राफ्टिंगचा थराराक आनंद!

सुमेधा कुलकर्णी
सोमवार, 28 सप्टेंबर 2020

आमची बोट वरून घसरत होती. आजूबाजूला प्रचंड फेसाळलेले पाणी आणि मोठ्या मोठ्या पाण्याच्या शिंतोड्यांनी संपूर्ण अंग भिजवून टाकले होते. आपण वरच्या वर उडणार की खाली जोरात पडणार? किती खोलात जाऊन पडणार? हातपाय धड असतील ना? एक ना अनेक विचार त्या ५-१० सेकंदांत डोक्यात थैमान घालून गेले.

नोकरीच्या निमित्ताने मला केनियात राहण्याची संधी मिळाली होती. केनिया निसर्ग सौंदर्याने नटलेला देश आहे. भरपूर वन्यजीवन असलेल्या जंगल सफारी, इंडियन ओशन वरील समुद्रकिनारे, सरोवरे आणि माऊंट केनियासारखे डोंगर-दऱ्या अशी वैविध्यपूर्ण पर्यटनाची मेजवानी आपल्याला केनियाच्या वास्तव्यात मिळते. केनियातील माझ्यासारखे  प्रवासी-निवासी (Expatriates) आपापले ग्रुप करून २-३ दिवसांची सुटी मिळाली, की  वेगवेगळ्या प्रेक्षणीय स्थळांना भेटी देत असतात. ७-८ जणांचा ग्रुप असला की एकत्र जाण्यात मजाही येते आणि ट्रिप कमी खर्चिक होते. २-३ दिवसांची सुटी येण्यापूर्वीच एखाद्या ग्रुपबरोबर हिंडण्याचा प्लॅन ठरलेला असायचा.

माझ्या १०-११ वर्षांच्या वास्तव्यात माझे केनियात खूप हिंडणे झाले आहे, पण अजून बरीच प्रेक्षणीय स्थळे बघायची राहून गेली आहेत असे मला नेहमी वाटत असे. साहसी खेळ, माउंटेनिअरिंग अशाप्रकरच्या सहलीस जाण्यास फॅमिली ग्रुप तयार नसत. मी माऊंट केनियाची ट्रिप एका साहसी ग्रुपबरोबर करून आले होते. तेव्हा मी केनियातील व्हाइट वॉटर राफ्टिंग ॲडव्हेंचर सहलींबद्दल ऐकले होते. मी पूर्वी राफ्टिंग कधी केले नव्हते, पण बरोबरच्या गिर्यारोहकांनी सांगितलेले थरारक अनुभव ऐकून माझी अशा सहलीस जाण्याची खूप इच्छा होती.  

ईस्टरच्या २०१५ च्या सुटीमध्ये व्हाइट वॉटर राफ्टिंग करायला जाणारा एक ग्रुप मला मिळाला. माझ्या मैत्रिणी डॉ. ज्योती त्रिवेदी, दीप्ती पवार, वैशाली व्हावळे आणि रियांका पेडणेकर यांच्या फॅमिलीबरोबर आम्ही नैरोबीपासून १०० किलोमीटर अंतरावर असलेल्या ‘सगाना’ येथील टाना नदीवर असलेल्या ‘सॅवेज वाइल्डनेस व्हाइट वॉटर  राफ्टिंग’ कॅम्पला भेट दिली. आमच्याबरोबर १२-१४ वर्षांची मुलेही होती, पण सगळी पोहणे आणि साहसी खेळ खेळण्यास उत्सुक होती. 

