मोहात पाडणारा सागर 

उदय हर्डीकर 
शुक्रवार, 12 जानेवारी 2018

सागरी पर्यटन
दुचाकी ऊर्फ मोसावरून भटकंती हा माझा फार आवडता छंद. त्यातही कोकणासारख्या प्रदेशात जाणं हा त्याहून मोठा आनंद. कोकणातले वळणावळणाचे रस्ते. कधी एकदम चढावर नेणारे, कधी एकदम खाली उतरवणारे. कधी एकदम हेअरपीन बेंड तर कधी एकदम शार्प टर्न. वाऽऽ.. गाडीचा आणि चालवणाऱ्याचाही खरा कस पाहणारा भाग म्हणजे कोकण.

एरवी चाकरीसह नाना व्यवधानांत खर्ची पडणाऱ्या जिवाला भटकंती हा फार मोठा विरंगुळा! उन्हाचा तडाखा जाणवायला लागतो, पारा वर जायला लागतो, पळस-पांगिरा फुलायला लागतात अन्‌ मला भटकंतीचे वेध लागतात. वास्तविक उन्हाळा म्हणजे घाम काढणारा, भाजणारा. पण मला याही काळात भटकायला आवडतं. विशेषतः कोकणाच्या हाका कानांत घुमायला लागतात. सागराची कधी मंद तर कधी भारून टाकणारी गाज ऐकू येऊ लागते. चंदेरी मासळीचा अन्‌ सोलकढीचा चविष्ट स्वाद जिभेवर रेंगाळायला लागतो...  मुरुड-जंजिरा, हेदवी, वेळणेश्‍वर, गुहागर, देवगड, मालवण, वेंगुर्ला, आचरा, तांबळडेगपासून पार तेरेखोलपर्यंतचे किनारे मला आवतणं द्यायला लागतात. मग मात्र मी निश्‍चय करतो. एका प्रभाती अगदी किमान गरजेच्या वस्तू पाठीवरच्या पोतडी ऊर्फ हॅवरसॅकमध्ये टाकतो, एरवी सॅंडल किंवा चपलेला सोकावलेले पाय बुटांत बंदिस्त करतो, डोस्क्‍यावर हेल्मेट अडकवतो आणि सर्व्हिसिंग होऊन एकदम ‘तय्यार’ झालेल्या मोसाला (पक्षी ः मोटरसायकल) अलगद किक्‌ बसते, इंजिन खुशीत गुरगुरायला लागतं अन्‌ स्मूद धावणाऱ्या मोसाच्या संगतीनं आणखी एका आनंद यात्रेला प्रारंभ होतो... समोर हमरस्ता उलगडायला लागतो, मागच्या वेळी दिसलेल्या खुणा काही वेळा गायब होऊन नव्याच खुणा सामोऱ्या येत असतात. गाडीनं एकदम मस्त लय पकडलेली असते. उन्हाचा ताव वाढत राहतो, पण ‘रायडिंग’ची मजा शरीरात भिनत जाते. अंतरांचे दगड मागं पडत जातात अन्‌ कोवळ्या सायंकाळी मी कोकणात हजर होतो...

दुचाकी ऊर्फ मोसावरून भटकंती हा माझा फार आवडता छंद. त्यातही कोकणासारख्या प्रदेशात जाणं हा त्याहून मोठा आनंद. कोकणातले वळणावळणाचे रस्ते. कधी एकदम चढावर नेणारे, कधी एकदम खाली उतरवणारे. कधी एकदम हेअरपीन बेंड तर कधी एकदम शार्प टर्न. वाऽऽ.. गाडीचा आणि चालवणाऱ्याचाही खरा कस पाहणारा भाग म्हणजे कोकण. आणखी एक आकर्षण म्हणजे कोकणात उतरणारे घाट. अगदी ताम्हिणीपासून पार आंबोलीपर्यंत आणि पुढं कर्नाटकातूनही घाट उतरतात. दर वेळी येता-जाता वेगळे मार्ग निवडण्याचा माझा प्रयत्न असतो. 

