क्षण सहलींचे

सुजित काळे, कॅलिफोर्निया
रविवार, 7 जून 2020

पर्यटन
प्रत्येक प्रवासात मी माझ्यातला एक भाग कुठं तरी ठेवून आलोय आणि मग अशा ठिकाणी जेव्हा मी पुन्हा जातो, तेव्हा तो भाग शोधायचा प्रयत्न करतो. मागच्या प्रवासातल्या खुणा शोधतो. मुख्य म्हणजे हे सगळं आठवायला फोटोंची अजिबात मदत घ्यावी लागत नाही. तो एक क्षण, ती एक जागा आठवते आणि पूर्ण सहल झरझर झरझर डोळ्यासमोरून जाते.

उन्हाळा... लहानपणीचा माझा आवडता ऋतू. कारण उन्हाळ्यात असायची उन्हाळ्याची सुटी. महिना दोन महिने धमाल. मी कोकणात आणि माझे मामा नोकरीनिमित्त घाटावर, त्यामुळं मामाच्या गावाला जास्त जाणं व्हायचं नाही, पण आम्ही घरातच खूप मजा करायचो.

मला आठवतं, कोकणात आमचं कौलारू घर होतं. उतरत्या छपराच. भूगोलाच्या पुस्तकात खूप पाऊस पडणाऱ्या प्रदेशातली घर जशी असतात ना अगदी तसं. उन्हाळ्यात आम्ही कौलं बदलायचो. ते काम सुरू असताना आम्ही २-३ दिवस आमचा मुक्काम घरासमोरच्या रामाच्या देवळात हलवायचो. माझ्या घरासमोर तळं होतं आणि तळ्याच्या डाव्या बाजूला पाच सहा देवळं. छोटीशी देवळांची कॉलनीच म्हणा ना. गणपतीचं, शंकराचं, देवी, दत्त आणि रामाचं देऊळ. मला त्यातलं रामाचं देऊळ खूप आवडायचं. कारण त्या सर्व देवळांत रामाचं देऊळ सर्वात मोठं होतं आणि त्याला आतून एक माडीसुद्धा होती. त्या माडीचा लाकडी जिना चढताना होणारा धाडधाड आवाज आजही मला ऐकू येतो. त्या माडीवरच चटई घालून मी, आई आणि माझी मोठी बहीण बसायचो. जेवणाचा डबा असायचा, एका छोट्या मडक्यात गार पाणी असायचं. वाचायला गोष्टीची पुस्तकं आणि सापशिडी, चंपल वगैरे खेळायला. मी साधारण बालवाडीत असेन तेव्हा. मला वाटतं ते दोन तीन दिवस घर सोडून देवळात राहणं ही माझ्या आयुष्यातली पहिली सहल असावी. 

नंतर पहिलीत गेल्यावर मी माझ्या आयुष्यातल्या पहिल्या शालेय सहलीला गेलो. शैक्षणिक सहल. आमच्या नाडकर्णी बाईंनी आम्हाला मुगवलीच्या गणपतीच्या देवळात नेलं होतं. आईनं डब्यात मटकीची उसळ दिली होती. मला ती अजून आठवते. मुगवलीचं ते देऊळ मात्र अगदी पुसटसं आठवतंय. आज मी तिथं गेलो तरी कदाचित मला काहीच आठवणार नाही. पण त्या मटकीच्या भाजीची चव जणू आजच खाल्ली इतकी ताजी आहे. 

त्यानंतरची सहल आठवतेय ती माझ्या बालपणीचा मित्र हेमेंद्रबरोबरची. शिवथरघळची सहल. आम्ही एका मोटारसायकलवर होतो आणि हेमेंद्र त्याच्या घरच्यांबरोबर त्यांच्या मोटारसायकलवर. मला त्या सहलीतलं फारसं काहीच आठवत नाही. आठवते ती फक्त मनातल्या मनात हेमेंद्रच्या गाडीबरोबर लावलेली शर्यत. आतासुद्धा डोळे मिटले तर हेमेंद्रची काळी CD 100 दिसेल. तिच्या टाकीवर बसलेला, अगदी ती गाडी तो स्वतःच पळवतोय असा आभास निर्माण करणारा हेमेंद्र दिसेल, असं वाटतं. ती शर्यतपण त्यानंच जिंकली होती. तो संबंध दिवस मी बाबांशी नीट बोललोच नाही. का ते त्यांना शेवटपर्यंत कळलं नाही. 

