाव, सर्न लॅब, फाउंटन, क्रुझ, फ्लोरर क्लॉक इत्यादी ठिकाणे बघण्यासारखी आहेत. बर्नला आइन्स्टाईन हाउस आहे. त्याची फिल्म दाखवली जाते. म्युझियममध्ये त्याने वापरलेले टेबल पेन, पासपोर्ट सर्टिफिकेट बघावयास मिळते. चौकातच मोठे चर्च, भाजी, फळबाजार आहे. सर्वच गावात चर्च बघायला मिळतात. सार्वजनिक वाहतूक उत्तम आहे. कुठेही थांबावे लागत नाही. चकाचक स्वच्छ रस्ते, कुठेही कचरा पडलेला आढळत नाही, धूळ नाही, टुमदार घरे, आखीव रेखीव अंगण, कंपाऊंड, रंगीबेरंगी फुले सगळे कसे चित्रात काढल्यासारखे... डोंगर उतारावर कौलारू घरे नजरेस पडतात. वर्षातून चार-पाच महिने नोव्हेंबर ते मार्च बर्फ पडतो. एप्रिल ते ऑक्‍टोबर ऋतू चांगला असतो. मधूनच पडणारा पाऊस, बर्फ डोळ्यांना सुखावतो. इथे अतिशय शांतता असते. घरे लागून लागून असली, तरी खूप प्रसन्न वातावरण असते. इथले लोक खूप प्रामाणिक, कष्टाळू, सहकार्य करणारे आहेत. ट्रेनमध्येसुद्धा लॅपटॉप उघडून काम करताना दृष्टीस पडतात. वेळेचा सदुपयोग कसा करावा हे त्यांच्याकडून शिकण्यासारखे आहे. 

इथे हिरवीगार मैलोनमैल पसरलेली कुरणे, त्यावर शांतपणे रवंथ करणाऱ्या धष्टपुष्ट गाई-दुधदुभते असल्यामुळे चीज, क्रीम, आइस्क्रीम इत्यादी पदार्थ खूप चांगले मिळतात. चीज, चॉकलेट तयार करणारे कारखाने येथे आहेत. स्टेशनच्या इंडस्ट्रिअल शेड्‌स आहेत. भाजीपाला, फळे दुसरीकडून येतात. पण दूध, आइस्क्रीम अत्यंत चांगल्या दर्जाचे मिळते. 

ज्यांना फार थंडी वाजत नाही त्यांच्याकरता हा देश, येथील हवामान खूपच छान आहे. एप्रिल ते ऑक्‍टोबर दरम्यान गेलात, तर एक स्वेटर घातला तरी पुरते. ट्रेन, बसमध्ये हीटर असल्यामुळे कायम उबदार वातावरणात आपण प्रवास करतो. येथे व्हेजवाल्यांचे खायचे थोडे हाल आहेत. भारतीय हॉटेल्स आहेत. पण आपले समाधान होत नाही व महाग पडते. येथे कायम थंडी असल्याने जॅकेट कायम बरोबर ठेवणे सोयीस्कर ठरते. कायम थंडीमुळे पुरुष, बायका सर्व सिगरेट ओढताना दिसतात, थंडीपासून संरक्षण म्हणून. त्यामुळे सिगरेट व कॉफीचा वास सर्व स्टेशनवर दरवळत असतो. त्याकडे थोडे दुर्लक्ष केल्यास आपली ट्रीप छान, सुखद होऊ शकते. 

येथे बघण्यासारखी ठिकाणे  
शिलथॉर्न हे सिमल्यासारखे उंच टेकडीवर वसलेले. पण सिमल्यासारखी गर्दी नाही. स्वच्छता वाखाणण्याजोगी आहे. बर्फ, धुके, मधेच पाऊस... चालायला जायला खूप सुंदर वातावरण असते. रोपवेची सोय आहे. वरच्या शिखरांचे विहंगम दर्शन घडते. सगळीकडे जायला ट्रेन, बसची सुविधा आहे. 