पण खरं आकर्षण असतं सागर, समुद्र. पुण्यात राहणाऱ्या माझ्यासारख्याची रायगड जिल्ह्यातही भटकंती चालते. कधी काशीद किनाऱ्यावर चक्कर तर कधी मुरुड-जंजिरा, कधी मुरुड (दापोली), तर कधी हर्णे तर कधी आंजर्ले. टेकडीवरच्या गणपतीच्या देवळापासून माड-पोफळींच्या कुशीत हरवलेलं हे गाव पाहूनच दिल खूश होतो. पण मला आवडतं तळकोकणात बागडायला. एकतर पुण्यापासून छानपैकी लांब असल्यामुळं माझी रायडिंगची हौस पूर्ण होते आणि तळकोकण अजूनही बऱ्यापैकी शांतही आहे. सिंधुदुर्गातले किनारेही मस्तच आहेत. 

अशा एखाद्या शांत किनाऱ्यावर बसून राहणं मला फार आवडतं. मग डोक्‍यावर सूर्य असो किंवा चंद्र! समोर तो अथांग रत्नाकर उसळत असतो, त्याच्या लाटा कधी मी बसलेल्या जागेपर्यंत येतात. भरती सुरू झाल्याचा तो इशारा असतो. मीही सागराच्या सूचनेचा आदर करतो आणि थोडा मागं जातो. असाच छान वेळ जातो. कोकणात फिरताना मी घड्याळाची गुलामी शक्‍यतो टाळतो.

आता अगदी पॉप्युलर झालेले मालवण दहा-बारा वर्षांपूर्वी शांत-निवांत-सुशेगाद होते. गावात फार गडबड नसायची आणि किनाऱ्यांवर हौशी पर्यटक वावरत असायचे. त्यातलाच मी एक होतो. या पर्यटकांतील काहींनी कदाचित पुन्हा मालवणला मोहरा वळवला नसेल; मी मात्र न चुकता जातोय. पूर्वी सह्याद्रीत भरपूर पदभ्रमण केलं (म्हणजे झेपेल तेवढं, पण बऱ्यापैकी). नंतर तंगडतोडीचा कंटाळा आला आणि दुचाकीवरून भटकंतीचा कीडा चावला. मग काय, महिती मिळवायची आणि सुटायचं, असं सुरू झालं. गाडीवरून भटकताना ‘अकेला निरंजन’ हे तत्त्व कटाक्षानं पाळतोय. आपले आपण असणं बरं असतं. कोकणात खास भटकंतीसाठी म्हणून पहिल्यांदा काही तरी दहा-बारा वर्षांपूर्वी गेलो होतो. तेव्हा मुरुड (दापोली) पासून प्रारंभ केला होता. पोचल्याच्या दिवशी आसूदचा केशवराज पाहून सायंकाळ किनाऱ्यावर एंजॉय केली. दुसऱ्या दिवशी हर्णे, अंजर्ले केलं आणि तरीही वेळ होता म्हणून तिसऱ्या दिवसापासून किनारपट्टीजवळून भटकंती सुरू केली. गुहागर, हेदवी, वेळणेश्‍वर, गणपतीपुळे असा प्रवास करत पुढं निघालो आणि पुढं वेंगुर्ले, वेळागर करत रेडी आणि पुढं तेरेखोलला धडकलो. त्यानंतर मग कोकणाची ओढच निर्माण झाली. ती निर्माण करण्यात किनाऱ्यांचा आणि अर्थातच समुद्राचा वाटा मोठा होता. मालवणला पहिल्यांदा गेलो तेव्हा मुख्य आकर्षण होतं ते सिंधुदुर्गाचं. पूर्वीच्या कुरटे बेटावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या दूरदृष्टीतून साकारलेला हा जलदुर्ग म्हणजे आश्‍चर्यच आहे. दुसरं आश्‍चर्य म्हणजे या जलदुर्गावरचा ‘वाय’ आकाराच्या दोन फांद्या फुटलेला माड. (मात्र, आता हा माड नाही). या जलदुर्गावर मी ऐन उन्हात भ्रमंती केलीये आणि नंतर किल्ल्यात मिळणारं लाल-गुलाबी चविष्ट कोकम सरबत पिऊन तृप्तही झालोय. फिरत असताना उन्हात चमकणारा, उसळत्या लाटा सिंधुदुर्गावर आदळवणाऱ्या सागरानं मला कायम मोहात पाडलंय. सभोवताली खारट पाणी असणाऱ्या सिंधुदुर्गात गोड्या पाण्याच्या विहिरी असणं ही एक कमाल! आजही या किल्ल्यात वस्ती आहे. 

