वन्यजीवनाने समृद्ध ‘मादागास्कर’

सुधीर य. नाडगौडा 
शुक्रवार, 12 जानेवारी 2018

वन पर्यटन
जगामध्ये काही ठराविक देशांमध्येच ‘लिमर’चे अस्तित्व आहे. मात्र एकूण साठ ते पासष्ट जातीपैकी लिमरच्या चाळीस ते पंचेचाळीस जाती एकट्या मादागास्करमध्ये आहेत. लिमरसाठी इथले हवामान अत्यंत पोषक आहे. त्यातही आय आय या प्रकारचे लिमर फक्त मादागास्करमध्येच आहेत.

वन्यप्राणी, पशू, पक्षी यांच्या अभ्यासाची आवड खूप पूर्वीच निर्माण झाली. त्यामुळे आतापर्यंत वन्यजीवनाच्या अनेक देशांत जाऊन आलो व अभ्यासही केला. या अभ्यासाची खरी आवड निर्माण केली केनिया, टांझानिया, झांबिया, दक्षिण आफ्रिका या देशांनी. आता जगात आणखी कोणत्या देशात वन्यजीवन समृद्ध आहे, हे आमचे मंडळ शोधत होते. चर्चा करता करता बोर्निओ, कांगो, मादागास्कर, बोस्टवाना या देशांची नावे समोर येऊ लागली आणि मादागास्करवर एकमत झाले. 

मुंबई-सेशेल्स-मादागास्कर असे सेशेल्स एअरलाईन्सचे विमान होते. तसाच परतीच्या प्रवासही होता. मादागास्कर हा देश आफ्रिका खंडाच्या दक्षिणेला एक स्वतंत्र देश आहे. पश्‍चिम हिंदी महासागरात हे मोठे बेट आहे. तसेच त्याच्या जवळच्या इतरही दोन-तीन छोट्या बेटांचा त्यात समावेश होतो. आकाराने हा देश चांगलाच मोठा आहे. पण गरिबीने चांगलाच ग्रासलेला आहे. या देशावर बराच काळ फ्रेंचांची राजवट होती, त्यामुळे सर्वत्र फ्रेंच भाषेचा पगडा दिसून येतो. १९६० मध्ये मादागास्कर स्वतंत्र झाला. 

मादागास्करच्या जंगलात विविध प्रकारच्या प्राण्यांचा मुक्त संचार आहे. प्रत्येक देशाला निसर्गाने काहींना काही वेगळेपण दिलेले असते. तस मादागास्करला रंगीत संगीत अशा वेगवेगळ्या वन्यप्राण्यांचे वरदान दिलेले आहे. अनेक संरक्षित अभयारण्ये आहेत. अनेक नैसर्गिक जंगले आहेत. या जंगलातील रंगीत वन्यजीवन पाहणे हा एक वेगळा अनुभव आहे. निसर्गाचा तो एक चमत्कार आहे. आपल्या भारतात बहुतेक पांढऱ्या आणि काळ्या रंगाचेच प्राणी दिसतात. पण या ठिकाणी निरनिराळ्या रंगाचे अत्यंत लहान व मोठ्या आकाराचे सरडे पाहायला मिळतात. तसेच लिमर, सरडे, बेडूक, फोसा, जिराफ, बिटल, साप, कासव, पाली, कोळी, कीटक, फुलपाखरे, लहान मोठे पक्षी आपण न पाहिलेले वृक्ष उदा. कॉटन ट्री (हात पुसायला कागद) फळे, फुलेही खूप प्रकारची पाहायला मिळतात. मात्र मादागास्करचे मुख्य आकर्षण म्हणजे लिमर, बेडूक व सरडे होय. यासाठी जगभरातील वन्यजीव अभ्यासक, संशोधक, पर्यटक हे घनदाट जंगल तुडवत असतात. कारण असे सप्तरंगी वन्यजीवनजगात इतरत्र कुठेही पाहायला मिळत नाही. इथे काही प्राणी शांत स्वभावाचे असले तरी काही प्राणी मात्र एकदम आक्रमक आहेत. वन्यजीवन समृद्ध होण्यासाठी लागणारे अनुकूल वातावरण म्हणजे प्रचंड दलदल, सततचा भरपूर पाऊस, दाट जंगल व वन्य प्राण्यांना लागणारी मुबलक अन्न साखळी होय. 