कॅम्पमध्ये प्रवेश करतानाच समोर दिसणारे हिरवेगार गवत, त्याच्या पलीकडून वाहणारी टाना नदी, नदीवरून बांधलेला दोरीचा पूल आणि राहण्यासाठी बांधलेल्या कॉटेजेस आपले मन प्रसन्न करतात. तिथे आलेल्या पर्यटकांच्या ग्रुपकरिता बसण्यासाठी शेड, स्वयंपाक करण्यासाठी शेगडी, भांडी, बार्बेक्यू, प्यायचे पाणी, प्लेट्स अशा सगळ्या गोष्टी मिळतात. केनियात ‘करागो’ नावाने ओळखली जाणारी एक उत्तम प्रथा बहुतेक मूइंडीं (भारतीय वंशाचे लोक)मध्ये आहे. ज्याला आपण ‘Cook- Out’ असेही संबोधतो. करागोच्या मेनूमध्ये एखादी चिकन करी आणि शाकाहारी लोकांकरिता एखादी भाजी केली जाते आणि ती ब्रेड किंवा भाताबरोबर खाल्ली जाते. काही हॉटेलमध्ये तयार गरम गरम फुलकेही मिळतात. या करागोची खासियत अशी आहे, की बहुतेक पुरुष मंडळी स्वयंपाक करतात आणि बायका-मुले जेवणाचा आनंद लुटतात. दररोज नवऱ्याला आणि मुलाबाळांना स्वयंपाक करून घालणाऱ्या बायकांच्या नावाने ‘करागो - डे’ केनियात बरेचदा साजरा केला जातो, त्यामुळे केनियातील प्रवासी-निवासी भारतीयांच्या बायका नवऱ्याशी सहसा भांडत नाहीत.  

आमचा पहिला दिवस खाणे-पिणे, गप्पा-टप्पा, आजूबाजूच्या परिसरात हिंडण्यात, स्विमिंग पूलमध्ये पोहण्यात आणि संध्याकाळी मस्तपैकी शेकोटी करून गाण्याच्या भेंड्या आणि थोड्या गॉसिप्ससह हास्य-विनोद असा छान गेला. आम्ही प्रत्येकजण आपापल्या कामाच्या क्षेत्रातले अनुभव एकमेकांना सांगत होतो. ज्योती डोळ्यांची डॉक्टर, तृप्ती चार्टर्ड अकाउंटंट, वैशाली उत्तम गायिका आणि रियांका क्रिएटिव्ह आर्टिस्ट आहे. वैशालीने छान गाणी म्हटली.

दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही ब्रेकफास्ट करून ‘सॅवेज वाइल्डनेस व्हाइट वॉटर राफ्टिंग’च्या ऑफिसमध्ये गेलो. या कॅम्पमध्ये दररोज ठराविक ट्रिप्स केल्या जातात. त्यामुळे अगोदरच बुकिंग करणे इष्ट ठरते. हा कॅम्प मूळ ब्रिटिश वंशाच्या असलेल्या सेवेज कुटुंबाच्या मालकीचा आहे. या कॅम्पमध्ये कायाकिंग, राफ्टिंगचे ट्रेनिंग दिले जाते आणि आमच्या सारख्या हौशी पर्यटकांना राफ्टिंगचा आनंद दिला जातो. आम्हाला हेल्मेट्स आणि लाइफ जॅकेट्स घालायला दिली. राफ्टिंग कसे करतात? काय केले पाहिजे? आणि काय नाही केले पाहिजे? याची माहिती दिली गेली. त्यानंतर आम्ही बसने २-३ किलोमीटर अंतरावर असलेल्या टाना नदी किनाऱ्यावर असलेल्या सपाट जागेपर्यंत गेलो. आजूबाजूला बरीच शेते होती. काही स्थानिक मुले परदेशीय लोकांच्या गप्पा कुतूहलाने ऐकत  होती.