मालवणमध्ये फिरताना आजूबाजूलाही खूप काही पाहण्यासारखं असल्याचं लक्षात आलं. एक धोरण मी ठेवलं - सगळ्या ‘स्पॉट’ला एकदम भेट नाही द्यायची. उरवून-पुरवून फिरायचं. त्याचा फायदा म्हणजे, त्या भागात पुन्हा जाणं होतं आणि पाहण्यासारखं सगळं निवांतपणानं पाहूनही होतं. खुद्द मालवणात दोन किनारे. एक गजबजलेला, दुसरा जरा शांत. तो आहे चिवला किनारा. शेजारीच रॉक गार्डन. अशाच एका भेटीत या चिवला बीचवर मला सूर्यास्ताची काही सुरेख छायाचित्रं मिळाली. मालवणच्या जवळच आहेत आताचे ‘टुरिस्ट हॉटस्पॉट’ तारकर्ली आणि देवबाग. तिकडं जाणाऱ्या रस्त्याच्या दोन्ही बाजूंना निवास-न्याहारीची सोय असलेली घरं आहेत. काही आधुनिक झाली आहेत, तर काही अगदी मांगरासह अस्सल कोकणी राहिली आहेत. या दोन्ही गावांमध्ये समुद्र सतत भेटत राहतो. देवबागमध्ये खाडी आणि सागराचा संगम होतो. तेथील सूर्यास्त टिपण्यासाठी छायाचित्रकारांना भरपूर संधी असते. पूर्वी ही गावं शांत होती, पण काळाबरोबर बदलत तीही आधुनिकतेचा साज ल्यायला लागली आहेत. हॉटेल, निवास, बोटिंग आदी मार्गांनी स्थानिकांनाही रोजगार उपलब्ध झाला आहे. याच देवबागजवळ एकदा मी एक सुरेख सायंकाळ अनुभवली होती. 

देवगडकडं जाणाऱ्या रस्त्यानं मालवणबाहेर पडलात, की भेटतो सर्जेकोट. झाडाझुडपांत आता हा किल्ला अडकला आहे. पुढं गुंफेतलं एक छोटं मंदिरही आहे. मालवणकडून देवगडकडं जाणाऱ्या रस्त्यावर एक से एक जागा आहेत हे पहिल्याच भेटीत लक्षात आलं. देवगड प्रसिद्ध आहे ते मुख्यत्वे हापूस आंब्यासाठी. ऐन एप्रिल-मेमध्ये जामसंडेपासूनच आंब्याचा घमघमाट दरवळायला लागतो तो थेट देवगडपर्यंत. पण देवगडला खाडी आहे आणि किल्लाही. थेट वरपर्यंत रस्ता असल्यानं आणि किल्लाही फार उंच नसल्यानं तिथं अवश्‍य जावं. वर एक गणपती मंदिरही आहे. किल्ल्यावरून समोर अरबी समुद्राची निळाई डोळ्यांना तृप्त करते. याच परिसरात काही सुंदर ठिकाणंही आहेत. त्यातलंच एक म्हणजे ‘पूर्वेकडील जिब्राल्टर’ म्हणून ओळखला जाणारा किल्ले घेरिया ऊर्फ विजयदुर्ग. केवळ इतिहासाशीच नव्हे, विज्ञानाबरोबरही या किल्ल्याचा संबंध आहे, कारण हेलियम वायूचा शोध येथेच लागला. हा किल्ला एकदम सोपा. सरळ जायचं आणि किल्ला पाहायचा. अद्यापही तो बराच सुस्थितीत आहे. सुरेख छायाचित्रं इथं काढता येतात. विजयदुर्गाच्या अलीकडं तीन किलोमीटवर वाटेत गिर्येचं रामेश्‍वर मंदिरही पाहता येईल. या मंदिरातील जुनी चित्रं पाहण्याजोगी. 