त्यानंतर अनेक सहली झाल्या. हरिहरेश्वरला तर इतक्या वेळा जाणं झालं, की पुढं पुढं कोणी पाहुणे आले की त्यांना मी आणि दीदीच हरिहरेश्वरला घेऊन जात असू. मी आयुष्यात पहिल्यांदा समुद्र हरिहरेश्वरला पाहिला. त्याआधीसुद्धा पाहिला असेल, पण मला आठवणारं पहिलं समुद्रदर्शन हरिहरेश्वरचंच. मी तिथल्या किनाऱ्यावर खूप शंख शिंपले गोळा केले होते. आजही एखाद्यावेळी रात्री स्वप्नात मी अशाच एखाद्या समुद्र किनाऱ्यावर जातो आणि तिथं मला पावलागणिक मोठाले सुंदर सुंदर शंख शिंपले सापडतात. 

माझी आजी दात घासायला मशेरी वापरायची. मला त्या मशेरीचा वास खूप आवडायचा. मी किती तरी वेळा चोरून तिच्या डबीतल्या मशेरीचा वास घ्यायचो. सोनचाफ्याचा वास घेतला की कसे डोळे आपोआप मिटतात, मशेरीचा वास घेतला की तसं व्हायचं. मी तर एकदा ती मशेरी थोडी खाऊनसुद्धा पाहिली होती. शिंपले पाहिले की मला ती मशेरी आठवते, कारण ती मशेरी घ्यायला आजीनं त्यात चमचा म्हणून एक शिंपला ठेवलेला.

याच किनाऱ्यावर दीदीनं मला रेतीत बोगदा करायला शिकवलं होतं. तेव्हापासून मी आमच्या प्रत्येक प्रवासात बाबांना विचारत असे, 'बाबा बोगदा कधी येणार?' कोकणातून पुण्याला येताना लागणारा कात्रजचा बोगदा कितीतरी वर्षं माझ्यासाठी सहलीचं एक ठिकाण होता. वरंधा घाटातून येताना वाघजाईला वडापाव खायला आणि माकडं पाहायला जशी एसटी थांबते, तशी ती कात्रज बोगद्यातपण थांबावी असं मला वाटायचं. 

कोकण सोडल्यावर बोगद्यांचं दर्शन दुरापास्त झालं. बोगद्यांचं आणि समुद्राचंही. समुद्रावरचा तो रेतीतला बोगदा मात्र कधी कधी बांधकामाच्या साईटवरच्या ओल्या वाळूत भेटायचा. माझ्या नगरच्या घरासमोर नवीन बंगला बांधायचं काम सुरू होतं. एकदा माझ्या एका बालमैत्रिणीबरोबर मी तिथं वाळूत बोगदा करत होतो. ती एका बाजूनं वाळू उपसू लागली आणि मी दुसऱ्या बाजूनं. नकळत एका क्षणी त्या वाळूच्या ढिगाखाली आमची बोटं एकमेकांना भेटली. तेव्हा गुदगुल्या झाल्यासारखं काहीतरी वाटलं होतं. पुढच्याच क्षणी तो बोगदा कोसळला. आमचे दंडापर्यंत हात त्या वाळूच्या ढिगाऱ्याखाली अडकले. किती मोठ्यानं हसलो होतो तेव्हा आम्ही दोघंही! नंतर बराच वेळ बोगदे करत बसलो होतो. 

मला मुंबईला नोकरी लागल्यावर पुणे-मुंबई खूप प्रवास झाला. अगदी दर आठवड्याला. प्रवासात बऱ्याचदा माझं फोनवर बोलणं सुरू असे. वाटेत ५-६ बोगदे लागायचे. बोगदा सुरू झाला रे झाला की फोन बंद पडायचा. कधी एकदा बोगदा संपतोय असा व्हायचं.

कोकणातल्याच इतर सहलींमुळं मला गड-किल्ल्यांचं वेड लागलं. ‘पहिलीत असताना हा पूर्ण रायगड चढला,’ असं जेव्हा आई कुणा पाहुण्यांना सांगायची, तेव्हा भारी वाटायचं. त्यानंतर अनेकदा मी रायगडावर गेलो. पायऱ्यांनी गेलो, रोपवेनंपण गेलो. चालताना वाटत राहायचं मागल्या वेळी आलो, तेव्हा याच पत्थरावर बसलो होतो का आपण? 

