ताडोबाची सफर

सुजाता लेले
मंगळवार, 18 ऑगस्ट 2020

पर्यटन

ताडोबाला जायच्या दोन/तीन दिवस आधी माझ्या मिस्टरांना ताप आला होता. डॉक्टरांनी चंद्रपूरच्या उन्हाळ्यात(मे) जायची परवानगी दिली नाही. त्यामुळे दोन वर्षांपूर्वी आमचे ताडोबाला जायचे बारगळले. ‘कशी झाली ताडोबा सफारी?’ असे मैत्रिणीला विचारल्यावर ती पुरती वैतागून गेली. मग म्हणाली, ‘बरं झालं आला नाहीत ते, ताडोबाला एवढ्या रणरणत्या उन्हात फिरूनसुद्धा बोंबलायला वाघ दिसलाच नाही. डुकराची शिकार दिसली, पण तीसुद्धा होताना दिसलीच नाही.. पण बिबट्या ती खात बसलेला तेवढा दिसला. बाकी ऊन.. ऊन.. ऊन.. एवढे मात्र खूप दिसले.’ एकंदर सारे सांगताना ती वैतागली होती, त्यामुळे पक्षी तरी दिसले असतील हे विचारायचे धाडस केले नाही. पण ताडोबाला थंडीच्या दिवसात जाऊयात हे विचारायचे धाडस मी ग्रुप लीडरला केले. तो म्हणाला, ‘उन्हाळ्यात पाण्यासाठी शाकाहारी प्राणी बाहेर येतात. त्यांच्या मागावर मांसाहारी प्राणी येतात. त्यामुळे आपल्याला साइटिंग होते.’ हेच वाक्य पकडून मी म्हणाले, ‘पण उन्हाळ्यात तरी तुम्हाला कुठे वाघ दिसला?’ तो म्हणाला, ‘आम्हाला त्यावेळी फारसे काही दिसले नाही. पण दोन-चार दिवसांनंतर आलेल्या आपल्या दुसऱ्या ग्रुपला दोन दिवस वाघाचे दर्शन झाले.’ ‘आम्हाला उन्हाळ्यात त्रास होतो. त्यापेक्षा थंडीतले ऊन सोसते.’ मी हटणार नाही हे लक्षात आल्यावर मागच्या वर्षी जानेवारीच्या शेवटाला ताडोबा व्याघ्र प्रकल्पाला जायचा योग आला. 

सहा जणांचा ग्रुप झाला होता. तिथे काहीही दिसले नाही तर वैतागलेला सूर लावायचा नाही आणि मला बोलायचे नाही, असे आधीच गाइडने बजावले होते. खरे तर जंगलात काही दिसले नाही, तरी जंगलातील शांतता अनुभवायची असते. असे म्हणतात की हिमालयात जाऊन आलो, की तो परत परत यायला खुणावतो. समुद्रकिनाऱ्याच्या लाटांचा आवाज आणि तिथला सूर्यास्त-सूर्योदय आपल्याला साद देतो. तर, गडांवर जाऊन आलो, की तिथला इतिहास पुन्हा पाहावासा वाटतो. जंगलात जाऊन आलो, की जंगलातील वृक्षवल्लरींचा सुगंध, उभयचर, जलचर प्राणी आणि पक्षी आठवत राहतात. आपण त्याच-त्याच जंगलात पुन्हा गेलो, तरी प्रत्येकवेळी वेगळे अनुभव मिळतात. त्यामुळे खरे तर वैतागायचा प्रश्नच येणार नव्हता असे माझे मत होते.

