अविस्मरणीय ‘सी लायन’अन् चित्तथरारक ‘शार्क’

उदय बिनीवाले
शुक्रवार, 31 डिसेंबर 2021


पर्यटन

जलचर प्राण्यांना जवळून पाहणे, तो विलक्षण थरार अनुभवणे ही एक अविस्मरणीय अनुभूती आहे. त्यातही सी लायनबरोबर पोहणे आणि पिंजऱ्यातून अगदी जवळून शार्क पाहणे यांसारखे अनुभव निश्चितच आयुष्यभराची आठवण ठरतात.

विलोभनीय सागरी किनारे, निसर्गदृष्यांची सुंदर लयलूट यासाठी ऑस्ट्रेलिया जगप्रसिद्ध आहे, आणि म्हणूनच तो पर्यटकांचाही आवडता देश आहे. परंतु याबरोबरच या देशाची आणखीन एक खासियत आहे, ती म्हणजे अप्रतिम व विशेष असे सागरी जलचर विश्व.

भयंकर, महाकाय शार्क, मोहक ऑस्ट्रेलियन सी लायन, व्हेल, डॉल्फिन, पेंग्विन असे विविध आणि अभावाने आढळणारे इतर काही जलचर ऑस्ट्रेलियातल्या मोजक्या सागरी ठिकाणी पाहावयास मिळतात. विशेषतः शार्क आणि सी लायन हे दुर्मीळ असून जगामध्ये अगदी मोजक्याच तीन-चार ठिकाणी आढळून येतात. या जलचर प्राण्यांना जवळून पाहणे, तो विलक्षण थरार अनुभवणे ही एक अविस्मरणीय अनुभूती आहे आणि हा अनुभव निश्चितच आयुष्यभराची आठवण ठरते. 

हे सर्व मला नुकतेच प्रत्यक्ष अनुभवायला मिळाले. शार्क तसेच सी लायन पाहण्यासाठी साऊथ ऑस्ट्रेलियातील ॲडलेड येथून छोट्या विमानाने पोर्ट लिंकन येथे जावे लागते. दुसरा सोपा पर्याय नाही. साहजिकच या आडवळणाच्या ठिकाणी जाण्यासाठी बराच वेळ, पैसा, श्रम खर्च करावे लागतात हे उघड आहे. पण हौसेला मोल नसते, या बरोबरच कष्टाशिवाय फळ नाही, हे तितकेच खरे.

माझा अनुभव विचाराल, तर सिडनीतील आमच्या घरापासून अगदी सिटी बसने ट्रेन स्टेशन आणि तसेच पुढे ट्रेनने अगदी थेट सिडनी विमानतळ असा सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेने प्रवास केला. एक विशेष बाब मुद्दाम नमूद करावीशी वाटते. सिटी बसमध्ये प्रवेश केला आणि आतमध्ये चक्क हिंदी गाणी लावलेली ऐकली. बसचा चालक भारतीय होता. अर्थातच प्रसन्न वाटले, त्या चालकाला दाद दिली – जय हिंद!

सिडनी - ॲडलेड - पोर्ट लिंकन प्रवास केल्यावर छोट्याशा विमानतळावरून शहरात जाण्यासाठी दोनच टॅक्सी सर्व्हिस आहेत, ज्या प्रवाशांची ने-आण करतात. त्यामुळे सर्व बुकिंग आगाऊ करावे लागते, हे ओघाने आलेच. पोर्ट लिंकन हे शहर ऑस्ट्रेलियाची ‘सी फूड’ राजधानी समजली जाते. अनेक हॉटेल्स अगदी समुद्र किनाऱ्याला लागूनच आहेत.

सी लायन टूर

भल्या पहाटे पर्यटकांना घेऊन क्रूझ किंवा अद्ययावत बोट समुद्रात कूच करते. सुमारे दोन तासांनंतर मोठ्या खडकाळ भागाजवळ बोट अँकर करतात. तत्पूर्वी दोन तासांचा अवधी खाणे पिणे, संगीत आणि देशी-विदेशी पर्यटकांशी ओळख, गप्पा यात उत्साहाने, आनंदाने निघून जातो. एकदा पोचल्यानंतर मात्र तिथे मिळणारा अनुभव विलक्षण. पेडल्स असलेले खास रबरी सूट, ते परिधान करून पाण्यात उडी मारणे, तरंगत सी लायनच्या जवळ जाणे आणि नंतर या अजब जलचर प्राण्याबरोबर पोहणे, अगदी जवळून खेळ-कवायती करणे... सारेच अद्‍भुत.. हे शब्दांत सांगणे महाकठीण आहे. सुमारे एक तास अनेक सी लायन तुमच्याबरोबर मित्राप्रमाणे डुंबत असतात. पाण्याच्या आत बाहेर उड्या मारत असतात, पोहत असतात. हे सर्व पाहून अक्षरशः डोळ्याचे पारणे फिटते. 