गणपतीपुळ्याजवळच्या जयगड किल्ल्यावर मला गणपतीचं एक पेंडंट सापडलं होतं. आजही ते मी माझ्या नाण्यांच्या डब्यात जपून ठेवलंय. जेव्हा केव्हा तो डबा उघडतो, तेव्हा तो रक्तवर्णात कोरलेला सोनेरी धुम्रवर्ण संपूर्ण जयगडचा किनारा, केशवसुतांचं मालगुंड आणि पुळ्याचा गणपतीची सहल घडवून आणतो. 

मला ठाऊक नाही, चौथीच्या इतिहासाच्या पुस्तकानं माझ्यात स्वराज्याबद्दल किती अभिमान निर्माण केला ते, पण मला सह्याद्रीचा, नव्हे एकूणच डोंगरांचा लळा नक्कीच लावला. किल्ले नसते तर कदाचित माझ्या आयुष्यातले बरेचसे शनिवार अत्यंत भकास गेले असते हे खरं. 

साडेसाती आहे म्हणून अनेक शनिवार मी पाषाणजवळच्या मारुतीच्या देवळात जात असे. ती जागासुद्धा मला सहलींच्या इतर ठिकाणांइतकी प्रिय आहे. पिंपळाच्या जुन्या झाडाखालचं ते छोटेखानी देऊळ, देऊळ कसलं एक छोटीशी देवळी. त्या पिंपळाला, इच्छा पूर्ण व्हावी म्हणून बांधलेल्या असंख्य घंटा, त्याची ती थंडगार सावली, उदबत्तीचा सुगंधी दरवळ, प्रसाद म्हणून ठेवलेली साखर आणि नारळ. दर शनिवारची ती त्या देवळाची सहल मला माझ्या आयुष्यातले प्रश्न थोड्या वेळाकरता का होईना विसरायला लावायची.

देवावर विश्वास, श्रद्धा वगैरे या गोष्टी जर का बाजूला ठेवल्या, तर देव ही संकल्पना मला त्याच्याशी जोडल्या गेलेल्या पर्यटनामुळं खूप आवडते. मला वाटतं देवस्थानं नसती तर आपल्या देशांतील पर्यटनाचं प्रमाण कदाचित खूप नगण्य असतं. 

मागे एकदा मी रामेश्वरला गेलो होतो. तिथं इतके महाराष्ट्रीयन लोकं दर्शनाला आलेले पाहून बरं वाटलं होतं. असं वाटलं जाऊन त्या शंकराचे आभारच मानावे. कारण त्याच्यामुळं या लहान मुलांना बंगालचा उपसागर पाहायला मिळाला. धनुषकोडीचा निळाशार, नयनरम्य सागरकिनारा पाहायला मिळाला. त्यातली बहुसंख्य लोकं महाराष्ट्रातल्या खेड्यातून आली होती. वर्षभर घरात आणि शेतात राबणाऱ्या त्या बायका, देवदर्शनाच्या निमित्तानं का होईना घराबाहेर पडल्या होत्या. हसत होत्या, गप्पा मारत होत्या, खरेदी करत होत्या, हॉटेलातलं आयतं खात होत्या. थोडा मोकळा श्वास, थोडा स्वातंत्र्याचा आनंद घेत होत्या. 

असा विचार आला नि मला पंढरपूरची वारी आठवली. तीसुद्धा एक सहलच तर आहे. दरवर्षी दिवेघाटातला वारीचा फोटो पाहिला की बरं वाटत. असं वाटतं जगात सगळं ठीक सुरू आहे. एकदा कुठल्यातरी उन्हाळ्याच्या सुटीत बाबांनी आम्हाला हिमालयात नेलं होतं. परत येता येता जून महिना उजाडला होता. आम्ही रेल्वेनं परतत होतो. मध्य प्रदेशाची सीमा ओलांडून महाराष्ट्र सुरू झाला आणि पावसाचे ढग दिसू लागले. कुठं कुठं पाऊस पडल्यानं हिरवं हिरवं गवत उगवलं होतं. मी नकळत आईला म्हणालो होतो, ‘वारीचं वातावरण झालंय ना गं आई?’ मी तसं का म्हणालो मला आजही माहीत नाही. मी पंढरपूरला अनेकदा गेलोय, पण आयुष्यात एकदा तरी अशी पंढरपूरची पायी सहल करायची असं डोक्यात आहे. 

