इंडियाना कॅवर्न्स

श्रीकांत निंबवीकर
गुरुवार, 22 फेब्रुवारी 2018

पर्यटन
‘सकाळ साप्ताहिक’मध्ये पर्यटन या सदरासाठी लेख पाठविण्याचे आवाहन वाचकांना करण्यात आले आहे. या आवाहनाला प्रतिसाद देताना वाचकांनी पाठविलेले लेख प्रसिद्ध करीत आहोत.

नैसर्गिक सृष्टिसौंदर्य आणि पृथ्वीवर वेगवेगळ्या काळात घडलेल्या विविध चमत्कारांनी अमेरिका देश नटलेला आहे. अमेरिकेच्या प्रत्येक वेळेच्या भेटीत नवीन स्थळे पाहायला मिळतात. ते बघताना आनंद निश्‍चितच होतो पण त्याचवेळी या आपल्या भारत देशातही अशा अनेक प्रेक्षणीय गोष्टींची चाललेली हेळसांड, दुर्लक्ष पाहून खंत वाटते. मी गेल्या अमेरिका भेटीच पाहिलेले ’इंडियाना कॅवर्न्स’ हे ठिकाण अगदी नवीन आहे. ’इंडियाना कॅवर्न्स’ येथील जमिनीच्या पोटातील गुहा तशा सुमारे ५० हजार वर्षापूर्वीच्या आहेत. पण त्यांचा शोध जेमतेम २०१० मध्ये लागला. त्यांच्या शोधाचे काम सुरू झाले. २०११ ते २०१६ या पाच वर्षात जनतेसाठी त्या खुल्या करण्यात आल्या. त्यावरचे काम पुढे चालूच आहे, परंतु सध्यासुद्धा प्रेक्षकांच्यासाठी लागणाऱ्या सोयी - सवलती पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहेत. अमेरिकेमधील नायगारा फॉल्स, ग्रॅंड कॅनियन, यलो स्टोन पार्क वगैरे प्रेक्षणीय स्थळे सर्वांना माहिती असतात म्हणून या एका वेगळ्या ठिकाणाची ही माहिती आहे. इंडियान ही जागा, पोलि शहरापासून २ तास १५ मिनिटे, ईव्हन्स व्हीलेपासून १ तास ३० मिनिटे, लुई सव्हिलेपासून २५ मिनिटे एवढ्या ड्रायव्हिंग अंतरावरील आहे.  हे ठिकाण ’कॉरीडॉन’ म्हणून आहे. अमेरिकेतील हे पर्यटन स्थळ ’आय-६४’ या मुख्य महामार्गाच्या रस्त्यावर थोड्या आतल्या बाजूला आहे. हे ठिकाण बिंकले केव्ह सिस्टिमचा हा भाग आहे. आम्ही यावेळी जाताना कोलंबस येथून तिथे गेलो होतो. जायचा रस्ता खास अमेरिकन सृष्टीसौंदर्याचा आहे. हिरवीगार दाट झाडीमधूनच दिसणारी हिरवीगार शेते, कुरणे अगदी रमणीय होती. जमिनीखालच्या गुहा म्हणजे एक छोटीशी टेकडी आहे. भोवती हिरवेगार कुरण आहेत. इथे आता कॅंपिंग साइट पण तयार होत आहे. आपापले तंबू घेऊन येथे निवांतपणे राहण्याची सोय झाली आहे. प्रवेशद्वारापाशी छोटे उपाहारगृह, भेटवस्तू, स्मरणचिन्हे, टी.-शर्टस वगैरे घेण्यासाठीचे केंद्र पण आहे. करमणुकीचे खेळ, बाजारपेठ वगैरेचा प्रस्ताव प्रलंबित आहे. भविष्यात नक्कीच हे सर्व होऊ शकते. विकास चालू आहे. 

गाइडकडून इथली प्राथमिक माहिती, सुरक्षाविषयक नियम वगैरे माहिती घेऊन झाल्यावर आम्ही गाइडबरोबर आत प्रवेश केला आणि हळूहळू पायऱ्या उतरत, थोडे चालत - चालत पृथ्वीच्या पोटात प्रवेश केला. एकूण १५० - २०० फूट खोल आपण उतरत जातो. ही गुहा ४० ते ५० हजार वर्षापूर्वीची आहे. वाटेत जागोजागी त्या काळातल्या प्राण्यांचे अवशेष - हाडांचे सांगाडे दिसतात. खाली-खाली जात असताना हे सांगाडे मोठ्या मोठ्या प्राण्यांचे असावेत असे वाटत राहते. गुहेचे खडक चुनखडीपासून बनलेले आहेत. गाइड त्यांची सविस्तर माहिती देत असते. वाटेत पाण्याचे झरे, ओहोळ लागतात. पुढे ३५ फूट उंचीचा एक छोटा धबधबा पण आहे. लोखंडी पाइप्स, बांबू, फळ्या यांच्या साहाय्याने हा साधारण अर्ध्या मैलाचा रस्ता सुरक्षित केला आहे. ज्या ज्या ठिकाणी हे अवशेष आहेत तिथे प्रकाश योजना केलेल्या आहेत. येथे एरवी काळोखाचे राज्य आहे. धूसर प्रकाशातला हा प्रवास फार रोमांचक वाटतो. काळोख किती घनदाट असू शकतो, हे इथले दिवे बंद करून मुद्दाम दाखवतात.

आता आपण येतो या गुहेतून वाहणाऱ्या नदीपाशी. इथे १५० - २०० फूट जमिनीच्या पोटातून एक नदी वाहते आहे. सध्या तिचा मागही काढला आहे तो ३८ मैलांपर्यंत. त्याहूनही पुढे असू शकते. इथे गुहा बऱ्यापैकी रुंद आणि उंचही आहे. त्यामुळे इथे बोटीची सोय केली आहे. २०-२५ जण बसू शकतील एवढ्या मोठ्या बोटीतून आपण नदीचा प्रवास करू शकतो. सध्या साधारण एक मैल अंतरापर्यंत बोट जाऊ शकते. तेथपर्यंत मधून-मधून विजेचे दिवे लावून प्रकाशाची व्यवस्था केलेली आहे. हा सगळा प्रवास अतिशय अद्‌भुत वाटतो. अतिशय मंद उजेडातला - काळोखातलाच हा प्रवास शांतपणे वाहणाऱ्या नदीच्या पात्रातून आपण करतो तेव्हा होणारी भावना ही अनुभवायलाच हवी,. वर्णन करता येत नाही. चाळीस हजार वर्षापूर्वीच्या जगात आपण गेलो होतो. रानडुकरासारखे पेकॉर्टस, प्लेस्टोसिन काळी अस्वले, गवे, फिशर, पोर्क्‍युपाईन तसेच वटवाघळे, घुबडे हिमयुगाच्या वेळी आत शिरली होती. हिमयुगानंतर १२ हजार वर्षांनी यांचा शोध लागत आहे. अशी ही या अद्‌भुत जगाची सफर आहे. 

फोटो फीचर

संबंधित बातम्या