आवर्जून पाहावे असे... 

सुनील पाटील
बुधवार, 28 मार्च 2018

कोल्हापूर-कोकण विशेष

कोल्हापूरला भेट देणाऱ्या पर्यटकांनी आवर्जून भेट द्यावी अशी काही ठिकाणे खुद्द शहरातच आहेत. प्राचीन तसेच ऐतिहासिक महत्त्व असलेली ही स्थळे प्रत्यक्ष पाहण्यासाठी, अनुभवण्यासाठी कोल्हापूर भेटीत प्रत्येकाने जरूर वेळ काढलाच पाहिजे. 

जुना राजवाडा (भवानी मंडप) 
करवीर संस्थापिका, रणरागिणी ताराराणी यांनी १७८८ मध्ये राजधानी पन्हाळ्याहून कोल्हापुरात आणली. त्यावेळी बांधलेला हा वाडा आहे. वाड्यात दरबार हॉल, आईना महाल, दिवाणखाना, खलबतखाना, सज्जे, कोठड्या, चौक व शंभरहून अधिक खोल्या. वाडा आताच्या परिमाणानुसार भवानी मंडपातून इंदुमती गर्ल्स हायस्कूलपर्यंत पसरलेला. १८३४ पर्यंत जुन्या राजवाड्याला नगारखाना (हत्ती बांधण्याची कमान व त्यावरील इमारत) नव्हता. बुवासाहेब महाराजांच्या कारकिर्दीत हा नगारखाना बांधला. नगारखान्याची इमारत १८३४ च्या ऑक्‍टोबर महिन्यात पूर्ण झाली. नगारखान्याची इमारत पाच मजली आहे. एका मजल्यावर घोटीव दगडाच्या साह्याने बांधलेला आरसे महाल आहे. दगड इतका गुळगुळीत आहे की, तो आरशासारखा आहे. 
खासबाग कुस्ती मैदान 
राजर्षी छत्रपती शाहू महाराज १९०२ मध्ये युरोप दौऱ्यावर गेले. रोममध्ये त्यांनी कुस्तीचे मैदान पाहिले व त्यांनी तेथेच ठरविले की असे मैदान कोल्हापुरात उभे करायचे. मैदानासाठी खासबागेतील जागा निश्‍चित करण्यात आली. १९०७ मध्ये मैदानाच्या बांधकामास सुरवात झाली. उत्तर, दक्षिण व पश्‍चिम बाजूस तटबंदी करून त्यात भर टाकून उतार करण्यात आला. उताराच्या तळावर गोल मैदान करण्यात आले. त्यात तांबड्या मातीचा हौदा करण्यात आला. मैदानाची रचना अशी, की कोठेही बसून हौद्यातील कुस्ती नजरेच्या टप्प्यात दिसेल. पूर्वेच्या बाजूला मंडप व प्रवेशाचा मार्ग ठेवण्यात आला. कुस्तीत जोश निर्माण व्हावा, मैदानाच्या तटावर रणवाद्ये वाजविण्यासाठी चौथरा करण्यात आला. पश्‍चिमेकडील तटावर टुमदार इमारत बांधली गेली. १९१५ मध्ये कुस्ती मैदानाचे बांधकाम पूर्ण झाले. त्याला एकूण सव्वा लाख रुपये खर्च आला. मैदानाचे उद्‌घाटन जगज्जेता पैलवान गामा याचा भाऊ इमामबक्ष व गुलाब मोहिद्दीन यांच्यातील कुस्तीने झाले. ही कुस्ती पाहण्यासाठी देशाच्या विविध भागांतून कुस्तीशौकीन आले होते. 

केशवराव भोसले नाट्यगृह 
राजर्षी शाहू महाराजांनी पॅलेस थिएटर नाट्यगृहाच्या बांधकामाचा प्रारंभ १९०२ मध्ये केला आणि १९१५ मध्ये ते पूर्ण झाले. १९५७ मध्ये त्याचे संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह, असे नामकरण झाले. १९७९ पर्यंत हे नाट्यगृह शासनाच्या ताब्यात होते. त्यानंतर ते महापालिकेकडे आले. १९८० ते ८४ व २००३ ते २००५ या काळात त्याचे नूतनीकरण करण्यात आले. नाट्यगृहाच्या शताब्दीचे औचित्य साधून शासनाने भरीव निधी दिला आणि त्यातून नाट्यगृहाचे मूळ स्वरूप कायम ठेवून नूतनीकरण करण्यात आले. अलीकडेच पुन्हा एकदा राज्य शासनाने दिलेल्या निधीतून या नाट्यगृहाचे आधुनिकीकरण करण्यात आले आहे. 