ऑस्ट्रेलियातल्या सी लायनचा रंग फिकट तपकिरी असतो आणि मान-गळा पिवळसर दिसतो. त्यांचा आकार साधारण १.७५ ते ३ मी. आणि वजन ११० ते ३०० किलोपर्यंत असते. साधारण २० वर्षे आयुष्य असलेल्या या जलचर प्राण्याचे खाद्य म्हणजे छोटे मासे आणि पक्षी. सी लायन चपळ आणि लयबद्ध हालचाली करतात. हा आगळा वेगळा दुर्मीळ अनुभव घेण्यासाठी सहा तास आणि २५० डॉलर्स मोजावे लागतात.

शार्क केज डायव्हिंग

साहस प्रकारातील जगातील सर्वात सनसनाटी, अद्‍भुत आणि अविस्मरणीय प्रकार म्हणजे ‘शार्क केज डायव्हिंग’. अद्ययावत बोटीने खोल समुद्रात विशिष्ट ठिकाणापर्यंत  सुमारे तीन तास प्रवास करावा लागतो. प्रवासादरम्यान आजूबाजूचा सुंदर निसर्ग आणि पांढऱ्या वाळूचे समुद्र किनारे न्याहाळता येतात. 

प्रथम रबर सूट, श्वासोच्छ्वासाचा मास्क याबाबत माहिती दिल्यानंतर सहाजणांना ॲल्युमिनियम आणि मिश्र धातूंच्या पिंजऱ्यात उतरवतात. हा धातूचा पिंजरा पाण्याच्या पातळीखाली, सुमारे दहा फूट ठेवतात, आणि इथूनच सुरू होते एक अद्वितीय अनुभूती... आजूबाजूला जवळून हजारो लहान मोठे मासे आणि अन्य जलचर जीव फिरत असतात, पण आपले लक्ष लागून राहते ते शार्क कधी दिसतो याकडे. कारण या भयावह, अजस्र माशाचे दर्शन होईलच याची खात्री नसते... जिसने देखा, वो सिकंदर!

आम्ही पंचवीस ते तीस मिनिटे पाण्याखाली पिंजऱ्यात उत्कंठतेने वाट पाहात होतो. शार्क दिसेना म्हणून हळूहळू नैराश्य येत होते. तेवढ्यात क्रूझ कॅप्टनने आम्हास सावध केले. श्वास रोखून इकडे तिकडे पाहताना पाण्याच्या लाटांची जोरदार हालचाल झाली आणि वेगळा, विलक्षण आवाज कानी पडला. लांबून प्रचंड धूड आमच्या दिशेने येत असल्याचे दिसले. लयबद्धपणे तो भयावह प्रचंड मासा जबडा उघडून पिंजऱ्याजवळ आला... खरे सांगतो, पाच सेकंद हृदयाचे ठोके थांबल्याचा भास झाला. पण लगेच सावरून सगळ्यांनी कॅमेरे खटाखट क्लिक केले आणि हा दुर्मीळ, कदाचित आयुष्यात पुन्हा कधीही न येणारा प्रसंग कॅमेऱ्यात कैद केला. शार्क काही काळ आमच्या पिंजऱ्याभोवती घुटमळला, आणि नंतर आम्हाला आठवणींचा अमूल्य ठेवा देऊन दिसेनासा झाला. हे लिहीत असताना आजही अंगावर काटा उभा राहतो. कारण, त्या दोन-तीन मिनिटांत उगाच मनात विचार आला, या महाभागाने करवतीसारख्या दातांनी पिंजऱ्याचे एक-दोन रॉड तोडले तर? तर काय ?.... आपला प्रवेश थेट शार्कच्या अजस्र जबड्यातच..! पण नाही, असे कधी होत नाही. पर्यटक आयुष्यभर कायम लक्षात राहील असा अनुभव आणि आठवणींचा अमूल्य ठेवा मनात, डोळ्यांत आणि कॅमेऱ्यात साठवून तृप्त मानाने, संतुष्ट होऊन परततात. या साहस प्रकारासाठी ११ तास आणि ५५० डॉलर्स खर्च होतात. ज्यांना धातूच्या पिंजऱ्यात जायचे नसेल, त्यांना काचेच्या केबीनमधून हे सर्व न भिजता पाहता येते. आम्ही पाहिलेल्या ग्रेट व्हाईट शार्कचे प्रमुख खाद्य म्हणजे, छोटे व्हेल मासे, सील आणि सी लायन. त्यांची घ्राणेंद्रिये तीक्ष्ण असतात आणि चार किमी अंतरावरून त्याला भक्ष्याचा अंदाज येतो. ग्रेट व्हाईट शार्कला तिनशे त्रिकोणी धारदार दात असतात. ताशी ६० किमी वेगाने ते पोहू शकतात. त्यांची लांबी ४.५ ते ६ मी. असते.

आम्ही अनुभवलेले हे दोन्ही साहस प्रकार अद्‍भुत आणि असाधारण असेच होते यात शंकाच नाही.

 

संबंधित बातम्या