झरमॅटमधील मॅटरहॉर्न ग्लेशियर येथे सर्व बाजूने बर्फाच्या शिखरांचे दर्शन होते. समोर मॅटरहॉर्न शिखर दिसते. तसेच दुर्बिणीतून आणखी पाच-सहा शिखरे जवळून बघता येतात. माऊंट रोजा ग्लेशियर आणि माऊंट ब्लँक या ठिकाणी गंडोला राईडने आपण वरपर्यंत जाऊ शकतो. बर्फाच्या कड्यावरून गंडोला जातो, तेव्हा काळजाचा ठोका चुकल्यावाचून रहात नाही. स्किइंग हा येथील लोकांचा आवडता खेळ. अगदी लहान मुलांपासून ५०-६० वयापर्यंत किंवा काही त्याच्याही पुढच्या वयाचे असे शेकडो लोक स्किइंग करताना दिसतात. दिवसभर हा खेळ सुरू असतो. वरती हॉटेलची सोय व मधेमधे स्किइंगच्या लोकांकरिता थांबे आहेत. बर्फाच्या उतरत्या कड्यावरून घसरत येणे हा खूप साहसी खेळ आहे. 

युंग फाऊ योक या ठिकाणाला टॉप ऑफ द युरोप म्हटले जाते. इथेही स्किइंगची मजा लुटता येते. स्किइंगची मजा लुटायला स्विस सारखा दुसरा देश नाही. स्किइंग करण्यात इथले लोक तज्ज्ञ असतात. ऑस्ट्रियातपण स्किइंग केले जाते. येथे लोखंडी (झुलता) ब्रिज केलेला आहे. पॅनोरॅमिक व्ह्यू बघण्याकरिता एवढ्या उंचीवर गंडोला आणि वरती कड्यावर हॉटेलशिवाय मधे मधे स्किइंगवाल्यांकरिता केलेली हॉटेल्स पाहून आपण किती मागे आहोत याची कल्पना येते. खूप आधुनिक तंत्रज्ञान आहे. सगळीकडे, पायथ्याच्या गावातपण राहायची सोय आहे. 

माऊंट टिटलिस येथे छोट्या गंडोलाने वरपर्यंत जाऊन नंतर मोठी ट्रॉली घेऊन आपण टॉपला जातो. सर्व बाजूने बघता येईल, तसेच ३०-४० जण बसतील एवढी मोठी ट्रॉली असते. निसर्गाचा खूप सुंदर नजारा दृष्टीस पडतो. कितीही फोटो काढले, तरी समाधान होत नाही. येथे चार-चार जणांचे पाळणेसुद्धा आहेत. त्यात बसण्याची मजा काही औरच! पायथ्याच्या ठिकाणापासून छोटी गाडी जाते. या सर्वांची मजा लुटण्याकरिता स्वतंत्र ग्रुप करून ट्रिप काढली, तर फायदेशीर होते व व्यवस्थित वेळ देऊन बघता येते. 

ट्रेनने व्होलार्बे येथे येऊन तेथून बसने व पुढे जीप भाड्याने घेऊन थोडे जंगल ट्रेक करून व्होलार्बे गुहांपाशी आपण पोचतो. आत २०-२५ पर्यटनस्थळे आहेत. लोखंडी जिने केलेले आहेत. गुहांमध्ये दिवे आहेत. येथील क्रिस्टल म्युझियम, आईस पॅलेस बघण्यासारखे आहे. मॅटरहॉर्नहून येताना डोंगराच्या मधे धबधबा लागतो. एकूण सहा मजले आहेत. तीन मजले लिफ्ट आहे. तीन मजले डोंगरकड्यावरून ट्रॉलीतून आपण वर जातो. किती वेळा पाहिले तरी समाधान होत नाही. वर चढायला गुहेमधून स्वच्छ सुंदर पायऱ्या केलेल्या आहेत. त्यातून प्रकाश व जोरात पाणी पडते. काही ठिकाणी संथ पाणी वाहत असते. 

लुझर्न हे झुरिक, जिनिव्हा सारखे मोठे शहर आहे. येथील स्टेशन व्ही.टी. सारखे आहे. तीन मजले मिळून ७० प्लॅटफॉर्म आहेत. लुझर्न लेकची सफर चुकवू नये अशीच. स्टेशन समोरच क्रुझ करता जाता येते. बसने पिलॅटस येथे जाता येते. गंडोला राईडने बर्फाच्छादित शिखरे बघता येतात. येथे ट्रेकिंग करतही जाता येते. चॅपल ब्रिज या ठिकाणी खरेदी करून त्याला समांतर दुसऱ्या पुलावरून चर्च बघायला जाता येते. 

