‘केटकिचन’चा ट्रेल!

उदय ठाकूरदेसाई
शनिवार, 13 जानेवारी 2018

साहसी पर्यटन
अलास्काच्या सफरीवर जाल, तेव्हा बरेच पैसे, क्रेडिट कार्डस बरोबर घेऊन जा. कारण नेहमीच्या मौजमजेव्यतिरिक्त त्या सफारीत, अलास्काच्या भूभागावर उतरल्यावर अनेक थरार अनुभवता येतात आणि त्यात भाग घेण्यासाठी लहान - थोरांपर्यंत इतके विपुल पर्याय उपलब्ध असतात की काही बोलताना सोय नाही!

खरं तर कॅनडा - अलास्काच्या प्रवासाला निघण्यापूर्वी आम्हाला अलास्काच्या क्रुझमधल्या प्रवासादरम्यान कोणती आकर्षणं आहेत, याबद्दल कसलीच माहिती नव्हती! किंबहुना अलास्कामध्ये जमिनीवर उतरायला मिळेल, याची देखील शाश्‍वती नव्हती. कारण ‘क्रुझमधून प्रवास’ एवढंच डोक्‍यात होतं. प्रत्यक्षात मात्र ‘सेलिब्रिटी सेंच्युरी’ या आलिशान क्रूझमधून प्रवास करताना, क्रुझवरील स्वप्नील वास्तव्याचा अनोखा आनंद तर मिळालाच; परंतु ‘जुनौ’मध्ये स्वप्नवत वाटणारी आणि त्यामुळे केवळ कल्पनेतच असणाऱ्या ‘ॲगस्लेड’मध्ये (बर्फाळ प्रदेशात कुत्र्याने ओढलेल्या गाडीतून फेरफटका) बसण्याची संधी मिळाली. तर ट्रेकिंग चांगलंच माहिती असलेल्या आम्हाला केटकिचन येथे ट्रेक करायची संधी मिळाली.

वाचकहो, तुम्ही जेव्हा अलास्काच्या सफरीवर जाल, तेव्हा बरेच पैसे, क्रेडिट कार्डस बरोबर घेऊन जा. कारण नेहमीच्या मौजमजेव्यतिरिक्त त्या सफारीत, अलास्काच्या भूभागावर उतरल्यावर अनेक थरार अनुभवता येतात आणि त्यात भाग घेण्यासाठी लहान - थोरांपर्यंत इतके विपुल पर्याय उपलब्ध असतात की काही बोलताना सोय नाही!

हां परंतु एक आहे. क्रुझवर साधारण तीन - साडेतीन हजार पर्यटक असल्याने या थरार मोहिमा पटकन भरतात आणि तुम्ही उशिरा काऊंटरवर पोचल्यावर त्या फुल्ल झाल्याचं तुम्हाला ऐकायला येण्याच्या आत तुम्ही त्या सफारी बुक करून टाकायच्या असतात.

स्वाती आणि मी ॲगल्सेड, झिपराईडनंतर ट्रेकिंगची सफारी बुक केली. आमच्याबरोबरच्या जोन मैत्रिणींना भेटल्यावर सहज सांगितलं. त्यावर त्या दोन मैत्रिणी, ‘‘आम्हाला जमेल का? म्हणू लागल्या. त्यातल्या एकीने सांगितलं, ‘‘माझ्याजवळ सॅंडल्स आहेत, बूट नाहीयेत, चालेला का?’’ मी म्हटलं ‘इथं सुरक्षेच्या नावाखाली किरकिर करतील. परंतु आपण दामटवून नेऊ’ झालं. ३४०० पर्यटकांपैकी अवघे ९ जण पैसे देऊन स्वतःला दमवायला तयार झाले. त्या ९ जणांत आम्ही चौघे जण भारतीय होतो. एकमेकाला परिचित होतो.

सुरवातीच्या माहितीपत्रकात ‘हायकिंग’ असा शब्द असला, तरी पुढे सर्वत्र ट्रेल असा शब्द वापरल्याने, आमची हाईक ही खरी म्हणजे नयनरम्य रपेट असणार असा मी जो अंदाज बांधला होता, तो खरा झालेला पुढच्या प्रवासात पाहायला मिळाला.

क्रुझवरच्या लोकांचे बोलणं पूर्ण व्यावसायिक आणि अर्थातच पाश्‍चिमात्य पद्धतीचं असतं. सर्वाथानं!! क्रुझवरच्या कॅप्टनने सांगितलं, ‘‘क्रूझ तुम्हाला घेतल्याशिवाय निघणार नाही. तुमची पूर्ण काळजी घेण्यात येईल परंतु, दिलेल्या वेळेच्यानंतर एक सेकंदाचा जरी विलंब लागला तरी क्रूझ तुमच्यासाठी थांबणार नाही. आता केटचिकनवरून निघून क्रूझ तडक व्हॅकुवरला (कॅनडा)ला जाणार असल्यानं तुम्ही उशीर केलात, तर तुम्हाला तुमच्या खर्चाने परतावं लागले. आता ही सूचना होती की धमकी होती हे समजण्यातच आमची ५-१० मिनिटं गेली.

