दिल्ली-आग्रा-मथुरेची सहल 

सुरेश कुलकर्णी
सोमवार, 2 मार्च 2020

पर्यटन
 

जून २०१९ मध्ये रात्रीच्यावेळी कुटुंबातील सर्वजण एकत्र असताना गप्पा सुरू होत्या. प्रत्येकजण दिवसभरातले आपापले अनुभव शेअर करत होता. आमच्याकडे, मी व पत्नी दोघेही सध्या पूर्ण वेळ घरी असून रिटायर्ड लाइफचा आनंद उपभोगत, छोट्या नातीला संभाळणे एवढे एकच काम करतो. थोरल्या मुलाचे हेड ऑफिस बंगलोर येथे आहे. पण त्याचा महिन्यातून किमान एकदा तरी विमानप्रवास अर्थातच कंपनीच्या खर्चाने होत असतो. अहमदाबाद, कोलकत्ता, भुवनेश्वर, पाटना, हैदराबाद इत्यादी देशातील बरीच शहरे तो विमानाने फिरत असतो. गप्पांच्या ओघात माझा व पत्नीचा अजून एकदाही विमानात बसण्याचा योग आलेला नाही असा उल्लेख झाला आणि तीन महिने अगोदर बुकिंग केल्यास विमान प्रवासाचा खर्च निम्म्यावर येतो असे समजले. म्हणजे पुणे ते दिल्ली पाच हजाराचे तिकीट अडीच हजारात मिळते. त्यामुळे जूनपासून तीन महिन्यानंतर म्हणजे सप्टेंबरमधील गणपतीनंतरचा शनिवार-रविवार व त्याला जोडून सोमवार-मंगळवारच्या दोन रजा, अशी एकूण चार दिवसांची (२१ ते २४ सप्टेंबर) दिल्ली-आग्रा-मथुरा सहल नक्की करून त्याच दिवशी विमान प्रवासाचे तिकीटसुद्धा ऑनलाइन बुक करून टाकले.

पूर्ण तीन महिन्यांचा वेळ असल्यामुळे सहलीच्या नियोजनास भरपूर वाव मिळाला. सहलीला जाणार असलेल्या सहाजणांपैकी पाचजण वय वर्षे २८ ते ५९ अशा प्रावासामधील दगदगी पेलू शकण्याच्या वयोगटात होते; फक्त काळजी होती ती आमच्या पावणेदोन वर्षांच्या नातीची. हे काम आमच्या सूनबाईने अतिशय उत्तमपणे पार पाडले. तसेच पहिल्या दिवशी दिल्ली विमानतळावर उतरल्यापासून ते चौथ्या दिवशी परत तिथेच आणून सोडणे याकरिता एकच सहा आसनी कॅब बुक करण्यात आली. एक मुक्काम आग्रा व दोन मुक्काम दिल्ली येथील हॉटेलचे व कॅबचे बुकिंग मुलाने त्याच्या दिल्लीतील मित्रांच्या सहकार्याने केले. फक्त ताजमहालची प्रवेश तिकिटे प्रत्येकी दोनशे पन्नास प्रमाणे पाचजणांचे बाराशे पन्नास रुपये बँकखात्यातून वजा होऊनसुद्धा ऑनलाइन मिळू शकली नाहीत. अशा प्रकारे सर्व नियोजन झाले आणि बघता बघता तीन महिने कधी संपले हे न कळता प्रत्यक्ष जाण्याचा दिवस उजाडलादेखील.

पुणे ते दिल्लीकरिता पहाटे ५.५५ चे विमान असल्याने व त्याच्या अगोदर दोन तास विमानतळात प्रवेश करावा लागतो म्हणून पहाटे तीनलाच गजर लावून जागे झालो. ४.२० ला आम्ही पुणे विमानतळात प्रवेश केला. विमानतळावरचे सर्व सोपस्कार उरकून पाच वाजता प्रतीक्षा कक्षात प्रवेश केला. अर्ध्या तासातच मंजूळ आवाजात विमानात बसण्याची सूचना ऐकविली गेली आणि काहीशा धडधडत्या अंतःकरणानेच आम्ही विमानात प्रवेश केला. नियोजित वेळेला विमानाचे उड्डाण झाले आणि थोड्याच वेळात विमान जमिनीपासून ढगांच्यापण वरच्या उंचीवर पोचले. उंचावरून ढगांशिवाय दुसरे काहीच दिसत नव्हते. १५-२० मिनिटांतच एक अप्रतिम दृश्‍य पाहायला मिळाले, ते म्हणजे वरून दिसणारा सूर्योदय. काही वेळानंतर सूर्यकिरणे खिडकीतून अंगावर पडू लागली आणि आमच्यातील प्रथम प्रवास करीत असलेल्या सर्वांनी खिडकीत बसण्याकरिता जागांची आदलाबदल करून सूर्य दर्शनाचे मनोहारी दृश्‍य डोळे भरून पाहून घेतले. विमान उंचावरून खाली घेताना आणखी एकदा मंजूळ आवाजाने सूचना दिली. यावेळी कानांवर दबाव पडून कान सुन्न झाल्याचे जाणवले. विमानतळातून बाहेर आल्यावरसुद्धा काही वेळ कमी ऐकू येत होते.