पाच-दहा मिनिटांच्या अंतरावर नदी पात्र दिसत होते. पाण्यामध्ये लाल माती मिसळल्याने नदीकाठच्या पाण्याचा रंग चहाच्या रंगासारखा दिसत होता. केनियातील पर्वत रांगांतून, संथ झऱ्यातून आणि खळखळत्या धबधब्यातून पाणी नदी पात्रात मिसळत होते. आमच्या प्रशिक्षकाने आम्हाला एका ओळीत उभे करून परत सगळ्या सूचना आमच्याकडून वदवून घेतल्या. समोरच हवेने फुगवलेल्या काहीशा उथळ-पसरट बोटींमध्ये कसे बसायचे, वल्हे गोलाकार फिरवत पाणी कापत पुढे कसे जायचे याचे प्रात्यक्षिक आम्हाला दिले गेले. आम्हाला टाना नदीच्या उंच सखल पात्राची आणि पाण्याच्या वेगाबद्दल माहिती दिली. याला इंग्लिशमध्ये ‘रॅपिड’ असे म्हणतात. नदीच्या पात्राचे पाण्याच्या वेगानुसार ६ प्रकारात वर्गीकरण केले जाते. रॅपिड वर्ग ०-१ म्हणजे शांत पाणी, रॅपिड वर्ग १-३ म्हणजे  उंचीवरून पाणी खाली जास्त वेगाने पडत असते. त्यामुळे कधी कधी बोट उलटू शकते. रॅपिड वर्ग ४-५ म्हणजे बोटीतील प्रशिक्षकाने पाण्यात उतरून सुरक्षित मार्ग शोधून त्या मार्गाने बोट पुढे नेणे. रॅपिड वर्ग ६ हा खूपच धोकादायक असतो. खूप पाऊस पडल्यामुळे नदीला पूर आला असेल, तर तशी परिस्थिती उद्‍भवू शकते. आमच्या प्रवासात आम्हाला रॅपिडचे सगळे वर्ग अनुभवायला मिळणार होते. माझ्या समोरच्या दुसऱ्या ग्रुपमधील दोन बायका फोन करून आपल्या प्रियजनांना सांगत होत्या - कदाचित त्यांची फोनवरची मुलाखत शेवटची असू शकते. छातीत थोडी धडकीच भरली! मनात म्हटले, आता जे होईल ते होईल. मागे फिरणे नाही!

थोडी बोट नदीपात्राला लावून आम्ही सगळ्या मराठी भगिनींनी एका बोटीत प्रवेश केला. आमच्याबरोबर एक  प्रशिक्षक होता आणि आम्ही सहाजण एका बोटीत होतो. ‘जय भवानी! जय जिजाई!’ अशी जोरात घोषणा देत  आम्ही वल्ही फिरवत नदीच्या पात्रात बोटीला झोकून दिले. सुरुवातीचा काही भाग संथ वाहणाऱ्या पाण्याचा होता. नदी पात्रही मोठे होते, त्यामुळे आम्हाला वल्ही चालवण्याची प्रॅक्टिस झाली. आमचा थोडा आत्मविश्वास वाढला.  नदीचे पाणी स्वच्छ आणि पांढरे दिसू लागले होते, आम्ही थोडे स्थिरावलो होतो. नदीच्या दोन्ही बाजूला भरपूर झाडी होती. पात्राच्या काठावर एका खडकावर कपडे धुणाऱ्या ३-४ बायकांचा ग्रुप दिसला. त्या आमच्याकडे बघून आपल्याआपल्यात काहीतरी कुजबुजत होत्या. मी त्यांना हात हलवून ‘हॅलो’ म्हटले, त्यांनीही खूश होऊन आम्हाला ‘हॅप्पी जर्नी!’ म्हटले. पुढे काही गायी आणि म्हशी आणि इतर काही पाळीव प्राण्यांचे कळप दिसले. वेगळ्या वेगळ्या रंगांच्या पक्ष्यांची किलबिल सुरू होती. खूपच मोहक आणि मनाला सुकून देणारे वातावरण होते. आम्ही असेच २५-३० मिनिटे पुढे आलो.

तेवढ्यात प्रशिक्षक ओरडला, ‘रॅपिड फाइव्ह’. समोर मोठा खडकाळ उतार होता. पाण्याचा प्रवाह खूपच जोरात होता. आमच्या समोर असलेली बोट प्रचंड पाण्याच्या प्रवाहातून खाली जोरात घसरताना दिसत होती. त्यातील सगळे प्रवासी जोरजोरात ओऽऽऽ असे किंचाळताना ऐकू येत होते. पुढील नाव खाली पोचेपर्यंत पाण्याचे फवारे आणि तांडव नृत्य करणारे मोठे मोठे थेंब उंच हवेत उडताना दिसले. हे सगळे दृश्य बघितल्यावर आता आपला नंबर येणार या भीतीने पोटात एकदम गोळा आला. आमच्या प्रशिक्षणार्थ्याने खाली डोके करून, सीट बेल्ट पकडून, वल्ही बोटीमध्ये घेऊन हातात घट्ट पकडून ठेवण्यास सांगितले आणि जोरात आवाज आला – Here you Go, आमची बोट वरून घसरत होती. आजूबाजूला प्रचंड फेसाळलेले पाणी आणि मोठ्या मोठ्या पाण्याच्या शिंतोड्यांनी संपूर्ण अंग भिजवून टाकले होते. आपण वरच्या वर उडणार की खाली जोरात पडणार? किती खोलात जाऊन पडणार? हातपाय धड असतील ना? एक ना अनेक विचार त्या ५-१० सेकंदांत डोक्यात थैमान घालून गेले. तेवढ्यात बोट हळूहळू उतार संपवून थोड्या सखल भागात येऊन पोचली. पाण्याच्या हा अक्राळ विक्राळ रोमांचक थरार भन्नाट होता. पार केलेल्या रॅपिडकडे मागे वळून पहिले, तर उंच उतारावरून कोसळणाऱ्या  खळखळत्या पाण्यावर तयार झालेली इंद्रधनूची कमान आमचे चित्त वेधून घेत होती.

