पूल

सुजित काळे, कॅलिफोर्निया
सोमवार, 1 मार्च 2021

पर्यटन

मी एक संगणक अभियंता आहे. एकदा माझ्या वरिष्ठांनी विचारले, मला माझ्या सध्याच्या कामात जास्त काय आवडते? माझ्या नोकरीमध्ये मी अमेरिकेतले माझे युझर्स आणि संगणक प्रणाली तयार करणारे भारतामधले माझे सहकारी यांच्यामधल्या समन्वयाचे काम करतो. मला माझी ही भूमिका एका पुलासारखी वाटते. कारण पूल दोन्ही बाजू धरून ठेवतो. पुलामुळे दोन बाजूंमध्ये देवाणघेवाण सहज शक्य होते. मी माझ्या वरिष्ठांना हे उत्तर दिले आणि माझे  मन मी आजवर पाहिलेल्या असंख्य पुलांवर जाऊन बसले.

माझ्या आयुष्यातला पहिला पूल म्हणजे, कोकणात शाळेत जाताना एका ओढ्यावरून जाताना लागणारा. पावसाळ्यात जेव्हा शाळा सुरू व्हायची तेव्हा हा ओढा दुथडी भरून वाहायचा. शाळेत जाताना-येताना पाच मिनिटे का होईना मी या पुलावर थांबायचो. मातीमुळे पाण्याला लाल, विटकरी रंग आलेला असायचा. ओढ्याच्या दोन्ही बाजूला हिरवेगार गवत उगवायचे. पाणी वेगाने पुलाखालून जात असायचे. त्या पाण्याकडे जर एकटक बघत बसले तर ते पाणी स्थिर आहे आणि मी त्या पुलासहित मागे मागे जातोय असे वाटायचे. तसे झाले की खूप गंमत वाटत असे. मी पुलावरून गेलो की वहीची पाने फाडून केलेल्या होड्या पाण्यात सोडायचो. 

आयुष्यातला पहिला पूल असा छोटासा असला तरी पहिला मोठा पूल पण मी लवकरच पहिला. म्हाप्रळजवळचा खाडीचा पूल. हा पूल माझ्या ओढ्याच्या पुलाहून कितीतरी लांब आणि रुंद होता. त्याला खाली सिमेंटचे अनेक पाय होते. ‘इतके पाय असूनही कुठेच न जाणारा असा कोण?’ असे कोडे मी शाळेत घातलेले आठवतेय. या पुलावर डांबरी रस्ता  होता. त्यावर रस्ता दुभाजकाच्या पांढऱ्या पट्ट्या होत्या. त्यावरून एका बाजूला म्हाप्रळचे बंदर दिसायचे. छोटीशी कौलारू घरे, नारळाची असंख्य झाडे, खाडीचे निळे जांभळे पाणी,  त्यावर कोळ्यांच्या छोट्या मोठ्या होड्या आणि होड्यांवरचे रंगीबेरंगी झेंडे. इतके मनोहर असायचे ते दृश्य! लहानपणी कागदाच्या बोटी जशा त्या ओढ्यावरच्या पुलाखालून जाताना मजा यायची तशी मजा किंबहुना त्याहून जास्त मजा या होड्या पुलाखालून जाताना बघताना यायची. पुलाच्या दुसऱ्या बाजूने छोट्या छोट्या टेकड्या आणि मावळतीला जातानाचा सूर्य दिसायचा. 

बाबांनी गाडी घेतल्यावर खूप फिरणे व्हायला लागले. मी पुढे पेट्रोलच्या टाकीवर बसायचो त्यामुळे सगळे खूप छान दिसायचे. त्या फिरण्यात अनेक पुलांवरून गेलो असेन. बाबांसोबत फिरताना एक पूल वेगळा म्हणून लक्षात राहिला. माझ्या आजोळी जाताना एका ठिकाणी रेल्वेचे फाटक लागायचे. त्या रस्त्याने जाताना मला नेहमी वाटायचे की फाटक बंदच असावे म्हणजे मला रेल्वे पाहता येईल. बाबांचे म्हणणे असायचे फाटक उघड असावे म्हणजे वेळ वाचेल. लहान मुले आणि मोठ्या माणसांच्या विचारांमध्ये आणि अपेक्षांमध्ये किती फरक असतो. या रेल्वे क्रॉसिंगवर पुढे एक पूल बांधण्यात आला. उड्डाणपूल. आता ते रेल्वेचे  फाटक राहिलेच नाही. रेल्वेच्या रुळावरून जाणाऱ्या या पुलावरून पहिल्यांदा गेलो तेव्हा मजा वाटली. जाताना रेल्वेसुद्धा दिसली पण नंतरच्या प्रवासात ते ठिकाण कधी येऊन जाई ते कळत नसे. रेल्वेचा पूल मी खूप नंतर पहिला. हा पूल जुना होता. रस्त्यावरून गाडीने जाताना गाडीच्या खिडकीतून बाजूचा रस्ता दिसतो तसे रेल्वेच्या खिडकीतून रेल्वेचा रूळ दिसत नाही. या पुलावरून तर थेट नदीचे पाणी दिसत होते. त्यामुळे रेल्वे रुळावरून नाही तर पाण्यावरून तरंगत चाललीय असे वाटले. 

