दूधसागरची आडवाट...

श्रीनिवास निमकर
गुरुवार, 19 जुलै 2018

‘सकाळ साप्ताहिक’मध्ये पर्यटन या सदरासाठी लेख पाठविण्याचे आवाहन वाचकांना करण्यात आले आहे. या आवाहनाला प्रतिसाद देताना वाचकांनी पाठविलेले लेख प्रसिद्ध करीत आहोत.

`नक्की कसा फोटो आहे हा, जरा सांग बरं’ फोटो पाहताना मित्रानं विचारलं. मी म्हणालो, ‘‘जरा शब्दांचा खेळ करायचा तर ‘धिस इज द टॉप द फॉल’. दूधसागर जिथून खाली झेपावतो तिथे उभं राहून काढला हा फोटो.’

दूधसागर म्हणजे मांडवी नदीवरचा गोव्यातला प्रसिद्ध प्रचंड धबधबा हे बहुतेकांना माहीतच असेल. ‘चेन्नई एक्‍स्प्रेस’ या सिनेमातल्या एका शॉटमुळे तो अधिक प्रकाशझोतात आला. या भागातल्या ‘भगवान महावीर’ अभयारण्यात भटकायचं बरेच दिवस मनात होतं. दरम्यान युथ होस्टेल असोसिएशन ऑफ इंडिया ऊर्फ  YHAI चा सदस्य झालो. ही केंद्र सरकारच्या विभागात येणारी संस्था आहे. हिची ‘इंटरनॅशनल लाइफ मेंबरशीप’ स्वस्त आहे. या संस्थेने आयोजित केलेल्या ट्रेकमध्ये सहभागी होण्यासाठी सर्व क्षेत्रातल्या सरकारी-निमसरकारी कर्मचाऱ्यांना विशेष रजेचीही तरतूद असते. (www.yhai.com) साधारणतः १७ डिसेंबर ते ५ जानेवारी दरम्यान हा ट्रेक चालवला जातो. पणजीमधील ‘कंपाल स्पोर्टस ग्राउंड’ पासून निघणारी बॅच सुमारे ६-७ दिवसांची असते. पहिले तीन दिवस समुद्रकिनाऱ्याने चालायचं असतं. (बीच वॉक) आणि नंतरचे तीन दिवस दुधसागरच्या जंगलात मुक्काम असतो. ट्रेकचा शेवट होतो इतिहासकालीन तांबडी सुर्ला मंदिराजवळ व तेथून ट्रेकर्सना बसने पणजीला परत आणलं जातं. 

तर पुण्याहून रेल्वेने निघालो आणि दुसऱ्या दिवशी सकाळी मडगावला पोचलो. पहाटे साडेतीनच्या सुमारास दूधसागर स्टेशन पार केलं. तेव्हा धबधब्याला सांगितलं ‘आलोच’. मडगाव ते पणजी रस्त्याचं रुंदीकरण चालू असल्यानं जायला जरा वेळ लागला. (पण लेन कटिंग, वाट्टेल तशी वाहनं घुसवणं आणि स्वतःबरोबर समोरच्याचीही गैरसोय करणं हा प्रकार तिथे दिसला नाही.) पणजीजवळच्या थिविम किंवा करमळीपर्यंतच तिकीट काढल्यास हा प्रवास टाळताही येतो. कंपालच्या स्पोर्टस ग्राउंडवर ट्रेकर्सची तंबूत राहण्याची व्यवस्था असते. पहिल्या दिवशी वायएचएची तसेच ट्रेकची सर्वसाधारण माहिती, एकमेकांची ओळख करून देणं-घेणं वगैरे कार्यक्रम झाला. कोणाला काय कितपत येतं हे पाहण्यासाठी थोडा व्यायाम, पळणे, क्‍लाइंबिंग वॉल चढणे व दोरी वापरून उतरणे इ. चाचणीही झाली. दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही (बसने) दक्षिण गोव्यातल्या मोबोर बीचकडे रवाना झालो. मोबोर बीचवरील प्रसिद्ध‘द लीली गोवा’ या पंचतारांकित हॉटेलपासून (तिथे कॉफी वगैरे न घेता) आमचा वॉक सुरू झाला.