जगामध्ये काही ठराविक देशांमध्येच ‘लिमर’चे अस्तित्व आहे. मात्र एकूण साठ ते पासष्ट जातीपैकी लिमरच्या चाळीस ते पंचेचाळीस जाती एकट्या मादागास्करमध्ये आहेत. लिमरसाठी इथले हवामान अत्यंत पोषक आहे. त्यातही आय आय या प्रकारचे लिमर फक्त मादागास्करमध्येच आहेत. त्यांची संख्याही केवळ वीस-पंचवीस एवढीच आहे. ती वाढविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. हे लिमर पाहण्यासाठी पर्यटकांवर खूप बंधने आहेत. कारण या लिमरची संख्या वाढली नाही, तर ही जातच पृथ्वीतलावरून कायमची नष्ट होणार आहे. 

लिमरच्या वेगवेगळ्या जाती वेगवेगळ्या रंगात दिसतात. काळ्या, तपकिरी, पांढऱ्या, लाल, मोठ्या मिशा, सर्व अंगावर भरपूर केस, असा लिमर असतो. त्याच्या शरीराचा आकारही लहान, मध्यम, मोठे असे असतात. त्याचे वयोमान सरासरी दहा ते अठरा वर्षे एवढे असते. लिमरचा वावर जगात दक्षिण मध्य अमेरिका ते वायव्य कोलंबिया व अॅमेझॉनच्या खोऱ्यापर्यंत आहे. यांना उष्ण हवामान व मोकळ्या वातावरणात राहायला आवडते. लिमर झाडांना धरूनच पळतात. ते गटागटानेच राहतात. त्यांचा आहार म्हणजे झाडांची फळे, झाडांची पाने, झाडावरील मधमाशांची पोळी, लहान पक्ष्यांची अंडी, कोळी कीटक होय. 

डाएटिंग सिफाका, इंद्री, पारसोनी चायलिन, कॉमन ब्राऊन लिमर, ब्लॅक अँड व्हाइट लिमर, ईस्टर्न ऊलि लिमर, गुड मॅन्स लिमर, बुटका लिमर (गॉड लिट) रेड मेलिड लिमर, रेड फॅटेड लिमर, आय आय लिमर, माऊस लिमर या लिमरच्या जाती आहेत. विशेष म्हणजे आय आय लिमरचे एक बेट आहे. आणि या जातीचा लिमर जगात केवळ याच बेटावर आहे. लिमरच्या काही जाती अगदी सहजपणे दिसतात. तुम्ही जंगलातून चालले असताना हे लिमर तुमच्या डोक्‍यावर, खांद्यावर उडी मारून येऊन बसतात. पण नियम कडक आहेत. तुम्ही त्यांना हात लावायचा नाही किंवा काही खायला द्यायचे नाही. मात्र काही जाती तुम्हाला अत्यंत दाट जंगलात जाऊन शोधाव्या लागतात. 

मादागास्करच्या कुठल्याही जंगलात जायचे म्हणजे फार कष्ट आहेत. कारण सर्वत्र काटेरी वनस्पती आहेत. पाणथळ, दलदलीची जमीन. प्रचंड चिखल व यातून जाताना खालून जळवा पायावर चढतात किंवा जळवा झाडावरूनही अंगावर पडतात. त्यातही जोरदार पाऊस असतो. सतत झाडाची पाने पडून ओलीमुळे जमीन स्पंजसारखी झालेली असते. पाय जमिनीत किती घुसेल काही सांगता येत नाही. एक फुटभरसुद्धा रस्ता नाही. खालून जळवा, वरून जळवा, जोरदार पाऊस अशा परिस्थितीत वन्यजीवन पहायचे असते. त्यांचे फोटोही घ्यायचे असतात. बराच वेळ त्यांच निरीक्षण करायचे असते. अभ्यास करायचा असतो. हे दिवसाचे व रात्रीच ट्रेकिंग अत्यंत खडतर आहे. पण त्यामुळेच समृद्ध वन्यजीवन पाहण्याचा आनंद मिळतो. 