क्रूझमधून तिसऱ्यांदा आणि अखेरच्या वेळी अलास्काच्या भूभागावर केटचिकनमध्ये उतरताना, पुन्हा एकदा कमालीचा आनंद झाला. उतरल्या उतरल्या आमच्या ट्रेकिंग गुरूला - रॉबर्टला भेटून बरोबरीच्या मोजक्‍याच सहकाऱ्यांना तोंडदेखलं भेटून आम्ही रॉबर्टनं आणलेल्या वॅनमध्ये बसलो.

रॉबर्टनं विचारलं, ‘‘आज सूर्योदय कितीला झाला किंवा सूर्यास्त कधी होणार?’’ आम्हा सर्वांचे अंदाज चुकल्यावर म्हणाला, आज सूर्योदय झाला पहाटे ४.११ ला आणि सूर्यास्त होईल रात्री ९.२५ ला! त्यामुळे तुमची वेळ पाळून, ट्रेक संपल्यावर केटचिकनला मजा करा, असं सांगून त्याने आपल्याजवळची पाण्याची एक-एक पाण्याची बाटली सर्वांना देऊ केली.

आम्ही टोंगा रेनफॉरेस्टच्या प्रवेशद्वारापाशी येऊन थांबलो. रॉबर्टनं सांगितलं, या विभागाला रेविलॅगिगेडो आयलंड म्हणतात. या विभागात देवदारची झाडं खूप आहेत. विषारी वनस्पती आहेत. सदा हिरवी राहणारी झाडं आहेत. टाकू, हायडा, शिमसियन आणि प्रमुख त्लिंगिट (Tlingit) या जमाती या झाडांच्या खोडापासून बोट बनवतात, वेगवेगळी वाद्यं बनवतात, लाकडा कोरीव काम करून देखणं शिल्प बनवतात, झाडपाल्यापासून औषधं तयार करतात आणि मासेमारी करून उपजीविका करतात. एव्हाना आम्हाला कळून चुकलं, की छोटेखानी ट्रेल असल्यानं रॉबर्टला ऐकतच सफर करावी लागणार आहे!

त्यानंतर टोंगा रेनफॉरेस्टच्या प्रवेशद्वाराजवळ त्यानं सांगितलं, की ज्यांना फ्रेश व्हायचंय त्यांनी फ्रेश होऊन या. आत दोन-अडीच तास चालताना जंगलात काही संधी मिळणार नाही. मला आपली सह्याद्री आणि हिमालयातील ट्रेकिंगची आठवण झाली. ना आम्हाला कोणी अशा सूचना दिल्या, आम्हाला कधी या (कुठेही कधीही लघुशंका करण्याचं काही वाटलं! कारण जागोजागी टॉयलेटस्‌ बांधलेल्या नव्हत्या ना!) गोष्टीचं कधी अवडंबर वाटलं! 

त्यानंतर रॉबर्टनं मैत्रिणीच्या पायातल्या सॅंडल्स पाहिल्या मात्र... त्याला जे टेंशन आलं... हायकिंगला सॅंडल्स कशा चालणार? काही झालं तर काय करायचं वगैरे वगैरे...

मला हसायला आलं. बिचाऱ्या रॉबर्टनं पावसात स्लीपर्स घालून, हरिश्‍चंद्रगड, प्रबळगड चढणारी अतिरेकी मंडळी पाहिली नव्हती. नाहीतर एवढ्या सपाट रस्त्यावर सॅंडल्स घालून चालताना त्याला प्रश्‍न पडला नसता.

आम्हाला रेनफॉरेस्टचं महत्त्व सांगताना, तिकडच्या जमातींची वर्णन सांगताना किंवा अस्वलानं अचानक हल्ला केलाच तर पेपर स्प्रे कसा मारायचा याचं प्रात्यक्षिक दाखवताना तो मनापासून सारं करतोय असं वाटायचं. वनस्पतीशास्त्राचा जाणकार असल्यानं झाडं, पानं, फुलं, पक्षी यांची बारीक माहिती तो, तुमची इच्छा पूर्ण होईपर्यंत सांगायचा. जंगलातल्या एका प्राचीन झाडाच्या खोडाजवळ स्वातीला - मला उभं करून, फोटो काढायला लावून, एका बाजूनं अखंड माहितीचा खजिना तो रिता करीत होता. वेगळी नावं असलेली झाडं, त्यांची शास्त्रीय नावं ऐकता - ऐकता आम्ही दमून गेलो.

मी हळूच ग्रुपपासून अलग होऊन जंगलातील नीरव शांतता, सभोवार असलेली हिरवाई, पाण्यात उतरलेला हिरवाईचा हिरवेपणा, जंगलात अखंड चालू असलेला निसर्गाचा चक्रेन मिक्रम आदी पाहण्यात आणि फोटो काढण्यात दंग झालो. परंतु थोड्याशा विश्रांतीनंतर ग्रुपमध्ये मिसळणं आवश्‍यकच होतं ना?