कॉलेजला गेल्यावर ट्रेकचा शौक जडला. त्यातूनही बरेच फिरणे झाले. एकदा आमचा ट्रेक दूधसागरला गेला होता.  दूधसागरच्या प्रचंड धबधब्याचे तुफान पाणी आणि त्यावरून जाणारा रेल्वेचा पूल. मला आठवते गोवा एक्सप्रेसने आम्ही पुण्याहून कुलेंला गेलो होतो. जाताना दूधसागरच्या अलीकडे कॅसल रॉक स्टेशन लागते. ते ओलांडले की रेल्वे एका ठिकाणी दोन-तीन मिनिटे थांबते. तिथे आम्ही पटापट उतरलो. पहाटेचे चार वगैरे वाजले असतील. सगळीकडे मिट्ट काळोख होता. त्या रुळावरून चालत आम्ही दूधसागरच्या त्या पुलावर आलो. अंधारात धबधबा दिसत नव्हता पण पाण्याच्या धीरगंभीर आवाजाने अंगावर  रोमांच आला. आता या क्षणी लिहतानासुद्धा माझ्या हृदयाची धडधड वाढलीय. हळूहळू उजाडू लागले आणि  दूधसागरचा अक्राळविक्राळ धबधबा दिसायला लागला. त्याचे ते अवाढव्य पण साजरे रूप बघून डोळ्यांचे पारणे फिटले. निसर्गासमोर आपण लहानच याची पुन्हा एकदा जाणीव झाली. नंतर आम्ही कुलेंला चालत जाऊन परतीची रेल्वे पकडली. जाताना ती रेल्वे पुलावरून गेली तेव्हा धबधबा पाहायला सगळ्यांनी खिडकीत गर्दी केली. पुढे मला नवा प्रोजेक्ट मिळाला. त्यातली सर्व टीम चेन्नईला होती. मी पुण्यात. मग सुरुवातीला प्रोजेक्टची माहिती मिळवण्यासाठी आणि नंतर वरचेवर माझे  चेन्नईला जाणे होऊ लागले. त्यात मी तामिळनाडूतल्या बऱ्याच जागा फिरलो. यातल्या रामेश्वरमला पाहिलेला पंबन पूल चांगलाच लक्षात राहिला. रामेश्वर एका बेटावर आहे. बेटाचे नाव आहे पंबन. भारताला  श्रीलंकेपासून पाल्कच्या सामुद्रधुनीने वेगळे केले आहे. श्रीलंकेसोबत पंबन बेटपण वेगळे झाले. या बेटाला भारताच्या मुख्य भूमीला जोडणारा पूल म्हणजे पंबन पूल. खरेतर इथे दोन पूल आहेत. एक वाहनांसाठी आणि एक रेल्वेसाठी. मला दोन्ही पुलांवरून जायचे होते म्हणून मी जाताना मदुराईवरून रेल्वेने गेलो आणि येताना बसने परत आलो. रेल्वेचा पूल जुना आणि समुद्रापासून अत्यंत कमी उंचीवर आहे. वाहनांचा पूल बराच उंच आहे. या दोन्ही पुलांवरून बंगालच्या उपसागराचे निळेशार पाणी पाहायला मिळते. त्यात उभ्या असलेल्या छोट्या मोठ्या होड्या पाहायला मिळतात. 

नोकरीनिमित्तच मला एकदा इंग्लंडला जायची संधी मिळाली. तिथे मी राजधानी लंडनला जवळजवळ वर्षभर राहिलो. लंडन थेम्स नदीच्या किनाऱ्यावर वसलेय त्यामुळे संपूर्ण शहरात पूलच पूल आहेत. त्यातला सगळ्यात प्रसिद्ध म्हणजे टॉवर ब्रिज. हा तोच ब्रिज जो बोटी आरपार जाव्यात म्हणून मधून उघडतो. दिसायला अतिशय देखणा. या पुलासमोर फोटो काढण्यासाठी पर्यटकांची नेहमी गर्दी होते. कोकणातल्या खाडीवरच्या पुलाखालून होड्या जात तेव्हा मला नेहमी प्रश्न पडायचा, एखादे मोठे जहाज आले तर काय करणार? बाबा म्हणायचे खेड्यात कशाला मोठी जहाजे येणार? मोठी जहाजे जाणार मुंबईला. टॉवर ब्रिज पाहून मला कळले; असाही पूल असतो, ज्याच्या समोर जर मोठे  जहाज आले तर तो मधून उघडतो. जणू पूल या जाणाऱ्या बोटींना सॅल्यूटच करतो. या पुलाच्या दोन्ही टोकांना टॉवर आहेत आणि हे दोन टॉवर वरूनसुद्धा एकमेकांना जोडलेले आहेत. 

