लंडनची सफर!  

सुमेधा कुलकर्णी
सोमवार, 5 जुलै 2021

पर्यटन

ब्रिटिश साम्राज्याच्या राजधानीचे ठिकाण म्हणजेच लंडन शहर पाहण्याची उत्सुकता मला शाळेत इतिहास शिकत असल्यापासून होती. ब्रिटिश साम्राज्याचा विस्तार जगभर इतका मोठा होता, की त्याचे वर्णन ‘ब्रिटिशांच्या साम्राज्यावरून सूर्य कधी मावळत नाही,’ असे केले जायचे. एक शतकाहून अधिक वर्षे ब्रिटिश साम्राज्याला जगातील महत्त्वाचे सत्तास्थान म्हणून ओळखले जायचे. ब्रिटिशांनी सुरू केलेल्या रेल्वे, पोस्ट आणि ब्लॅक-टॅक्सी या सेवा याच वारशाचे काही दाखले आहेत. काही सहकाऱ्यांबरोबर मला ऑफिसच्या कामानिमित्ताने लंडनला जायची संधी चालून आली. ही संधी माझ्याकरिता ‘सोने पे सुहागा’ होती. 

लंडन एअरपोर्टमधून बाहेर पडताच आम्ही हॉटेलकडे जाण्यासाठी ‘ब्लॅक-टॅक्सी’ घेतली. ब्लॅक-टॅक्सीची सुरुवात १६व्या शतकात झाली. त्याकाळात राजेरजवाड्यांनी मोडीत काढलेल्या घोड्याच्या बग्गीचा उपयोग होत असे, १८व्या शतकात कॅबिओलेट आल्या आणि १९व्या शतकाच्या मध्यापासून पेट्रोलवर चालणाऱ्या ‘ब्लॅक-टॅक्सी’ आल्या. लंडनमधील ब्लॅक-टॅक्सी ब्रिटिशांच्या ओळख चिन्हांपैकी एक समजली जाते. लंडनमध्ये येणाऱ्या प्रवाशांचे स्वागत करणे, त्यांचा लंडनमधील प्रवास सुखकर करणे आणि त्यांच्या परतीच्या मार्गावर परत सुखरूपपणे एअरपोर्टवर आणून सोडणे ही जबाबदारी आम्ही खूप आनंदाने स्वीकारतो, असे सांगून ड्रायव्हरने आम्हाला हॉटेलपाशी आणून सोडले. टॅक्सी ड्रायव्हरने दाखवलेल्या या आदरातिथ्याने आम्ही भारावलो. 

   लंडन शहरात हिंडण्यासाठी टॅक्सी, डबलडेकर बस आणि लंडन अंडरग्राऊंड ट्युब असे पर्याय पर्यटकांसाठी उपलब्ध आहेत. लंडनमध्ये ट्युबची सुरुवात १८६३ सालापासून झाली. लंडनमध्ये ११ रेल्वे लाइन्स असून त्यावर २५०हून अधिक रेल्वे स्थानके आहेत. या लाइन्सना बेकर्लू, वॉटर्लू, सेंट्रल अशी नावे दिली असून त्या लाइन्स वेगवेळ्या रंगांनी नकाशात दाखवलेल्या असतात. उदाहरणार्थ रेड लाईन, ग्रीन लाईन इत्यादी. प्रत्येक ट्रेनमध्ये नकाशाद्वारे लाइनवर असणाऱ्या स्थानकांची नावे दर्शवली आहेत. त्याशिवाय ट्रेनमध्ये पुढील स्टेशनची घोषणा दिली जाते. या सुविधांमुळे नवख्या प्रवाशांना गोंधळून जायला होत नाही. व्हील चेअरवरचे दिव्यांगही ट्रेनमध्ये खुर्चीसकट चढताना उतरताना दिसतात. इथल्या लोकांना, लहान मुलांना घेऊन, सामानाबरोबर, बाबागाडीसह ट्रेनमधून खूप सहजतेने प्रवास करताना बघून मला लंडन ट्युबचा अनुभव सुखावह वाटला. आम्ही ट्रेनने सेंट्रल लंडनमध्ये ‘लंडन आय’पाशी पोचलो. लंडन आय हे जगातील सर्वात मोठे फिरते चक्र आहे. ते जवळजवळ ४५० फूट उंचीवरून लंडनचे दर्शन घडवते. आम्ही लंडन आयमध्ये बसून लंडनच्या हवाई दर्शनाचा आनंद घेतला.    