दरवर्षी दिवाळीनंतर आम्ही आमच्या कुलदैवताला जात असू. मी पाचवी की सहावीत असताना आम्ही त्या कुलदैवताला जाताना वाटेत एका शेतात जेवलो होतो. शेतातली ताजी कांद्याची पात उपटून कोवळे कांदे खाल्ले होते. तिथल्या पाण्यात मनसोक्त खेळलो होतो. नंतर पुढं वाटेत रस्त्यालगतच्या एका गुलमोहराच्या झाडाला झोका टांगून एक मुलगा उभ्यानं जोरात झोका घेताना पाहिला होता. किती सुखी आहे तो मुलगा असं वाटलं होतं. आजही जेव्हा आम्ही कुलदैवताला जातो मी ते शेत, ती कांद्याची पात आणि ते गुलमोहराचं झाड शोधतो. 

मला वाटतं अशा प्रत्येक सहलीत, प्रत्येक प्रवासात मी माझ्यातला एक भाग कुठं तरी ठेवून आलोय आणि मग अशा ठिकाणी जेव्हा मी पुन्हा जातो, तेव्हा तो भाग शोधायचा प्रयत्न करतो. मागच्या प्रवासातल्या खुणा शोधतो. जसं चिपळूणला जाताना चुकामुक झाली होती, तेव्हा झाडाखाली थांबलो होतो ते झाड. भीमाशंकरच्या ट्रेकमध्ये ज्या धबधब्याखाली आंघोळ केली तो धबधबा. कोल्हापूरवरून येताना गाडी पंक्चर झाली, तेव्हा चहा घेतला होता ती टपरी. कुठल्या तरी प्रवासातून घरी परत येताना वाटेत थांबून घेतलेली ताजी मेथीची भाजी. जगन्नाथ पुरीच्या किनाऱ्यावरची ती फिश फ्रायची गाडी. मुख्य म्हणजे हे सगळं आठवायला फोटोंची अजिबात मदत घ्यावी लागत नाही. तो एक क्षण, ती एक जागा आठवते आणि पूर्ण सहल झरझर झरझर डोळ्यासमोरून जाते. आता या क्षणीसुद्धा हे लिहिताना अशा असंख्य सफरींनी आणि त्यातल्या आठवणींनी माझ्या मनात गर्दी केली. 

परवाच फोनवर बाबांशी बोलत होतो. बाबा म्हणत होते या विषाणूमुळं सगळे घरात बंद आहेत अन्यथा आता या सुट्यांच्या काळात कोकणात, महाबळेश्वरला केवढी गर्दी झाली असती. विरंगुळा म्हणून जायला अशी कुठली जागाच राहिली नाही. तेव्हा मला वाटलं खरंच सहल, पर्यटन ही आपल्या आयुष्याला मिळालेली केवढी मोठी देणगी आहे. दैनंदिन कंटाळवाण्या दिनचर्येतून आपण जेव्हा एखादी छोटीशी सहल काढतो, तेव्हा किती सहज ती आपल्याला ताजंतवानं करते... आणि आज केवळ या सहलींच्या आठवणीनं मला किती छान वाटतंय. घरात बंद असल्यानं आलेली मरगळ कमी झाल्यासारखी वाटतेय. शाळेत असताना सहल संपली, की त्यावर निबंध लिहायला सांगायचे ते का ते मला आज कळतंय. 

कुठं तरी वाचलं होतं, की जागतिक महायुद्धात जे सैनिक युद्धबंदी व्हायचे, त्यांच्या खाण्याची बऱ्याचदा आबाळ होत असे. अशा वेळी ते एकमेकांबरोबर त्यांच्या आया किती चविष्ट जेवण करायच्या याची चर्चा करत असत. स्वादिष्ट जेवणाच्या नुसत्या कल्पनेनं ते त्यांची पोटं भरत असत. मला वाटतं या विषाणूच्या प्रसारामुळं आपण हे असे घरात बंदी झालोय, तर चला आपल्या घरच्यांबरोबर त्या पूर्वीच्या सगळ्या सहलींवर चर्चा करू. कोणाला काय आठवतंय बघू. आपल्या मनाचा एक हिस्सा सहलीत कुठं सोडलाय ते शोधू आणि या उन्हाळ्यात लागलेली सहलीची आपली तहान भागवू.

संबंधित बातम्या