गोव्यातली सायकल सफर

श्रीनिवास निमकर
सोमवार, 12 ऑक्टोबर 2020

पर्यटन

तुम्ही सायकल चालवत आहात, दमलेलेही आहात कारण रस्ता चढाचा आहे, सायकलच्या कॅरिअरवर बारा-पंधरा किलोची सॅक आहे आणि डोक्यावर ऊन... अशा वेळी एक चारचाकी उलट्या दिशेने म्हणजेच रॉँग साईडने तुमच्या दिशेने येऊ लागते. आता, सर्वसामान्यतः काय होते? गाडीवाला त्याची जागा सोडत नाही, त्यामुळे सायकलस्वाराला एकतर रस्त्याच्या मध्यभागी यावे लागते (म्हणजे मागून येणाऱ्‍याचा अंदाज चुकणार आणि तो चालक आपल्याला शब्दगुच्छ देणार!) किंवा कडेच्या मातीत वा साइडपट्टीवर उतरावे लागते. बरोबर आहे ना?... पण गोव्यात तसे झाले नाही. माझ्यासमोर आलेल्या कारवाल्याने आपली गाडी खाली उतरवली! मी गहिवरलोच. बरं हा अनुभव मला एकट्याला नाही तर आमच्या गटातल्या इतरांनाही वेगवेगळ्या ठिकाणी आला.  

डिसेंबर महिन्यात गोव्यात सायकलिंग करून आलो. यूथ हॉस्टेल असोसिएशन ऑफ इंडिया ऊर्फ वायएचएआय (www.yhai.org) तर्फे सर्वप्रकारचे ट्रेक आणि सायकलिंगचे कार्यक्रम देशभर आयोजित केले जातात. त्यांच्यातीलच ‘गोवा बाइकिंग’ हा एक. पणजीपासून सुरुवात करून, दररोज सुमारे ५० ते ६० किलोमीटर्सचा टप्पा असतो. यात दक्षिण गोव्यातील एकूण पाच मुक्काम आहेत आणि त्यात गोव्यातील प्रसिद्ध समुद्र किनाऱ्यांपासून अंतर्भागातील प्रसिद्ध नसलेल्या, परंतु अतिशय सुंदर भूभागांचाही समावेश आहे. प्रवासमार्ग सांगायचा तर पणजी – अंबेली – विंचुंद्रे – कोलेम – पिळ्यें – मार्सेलमार्गे पणजी. यातली, मला वाटते, लोहमार्गावर असलेले कोलेम वगळले तर बाकीची गावे इतकी छोटी आहेत, की गुगल मॅप्सच्या सर्वसाधारण व्ह्यूमध्ये ती दिसतच नाहीत! नेत्रावळी जंगलातील सावेरी धबधबा, भगवान महावीर अभयारण्यातून जाणाऱ्‍या रस्त्याने पुरातन तांबडी सुर्ला महादेव मंदिर, सलौलिम धरण असे या सायकलिंग ट्रेकचे काही ‘लॅँडमार्क’ सांगता येतील. संपूर्ण राइडदरम्यान संस्थेचा सायकल मेकॅनिक-मार्गदर्शक-व्यवस्थापक त्याच्या स्कूटरवरून सतत आपल्याबरोबर असतो.

सायकलने फिरण्याचा एक मोठा फायदा म्हणजे स्थानिक आयुष्य अक्षरशः जवळून आणि शांतपणे पाहता व अनुभवता येते. आमचा ही राइड २२ ते २९ डिसेंबर या काळात असल्याने गोव्यात सर्वत्र नाताळ आणि नववर्षाचे उत्साही वातावरण होते. गणपती किंवा दिवाळीप्रमाणेच सर्वत्र साफसूफ व सजावट पाहायला मिळाली (गोव्यात एकंदरीतच स्वच्छता जास्त आहे). मुंबई, पुणे, दिल्ली, बंगळूर इ.सारख्या महानगरांतील वेगवान आयुष्याच्या मानाने गोव्यातील दिनक्रम अर्थातच निवांत, ‘सुशेगाद’ असतो. त्याची आणि आमच्या प्रवासाच्या वेगाची नाळ जुळल्याने वेगळीच मजा आली. अंतर्भागातले छोटे रस्तेही अत्यंत चांगले, आमच्या एकूण सुमारे ३०० किमी.च्या सायकलिंगमध्ये अक्षरशः एकही खड्डा लागला नाही असे म्हणता येईल! (सायकलला सस्पेन्शन नसल्याने खड्ड्यांचा थेट परिणाम खांदे आणि पाठीला जाणवतो.) पणजी, मिरामार, दोना पौला अशा शहरी भागापासून राखीव वनक्षेत्रात अगदी आतमध्ये असलेल्या दोन-तीन घरांच्या वस्तीपर्यंत सर्वप्रकारचे मुक्कामही आम्ही अनुभवले. 