जिनिव्हा येथील सर्न लॅब बघण्यासारखी आहे. इथेच युनायटेड नेशन्सही आहे. तिथे बसने जाता येते. स्विस बँक, क्रेडिट स्विस आणि इतर कंपन्यांची प्रमुख कार्यालयेही इथे आहेत. सर्न लॅबमध्ये मोठेमोठे शास्त्रज्ञ अभ्यासाला येतात. जिनिव्हा तलावामधून क्रुझने दोन्ही बाजू बघू शकतो. इथे फाउंटन, फ्लॉवर क्लॉक इत्यादी स्थळे बघण्यासारखी आहेत. माऊंट ब्लॅंक रोडवर चॉकलेट्‌स, घड्याळांच्या शोरूम्स आहेत.

बेसल येथे फार्मा इंडस्ट्री आहे. इथून सर्व औषध कंपन्यांना माल पुरवला जातो. येथे जर्मनी, ऑस्ट्रिया, फ्रान्स अशा तीन देशांच्या सीमारेषा आहेत. सगळीकडे जर्मन, फ्रेंच भाषा बोलली जाते. पण इंग्रजीमध्ये आपण संवाद साधू शकतो. इथे नियम खूप कडक आहेत. बहुतेक ठिकाणी जर्मन लोकच दिसतात. इथले लोक खूप प्रामाणिक, कष्टाळू, आपापल्या कामात व्यग्र दिसतात. चोऱ्यामाऱ्या, खून यांना येथे थारा नाही. सर्व आपल्याला त्यांच्यापरीने श्रीमंत, समाधानी दिसतात. इथली खेडी श्रीमंत आहेत. स्वच्छता हा सर्वांत महत्त्वाचा गुण दिसून येतो. कुठेही रेकॉर्ड्स लावलेल्या दिसणार नाहीत. लायटिंगचा झगमगाट नाही. डीजे लावून वाटेल तसे नाचणारे लोक कुठेही दिसणार नाहीत. उपलब्ध साधनांचा पुरेपूर योग्य पद्धतीने वापर केलेला दिसून येतो. फ्रिबोर्ज सारख्या ठिकाणी ड्रेनेजच्या पाण्याचा खुबीने वापर करून त्यावर चालणारी ट्रॉली केली आहे. त्यात बसून आपण वरपर्यंत जाऊन परत खाली येतो. पेशवे पार्कसारखी फुलराणीपण रस्त्याने ट्रामसारखी जाताना दिसते. गडबड, गोंधळ, ट्रॅफिक जॅम कुठेही नाही. एकदम शांत वातावरण असते. पोलिसाला मध्यस्थी करावी लागत नाही. सर्वजण समजून नियम पाळताना दिसतात. 

ऱ्हाईन फॉल हा धबधबा नायगाराचे छोटे रूप आहे. धबधब्याच्या जवळपर्यंत बोट जाते. शिवाय मधे एक छोटा डोंगर आहे. बोटीने तिथपर्यंत जाऊन पायऱ्या चढून वरूनही धबधबा बघू शकतो. 

लिंटेस्टाईन हा अल्पाईन मध्य युरोपातील सर्वांत छोटा देश. खूपच टुमदार टेकडीवर वसलेला. इथे इन्फोसिस, मायक्रोसॉफ्ट, थायसेन क्रुप, पेपर मिंट इत्यादी कंपन्यांची कार्यालये आहेत. आपण कुरी स्टेशनवरून (साधारण तीस हजार लोकवस्तीचे गाव) ग्लेशियर एक्स्प्रेसने सर्व बर्फाच्छादित शिखरांचा नजारा खूप जवळून बघू शकतो. मस्त गरम कॉफी, वाईन घेत लोक एन्जॉय करत असतात. जायला यायला एक-एक तास अशी दोन तासांची ट्रीप आहे. याचे वेगळे तिकीट काढायला लागते. रिजी कुल्म हे असेच एक ठिकाण जिथून आपण बर्फाच्छादित शिखरे बघू शकतो. वर जायला माथेरानसारखी छोटी ट्रेन आहे. दोन्ही बाजूला बर्फ, धबधबा यामधून अंतर कापत ही ट्रेन वर जाते. रिजी माऊंटनवर आपण पोचतो. जिकडे पहावे तिकडे आल्प्सच्या पर्वतरांगा खूपच सुंदर दिसतात. 

अशी ही सफर कधी संपू नये अशी वाटणारी आहे. स्वर्गीय आनंद देणारी - प्रत्येकाने जरूर बघावा असा हा देश आहे. स्विझर्लंड... कायम आठवणीत कोरून राहील असा. सुंदर आणि शांतताप्रिय.

संबंधित बातम्या