बेडूक
मादागास्करचे दिवसाची जंगल सफारी, रात्रीची जंगल सफारी त्या त्या हवामानावर ठरविली जाते. एकदा रात्री जोरदार पाऊस होता. रात्री सात वाजता नाईट जंगल ट्रेकिंगसाठी जायचे आहे, आज पूर्ण रात्र बेडूक जंगल सफारी आहे. तेव्हा दलदलीच्या सर्व कपड्यानिशी चला, असे गाईडने आम्हाला सांगितले.भर पावसात बेडूक पाहण्याचे मुख्य कारण म्हणजे बेडूक पावसातच खूप ॲक्‍टीव होतो. दलदल, पाणी, झाडांचे बुंधे, झाडाची पाने यातून तो बाहेर येतो. म्हणून पाऊस असला तरच बेडूक नाईट ट्रेकिंग केले जाते. इथले सर्व बेडूक रंगीबेरंगी आहेत. त्यामुळे लहान आकाराचे, मोठ्या आकाराचे बेडूक सहज दिसतात. दिवसभर ते कधीच दिसत नाहीत. हिरवे, लाल, पिवळे, पांढरे, अगदी पांढरे स्वच्छ, इथे पहायला मिळतात. 

सरडा
आपल्याला सरडा म्हणजे रंग बदलणारा काळा सरडा एवढेच माहीत आहे. पण या ठिकाणी सर्व सरडे हिरवा, पिवळा, लाल, मातकट, अंगावर निरनिराळे डिझाइन असणारे सरडे आहेत. काही एकदम लहान एक इंचाएवढे तर काही खूप मोठे दोन-अडीच फुटांएवढे आहेत. गेंड्यासारखी काहींच्या तोंडापुढे दोन शिंगे असतात. तर काही सतत शेपटी गुंडाळून बसलेले असतात. काही सरड्यांच्या कानांची ठेवण हत्तीच्या कानासारखी असते. काही सरडे फताड्या पायाचे, धारदार नखे असलेले, तर काही छोट्या पायाचे. काहींचे शेपूट टोकदार तर काहींचे शेपूट झाडांच्या पानासारखे रुंद असते. काही सरडे जागेवर बसूनच जीभ फेकतात तर काही सरड्यांना जीभच फेकता येत नाही.

जिराफ भुंगा
याला त्याच्या प्रचलित नावापेक्षा ‘जिराफ भुंगा’ असेच म्हणतात. हा भुंगा जगात इतरत्र कुठेही आढळत नाही. फक्त मादागास्करच्या जंगलात तो झाडावर दिसतो. याचे शरीर लाल व मान काळी असते. मान खूप लांब असून तीन टप्प्यात असते. त्यामुळे तो कोणत्याही बाजूला मान सहज वळवू शकतो. त्याला पंख असल्यामुळे हवेत उड्डाण करता येते. त्याच्या शरीराची लांबी एक इंच ते सव्वा इंच असते व मान इतर कोणत्याही भुंग्यापेक्षा चौपट लांब असते. या मानेचा उपयोग त्याला घरटे बांधण्यासाठी व स्वजातीशी लढण्यासाठी होतो. त्याचेही दोन प्रकार आहेत. ’ट्रॅचेल फोरस जिराफ भुंगा’ व ’टी जिराफ भुंगा’ हे पाहण्यासाठी प्राणीप्रेमी, शास्त्रज्ञ  धडपडत असतात. 

मादागास्कर हा तसा गरीब देश आहे. पण वन्यजीवनांनी अत्यंत समृद्ध आहे. मादागास्करचा जंगल ट्रेक फार खडतर आहे. कारण आपण जंगलातच राहत असतो. इथे राहण्याची सोय चांगली आहे. सर्व प्रकारच्या खाण्या पिण्याची व्यवस्था असते. मादागास्करला तसे शहरी पर्यटन काहीही नाही. जंगलात राहणे तसे खूपच खर्चिक आहे. शिवाय भारतापासून हा देश खूप लांबही आहे.

फोटो फीचर

संबंधित बातम्या