टाऊन हॉल 
कोल्हापुरातील ही अतिशय देखणी वास्तू असून गॉथिक शैलीतील बांधकामाचा अप्रतिम नमुना आहे. टाऊन हॉलची उभारणी १८७२ ते १८७६ या कालखंडात झाली आहे. त्यासाठी एकूण ८० हजार रुपये खर्च करण्यात आला. याचे वैशिष्ट्य म्हणजे दोन मनोरे आणि अतिशय निमुळते छप्पर होय. या हॉलमध्ये एक मोठे सभागृह असून त्या सभोवार सज्जा आहे. या मध्यवर्ती सभागृहाच्या दोन्ही बाजूला दोन दोन खोल्या असून त्या मुख्य सभागृहाशी प्रशस्त अशा व्हरांड्याने जोडल्या आहेत. दर्शनी भागात एक आकर्षक द्वारमंडप असून त्यावरील गच्ची सभागृह आणि सज्जा यांना जोडलेली आहे. ५०० माणसे एका वेळेला बसू शकतील इतके सभागृह प्रशस्त आहे. सभागृहात प्रवेश करण्यासाठी कमान असलेला लाकडी दरवाजा आहे. या वास्तूच्या सभोवार बाग आहे. 

न्यू पॅलेस (नवा राजवाडा) 
न्यू पॅलेस, करवीर नगर वाचन मंदिर, राजाराम कॉलेज (पूर्वीचे राजाराम हायस्कूल) अशा काही कोल्हापूरच्या वैभवशाली इमारतींचे वास्तुरचनाकार मेजर चार्ल्स माँट होते. कोल्हापूरमधील न्यू पॅलेस १८७७ ते १८८४ मध्ये अहिल्याबाई यांनी बांधला. तळमजल्यावर कोल्हापूर संस्थानमधील दुर्मीळ वस्तूंचे शाहू संग्रहालय आहे. या राजवाड्यासाठी स्थानिक काळा पत्थर (बेसॉल्ट) तसेच त्यात सॅन्डस्टोनचाही वापर आहे. जैन आणि हिंदू बांधकाम शैलीचा संयोग असलेल्या या वास्तूतील भव्य दरबार हॉलही माँट यांच्या शैलीचा आविष्कार म्हणता येईल. 

बिंदू चौक 
करवीर संस्थानकालीन तटबंदीचे अवशेष जतन केलेली रविवार वेस, पिंपळाच्या झाडाखालचा पार व धर्मशाळा, नंतर नगरपालिकेने हा  परिसर स्वच्छ केला. तिथे आठवड्याचा बाजार भरू लागला. वाहतुकीचे स्टॅंड सुरू झाले. याला ‘रविवारातला पार’ असे म्हणायचे. ‘भारत छोडो’ चळवळीतील १९४२ मधील एका घटनेने या चौकाचे नाव बदलले. १५ ऑगस्ट १९४२ ला विद्यार्थ्यांच्या एका सभेवर तत्कालीन पोलिस प्रमुख साद्रीने लाठीमार केला. यात बिंदू नारायण कुलकर्णी यांचा मृत्यू झाला. दुसऱ्या दिवशी १६ ऑगस्टला त्याची अंत्ययात्रा निघाली. सगळे शहर रस्त्यावर होते. यावेळी रविवार वेशीत आल्यावर बुरुजावर कोणीतरी ‘बिंदू नारायण चौक’ असा फलक लावला. त्याच दिवसापासून रविवार वेशीचे नाव ‘बिंदू चौक’ झाले. नंतर सार्वजनिक सभांसाठी त्याचा वापर सुरू झाला. 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा जोतिबा फुले यांचा अर्धपुतळा ९ डिसेंबर १९५० रोजी या चौकात बसविण्यात आला. भाई माधवराव बागल या पुतळा समितीचे अध्यक्ष होते. १७ ऑक्‍टोबर १९६० रोजी चौकात हुतात्मा स्तंभ उभारण्यात आला. स्वातंत्र्यलढ्यातील २० हुतात्म्यांची नावे त्यात कोरण्यात आली आहेत. काही वर्षांपूर्वी कोल्हापूर महापालिकेने बिंदू चौकाचे सुशोभीकरण केले असून सध्या ऐतिहासिक महत्त्वाबरोबरच शहरात येणाऱ्या पाहुण्यांसाठीही कुतूहलाचा विषय आहे.   
श्री लक्ष्मीसेन मठ 
भगवान महावीरांच्या मोक्षप्राप्तीनंतर सहाशे वर्षांनी चार दिगंबर जैन पीठांची स्थापना उत्तर भारतात दिल्ली, पश्‍चिमेमध्ये कोल्हापूर, दक्षिणेत तमिळनाडू (जिनकंची) व पूर्वेला पिनगोंडी (आंध्र प्रदेश) येथे दिगंबर साधूंनी केली. श्री लक्ष्मीसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी यांच्या आधिपत्याखाली या मठाचे कामकाज चालते. मठाच्या प्रवेशद्वाराची कमान काळ्या पाषाणातील असून त्यावर अत्यंत कोरीव व सुंदर नक्षीकाम आहे. मठात प्रथम तीर्थंकर आदिनाथ भगवंतांची २८ फूट उंचीची मूर्ती आहे. ही मूर्ती राजस्थानात घडवण्यात आली. ती १९५९ ला कोल्हापुरात आणण्यात आली. मठाच्या मध्यभागी जुने चंद्रप्रभः दिगंबर जैन मंदिर असून एकाच दगडातून ४१ फूट उंचीचा चतुःमुखी मानस्तंभ आहे. या स्तंभावर भगवान महावीर यांच्या मातेस पडलेल्या १६ स्वप्नांची चित्रे कोरली आहेत. 