अखेर विमानाने नागपूर, मग तिथून इनोव्हाने ताडोबाला जायला निघालो. ताडोबा हे राष्ट्रीय उद्यान भारताच्या महाराष्ट्र राज्यातील चंद्रपूर येथील प्रमुख राष्ट्रीय उद्यान आहे. मला वाटते की गुगलवर सर्व माहिती मिळेलच, तिथे राहण्याच्या सोयीसुविधापण कळतील, पण अनुभव कसे कळणार? म्हणूनच तीन दिवसांमध्ये या जंगलात आम्ही जे काही अनुभवले ते पुढच्या वेळी आणखीन वेगळे अनुभवायला या.. असेच सांगत या ताडोबाने आम्हाला साद घातली, खुणावले. म्हणूनच जंगलात जायचे. एखादवेळी खूप दिसेल, नाहीतर काहीच नाही. मग अशावेळी फक्त वृक्ष-वेलींशी हितगुज करायचे. हे मुके सजीव वाऱ्यासंगे डोलत, सुगंध देत आपल्याला प्रसन्नता देऊन जंगलात शांतता राखा असा संवाद साधतात. खरेच मैत्र कसे करावे, हे साऱ्या कांतारातल्या सजीवांकडून शिकावे. ते शिकायला जंगलात भेट द्यायला हवी, पण तिथल्या आपल्या सजीवांना त्रास न देता. तिथल्या नियमांचे काटेकोर पालन करायचे हे लक्षात ठेवायचेच!

आम्ही जिथे उतरलो होतो तिथून अर्ध्या-एक तासाच्या अंतरावर जंगल होते. स्थानिक लोक सांगत होते, बिबट्या नाहीतर वाघाचे इथेसुद्धा कधी कधी दर्शन होते. असेलही खरे, कारण आजकाल हे दोन्ही प्राणी मानवी वस्तीत येत आहेत. पोचायला बारा-एक वाजले होते. त्यामुळे दुपारच्या सफारीला गेलो. त्यावेळी जाता-जाता पाच/सहा गौर दिसले.. धिप्पाड प्राणी! काळसर चॉकलेटी रंगाचे असतात, पण पावलापासून थोड्या वरपर्यंत पांढरा रंग होता. त्यामुळे पायमोजे घातल्यासारखे वाटत होते. त्याचवेळी दुसऱ्या बाजूला नीलगायी बघितल्या. वेगवेगळी फुलपाखरे दिसली. मोबाइलचा वापर करायचा नाही, या नियमाचे काटेकोर पालन या जंगलात केले जाते. आमचे मोबाइल एका पिशवीत ठेवले होते, त्यामुळे फोटो काढून लगेच व्हॉट्सॲप ग्रुपवर, स्टेटसवर किंवा फेसबुकवर टाकायचा भाव खाता नाही आला. एकदा तर जीपमधल्या गाइडला दादा म्हणत विचारूनही पाहिले. पण तो म्हणाला, ताई आमची नोकरी जाईल. बरोबर होते त्याचे. मोबाइलची सवय वाईटच! 

दुसऱ्या दिवशी भल्या पहाटे भराभरा आवरून सफारीसाठी नंबर लावायला निघालो. खूप थंडी होती. जिथे उतरलो होतो त्यांनी सफारीला जाण्यासाठी रग दिले होते. तरीही थंडी वाजतच होती. दाट धुके, पानांवर पडलेले दवबिंदू, त्या ओलाव्यामुळे झाडे आणि त्यावर आलेल्या फुलांच्या सुगंधाने वातावरणच प्रसन्न झाले होते. तो सुगंध खूप साठवून ठेवावा असा विचार मनात येतोय ना येतोय तोच चार अस्वले अगदी रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडापाशी दिसली. हम दो हमारे दो असे कुटुंब दिसले. काल दुसरीकडे दोन अस्वले दिसली होती. पण दोन्ही वेळेला आमचा मागमूस लागल्यावर पटकन झाडीत पळाली. ठिपकेवाली हरणेपण जरा चाहूल लागली की पसार व्हायची. जंगलातले शाकाहारी प्राणी गवत खाताना काय किंवा इतर वेळीसुद्धा अलर्ट असतात. पण सांबर हरणे जरा धीट वाटली. अलर्टवरून कॉर्बेट जंगलांची आठवण झाली. तीन-चार हत्तिणी आणि त्यांची पिल्ले चरत होती. एका जीपमधून तरुण मुलांचे टोळके त्यांच्या चालकाला सेल्फी काढण्यासाठी जीप हत्तींच्या जवळ न्यायला सांगत होते. ते हत्तिणींना आवडले नाही, कारण त्यांना पिल्लांची काळजी होती. त्यामुळे एकीने माती उधळली, तरी यांची जीप हटेना. शेवटी तिने चित्कार केला. त्या आवाजाने जंगल तर दणाणलेच आणि ती जीपकडे धावत आली. हे पाहून आमच्याही छातीचा ठोका चुकला. त्या हत्तिणींनी आमचा पुढे जायचा रस्ताच अडवला. अगदी दुपारच्या सफारीला गेलो तेव्हाही त्यांनी रस्ता अडवला होता. 