आम्ही या रॅपिडच्या धक्यातून सावरतोय तोवर प्रशिक्षक पुन्हा एकदा ओरडला, ‘One more Rapid five, bend down’ आणि परत तोच थरार. यावेळी उतार वळणावरच्या खडकातून होता. आमची बोट ७०-८० अंशातून उलटी झाली होती. मी नेमकी पाण्याच्या प्रवाहाच्या बाजूला होते, जर सीट बेल्ट सुटला तर पाण्याचा  प्रवाह कोणत्या दिशेने किती उंचावरून मला फेकेल याची मी फक्त कल्पना केली आणि डोळे घट्ट मिटून घेतले. पुढील काही क्षणात बोट पूर्वस्थितीला आली आणि माझा जीव परत एकदा भांड्यात पडला. एका पाठोपाठ आलेल्या जीवघेण्या रॅपिड्सचा अनुभव खरच अद्‍भुत होता. 

अजूनही पाण्याचा प्रवाह खूपच जोरात होता. हळूहळू आम्ही कमी वेगाच्या पात्रात आलो. पात्र रुंदीने खूप मोठे होते. आम्ही परत वल्हे वर काढून पाणी कापायला सुरुवात केली. प्रशिक्षक पाण्यात उतरला, ज्यांना कुणाला पोहायचे आहे ते पाण्यात उडी मारू शकतात असे त्याने सांगितले. आम्ही पाण्यात जायचे की नाही असे एकमेकींना विचारत होतो, तितक्यात प्रशिक्षकाने बोट उलटी केली आणि आम्ही परत एका मोठ्या साहसाला सामोरे गेलो. आमच्यापैकी तिघींना पोहायला येत होते, बाकी तिघी ओरडायला लागल्या. प्रशिक्षक हसत म्हणाला, ‘Stand Up!’ तो भाग पाच-सहा फूट खोल होता. आम्ही सगळेच जोरजोरात हसायला लागलो. बोट पलटी करून आम्ही एकमेकांच्या साहाय्याने परत बोटीत येऊन बसलो. आमची वल्ही पाण्यावर तरंगत होती. प्रशिक्षकाने सगळी वल्ही गोळा करून आमच्याकडे दिली. पुढे अजून १५-२० मिनिटांच्या अंतरावर आमचा शेवटचा थांबा आला. 

आमच्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर अद्‍भुत थरार अनुभवल्याचा आनंद दिसत होता. आम्ही एकमेकींकडे विस्मित नजरेने बघत होतो. 

तितक्यात रियांका म्हणाली, ‘माझी इकडे येण्याची ही तिसरी वेळ आहे. प्रत्येक वेळी मला या अवखळ पाण्यातील प्रवासाने नवचैतन्य मिळाल्यासारखे भासते!’

वैशाली म्हणाली, ‘खरच गं! किती रोमहर्षक अविस्मरणीय अनुभव आहे हा!’

ज्योती आणि तृप्ती एकाच आवाजात म्हणाल्या, ‘आपण अजून एक दिवस आपला मुक्काम वाढवून उद्या इकडे परत येऊयात का?’

आम्हाला सगळ्या जणींना वास्तवात परत येण्यास थोडा वेळ लागला, ‘चला आता उद्या कामावर हजर व्हायचे आहे, परत कधीतरी येऊ.’ असे एकमेकींना समजावत आम्ही नैरोबीच्या परतीच्या मार्गाला लागलो.  

संबंधित बातम्या