सगळ्यात जास्त लांबीचा प्रवास म्हणजे दिल्ली विमानतळ ते फतेहपूर सिकरी (२७५ किमी). तो मुद्दाम सर्वात अगोदर पहिल्या दमाच्या उत्साहात करायचा होता. यमुना एक्सप्रेस हायवेवरून मथुरा-आग्रा-फतेहपूर सिकरी असा प्रवास रस्ता चांगला असल्याने मजेत झाला. वाटेत यमुना नदीचे दर्शन झाले. संध्याकाळी चार वाजता आम्ही फतेहपूर सिकरीला पोचलो. 

आग्र्याच्या पश्चिमेला ४० कि.मी. अंतरावर वसलेल्या या लहानशा शहरात अकबर बादशाहने सोळाव्या शतकात दहा-बारा वर्षांकरिता मुघल साम्राज्याची राजधानी केली होती. सर्व बांधकामे लाल रंगाच्या दगडातील असून फक्त मशीद मात्र पांढऱ्या संगमरवरामध्ये आहे. अकबराची तिसरी राणी जोधाबाई ही हिंदू असल्यामुळे बांधकामांमध्ये हिंदू संस्कृतीचे दर्शन होते. बुलंद दरवाजा, मशीद, जोधाबाई पॅलेस, पंचमहाल, फतेहपूर सिकरी किल्ला या सर्व इमारतींचे बांधकाम अजूनही मजबूत असून सुंदर ठेवलेले आहे. सर्व परिसराची माहिती सांगण्यासाठी गाइड्स आहेत. अंदाजे दीड तासात सर्व परिसर बघून साडेपाच वाजता आम्ही बुलंद दरवाजातून बाहेर पडलो. आग्रा येथील हॉटेल अलपाईन येथे संध्याकाळी सात वाजता पहिल्या दिवशीच्या मुक्कामी पोचलो.

दुसऱ्या दिवशी नियोजनाप्रमाणे सकाळी नऊ वाजता आम्ही ताजमहालाच्या प्रवेशद्वारी पोचलो. प्रवेशद्वारापासून आत ताजमहालापर्यंत सोडण्याकरिता दीड किमी अंतरासाठी लाइटवर चालणाऱ्या, १०-१२ लोक बसतील अशा व्हॅन्स आहेत. ताजमहालाचा पूर्ण परिसर ४२ एकर आहे. याचे बांधकाम पांढऱ्या रंगाच्या ‘मकराना मार्बल’मध्ये केले आहे. बांधकामाकरिता एकूण बावीस वर्षे (१६३१ ते १६५३) लागली. शहाजहान बादशहाने आपली पत्नी मुमताज बेगम हिच्या स्मरणार्थ बांधलेली अतिशय सुंदर इमारत पाहताक्षणी डोळ्यांचे पारणे फिटते. याची जमिनीपासून उंची २४३ फूट आहे. यमुना नदीच्या दक्षिण तीरावरील हे पर्यटन स्थळ जागतिक दर्जाचे आहे. याच्या बांधकामास बावीस वर्षे लागली म्हणून प्रवेशाच्या कमानीवर बावीस घुमट केले आहेत.

तसेच बांधकाम पूर्ण झाल्याचे ‘वर्ष १६५३’ लक्षात राहण्याकरिता परिसरातील एकूण बागांची संख्या १६ व त्यामध्ये ५३ कारंजी आहेत. बांधकामाकरिता भारत, तुर्कस्तान आणि इराण येथील एकूण वीस हजार कामगार लागले. ताजमहालाच्या दोन्ही बाजूला एकसारख्या आकाराच्या दोन लाल दगडातील इमारती आहेत, ज्यामध्ये म्युझियम व गेस्ट हाउस आहे. प्रत्येक शुक्रवारी ताजमहाल बंद असतो. पूर्ण परिसर बघण्यास नऊ ते बारा इतका तीन तासांचा वेळ लागला. बरोबर गाइड असल्याने सविस्तर माहिती मिळाली.