 थेम्स रिव्हर क्रूझ टूरमध्ये थेम्स नदीवरचे बरेच पूल दिसले. झुलता पादचारी पूल म्हणजेच मिलेनियम ब्रिज; त्याशिवाय दुसऱ्या महायुद्धात पुरुष युद्धभूमीवर लढत होते तेव्हा ब्रिटिश स्त्रियांनी बांधलेला वॉटर्लू ब्रिज, जुना आणि नवा ब्लॅकफ्रिअर्स रेल्वे पूल, सेंट पॉल ब्रिज, लंडन टॉवर ब्रिज इत्यादी पूलसुद्धा पहिले. वेस्ट मिनिस्टर पॅलेस-पार्लमेंट हाऊस, त्याच्या शेजारी ‘बिग बेन’ हा घड्याळ असलेला टॉवर, ब्रिटिश संसदीय लोकशाहीचे प्रतीक, सॉमरसेट हाऊस - ड्यूकचा राजवाडा, शार्ड- पिरॅमिडच्या आकाराचा ७२ मजली काचेचा टॉवर, शेक्सपिअरचे ग्लोब थिएटर, सेंट पॉल कॅथेड्रल अशी अनेक ठिकाणे ४० मिनिटांच्या बोटीच्या प्रवासात आम्हाला बघावयास मिळाली.

बोटिंग झाल्यावर आम्ही ‘टॉवर ऑफ लंडन’ बघायला गेलो. टॉवर ऑफ लंडन हा अधिकृत रॉयल पॅलेस असून इथे ब्रिटनच्या राजे आणि राण्यांचे रत्नजडित मुकुट, तलवारी आणि इतरही बऱ्याच मौल्यवान वस्तू प्रदर्शित केलेल्या आहेत. भारतातील प्रसिद्ध ‘कोहिनूर’ हिरा, सातव्या एडवर्ड राजाची पत्नी राणी अलेक्झांड्रा यांच्या मुकुटामध्ये बघावयास मिळतो. हा हिरा १९१ कॅरेटचा आहे असे सांगितले जाते.  

टॉवर ऑफ लंडन जवळ थेम्स नदीवर बांधलेला ‘टॉवर ब्रिज’ दिसतो. दोन दगडी टॉवर पुलानी जोडलेले आहेत. सस्पेन्शन टेक्नॉलॉजीचा वापर करून हा पूल बांधण्यात आला आहे. नदीतून जहाजांची ये-जा होत असताना पाती ८६ डिग्री अंशांमध्ये वर उचलली जातात.

 बकिंगहॅम पॅलेस हा इंग्लंडच्या राणीचा राजवाडा आहे. बकिंगहॅम पॅलेसमध्ये राजकीय समारंभ आणि राजघराण्यातील शाही समारंभ आयोजित केले जातात. राजवाड्यात ७७५ खोल्या आहेत, त्यापैकी २०० कर्मचाऱ्यांच्या खोल्या, १०० कार्यालये, १९ स्टेट्सरूम, बँक्वेट रूम्स, बॉल रूम्स आहेत. राजवाड्यात पोस्ट ऑफिस, सिनेमागृह, स्वीमिंग पूल, डॉक्टररूम, ज्वेलरी वर्कशॉप, हेलिकॉप्टर लँडिंग क्षेत्र, तलाव आणि टेनिस कोर्ट आहेत. राजवाड्याच्या मागील बाजूस तलाव असून त्यावर ४० एकर  जमिनीवर राजवाड्याची खासगी बाग आहे. 

 दररोज सकाळी ११ वाजता बकिंगहॅम पॅलेस येथे होणारा ‘चेंजिंग ऑफ द गार्ड’ समारंभ पाहण्यासारखा असतो. या समारंभात तालबद्ध बँडच्या आवाजात शिस्तबद्ध संचलन करत नवीन गार्डचा ग्रुप जुन्या गार्डच्या ग्रुपजवळ जातो. हे दोन्ही ग्रुप एकमेकांना सलामी देतात आणि राजवाड्याच्या किल्ल्या हस्तांतरित करतात. 