पहिल्या दिवशी पणजी शहरामध्येच एक चाचणी व प्रशिक्षण सफर असते. सायकलवरून अंतर सुमारे १५ किमी. त्याआधी जवळच्या मिरामार बीचपर्यंत दौड आणि स्ट्रेचिंग इ. पणजी समुद्रकिनाऱ्‍यावरच असले तरी त्यामागेच डोंगरउतारावरचे चढाचे रस्ते आहेत. पणजीचे आकाशवाणी केंद्र आणि इतर काही महत्त्वाच्या संस्थाही त्या उंचावरच्या भागात आहेत. पणजीच्या प्रसिद्ध इमॅक्युलेट कन्सेप्शन चर्चपासूनच चढाचा रस्ता सुरू झाला आणि त्यापूर्वी सायकलचे गिअर वापरण्याबद्दलच्या सूचना आमच्याबरोबरच्या टीम लीडरने प्रात्यक्षिकासह दिल्या. तेव्हा एक मनोरंजक मुद्दा समोर आला –  चढावर वेग कमी होण्याचा ऊर्फ ‘मोसम तुटण्याचा’ क्षण सेकंदभर आधीच ओळखून गिअर बदलून वेग कायम ठेवणे महत्त्वाचे असते. एरवीच्या आयुष्यात मोटरसायकल चालवणाऱ्‍यांना यात अडचण आली नाही. परंतु ज्यांनी आतापर्यंत फक्त (हल्ली विलक्षण लोकप्रिय असलेल्या) ऑटो स्कूटर्सच वापरल्या आहेत अशांची, गिअरची संकल्पना राबवताना प्रथम जरा तारांबळ झाली! 

यूथ हॉस्टेलच्या सर्वच ट्रेक्सवर, सकाळचा भरपूर नाश्ता करून निघतानाच दुपारचे जेवण (पॅक्ड लंच) डब्यात दिले जाते. इथेही आम्ही ते घेतले खरे परंतु एकदोन दिवसांनी बहुतेकांच्या लक्षात आले, की सायकल चालवताना भुकेपेक्षा तहान जास्त लागते आणि ती भागवणे (भुकेपेक्षाही) अधिक महत्त्वाचे ठरते. अन्यथा स्नायूंना पाणीरूपी वंगण कमी पडून (डिहायड्रेशन होऊन) क्रॅम्प येण्याचा धोका असतो. अर्थात अगदी जंगलातले काही भाग सोडले तर वाटेतील छोट्यामोठ्या हॉटेलांमधून पाण्याप्रमाणेच दही-ताक, सरबत, चहा-कॉफी इ. विकत घेऊन हा प्रश्न सोडवणे सोपे होते. शिवाय चांगले रस्ते, उत्तम हवा आणि परिसर यामुळे पकडलेला वेग सोडून निव्वळ वेळ झालीय म्हणून लंचसाठी थांबायलाही आम्ही आघाडीवीर राजी नसायचो.

असो. तर पहिल्या दिवशीच्या प्रॅक्टिस राइडनंतर दुसऱ्‍या दिवशीची आमची सफर होती बीचवरून. बीचपर्यंत पोचण्याचा रस्ताही अतिशय रमणीय आणि बिनखड्ड्यांचा होता. आम्ही पोचण्याच्या वेळेआधीच ओहोटी सुरू झालेली असल्याने पक्क्या वाळूवरून सायकल चालवता आली. अन्यथा ही सुमारे १५ किमीची राइड मोकळ्या म्हणजे ‘लूज’ वाळूतून करावी लागली असती तर परीक्षाच होती. कान्सोलिम बीचपर्यंत सायकल चालवताना फक्त वाऱ्‍याचा आणि लाटांचा आवाज (इंजिनचा नाही!), एखाद्या मोठ्या लाटेमुळे मधूनच टायरखाली येणारे पाणी आणि त्यामुळे क्वचित वाळूत चाक थोडे अडकणे, तुडतुडणारे छोटे पक्षी, शंखशिंपले वेचणे... मजा आली. 

त्या रात्रीचा आमचा मुक्काम एका फुटबॉल स्टेडियममध्ये होता. दुसऱ्‍या दिवशीचा नेत्रावळी जंगलापर्यंतचा पल्ला जरा जास्त असल्याने लवकर आवरणे आवश्यक होते (स्वच्छ आणि ॲटॅच्ड टॉयलेटचे महत्त्व अशा वेळी पटते!). या रस्त्यावर चांगलेच चढउतार होते, पण अखेर पोचलो. गेटवर सायकली ठेवून पुन्हा डोंगर उतरून सावेरी धबधब्यापर्यंत उतरलो. गर्द झाडीतूनच रस्ता असल्याने श्रम जाणवले नाहीत (तरी सिंहगडाइतका क्लाइंब झाला एकंदर). दूधसागरचा ट्रेक केलेल्यांना पुनःप्रत्ययाचा आनंद मिळाला. या कुंडात भरपूर मासे होते आणि पाण्यात पाय सोडून बसल्यावर ‘पेडिक्युअर’ करायला ते आलेच! शिवाय आम्हा सर्वांची ‘ट्रेकिंगची पावलं’ असल्याने त्यांना भरपूर खाद्य मिळाले! 

