सातोडीचा धबधबा

सुषमा घाणेकर, धारवाड
मंगळवार, 17 जुलै 2018

पर्यटन

‘सकाळ साप्ताहिक’मध्ये पर्यटन या सदरासाठी लेख पाठविण्याचे आवाहन वाचकांना करण्यात आले आहे. या आवाहनाला प्रतिसाद देताना वाचकांनी पाठविलेले लेख प्रसिद्ध करीत आहोत. 
 

आमच्या रिटायर लोकांच्या क्‍लबने सातोडी धबधबा (फॉल्स) पहायला जायचे ठरवले. आम्ही सगळे वयाची साठी पार केलेले तरुण तुर्क होतो. पण उत्साह मात्र पंचविशीचा होता. सातोडीचा रस्ता कच्चा असल्याने आम्ही टेंपो ट्रॅक्‍स ठरवली. कारण तिथे बस जाऊ शकत नव्हती. खड्डे, दगड, खाचखळगे व लालमाती हे सर्व मिळून आमचा रस्ता होता. 

सातोडी धारवाड (कर्नाटक)पासून १०० किमी अंतरावर आहे. इथून जाताना लागणारी गावे म्हणजे हल्याळ व यल्लापूर. भारताच्या पश्‍चिम घाटाचे दर्शन घेत आमच्या गाड्या जात होत्या. पावसाळी प्रदेश असल्याने रस्त्यांची दुर्दशा झालेली होती. यल्लापूर गाव गेल्यावर तर सगळे जीव मुठीत धरून बसलो होतो. वाटेत चार चाकी दिसतच नव्हत्या. फक्त दुचाकीवरून लोक फिरताना दिसत होते. 

सातोडी फॉल्स देहळ्ळी (देवनहळ्‌ळी) या छोट्या खेड्यात आहे. यल्लापूरहून २५ किमी अंतरावर काळी नदीवर कोडसळ्ळी येथे धरण बांधण्यात आले आहे. कर्नाटक पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेडने या पाण्याचा उपयोग इलेक्‍ट्रिसिटी (विद्युत) तयार करण्यासाठी केला आहे. पश्‍चिम घाटाचा हा भाग थोडा घाबरवून टाकणारा आहे. फक्त निबीड जंगलातून आपली गाडी अनेक वळणे घेत जात असते. मधून मधून खालवर काळी नदीचे दर्शन होते. देहळ्ळी गाव येतायेता धरणाचे बॅक वॉटर दिसू लागले. या पाण्यात कोणे एकेकाळी हिरवीगार असलेली व डेरेदार असलेली मोठ्या झाडांची मृत खोडे व शेंडा नसलेली नारळाची झाडे असा हा निर्जीव निसर्ग भयावह वाटतो. 

काळी नदीचे पाणी पुरेपूर उपयोगात आणण्यासाठी या नदीवर आठ ठिकाणी धरणे (चेकडॅम) व सहा ठिकाणी विद्युतकेंद्रे स्थापन करण्याचा सरकारचा विचार आहे. सध्या अस्तित्वात असलेली सूपा, नागझरी, दांडेली, कोडसळ्ळी व कद्रा ही विद्युत स्थावर आहेत. आमची अखंड बडबड व धडधडणारा प्रवास यात देहळ्ळी केव्हा आले कळलेच नाही. खाली उतरून इथून धबधब्याकडे पायवाटेने पायी जायचे होते. एका बाजूने अडीच फुटांची पायवाट, पाटाचे पाणी (ओहोळ) व उंच घनदाट डोंगर तर दुसऱ्या बाजूला खोल दरी. असेच पुढे जात राहायचे. जवळ जवळ दीड किलोमीटर चालून गेल्यावर सर्वजण क्षणभर स्तब्ध होऊन पाहत राहिलो. वीस फूट (अंदाजे) आडवे पाषाणाचे भिंताड व त्यातून मोत्यांच्या लड्या ओघळाव्यात असे पांढरे शुभ्र पाणी. दृश्‍याचे आकलन व्हायलाच पाच मिनिटे लागली. तीन बाजूंनी घनदाट अरण्य, डोंगर वेढलेला, एका बाजूला खाली खळाळत जाणारे पाणी. सगळे वर्णन करायला शब्द पुरणार नाहीत. स्वतः अनुभव घ्यायला एकदा तरी जायलाच हवे तेथे. कोणीही काही बोलत नव्हते. निसर्ग डोळ्यात व कॅमेऱ्यात साठवून घेणे एवढेच चालू होते. भर पावसाळ्यातील या धबधब्याचे रूप आठवले व मन थरारले. कारण आम्ही पावसाळ्याच्या मध्यावर गेलो होतो. यल्लापूर तालुका कर्नाटकातील जास्त पावसाळी प्रदेश मानला जातो. हे धबधब्याचे पाणी पुढे काळी नदीला जाऊन मिळते. 

तासभर तेथे थांबून जड अंतःकरणाने भव्य निसर्गाला निरोप देऊन परत निघालो. सहल अविस्मरणीय ठरायला आणखी एक कारण तेथील एका कुटुंबाने आम्हा प्रवाशांची जेवणाची व्यवस्था चोख ठेवली होती. सातोडी फॉल्स अजूनही मनात, आठवणीत रेंगाळत आहे.

कसे जाल? : हुबळी किंवा धारवाडहून कलघटगी यल्लापूरमार्गे.

केव्हा जाल? : जुलैअखेर ऑक्‍टोबरपर्यंत. हायहिल्स, चप्पल नको. (पावसाळ्यात जळवा पायावर चढू शकतात.)

संबंधित बातम्या