सकाळी कोवळ्या उन्हात किनाऱ्यावरून ओल्या वाळूवरुन किंवा उथळ पाण्यातून अनवाणी चालायला मजा येते. वाळूतील किडे टिपणाऱ्या छोट्या पक्षांचे एकदोन थवे आमच्यापुढेच काही पावलं तुडतुडत होते. लाटांचा आणि वाऱ्याचा आवाज सोडता बाकी शांतताच होती. ओल्या वाळूवरचे खेकडे, छोटे स्टारफिश इत्यादी बघत आणि अर्थातच वेगवेगळे शंखशिंपले गोळा करत चालताचालता दुपारच्या जेवणाची वेळ कशी आली समजलंच नाही. वायएचएच्या प्रत्येक ट्रेकवर, सकाळी निघतानाच पॅक लंच म्हणजे पोळीभाजीचा डबा पुरवला जातो. (अर्थात त्यासाठी लागणारी रिकामी लंचबॉक्‍स आपण बरोबर ठेवायची असते.) थोड्या विश्रांतीनंतर पुन्हा चालायला सुरवात. दर दिवशी सुमारे ९ ते १३ किमी. टप्पा असतो. पुढचे तीन दिवस मोबोर, बेनोलिम, वेलसाव, कोळवा असे बीच पार करत आमचा गट चालत होता. दररोज वेगळ्या बीचवर वेगळ्या प्रकारचे शिंपले आढळत असल्यानं पाठीवरच्या सॅकमधलं त्यांचंही वजन वाढ गेलं. (शंख शिंपले आणि त्यांचे किनाऱ्यावर आढळणारे प्रकार या बाबी सागरी पर्यावरणावर अवलंबून असतात असं मध्यंतरी वाचलं होतं ते खरं असावं. कारण माझ्यानंतर काही महिन्यांनीच गेलेल्यांना तिथे तसे शंखशिंपले दिसली नाहीत.) पहिल्या दोन रात्रींची मुक्कामाची सोय त्या त्या बीचजवळच्या जीवरक्षकांच्या (लाईफगार्ड) कॉलनीतील सभागृहात होती. प्रत्येकच ट्रेकला रात्रीचं जेवण (आणि नंतर स्वीट डिशही) यूथ होस्टेलचे आचारी मस्त बनवतात. तिसऱ्या संध्याकाळी मात्र आम्ही समुद्राची संगत सोडून जरा आतमध्ये लहान गावात असलेल्या एका बंगल्यात राहिलो. गाव लहान असलं, तरी वास्कोवरुन घाटावर म्हणजेच बेळगावकडे जाणाऱ्या रेल्वेलाईनच्या जवळ होतं. लवकरच उठून एक-दीड किलोमीटरच्या कान्सोलिम रेल्वे स्थानकापर्यंत चालत गेलो. हा गोव्याचा अंतर्भाग असल्यानं इतक्‍या सकाळी सर्व सुशेगाद (निवांत) होतं. आमचा गट, दोन-चार टुरिस्ट टॅक्‍सी आणि इतक्‍या सकाळीही कामावर निघालेले अत्यंत मोजके लोक वगळता शांतताच होती. तिथून कुलेम (kulem ऊर्फ कुळे) स्थानकापर्यंतचा अर्ध्या तासाचा रेल्वेप्रवास सुखावणारा होता. कुलेम स्थानकाला उतरल्यावर मात्र या ट्रेकचं एक वेगळं वैशिष्ट्य अनुभवण्याची सुरवात होणारो होती. या जंगलातल्या पुढच्या तीन दिवसांच्या प्रत्यक्ष ट्रेकदरम्यान वायएचएचा कोणीही मार्गदर्शक सोबत नसतो. झाडांवर, मोठ्या दगडांवर, एखाद्या चुकार खांबावर फक्त दिशादर्शक बाण रंगवलेला असतो. (yhai) या अक्षरांसहित) व त्यांच्या अनुरोधानं रात्रीचा मुक्काम किंवा एखादा विशिष्ट टप्पा गाठायचा असतो. अर्थात पहिले तीन दिवसही आमच्यासोबत संस्थेचे कोणी नव्हतंच म्हणा. पण समुद्र डावीकडे ठेवून किनाऱ्यावरुनच चालायचं असल्याने तिथे दिशा किंवा रस्ता चुकण्याचा प्रश्‍नच नव्हता. (मुक्काम जवळ आला, की कोणत्या झाडाखाली किंवा हॉटेलबाहेर वायएचएचा कॅम्प लीडर थांबलेला असेल हे निघतानाच सांगितलेले असायचं. ) जंगलात मात्र नजर तयार नसेल तर झाडावर रंगवलेला बाण (मार्कर) हुकण्याची आणि परिणामी चुकण्याची शक्‍यता थोडीफार होती व झालंही एक-दोनदा. पण ट्रेकची तीच गम्मत असते ना! थोडंफार रिस्क हवीच.

