रातव्याचा चकवा

उमेश वाघेला
बुधवार, 24 जून 2020

सूर्यास्त झाला... गार वारा सुटला होता. त्या वाऱ्‍याने दिवसभराचा शीण निघून गेला. सूर्य मावळताच चारही दिशेला अंधाराचे साम्राज्य पसरू लागले. अगदी चिडीचूप शांतता पसरली होती. एवढ्यात आम्हाला ‘चक, चक’ असे आवाज ऐकू येऊ लागले... अरे हा तर रातव्याचा आवाज! 

फणसाडचे जंगल स्वातंत्र्यपूर्व काळात नवाबाने स्वत:च्या शिकारीच्या  हौसेखातर राखून ठेवले होते. स्वातंत्र्यानंतर ते अभयारण्य म्हणून  घोषित झाले. या अभयारण्याला मी अनेकवेळा भेट दिली आहे. प्रत्येकवेळी वेगवेगळे आणि अविस्मरणीय असे थरारक अनुभव मला या गूढ जंगलाने दिले आहेत. फणसाडला पहिल्यांदा आलो तेव्हाच आम्ही या जंगलाच्या प्रेमात पडलो. पुन्हा लवकर यायचेच असे ठरवून निघालो होतो. ते इतके लवकर, की अगदी तीन महिन्यांतच आमची ही दुसरी भेट होती. २०१० चा मार्च महिना होता. दुपारनंतर सांबरगाणला निरीक्षणासाठी बसलो होतो. गाण म्हणजे छोटे तळे. परंतु, पाणी प्यायला सांबर काही फिरकले नाही. मधेच माकडांचे जोरजोरात आवाज येऊ लागले. पण साधा ससा किंवा एखादा  पक्षीसुद्धा दर्शनी पडला नाही. पक्ष्यांची हालचाल मंदावली होती. आम्ही थोडे खालच्या भागात घुम्याच्या माळावर जायचे ठरवले. घुम्याचा माळ म्हणजे चारही बाजूला दाट, गर्द हिरवीगार झाडी आणि मधेच विस्तीर्ण पसरलेला दगडगोट्यांचा सडा. अधेमधे कुठेही अगदी नावालासुद्धा एखादे खुरटे झुडूपसुद्धा नाही! थोडक्यात माळरान. जंगल वरून पाहता यावे यासाठी इथे एक मोठा लोखंडी वॉच टॉवर वनखात्याने उभारलेला आहे. तिघांचेही कॅमेरे, दुर्बीण, बॅगा सर्वकाही कारमध्येच ठेवून आमची कार टॉवरखाली लावून आम्ही  टॉवरवर चढलो. मी बरोबर फक्त एक टॉर्च घेतली होती. फणसाडला यायच्या आदल्या दिवशीच ही टॉर्च खरेदी केली होती.

टॉवरवरून अतिशय विहंगम  दॄश्य नजरेस पडते. जवळपासचे सर्व हिरवेगार डोंगर, चारही बाजूला दूरपर्यंत उंच दाट झाडी. त्यातून अनेक पक्ष्यांचे मधुर सूर कानी पडत होते. मात्र हे आवाज सकाळी येतात त्यापेक्षा वेगळे होते. रातथाऱ्‍यासाठी चांगली जागा पटकावण्यासाठी पक्ष्यांची आपसात होणारी ही स्पर्धा असते. सूर्य हळूहळू क्षितिजाकडे झुकू लागला होता. पक्ष्यांचे आवाजही कमी कमी होऊ लागले. संध्याकाळच्या साडेसहा वाजेपर्यंत सूर्यास्त झाला. मस्त गार वारा सुटला होता. या गार वाऱ्‍याने दिवसभराचा क्षीण निघून गेला. सूर्य मावळताच चारही दिशेला अंधाराचे साम्राज्य पसरू लागले. अगदी चिडिचूप शांतता पसरली होती. एवढ्यात आम्हाला ‘चक, चक’ असे आवाज ऐकू येऊ लागले. अरे हा तर रातव्याचा आवाज! 

आम्ही तिघेही एकदम उत्साहात आलो. चला रातवा शोधूया. टॉवरच्या तीन टप्प्याची सरळ शिडी उतरणे सोपे नव्हते. शिडी चढताना काही वाटले नव्हते, पण एक टप्पा उतरताच हे जाणवले. शिडीच्या दोन पायऱ्‍यांमध्ये अंतर होते तब्बल दोन फूट, वरून शिडीच्या काही पायऱ्‍या अधेमधे तुटलेल्या. म्हणजे अंदाज चुकला तर शिडी उतरण्याचे कष्ट कमी होऊन उतरणारा एकदम जमीनदोस्तच! अंधार इतका पसरला होता, की हाताला हात दिसणार नव्हता. मला बरोबर आणलेली टॉर्च आठवली आणि त्याच्या प्रकाशात आम्ही एकमेकांना खाली उतरायला मदत करू लागलो. खाली पोचेपर्यंत अंधार एकदम गडद झाला होता. 

