डेथ व्हॅलीचा थरार

शीतलकुमार शहा
शुक्रवार, 5 जानेवारी 2018

पर्यटन
‘सकाळ साप्ताहिक’मध्ये पर्यटन या सदरासाठी लेख पाठविण्याचे आवाहन वाचकांना करण्यात आले आहे. या आवाहनाला प्रतिसाद देताना वाचकांनी पाठविलेले लेख प्रसिद्ध करीत आहोत.

अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथे माझा मुलगा समीर व स्नुषा नीलकमल यांच्याकडे जाण्याचा योग आला. तेथे गेल्यावर पप्पा डेथ व्हॅलीला जायचे का? असे समीरने विचारल्यावर मी म्हटले ’’अरे तेथे जाऊन काय करायचे आहे ?. ’’नाव ऐकल्यावरच भीती वाटते’’, मग त्याने त्याचा खुलासा करून त्याबद्दलची माहिती सांगितली व तेथे प्रत्यक्ष गेल्यावर डेथ व्हॅलीविषयी असलेले सर्व गैरसमज व भीती दूर केली व आपण येथे आलो नसतो तर एका अलौकिक निसर्ग सौंदर्यास मुकलो असतो याची खात्री पटली. 

एक पायोनिअर ग्रुप १८४९-५० च्या हिवाळ्यात शॉर्ट रुट घेताना या भागात हरवला होता. त्यांची सुटका त्यांच्यातील दोन तरुण लुईस व जॉन रॉजर्स यांनी केली व नंतर त्यांनी परतताना पॅनामिंट पर्वतावरून जाताना मागे वळून पाहिले व ’गुडबाय डेथ व्हॅली’ असे म्हणाले म्हणून हे नाव पडले.

लॉस एंजलिस ते लास व्हेगासला जाताना इतर मार्गाबरोबरच एक मार्ग हा डेथ व्हॅलीतून जातो. हे अंतर अंदाजे ७०० किलोमीटर आहे. डेथ व्हॅली व्हेगासपासून २०० किलोमीटर उत्तरेस आहे. डेथ व्हॅली ही साधारण २३० किलोमीटर लांब आहे व ३४ लाख एकरात पसरलेली आहे. सकाळी ६ वाजता लॉस एंजलिस येथून निघून दिवसभर डेथ व्हॅलीतून प्रवास करत, निरनिराळे पॉइंट्‌स पहात आपण रात्री ८ वाजेपर्यंत लास व्हेगासला पोहोचतो. रस्ता सुंदर व रमणीय आहे.

डेथ व्हॅली हे उत्तर कॅलिफोर्नियात असून हा एक वाळवंटी व डोंगराळ प्रदेश आहे. डेथ व्हॅलीतील बॅड वॉटर बसीन हे ठिकाण समुद्रसपाटीपासून २८२ फूट खाली आहे. हा सर्व प्रदेश रुक्ष व प्रखर उन्हाचा आहे. जगातील सर्वांत उच्च तापमान ५७ अंश सें (१३४ अंश फॅरनहाइट) १३ जुलै १९१३ रोजी नोंदलेले आहे व हा जागतिक विक्रम आहे व डेथ व्हॅलीतच ’टेलिस्कोप शिखर’ जे पॅनामिंट माउंटन्स येथे वसलेले आहे. या शिखराची उंची ११०५० फूट आहे.

डेथ व्हॅलीतच ’फर्नेस क्रीक रिसॉर्ट’ हा बाग लश ओयासिसमध्ये स्थित असून भोवतालचा भूभाग हा विस्तृत वाळवंटाने वेढलेला आहे. फर्नेस क्रीक रिसॉर्टमध्ये जगातील सर्वांत खाली १८ होलचे गोल्फ मैदान आहे. हे मैदान समुद्रसपाटीपासून २१४ फूट खाली आहे. या रिसॉर्टमध्ये ४ रेस्टॉरंट, म्युझियम, व टेनिस कोर्ट आहे. येथे खासगी लहान विमान उतरण्यास एअरपोर्ट आहे.

डेथ व्हॅलीत पेट्रोल पंप नसल्याने व्हॅलीत प्रवेश करताना छोट्याशा गावामध्ये पुरेसे पेट्रोल व भरपूर पिण्याची पाणी व खाद्यपदार्थ यांचा साठा करून घ्यावा. डेथ व्हॅलीत फिरताना सकाळी १० च्या पुढे फिरताना पायी फिरणे टाळावे व भरपूर पाणी प्यावे असे फलक आहेत. डेथ व्हॅलीत हा नुसता सपाट वाळवंटी प्रदेश नसून येथे ज्वालामुखीमुळे तयार झालेल्या विविध रंगांचे डोंगर दिसतात व एकाच डोंगरात वेगवेगळ्या चार-पाच रंगाच्या छटा पाहावयास मिळतात. त्याप्रमाणे डेथ व्हॅलीत ’रेस ट्रॅक प्लाया’ नावाचे सुंदर कोरडे सरोवर आहे. तेथे मोठ-मोठे खडक रात्रीतून आपल्या जागेपासून दुसऱ्या जागेपर्यंत गूढरीत्या सरपटत जातात, जागा बदलतात.

डेथ व्हॅलीत पहाण्यायोग्य ठिकाणे
आर्टिस्ट ड्राइव्ह :  हा १५ किलोमीटरचा ड्राईव्ह एका बाजूने निघून दुसऱ्या बाजूने निघणारा व रंगीबेरंगी डोंगराचे अप्रतिम निसर्गसौंदर्य दाखवणारा आहे.

Badwater basin : हा भाग समुद्रसपाटीपासून २८२ फूट खाली आहे. सर्व भाग पांढरा क्षारयुक्त दिसतो. एका बाजूला डोंगर असून त्यावर समुद्रसपाटीचे शून्य कोठे आहे हे दर्शविले आहे.

बोरॅक्‍स पावडर : डेथ व्हॅलीत जाताना बोरॅक्‍स पावडरचा कारखाना आहे. जगातील ६० ते ७० टक्के पावडर येथे बनते.

स्कॉटी कॅसल ः मोठे स्पॅनिश घर आहे. त्याची टूर करता येते.

गोल्डन कॅनियन ः आर्टिस्ट ड्राईव्हपासून ७-८ कि.मी. पुढे असून तेथे डोंगरामध्ये सोनेरी रंगाचे छटा दिसतात.

डेथ व्हॅलीत राहण्यासाठी हॉटेल्स व कॅम्प ग्राउंडही आहेत. येथे रात्री मुक्काम केल्यास रात्री आकाशाचे दृश्‍य प्रदूषण नसल्यामुळे स्पष्ट व अत्यंत सुंदर दिसते. डेथ व्हॅलीच्या मध्यभागी ड्यून्स (वाळवंट) आहे. वसंतऋतूत डेथ व्हॅलीमध्ये रंगीबेरंगी फुलांचे ताटवे दिसतात (व्हॅली ऑफ फ्लॉवर्सप्रमाणे) डेथ व्हॅलीत रॅटल स्नेक, विंचू, मोठे कोळी, कोल्हे, सरडे व मधमाशा आढळतात. डेथ व्हॅलीत आपण सूर्योदय व सूर्यास्त zabriskie point & sand dunes येथून पाहू शकतो असा डेथ व्हॅलीचा सफरीचा आनंद संधी मिळाल्यास सर्वांनी जरूर घ्यावा.

फोटो फीचर

संबंधित बातम्या