दुसरा आवडलेला पूल म्हणजे ब्लॅक फ्रायर्स पूल. ब्लॅक फ्रायर्सला दोन पूल आहेत. एक वाहनांसाठीचा आणि एक रेल्वेसाठीचा. वाहनांचा पूल आणि पुण्यातला छत्रपती शिवाजी महाराज पूल यांच्यात एक साम्य आढळले. या पुलाला ठराविक अंतरावर छोटेखानी बुरूज किंवा देवळ्या आहेत, जिथे उभं राहून आजूबाजूच्या दृश्यांचा आनंद घेता येईल, गप्पा मारता येतील. पुण्यातल्या पुलालासुद्धा अशाच खोबण्या आहेत. ब्लॅक फ्रायरच्या रेल्वेपुलाची खासियत म्हणजे, याच्या एका टोकाला ब्लॅक फ्रायर्स रेल्वे स्टेशन आहे आणि स्टेशनचा प्लॅटफॉर्म पूर्ण पूल व्यापतो. संपूर्ण पुलावर सोलर पॅनेल्स आहेत. जगात अशी सोलर पॅनेल्स असलेल्या केवळ तीन पुलांपैकी हा सर्वात मोठा पूल आहे. अजून एक आवडलेला पूल म्हणजे मिलेनियम ब्रिज. हा पादचाऱ्यांसाठीचा पूल आहे. याच्या एका टोकाला जुने भव्य असे सेंट पॉल चर्च आहे. माझे कार्यालय या चर्चजवळच होते. या पुलाबाबत खास बाब म्हणजे, २००० साली बांधून पूर्ण झाल्यावर पुलाचे लोकार्पण करण्यात आले. पण दोनच दिवसात तो वापरासाठी बंद करावा लागला. पादचाऱ्यांना पुलावर जबरदस्त कंपने  जाणवली. पूल वापरासाठी सुरक्षित नसल्याचे लक्षात आले. तब्बल दोन वर्षांच्या दुरुस्तीनंतर तो पुन्हा सुरू करण्यात आला. 

लंडनमधल्या वास्तव्यातच मी फ्रान्स आणि नेदरलँड्सला जाऊन आलो. फ्रान्सची राजधानी पॅरिस सिएन नदीच्या किनारी आहे. त्यामुळे या शहरातही असंख्य पूल आहेत. नेदरलँड्सची राजधानी ॲमस्टरडॅम तर कालव्यांचे शहर आहे. त्यामुळे या शहरात लहानलहान अनेक पूल आहेत. ॲमस्टरडॅमला जर बोटीतून सफर केली तर यातल्या अनेक पुलांच्या खालून जाता येते. एका ठिकाणी तर सलग सात पुलांच्या कमानी एका मागे एक अशा दिसतात. या पुलाला सेव्हन आर्क ब्रिज म्हणतात. 

या प्रत्येक पुलाचे स्थापत्य, शैली वेगवेगळी आहे. एका भाषातज्ज्ञाकडून मी हे ऐकले होते. जर्मन भाषेत पुलाला die brucke म्हणतात. जर्मन भाषेमध्ये हा शब्द स्त्रीलिंगी आहे. तर स्पॅनिश भाषेत पुलाला el puente म्हणतात. हा स्पॅनिश शब्द पुलिंगी आहे. जर तुम्ही एखाद्या जर्मन व्यक्तीला पुलाचे वर्णन करायला सांगितले तर तो सुरेख, सुंदर अशी विशेषणे वापरेल. तेच जर तुम्ही स्पॅनिश व्यक्तीला विचारलेत तर तो भव्य, मजबूत अशी पुरुषी विशेषणे  वापरेल. मी पाहिलेले बरेचसे पूल सुंदर आणि मजबूत आहेत. 

या कोविड काळात बऱ्याच जणांचे ऑफिस घरात आले. ज्या मीटिंग्ज ऑफिसमध्ये मीटिंगरूममध्ये होत होत्या त्या आता फोनवर व्हायला लागल्या. या फोनवरच्या मीटिंगला ब्रिज मीटिंग किंवा ब्रिज कॉल म्हणतात. त्यामुळे गेले वर्षभर आपल्यातल्या बऱ्याच जणांनी ‘Please join my bridge. I am waiting for you on the bridge,’ अशी वाक्ये शेकडो वेळा ऐकली-बोलली असतील. जगाची या कोरोनाच्या  विळख्यातून लवकरच सुटका होईल, अशी आशा आहे. त्यामुळे ऑफिसच्या मीटिंग्जमधून  सुटका नाही होणार, पण तुम्हा-आम्हा सर्वांना सुंदर सुंदर पूल पाहायची आणि ओलांडायची संधी नक्की मिळेल!

संबंधित बातम्या