यानंतरचा मुक्कामही नदीकाठीच होता. या राइडमधील पाचपैकी तीन मुक्कामांत सर्वांची पाण्यात खेळण्याची चांगलीच सोय झाली. यावेळी मात्र मी इतरांबरोबर न डुंबता जरा दूरवर पाण्यात पाय सोडून बसलो होतो, शांतता अनुभवत. माझी पावले साफ करणारा माशांचा थवा अचानक झपकन तेथून निघून गेला. याचे आश्चर्य वाटून मी पाण्यावर नीट नजर टाकली, तर माझ्या पायांपासून तीन-चार फुटांवरच पाण्यातल्या एका कपारीतून एक पाणसाप पाण्याबाहेर फक्त त्याचे डोके ठेवून ठाकलेला! तो तिथे अवतीर्ण झालेला मला कळलाच नव्हता. म्हटले आता जागेवरून उठण्यासाठी पाय हलवले की एकतर तो चावेल किंवा तेथून निघून जाईल; दोन्ही बाबी मला नको होत्या. मग एक डोळा त्याच्याकडे ठेवून, दूरवर असलेल्या आमच्या गटाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न सुरू केला. दहा मिनिटांनी यश आले. एसएलआर कॅमेरा बाळगणारे नाईक माझ्याकडे आले व त्यांनी सापाचा छान फोटो काढला. तोपर्यंत बाकी गॅँगही आल्याने, बहुधा पायांच्या कंपनांमुळे आणि स्वतःचा फोटो काढून झाल्याने, साप पाण्यात दिसेनासा झाला. या छोट्याशा अनपेक्षित ॲडव्हेंचरबद्दल स्थानिक कँप लीडरने माझी थोडी हजेरी घेतली ते सोडा! 

सव्वीस डिसेंबर – भारतातून दिसणारे त्या वर्षातले शेवटचे सूर्यग्रहण. मी त्यासाठी पुण्यातून निघतानाच ग्रहण पाहण्यासाठीचे तीन चष्मे सॅकमध्ये ठेवले होते. त्यादिवशी सकाळीच ग्रुपमध्ये त्यांचे वितरण केले, कारण प्रत्येकाचा चालवण्याचा वेग आणि कौशल्य, स्टॅमिना, फोटो काढण्यासाठी थांबणे इ.मुळे आमचा हा २३ लोकांचा गट चांगला दोनअडीच किलोमीटर्सवर पसरलेला असायचा. ग्रहण ‘चढू’ लागले आणि सूर्यप्रकाश कमी होऊ लागला तसा मी मुद्दाम बसस्टॉप, चर्चचे प्रवेशद्वार, चहाची टपरी अशांसारख्या ठिकाणाजवळ थांबून चष्म्यातून ग्रहण बघायचो. परिणामी आसपासचे दोनचार लोक, विशेषतः शाळकरी मुले, जवळ यायचीच. त्यांना ग्रहणाची माहिती दिली. शिवाय सायकल चालवण्याने होणारा व्यायाम आणि घटणारे प्रदूषण याबद्दलही थोडे उद्‍बोधन केले. आम्ही ग्रहणाबाबत सुदैवी ठरलो, कारण त्यावेळी मुंबई ठाण्याकडे ढगाळ हवा तर पुण्यात पाऊसच होता.

आता पोचलो शेकडो वर्षे जुन्या तांबडी सुर्ला मंदिरापर्यंत. योगायोग असा की जंगलात खाणकाम करताना हे मंदिर ज्यांना आढळले आणि तत्कालीन पोर्तुगीज राजवटीकडे पाठपुरावा करून ते जतन करण्याचा आग्रह धरला त्या व्यक्तीची नात आम्हाला तिथे भेटली! त्यांच्याकडून ती हकिकत ऐकणे वेगळाच अनुभव होता. आता हे मंदिर पुरातत्त्व खात्याच्या अखत्यारीत आहे. दूधसागर ट्रेकमध्येही या स्थळाचा समावेश आहे, स्वतंत्रपणेही भेट देता येते. इथे बसेस भरून देशीविदेशी पर्यटक येतात. 