आग्र्यातील आणखी एक पर्यटन स्थळ म्हणजे ‘आग्रा किल्ला’. किल्ल्याचा पूर्ण परिसर ९४ एकरचा आहे. यापैकी फक्त २० टक्के भागच पर्यटकांना बघण्यास परवानगी आहे. बाकीच्या भागाला पुरातत्त्व खात्याकडून बंदी करण्यात आली आहे. त्यामुळे शिवाजी महाराजांना कैदेत ठेवलेली जागा बघता आली नाही. १६३८ पर्यंत मुघल साम्राज्याची राजधानी याच किल्ल्यात होती. त्यानंतर राजधानी दिल्लीला हालविण्यात आली. या किल्ल्याचे बांधकाम १५६५ ते १५७३ या कालावधीत झाले आहे. युनेस्कोकडून १९८३ ला या किल्ल्याचा जागतिक पर्यटन स्थळ म्हणून समावेश करण्यात आला. ताजमहालापासून याचे अंतर अडीच कि.मी. आहे. याच्या बांधकामाकरिता चार हजार कामगार आठ वर्षे राबत होते. पूर्ण किल्ल्याच्या भोवतीने ७० फूट उंचीची संरक्षण भिंत आहे. किल्ल्याला एकूण चार गेट आहेत. दिल्ली गेट, लाहोर गेट, इलेफंट गेट व दक्षिण गेट. पर्यटकांचा प्रवेश दक्षिण गेटमधून आहे. आतमध्ये जहाँगीर पॅलेस, खास महल, अंगूरीबाग, काचमहल इत्यादी वास्तू आहेत. इथून ताजमहालाचा ‘व्ह्यू’ खूप सुंदर दिसतो. आग्रा किल्ल्याच्या भव्य वास्तूमध्ये प्रवेश करण्याआधीच किल्ल्याच्या बरोबर समोर शिवाजी महाराजांचा एक अश्वारूढ पुतळा दिसतो.

आग्र्यानंतर पुढचे ठिकाण मथुरा येथे चार वाजता पोचलो. मथुरा व वृंदावन परिसरात एकूण वीस मंदिरे आहेत; परंतु वेळेअभावी म्हणजे तीन तासांचा प्रवास करून दिल्ली मुक्कामी जायचे असल्याने, आम्ही वृंदावनातील ‘रमणरेती मंदिर’ व ‘बलराममंदिर’ आणि यमुनेच्या पलीकडे जाऊन ‘कृष्णजन्मभूमी मंदिर’ अशी मुख्य तीनच ठिकाणे बघून अंधार पडल्यानंतर साडेसातला निघालो. साडेअकराला दिल्ली येथील हॉटेल गाठले. वाटेत एका धाब्यावर जेवणाकरिता थांबल्यामुळे थोडा उशीर झाला. 

तिसऱ्या दिवशी दिल्लीतील सर्वात पहिला पॉइंट ‘कुतुबमिनार’ बघितला. ११९३ मध्ये कुतुबुद्दीन ऐबक याने याचे बांधकाम पूर्ण केले. याची उंची २३८ फूट आहे. हा टॉवर पाच मजली असून याचा समावेश जागतिक पर्यटन स्थळांमध्ये आहे. तळमजल्याचा व्यास ४८ फूट, तर सर्वांत वरच्या मजल्याचा व्यास नऊ फूट आहे. हे जगातील सर्वांत उंच वीट बांधकाम आहे. येथे ७.२० मीटर उंचीचा एक आयर्न पिलर आहे. त्याचे वैशिष्ट्य असे, की त्याला मागील १६०० वर्षांपासून कधीही गंज लागलेला नाही. दिल्लीतील शेवटच्या हिंदू राजाचा मुस्लिमांकडून झालेला पराभव साजरा करण्यासाठी याचे बांधकाम करण्यात आले. 