देवगड तालुक्‍यातलंच आणखी एक प्रसिद्ध ठिकाण म्हणजे कुणकेश्‍वर मंदिर. मंदिराच्या मागं सागराची अखंड गाज सुरू असते आणि मंदिराच्या प्रांगणातही ती ऐकू येत असते. हे मंदिरही सुंदर आहे. आता थोडं तांबळडेगविषयी. हा अतिसुंदर किनारा आहे. पाण्याचा रंग मोरपंखी आहे. याच किनाऱ्यावर एका उंचवट्यावर मंदिर आहे. तेथून किनाऱ्याचा नजारा अप्रतिम दिसतो. स्थलांतरित कासवं या किनाऱ्यावर अंडी घालायला येतात आणि स्थानिक मंडळी त्यांची काळजी घेतात असं समजलं. तांबळडेगचा निरोप घेतला, की तोंडवळीचा किनारा लगेच साद घालतो. या किनाऱ्याला मस्त सुरूबनाची साथ लाभलीये. अगदी प्रथम तिथं गेलो होतो तेव्हा बनात एखाद-दुसरं घर होतं. या भेटीत ती संख्या जरा वाढलेली दिसली; पण निसर्ग तसाच आहे. या बीचवर नुसतं बसून राहणं हाही सुखाचा अनुभव आहे. बनाबाहेर एक मंदिर आहे. ते आहे व्याघ्रेश्‍वरीचं. मंदिरात वाघांचे दोन पुतळेही आहेत. या मंदिरात मध्यरात्री एक वाघ येऊन जातो अशी स्थानिक आख्यायिका आहे. तोंडवळीकडं जातानाच आचऱ्याचं रामेश्‍वर मंदिरही पाहता येतं. (मोटर सायकल नेण्याचा हा फायदा फार असतो. हवं तेव्हा हवं तिकडं हॅंडल वळवावं आणि गाडी पळवावी). 

मालवणकडून सावंतवाडीकडं जायचं असेल, तर ‘कोस्टल रोड’ पकडावा. या रस्त्यावरील गावांमध्ये असलेली जुनी मंदिरं पाहत पुढं जाता येतं. वाटेत खाड्यांवरचे पूल पक्षी निरीक्षणाची संधी देतात. त्यात रस नसेल, तर हिरवागार निसर्ग साथ देत राहतो. या रस्त्यानं जाताना किल्ले निवतीकडं जाता येतं. किल्ल्याचे फार अवशेष शिल्लक नसले, तरी किनारा मस्तच. समुद्रातले चित्र-विचित्र आकाराचे खडक पाहण्यासारखे. खुद्द वेंगुर्ल्यात सागर अक्षरशः उसळत असतो. तेथील सरकारी विश्रामधामापासून तो पाहणं म्हणजे ‘अनुभवणं’ असतं एवढं सांगितलं तरी पुरे! वेंगुर्ल्यापलीकडं आहे वेळागर किनारा. फारा वर्षांपूर्वी तिथं जाणं झालं, पण नंतर अजून ते जमलेलं नाही. 

स्थानिक, अस्सल खाद्यपदार्थांचा आस्वाद हा एक भटकंतीतला एक ‘वीक पॉइंट.’ कोकणात तर चंगळच. भरपूर खोबरं आणि खास स्वादाचे मसाले घातलेली कालवणं चाखून जिभेचे लाड पुरवायला मला आवडतं. शाकाहार-मांसाहार-मस्त्याहाराला मी जमेल तसा न्याय देतो. पण खरा जोर मत्स्याहारावरच. अर्थात, शाकाहारी पदार्थही तसेच रुचकर असतात हे नमूद करायला हवं. ते करणाऱ्यांना मनापासून धन्यवाद देत मी त्यांचा आस्वाद घेतो. 

खरं तर कोकणाचा परिसरच एवढा सुंदर आहे, की ‘काय पाहायचं?’ हा प्रश्‍न उद्‌भवत नाही. (निदान माझ्याबाबतीत). समोर अथांग सागर आहे, आकाशातील सूर्य किंवा चंद्राच्या किंवा चांदण्यांच्या अथवा तिथीच्या उपस्थितीनुसार त्याचे ‘मूड’ आणि पाण्याचे रंग बदलत आहेत, मस्त वारा वाहतोय आणि आपण स्वस्थ बसलोय... स्वर्गसुख म्हणतात ते दुसरं काय असावं? 

भटकंती चालूच असते. ‘चरवैती चरवैती’ म्हणतात. माझी भ्रमंती सुरू आहे. ती अशीच चालू राहावी, नवनवी ठिकाणं बघता यावीत आणि ‘दुबळी माझी झोळी’ निखळ आनंदानं भरून जावी एवढीच इच्छा! नाही तरी कोकणाच्या भटकंतीत माझी काय वेगळी अवस्था असते?

फोटो फीचर

संबंधित बातम्या