रॉबर्टच्या पाठोपाठ दाट हिरवाईतून फिरताना शिट्या मारल्याचा आवाज यायचा रॉबर्ट दरवेळी, ‘शिट्टीचा आवाज ऐकला का?’ असं विचारायचा. जेव्हा शिट्यांची लांबचलांब गुंफण एकत्रितपणं कानावर आली, तेव्हा ती वेळ साधून रॉबर्ट म्हणाला, ‘हा वेरिड थ्रश’. हा रखवालदार मारतो तशा शिट्या मारतो.’’

आता खरं सांगायचं, तर पाना-फुलांच्या माहितीत त्यानं गुंगवून टाकल्यानं सगळं लक्ष भवताल बघण्यात, माहिती ऐकण्यात, गुपचूप फोटो काढण्यात असताना, वर वाजणारी शिट्टी सांगेपर्यंत जाणवली नव्हती हे तर सत्य होतं. त्याहूनही खरं सांगायचं तर ‘वेरीड थ्रश’ हे एका पक्ष्याचं नाव म्हणून ऐकायला अपरिचित वाटण्याबरोबरच आपलं... ओळखीचं नाही असं वाटणारं होतं. त्यानंतर रॉबर्टनं बरोबर तळ्याच्या दूरच्या टोकावर एका निष्पर्ण वृक्षाच्या खोडावर बसलेला ‘टकली गरुड’ दाखवला. याचा परिचय होता ‘हूना’ इथं त्याला मनसोक्त पाहिला होता. तो पाहा ‘विंटर रेन’ म्हणून गाणाऱ्या पक्ष्याकडे त्याने बोट केलं. उभी वर जाणारी शेपटी असलेला तो पक्षी आम्ही काही गाताना पाहिला नाही, पण त्याचं दर्शन मात्र जरूर झालं. या आमच्या अडीच तासांच्या फेरीत असे ईन-मीन-तीन पक्षी बघायला मिळाले. आम्ही सोबत नेलेल्या दुर्बिणीतून ती चांगले पाहायला मिळाले. परंतु याशिवाय त्या जंगलात आम्हाला काहीही खास म्हणावं असं बघायला मिळालं नाही!

खरं तर आमच्या भटकंतीत दमावं, थकावं असं काही नव्हतं. कारण एक तर आखीव रस्ता होता. खतरनाक चढ नव्हते. मोठे उतार नव्हते. तरीही रॉबर्टची सर्वांची काळजी घेणं चालूच होतं. आमच्या मैत्रिणीला, ‘‘पायाला त्रास होत नाही ना?’’ असं सारखं विचारत होता. तिनं बूट न घातल्याचं त्यालाच प्रचंड टेंशन आलं होतं! ट्रेकचा शेवट जवळ आल्यावर आम्ही आमच्या मैत्रिणीच्या नावाने तिला परदेशात प्रथमच ट्रेक केल्याचा आनंद व्हावा (पहिलाच ट्रेक तो ही परदेशात) म्हणून सगळ्यांपासून तुटून - पुढं जाऊन एकच कल्ला केला. त्या एकमेव मोठ्या आवाजाच्या गमतीने आमचा ट्रेक - सोकॉल्ड ५ किमीची हाईक - पण खरा तर सोपा ट्रेल पूर्ण झाला.

परतताना खूष होऊन रॉबर्टनं चिमुकल्या केटचिकन शहरातल्या गल्लीबोळातून आम्हाला फिरवलं. भारती ज्वेलर्सच्या दुकानाजवळ आम्हाला सोडून, आश्‍चर्याचा अखेरचा धक्का देत आमचा निरोप घेतला.

भारतीय ज्वेलर्स? आणि केटचिकनमध्ये? आम्हाला खरं तर हा धक्का होता. सुंदर मराठी बोलणाऱ्या त्यांच्यातल्या एकानं आम्ही सगळे सुरतचे व्यापारधंद्यानिमित्त इथं आलो, असं सांगून खरेदी अगोदरची मोकळीक अनुभवू दिली. खरं तर जेव्हा आम्ही २०११ मध्ये न्यूझीलंडमधील क्वीन्स टाऊनवरून मिलफोर्ड साऊंडला चाललो होतो, तेव्हा ‘टी-अनू’ या अप्रतिम देखण्या गावाजवळ थांबलो होतो. तिकडच्या सोनेरी किरणातल्या चमकदार वातावरणात तिथं भरपूर ट्रेकिंग ऑप्शन्स उपलब्ध असल्याचं कळलं होतं. त्यामुळं पटकन ट्रेकिंगला जाण्याचा मोह झाला होता. परंतु तेव्हा जे जमलं नव्हतं, ते आणखी तीनच वर्षांनी करायची संधी मिळाली!

फोटो फीचर

संबंधित बातम्या