टॉवरवर असताना फक्त एका रातव्याचा आवाज ऐकला होता, मात्र आता अनेक रातव्यांचे आवाज ऐकू येऊ लागले होते. अंधारात जमिनीवर बसलेल्या रातव्यांचे चमकणारे डोळे अधूनमधून दिसत होते. आम्ही तिघेही पायी चालत टॉर्चच्या प्रकाशात रातव्यांचा आवाजाकडे पुढे सरसावू लागलो. जसे पुढे जाऊ तसे यात अनेक रातव्यांचे आवाज वाढू लागले. टॉर्च फिरवत फिरवत आम्ही माळाच्या मधोमध पोचलो असू. तेवढ्यात समोर, माळाच्या कडेला, जिथे जंगल सुरू होते तिथे दूर विश्‍वनाथ भागवतांना दोन डोळे चमकताना दिसले. हे डोळे जमिनीपासून साधारण एक ते दीड फुटांवर होते. ते केव्हाचे सलग आमच्याकडेच बघत होते  आणि  अजिबात लुकलुकत नव्हते. भालचंद्र पुजारीची अचानक  ट्युब पेटली. त्याने खात्रीसाठी विचारले की  दोन्ही डोळे समोरच आहेत का? मग आपण इथेच मागे फिरूया, कारण घोडा, पक्षी, ससा आणि सांबराचे डोळे बाजूला असतात आणि... आणि दोन्ही डोळे समोर असतात ते कॅट फॅमिलीचे!  

झाले, एवढे म्हणताच आमच्या तिघांच्याही अंगावर काटा आला. घशाला कोरड पडली. पाचावर धारण बसली. पोटात गोळा उठला. भीतीमुळे ज्या काही रासायनिक प्रक्रिया शरीरात होतात, त्या सर्वकाही तिघांच्याही शरीरात अगदी एकाच वेळी झाल्या. समोर साक्षात या जंगलाचा राजकुमार, अर्थात बिबट्या होता. घाबरण्याचे कारणही तसेच होते. या जंगलात १९८० च्या दशकात बिबट्या मानवभक्षी झाला होता.  आम्ही निसर्गप्रेमी असल्यामुळे बचावासाठी कोणतेही हत्यार ठेवण्याचे कोणतेही कारणच नव्हते. सुरक्षेचे सर्वात मोठे साधन म्हणजे बरोबर असलेली एकमेव टॉर्च!  

आम्ही लगेचच मागे फिरलो. पण सरळ चाललो तर आपण कारपर्यंत पोचायच्या आधी बिबट्या आपल्याला केव्हा गाठेल ते समजणारसुद्धा नाही, म्हणून विश्‍वनाथ भागवत म्हणाले टॉर्चचा प्रकाश आपल्या वाटेवर समोर न ठेवता मागे बिबट्यावर ठेवूया! त्यामुळे बिबट्याला प्रकाशामागे कोण आहे ते समजणार नाही. टॉर्च हातात असूनही आम्ही आयुष्यात पहिल्यांदाच त्याचा उजेड आमच्या मागे ठेवून धडपडत पुढे चालू लागलो. आमच्या हृदयाचे ठोके, आम्हालाच जोरजोरात ऐकू येऊ लागले. अंधारात माळावरच्या दगडगोट्यांवर अनेक वेळा पाय मुरगळला. चोहीकडे अंधार दाटल्यामुळे दिशाभूल होऊ लागली. चालण्याशिवाय आमच्याकडे कोणताच पर्याय नव्हता. कारण बिबट्या था एक और आदमी तीन, बहुत नाइन्साफी थी  वह! मात्र बिबट्याला  एक  नव्हे, तर  चांगले  चार चार पर्याय होते. पहिला म्हणजे आम्हा तिघांमध्ये सडपातळ बांध्याच्या भालचंद्र पुजारीला मारून ब्रेकफास्ट करायचा किंवा मध्यम बांधा असलेल्या मला मारून लंच करायचे किंवा एकदम खातेपिते घरके धष्टपुष्ट असलेल्या विश्‍वनाथ भागवतांना मारून डिनर करायचे. सर्वात मोठा पर्याय होता तो म्हणजे आम्हा तिघांनाही मारून बिबट्याला मस्त पार्टी करता आली असती!    

सुमारे १०० मीटर अंतरावर असलेल्या बिबट्याला झेप घेऊन आमच्यावर चालून यायला कितीसा वेळ लागला असता. फक्त ५० मीटरवर असलेल्या आमच्या कारपर्यंत अंतर कापायला आम्हाला एक एक क्षण एक एक युगासारखा वाटू लागला होता. टॉवरखाली लावलेली कारसुद्धा अंधारात दिसत नव्हती. वेडेवाकडे चालत, धडपडत, वाटा चुकत, चाचपडत कसेबसे कारजवळ पोचलो. पोचताच कारचे दरवाजे उघडून आत बसताच  आमचा देह कारमध्ये आणि जीव भांड्यात पडला! रातव्याचा चकवा लागतो आणि 

माणूस जंगलात वाट चुकतो हे ऐकून, 

वाचून माहिती होते. पण आयुष्यात पहिल्यांदाच रातव्याचा चकवा अनुभवला. त्याने तर अगदी बिबट्याचा आमना-सामना घडवला.  कारपर्यंत पोचेपर्यंत आम्ही टॉर्च बिबट्यावर रोखून ठेवल्याने बिबट्यादेखील जागेवरच बसून राहिला होता. कारजवळ जाताच तो उठून जंगलात गायब झाला. तेव्हा एक रातवा अगदी आमच्या कारजवळ येऊन पुन्हा ‘चक, चक’ आवाज करू लागला. तोपर्यंत तर आम्ही विसरलोच होतो, की आपण काय शोधत होतो ते! विश्‍वनाथ भागवतांनी लगेचच जवळ आलेल्या रातव्याचा फोटो काढला. आता जेव्हा जेव्हा हा फोटो बघतो, तेव्हा बिबट्या भेटीचा थरारक अनुभव आठवतो, अगदी काल परवा घडल्यासारखा. 

संबंधित बातम्या