स्थानकाहून बाहेर पडल्यावर जवळच्याच एका विजेच्या खांबावर बाण आणि YHAI अक्षंर दिसली. इथे दिशा (मार्करशिवायही) तशी स्पष्टच होती. कारण अभयारण्यातून दूधसागर-दर्शन स्थळापर्यंत स्कॉर्पियो आणि इनोव्हांची गर्दी दिसतेच. परदेशी पर्यटकांची संख्या जाणवण्याइतकी मोठी. कच्चा परंतु रुंद अशा आतल्या रस्त्यावरून या गाड्यांची वर्दळ अखंड चालू असते. अभयारण्याच्या दारावर एकदा गणती करून (प्रवेश, परवानगी आणि शुल्क संस्थेनं ‘एरेंज’ केली होतीच.) आम्ही मात्र पुढच्या बाणानुसार रस्ता सोडून जंगलात प्रवेश केला. त्यासाठी नमनालाच एक जलप्रवाह ओलांडावा लागला. पाणी होतं गुडघ्यापर्यंतच पण ओढ भरपूर होती. शिवाय पाठीवर बारा-पंधरा किलोची सॅक आणि बुटात पाणी जाणार! (बरं जंगलात जायचं असल्याने शॉर्टस वापरायला परवानगी नाही आणि मोजेही कंपल्सरी. भिजलेले मोजे म्हणजे... जाऊ दे. मग सर्वांनीच आपापले बुटमोजे काढून पलीकडच्या काठावर भिरकावले आणि पावलांखालच्या गोलाकार निसरड्या शिळांवरुन नृत्याचे काही अवघड पवित्रे टाकून पलीकडे गेलो. हा अनुभव ट्रेकमध्ये नंतरही दोन-तीनदा आला. एके ठिकाणी प्रवाहावर निव्वळ लाकडं एकावर एक ठेवून (जोडून नव्हे) केलेला (झुलता नसला तरी जरासा डचमळता!) पूल होता. आता जंगल दाट झालं. चांगलीच जुनी आणि उंच झाडं असल्यानं गारवा आणि थोडा अंधारही जाणवत होता.‘कॅनॉपी’ मधून पक्ष्यांचे आवाज येत होते. फुलपाखरं खूप होती. बाकी वन्यजीवन फारसं दिसलं नाही. अर्थात आमची २४ जणांची तुकडी असल्याने पायांचा आवाज तर येतच होता. शिवाय (स्पष्टच सांगतो) एकंदरीनेच आपण लोक भयानक मोठ्या आवाजात बोलतो, तेही विनाकारण आणि राजकारणासारख्या तिथे गैरलागू असलेल्या विषयांवर ! ट्रेकच्या एका भागात गवे ऊर्फ बायनस वाट अडविण्याची दाट शक्‍यता सांगितली गेली होती. पण नाही दिसले खरे. संध्याकाळी साइटवर तेथील उत्साही, शिस्तीचे आणि निसर्गाला समर्पित व्यक्तिमत्त्वाचे कॅम्पलीडर  प्रभू आमची वाटच पहात होते. जंगलाच्या ऐन गाभ्यात तंबूमध्ये मुक्काम. रात्री नऊ वाजता जेवण त्यानंतर दिवे आणि आवाज बंद. झोपेआधीच्या आणि पहाटेच्या ‘महत्त्वाच्या कार्यक्रमा’साठी तात्पुरती व्यवस्था होती. पण ती साहजिकच तंबूपासून लांब असल्याने टॉर्च आणि पाण्याची बाटली घेऊन ॲडव्हेंचर वॉक तोही शक्‍यतो एकट्यानं नव्हे कारण साप किंवा क्वचित बारकं जनावरही भेटण्याची शक्‍यता! (प्राथमिक शाळेच्या एखाद्या पिकनिकनंतर कित्येक वर्षांनी आपण ‘असे’ गेल्याचं बहुतेकांनी हसत हसत सांगितलं!) रात्रभर समोरच्या डोंगरातील रेल्वे इंजिनांच्या शिट्या आणि हेडलाईटचे झोत जाणवत होते. 