यापुढचा मुक्काम गाठण्यासाठी मात्र चांगला रस्ता सोडून, दोन टेकड्या ओलांडून त्यापलीकडच्या नदीजवळ पोचायचे होते. टेकडीवरचा हा रस्ता कच्चा होता, व्यवस्थित चढउतार, त्यात ढिसाळ मुरूम आणि दगडमाती! टायरला ‘ग्रिप’ कमी असल्याने, पॅडल मारत हॅँडल स्थिर ठेवण्याची धडपड करण्यापेक्षा सरळ खाली उतरून सायकल ढकलणे सोपे आहे असा निष्कर्ष निघाला. अशा कच्च्या उतारावर सायकल चालवण्याचेही वेगळे तंत्र असते, चालकाने नेहमीच्या स्टाइलने हॅँडलवर न झुकता त्याच्या शरीराचे वजन मागच्या बाजूला ठेवणे गरजेचे असते, अन्यथा सायकल पुढच्या चाकावर उलटण्याची शक्यता असते. इथे दमणूक फारच झाली आणि त्यानिमित्ताने एक वेगळ्याच मुद्द्यावर आम्हा काहींची चर्चा झाली – मेहनत करणारे शरीर असो किंवा ‘फुल लोड’ घेऊन घाट चढणारे वाहन असो, दोन्हींची तुलना केली तर लक्षात येते, की प्रत्यक्ष कार्याला चालना देणारे भाग किती लहान आकाराचे आहेत (हृदय आणि इंजिन)! आणि तरीही ते भरपूर आणि व्यवस्थित काम करीत असतात. बरे, काम झाले की आपण इंजिन बंद करतो, हृदयाला कधीच विश्रांती मिळत नाही. त्यामुळे, जीवनशैली योग्य ठेवून त्याची कार्यक्षमता कायम राखली तरच शरीर आयुष्याचा दुस्तर घाट नीट पार करेल!  

गोवा बाइकिंग ऊर्फ GB चा शेवटचा दिवस वेगळ्या प्रकारे सर्वांच्या लक्षात राहिला. हे अंतर्भागातले रस्ते असल्याने गावांची नावे किंवा अंतरे दर्शवणाऱ्‍या पाट्या फारशा नव्हत्या. जिथे फाटा असेल तिथे आमच्यासाठी योग्य रस्त्यावर बाण रंगवलेला असायचा व त्यानुसारच गेले चार

दिवस आमचा प्रवास सुरू होता. एका टप्प्यावर हायवे सोडून उजवीकडचा छोटा रस्ता घ्यायचा होता, त्याप्रमाणे वळलो. दीडदोन किमी गेल्यावर पुन्हा हायवेच समोर आला... मग आम्हाला वळायला का सांगितले? तिथेच थांबलो. पाचदहा मिनिटांतच वायएचएचा अवनीश आम्हाला शोधत आला. झाले होते असे की मधल्या आणखी एका फाट्याला रस्त्यावर बाण रंगवलेला होता, परंतु दरम्यान म्हशींनी त्यावरच ‘निसर्गक्रम’ उरकल्याने तो शेणाखाली झाकला जाऊन आम्हाला दिसलाच नव्हता! यावर हसून झाल्यावर, पाण्याकाठच्या अत्यंत रमणीय रस्त्यावरून, मार्सेलमार्गे पणजी बेस कँपकडे परतलो. भूक लागली होती खरी, पण जेवणाआधी अंगाला चिकटलेला घामट टीशर्ट उतरवून अंघोळ करणे आवश्यक वाटले! नंतर अर्थातच एकमेकांचे फोन नंबर घेणे, व्हॉट्सॲप ग्रुप तयार करणे वगैरे गडबड सुरू झाली, कारण काहींना रात्रीच निघायचे होते. 

संपूर्ण भारतातले लोक भेटणे हे यूथ हॉस्टेलच्या ट्रेक्सचे वैशिष्ट्य आहेच. शिवाय ‘सिक्स्टीन टू सिक्स्टी’ म्हणतात तशा विस्तीर्ण व्याप्तीच्या वयोगटातील सहभागी असल्याने अनेकविध विचारप्रवाहांची देवाणघेवाण होत राहते. आजचे तरुण नक्कीच जागरूक आहेत. त्यांनी फक्त प्रदूषण टाळण्यासाठी आणि व्यायामासाठीच नाही तर खऱ्‍या अर्थाने देशवासीयांच्या संपर्कात येण्यासाठी, दृष्टिकोन विशाल होण्यासाठी तसेच कमी संसाधने वापरूनही सुखाने जगण्याचा विचार समजण्याकरिता अशा तऱ्‍हेच्या ट्रेक्समध्ये सहभागी होणे आवश्यक व त्यांच्याच हिताचे आहे!   

संबंधित बातम्या