राधाकृष्ण मंदिर 
कोल्हापुरातील राधाकृष्ण मंदिर प्राचीन आहे. या मंदिरावरील शिखरात कोरलेल्या मूर्ती शिंदेशाही पगडीतील. असे शिखर कोल्हापुरातील कोणत्याही मंदिरावर नाही. या मंदिराने १८५७ च्या बंडातील थरार अनुभवला. बंड करून नंतर भूमिगत झालेल्या सैनिकांनी या मंदिरात आधार घेतला. ब्रिटिश कर्नल केर याने या मंदिरावरच सशस्त्र चाल केली. मंदिराभोवतीची तटबंदी फोडणे अशक्‍य झाल्याने चोरवाटेने आत प्रवेश केला. शस्त्रांचा साठा संपलेला, अन्न-पाण्यावाचून राहिलेले २५ बंडखोर त्या ठिकाणी ब्रिटिशांच्या कारवाईत बळी गेले. १० ऑगस्ट १८५७ ची ही वीरगाथा इतिहासाच्या जीर्ण पानांत दडली आहे. 

रंकाळा तलाव 
प्राचीन कोल्हापूरचा इतिहास पाहिला, तर येथील स्वतंत्र सहा खेड्यांपैकी रंकाळा हे एक खेडेच. येथे दगडाची खाण खोदली गेली आणि त्यातील दगड, राजा गंडरादित्याने बांधलेल्या साडेतीनशेहून अधिक मंदिरांसाठी वापरले गेले. नवव्या शतकातल्या भूकंपानंतर खाणीचा विस्तार वाढला आणि नैसर्गिक जलस्रोतातून रंकाळा नावाचा भला मोठा तलाव कोल्हापूरच्या सौंदर्यात भर घालू लागला. त्यातही संध्यामठाचं सौंदर्य इतकं की अनेक चित्रकारांना त्यानं भुरळ घातली. दोन-तीन किलोमीटर त्रिज्येचा हा भव्य तलाव. त्याची खोली अंदाजे पस्तीस फूट आहे. त्याच्या परिघावर (थोडा भाग वगळता) बांधीव दगडी चौपाटी आहे. राजर्षी शाहू महाराजांनी येथून पाणीयोजना राबवली. कपडे धुण्यासाठी जवळच धोबीघाट बांधला. आजही तो ‘धुण्याची चावी’ या नावाने प्रसिद्ध आहे. रंकाळ्यामुळे तब्बल साडेतीनशे एकर जमीन ओलिताखाली आली आहे. दर वर्षी येथे येणाऱ्या स्थलांतरित पक्ष्यांमुळे निसर्गप्रेमींनाही हा तलाव भुरळ घालतो.

पंचगंगा घाट 
शहराच्या वायव्येस पंचगंगा नदीकाठी बांधलेला हा विस्तीर्ण घाट म्हणजे पर्यटकांनी आवर्जून भेट द्यावे असे ठिकाण आहे. घाटाच्या सभोवताली व प्रत्यक्ष नदीपात्रामध्ये अनेक लहान-मोठी मंदिरे आहेत. राजघराण्यातील व्यक्तींची स्मृती मंदिरेही येथे आहेत. यापैकी सर्वांत मोठे व सुंदर देवालय श्री छत्रपती तिसरे शिवाजी यांचे आहे. हे देवालय सन १८८५ मध्ये बांधण्यात आले. पंचगंगा घाटाचे संपूर्ण बांधकाम दगडामध्ये केले असून तो विस्तीर्ण आहे. घाटाचा परिसर निसर्गरम्य असून त्याच्या उत्तरेस मोठ्या कमानी असलेला शिवाजी पूल आहे.
येथून जवळच ब्रह्मपुरी टेकडी म्हणजे कोल्हापूर शहराच्या अतिप्राचीन पहिल्या वसाहतीचा भाग होय. 

संबंधित बातम्या