ताडोबा जंगलात आम्ही एका ठिकाणी थोडावेळ थांबलो होतो. तेव्हा काही अंतरावरच हरणांचा कळप जोरात पळाला. पण त्यातले एक हरिण नेमके विरुद्ध दिशेने पळाले आणि जंगली कुत्र्यांच्या तावडीत सापडले. आमच्या ध्यानीमनीपण नव्हते, की असे काही दिसेल... असो. वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे पक्षी दिसले. शिपाई बुलबुल, सूर्यपक्षी, दयाळ, धोबी, नाचण, इंडियन रोलर, वेडा राघू, सोनपाठी सुतार, टिटवी, टकाचोर, बगळे, पाँड हेरॉन, किंगफिशर, रानकोंबडा, सर्पगरुड, मोर-लांडोर. एका झाडाच्या फांदीच्या बेचक्यात खोडाच्याच रंगाचे घरटे आणि त्या घरट्यात खोडाच्याच रंगाचे घुबड बसले होते. आमच्या गाइड मित्राने दाखवले तेव्हा आम्हाला दिसले. थोडे पुढे गेल्यावर कडेला वेगळ्या रंगाचे घुबडाचे पिल्लू पडलेले आमच्या ड्रायव्हरने दाखवले. दुपारी तिथूनच गेलो पण त्यावेळी तिथे नव्हते. उडाले की शिकार झाली हे कळायला मार्ग नव्हता. पण इथे कशाचीच शाश्वती नाही, हे मात्र तितकेच सत्य! वाघाच्या अंगावर पट्टे असतात तशी स्ट्राइप टायगर फुलपाखरे, कॉमन ग्रास, कॉमन यलो, कॉमन क्रो अशी बरीच फुलपाखरे दिसली. जवळ छोटी डायरी-पेन ठेवली होती, त्यामुळे नावे लिहिता आली.