आम्ही सुप्रसिद्ध मादाम तुसा वॅक्स म्युझियमलाही भेट दिली. यामध्ये जगभरातील प्रसिद्ध व्यक्तींचे मेणाचे पुतळे प्रदर्शित केले आहेत. त्यामध्ये महात्मा गांधी, अमिताभ बच्चन, लता मंगेशकर, सचिन तेंडुलकर आणि अन्य काही नामवंत भारतीयांचे पुतळे आहेत. या पुतळ्यांसमवेत आपला फोटो काढताना आपण खरोखरच त्या व्यक्तीसमवेत उभे असल्याचा भास होतो.  

आम्ही ‘लीड्स कॅसल’ या ‘राण्यांचा किल्ला’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या किल्ल्याला भेट दिली. या किल्ल्यात सहा मध्ययुगीन राण्या राहत होत्या. ‘डोम्सडे’ पुस्तकामध्ये हा किल्ला जगातील सर्वात सुंदर  किल्ला असल्याची नोंद आहे. ११व्या शतकात रॉबर्ट क्रेव्हकॉरे याने बांधलेला हा दगडी किल्ला, त्याचे स्वतःचे आवडते निवासस्थान होते. त्यानंतर या किल्ल्याची बरीच हस्तांतरे झाली. या किल्ल्याचा ५०० एकरातला लँडस्केप आणि चक्रव्यूह (Maize), धबधबे, वाइन यार्ड्स अशा बऱ्याच गोष्टी पर्यटकांना आकर्षित करतात. 

 लंडन शहरात खूप ठिकाणी नागरिकांना मोकळा श्वास घेण्यासाठी वनराई, सुंदर बागा आणि मोकळ्या जागा आहेत. इथे सगळीकडे स्वच्छता दिसते. लंडन दाट वस्तीचे शहर असले तरी खूप नीटनेटके दिसते. लंडनमधील प्रत्येक रस्ता दुतर्फा इमारतींनी सजलेला आहे. एकापेक्षा एक सरस अशी कौशल्यपूर्ण स्थापत्यकला या इमारतींच्या बांधकामातून नजरेस पडते. रात्री दिव्यांच्या रोषणाईत या रस्त्यांवरून  हिंडताना या इमारतींची शोभा अधिकच खुलून दिसते.

शॉपिंगसाठी ऑक्सफर्ड स्ट्रीट प्रसिद्ध आहे. या स्ट्रीटवर ३००पेक्षा जास्त दुकाने आहेत. डेबेनहॅम, हाऊस ऑफ फ्रेझर, बर्बेरी, एच अँड एम आणि इतर काही बड्या बड्या ब्रॅण्डच्या दुकानातील शोकेसमधील डिझाइनर ड्रेस घातलेले पुतळे पाहून आपल्याला खरेदीचा मोह आवरत नाही. मार्क्स अँड स्पेंसर, प्रिमार्क, टी.के. मॅक्स अशा काही दुकानांतून आम्हाला परवडणाऱ्या आणि चांगल्या प्रतीच्या कपड्यांची आणि इतर काही वस्तूंची आम्ही खरेदी केली.  

 लंडनच्या थिएटरमध्ये एखादे नाटक पाहायची सगळ्यांची इच्छा होती. वेस्ट एन्डमध्ये जवळ जवळ चाळीस नाट्यगृहे आहेत. ‘माऊस- स्ट्रॅप’ या नाटकाच्या तिकिटांचे दर वाचून जरा धक्काच बसला. बाल्कनीचे तिकीट १०० पौंड! हो-नाही करत आम्ही तिकिटे खरेदी केली. नाटक सुरू झाल्यानंतर थोड्या वेळात मनातील घालमेल संपली. दर्जेदार संवाद, अभिनय, नेपथ्य आणि शेवटपर्यंत उत्कंठा ताणून ठेवणारे कथेतील गूढ, तिकिटाचे पैसे वसूल करतात. उत्तम कलाकृती पाहिल्याचा आनंद काही वेगळाच असतो.      

लंडन सगळ्यांना आवडेल असेच शहर आहे. ब्रिटिशांची पर्यटकांप्रती असलेली सहकार्यभावना, शिस्तप्रियता, निसर्ग संगोपन, दूरदृष्टीपूर्ण नियोजन, साहित्य प्रेम आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे अबाल-वृद्ध आणि इतर सर्व नागरिकांचा विचार करून केलेल्या सर्वसमावेशक सार्वजनिक  सुविधा डोळ्यात भरतात.

संबंधित बातम्या