दुसऱ्या दिवशी चालायला लागलो. आणि थोड्याच वेळात दुधसागरचं ट्रेकमधलं पहिलंच दर्शन झालं! त्यामुळे उत्साह वाढला आणि लवकरच धबधब्याच्या मुख्य कुंडापाशी पोचलो. तिथं थोडाफार टाइमपास करून पायवाट चढून रेल्वेलाईनवर म्हणजे दूधसागर स्टेशनजवळ आलो. प्रपाताच्या एकंदर उंचीच्या मध्यावर रेल्वे असल्यानं खाली दरीतलं आणि मागे डोंगरावरून कोसळणाऱ्या दुधाचं दृश्‍य अप्रतिम होतं. एरवी आपण सुसाट वेगानं जाणाऱ्या राजधानी किंवा दुरांतोसारख्या गाड्या पाहतो. गोव्यातून बॉक्‍साईट सारखी खनिजे मोठ्या प्रमाणात बाहेर नेणाऱ्या इथल्या मालगाड्या उलट टोकाच्या होत्या. खनिजानं भरलेल्या वॅगनचं वजन साधारण ७० टन असतं. सरासरी ८०-९० वॅगन्सच्या ट्रेनला ५ इंजिन्स (२ पुढे ३ मागे) लावलेली दिसतात. ज्यायोगे या असल्या चढावर कासवगतीनं का होईना इतकं वजन नेता येतं. लोहमार्गाच्या बाजूने चालत ३ बोगदे पार केले व ‘टॉप ऑफ द फॉल’कडे निघालो. पुन्हा अतिशय अरुंद आणि खड्या चढणीच्या पायवाटा, दूधसागर स्थानकावर आमच्याकडून बिस्किटे मिळालेले एक कुत्रेही आमच्या बरोबर येऊ लागले. त्याचा एकदा मला अनपेक्षितपणे उपयोग झाला. माझ्यापुढेच दोन-चार पावले दुडदुडणारे हे कुत्रे अचानक थांबले आणि कान उभारून पुढच्या पायांनी जमीन उकरत वसवसू लागले. आडव्या जाणाऱ्या मोठ्या सापाबद्दलची मला दिलेली सूचना होती ती!

डोंगरमाथ्यावर दाट झाली विरळ होऊन गवताळ कुरणं लागली. ग्रुपपासून जरा बाजूला जाऊन थांबलो, की (किंवा सर्वांत पुढे)चहूकडची संपूर्ण शांतता-साऊंड ऑफ सायलेन्स छान ऐकू येतो.! अशाच स्तब्धतेत गोव्याची सीमा ओलांडून कर्नाटकमधील कुवेशीला पोचलो. हा ट्रेकमधला सर्वाधिक उंचीवरचा मुक्काम होता. अगदी छोटी वस्ती. मोकळ्यावरच्या बांधबंदिस्त शेतातले आमचे तंबू, त्यांना झाडांची किनार, थोडं खाली उतरल्यावर लागणारी नदी, सूर्यास्त आणि नंतरच्या गर्द आकाशात लखलखणारे लहानमोठे तारे; त्यांतच मिसळलेले विमानाचे दिवे. बस्स ‘हा आतापर्यंतचा सर्वांत सुंदर कॅम्प!’ असं एकमत झालं. रात्री मनसोक्त नक्षत्र दर्शन करून दुसऱ्या दिवशी सकाळी निघालो. अनोडकडे वाटेवर कॅसलरॉक हे या लायनीवरचं जुनं स्टेशन लागतं. तसं मोठं आहे पण त्या मानाने शुकशुकाटच. पुन्हा जंगल. पण आताही गवताळ कुरणांचं प्रमाण जास्त होतं. अनमोड मुक्कामाच्या आवाराजवळच खजुराच्या झाडांची लागवड आहे. किंबहुना तीच त्याची खूण आहे. दूधसागरपासून कुवेशीतही कोणत्याही नेटवर्कला रेंज नव्हती. अनमोड मात्र हायवेवर असल्यानं तिथे बऱ्याच सोई आहेत. त्यामुळे संध्याकाळी फोन चार्ज करणे, काल काढलेले फोटो सेंड करणे वगैरे गडबडही बहुतेकांची चालू राहते. ट्रेकचा शेवटचा दिवस म्हणजे अनमोड ते तांबडी सुर्ला या महादेव मंदिरापर्यंतचा टप्पा. इथे पुन्हा उंच झाडांचे जंगल लागलं. आणि शिळांवरचे बाण शोधण्याची एव्हाना सर्वांना चांगलीच सवय झाली असल्यानं बहुतेकांची पावलं झपाझप पडत होती. मंदिर खूपच जुनं आहे. परंतु सॅंड ब्लास्टिंगसारख्या तंत्रानं त्याचा पृष्ठभाग साफ केलेला वाटतो. लांबरुंद प्रांगणात हिरवळही राखली आहे. इथे प्रवाशांची गर्दी व बोलणं, बसेस आणि गाड्यांच्या इंजिनांचे आवाज, खाद्यपदार्थांचे स्टॉल यामुळे जंगल सोडून रोजच्या जीवनात पुर्नप्रवेश केल्याची जाणीव झाली. ट्रेक संपल्याचं वाईट वाटलं. पण पुन्हा सॅक पाठीवर घ्यायची नाहीये ही जाणीवही सुखद होती हेसुद्धा मान्य केलं पाहिजे!!

फोटो फीचर

संबंधित बातम्या