तिसऱ्या दिवशी सकाळी सफारीला निघताना मी म्हणाले, आज अस्वले दिसायला नको तरच व्याघ्र दर्शन होईल. कारण दोन दिवसांत ११ अस्वले बघितली होती. आमच्या बरोबर निघालेल्या काही जीप दुसऱ्या बाजूने गेल्या. थंडीमुळे कुडकुडत तर होतोच, त्याचवेळी गाइडने दुर्बिणीतून बघून कोणीतरी चालत येत असल्याचे सांगितले. आमची जीप थांबली. आम्ही ज्या प्राण्याची वाट बघत होतो, ज्याच्या दिसण्याने ट्रीपचे सार्थक होणार होते, त्या आपल्या राष्ट्रीय प्राणी असलेल्या वाघोबाचे चक्क दर्शन झाले. माया वाघीण आणि तिचा बच्चा आमच्या जीपसमोर चालत येत होते. बच्चा कसला, तगडा वाघ होता. ड्रायव्हरने जीप हळूहळू मागे घ्यायला सुरुवात केली. खरे तर जंगलाचा हा काही पहिलाच अनुभव नव्हता, तरीही थोडी भीती वाटली. पण काही वेळाने ही माय-लेकराची जोडी झाडीत गेली, तशी आमची जीप पुढे जाऊ लागली. तेवढ्यात ड्रायव्हर म्हणाला, समोर बघा. तिची बच्ची येत आहे. पण क्षणातच ती झाडीत शिरली. पण आम्ही धन्य झालो, कारण माया आणि तिचे बछडे दिसले होते. तिथे आलेल्या बऱ्याच जीपना कळल्यावर ते तिकडे गेले. त्यांना काहीच दिसले नाही. पण आम्ही जेव्हा वाघ बघत होतो, तेव्हा दुसरीकडे दुसऱ्या ग्रुपला ब्लॅक पँथर दिसला. याचाच अर्थ जंगलात कोणत्या क्षणाला कोणाला काय दिसेल हे सांगता येत नाही हेच खरे! पण त्या दिवशी आमचे नशीब जोरात होते. कारण दुपारच्या सफारीला गेलो, तर बांबूच्या वनात (ताडोबाच्या जंगलात बांबूची झाडे खूप आहेत) सावलीत शर्मिली नावाच्या वाघिणीच्या बच्चीने मस्तपैकी ताणून दिली होती. मधूनच आळोखेपिळोखे देत होती. बांबूच्या पानांची सावली वाघाच्या पट्ट्यांसारखी दिसत होती. त्यामुळे वाऱ्याने सावली हालली की वाटायचे उठली. चक्क दीड तास ती उठायची वाट बघत होतो. बऱ्याच जीप उभ्या होत्या. त्यातल्या तीन जीपमध्ये शाळेचे विद्यार्थी होते. हळू आवाजात दंगामस्ती करत होते. पण जेव्हा बच्ची उठली, तेव्हा ती बच्ची दिसतच नव्हती. पूर्ण वाढ झालेली वाघीण दिसत होती. ‌ती आमच्या जीप जवळून जाऊ लागली. त्याबरोबर या जीपमधली मुले एकदम चिडिचूप, काही जण तर खालीच बघत होते. पण एवढ्या जीप उभ्या होत्या, तरी तिने ढुंकूनही बघितले नाही. ती पुढे पुढे जात होती. तेवढ्यात तिच्या समोरून एक जीप आली. त्याबरोबर ती बांबूच्या वनात शिरली. पण आमचे स्वप्न सत्यात उतरले होते. 

जंगलातून बाहेर पडायची वेळ झाली होती, त्यामुळे आमची जीप बाहेर आली. थोडे पुढे गेल्यावर एक मोठा पक्षी उडत गेला आणि झाडावर बसला. साध्या डोळ्यांनासुद्धा सहज दिसत होते. खूप मोठे घुबड होते ते. अंधार पडू लागला होता. काहीतरी फडफडले म्हणून बॅटरी लावली तर रातवा दिसला. परमेश्वर कोणत्या ना कोणत्या रूपात दर्शन देतो याचा प्रत्यय आम्हाला त्या दिवशी आला.

जंगलात आम्हाला वाघ दिसला आणि सार्थक झाले, असे म्हणणे खरे तर चुकीचे आहे. आम्हाला दोन-तीन दिवसांत जे काही दिसले ते सर्व मिळून जंगल होते. निसर्गचक्र सुरू राहावे असे वाटत असेल, तर फक्त वाघ दिसणे महत्त्वाचे नाही. म्हणूनच जंगलात वृक्ष-वल्लरी, सर्व प्रकारचे प्राणी, पक्षी, कीटक दिसणे महत्त्वाचे असते. यापैकी काहीच नाही दिसले तर शांतता, सुवास अनुभवायचा आणि तिथे आपण शांतता राखायची. त्यांच्या घरात जाऊन त्या मुक्या जीवांना त्रास द्यायचा नाही, हे लक्षातच ठेवायचे. 

संबंधित बातम्या