यानंतर ‘श्री बंगला साहिब गुरुद्वारा’, दिल्लीतील शीख समाजाचे महत्त्वाचे मंदिर. १६६४ व त्यानंतर १७८३ मध्ये बांधण्यात आलेले हे गुरुद्वारा शिखांचे आठवे गुरू, गुरू हरकिशन यांच्याशी संबंधित आहे. आतमध्ये एक सुंदर असे सरोवर आहे. या कॅम्पसमध्ये शाळा, लायब्ररी, हॉस्पिटल आणि म्युझियम आहे. येथे अखंड अन्नदान (लंगर) सुरू असते. दररोज हजारो भाविक प्रसाद ग्रहणाचा लाभ घेतात. आम्हीही दुपारचे जेवण इथेच घेतले. 

जेवणानंतर दुपारी दोन ते पाच हा वेळ महिला वर्गाचा आवडता छंद म्हणून ‘जनपथ मार्केट’ येथील खरेदीसाठी राखीव ठेवला होता. त्यानंतर संध्याकाळी इंडिया-गेट, राष्ट्रपती भवन, वॉर मेमोरियल पाहिले. ४२ मी. उंचीची भव्य अशी दगडी कमान (इंडिया-गेट) म्हणजे वास्तुशास्त्राचे उत्कृष्ट उदाहरण आहे. याच्यामध्ये देशासाठी शहीद झालेल्या जवानांसाठी श्रद्धांजली म्हणून अखंड ज्योत तेवत असते. याचे बांधकाम ब्रिटिशांच्या काळात पहिल्या महायुद्धात शहीद झालेल्या जवानांच्या स्मरणार्थ करण्यात आले. अंधार पडल्यावर कमानीच्या वरच्या भागात लायटिंगमध्ये भारताचा तिरंगा अतिशय सुंदर दिसतो. इंडिया गेटच्या शेजारीच पंतप्रधान मोदींच्या काळात स्वातंत्र्यानंतरच्या वेगवेगळ्या युद्धात पराक्रम गाजविणाऱ्या सेनादलातील जवानांच्या स्मरणार्थ भव्य असे वॉर मेमोरियल बांधण्यात आले आहे. पराक्रम गाजविणाऱ्या प्रत्येक जवानाच्या नावाची वीट बसविण्यात आली आहे. 

चौथ्या दिवशी लाल किल्ल्यापासून सुरुवात केली. प्रत्येक १५ ऑगस्टला आपल्या देशाचे पंतप्रधान जेथून झेंडावंदन व भाषण करतात ते ठिकाण म्हणजे ‘लाल किल्ला’. या किल्ल्याचे बांधकाम सतराव्या शतकाच्या मध्यास (१६३९ ते १६४८ - नऊ वर्षे) शहाजहान बादशहाने केले. दिल्लीतील चांदणी चौक भागात नेताजी सुभाषचंद्र बोस मार्ग या अतिशय गजबजलेल्या भागात हे ठिकाण आहे. किल्ल्याच्या आतमध्ये शॉपिंगसाठी भरपूर दुकाने आहेत. 

यानंतर अक्षरधाम मंदिरामध्ये दर्शन घेतले. अक्षरधाम मंदिर हे भारतातील सर्वात मोठ्या हिंदू मंदिरांपैकी एक आहे. यात भगवान श्री स्वामीनारायण यांची सुबक अशी मूर्ती बसविली आहे. मंदिराची लांबी-रुंदी ३५६ बाय ३१६ फूट असून उंची १४१ फूट आहे. माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांनी ६ नोव्हेंबर २००५ ला याचे उद्‍घाटन केले होते. 

यानंतर शेवटचा पॉइंट ‘लोटस-टेंपल’ला टॅक्सीतून न जाता दिल्ली मेट्रोचा अनुभव घेण्याचे ठरले. कॅबला पुढे पाठवून आम्ही मेट्रोचा प्रवास केला. लोटस टेंपल या मंदिराचा आकार अर्धवट उमललेल्या कमळाच्या फुलासारखा आहे. यासाठी शुभ्र पांढरे मार्बल वापरले आहे. मंदिराची उंची ३४ मीटर आहे. मंदिर लांबून जितके सुंदर दिसते तितकेच स्वच्छ राखलेले आहे. भव्य अशा हॉलमध्ये पिन-ड्रॉप शांतता पाळून काही वेळ ध्यानधारणा करायची अशी येथील प्रथा आहे. हे मंदिर बहाई समाजाचे आहे. संध्याकाळी सहा वाजता मंदिर परिसर बंद केला जातो. 

परतीसाठी रात्री अकराचे विमान बुकिंग केले होते. अशा प्रकारे आमच्या पहिल्या-वहिल्या विमान प्रवासाचा योग साधून एक छोटीशी चार दिवसांची सहल पार पडली.

संबंधित बातम्या