एव्हरेस्ट मोहिमा थांबतात तेव्हा...

उमेश झिरपे
सोमवार, 17 मे 2021

पर्यटन
 

एव्हरेस्ट... जगातील सर्वोच्च शिखर. जगभरातील गिर्यारोहकांना खुणावणारे, भुरळ घालणारे हे शिखर हिमालय पर्वतरांगेत नेपाळ व तिबेटच्या सीमेवर वसलेले आहे. जगातील प्रत्येक गिर्यारोहकाला एकदा तरी या पर्वतशिखरावर जाऊन नतमस्तक व्हावे वाटते. विसाव्या शतकाच्या पूर्वार्धापासूनच डोंगरदऱ्यांत- पर्वतरांगांत रमणाऱ्या माणसांना हे शिखर खुणावत होते. मात्र, शिखरावर उणे ४० अंशांहून कमी तापमान, वर्षभर प्रचंड वेगाने वाहणारे वारे आणि ऑक्सिजनचे अतिशय कमी म्हणजे एक-दोन टक्केच असलेले अस्तित्व, त्यात अतिशय आव्हानांनी भरलेला चढाई मार्ग यांमुळे शिखर चढाईत यश मिळेपर्यंत २०व्या शतकातील अर्धी म्हणजे पाच दशके सरली.

एकोणीसशे त्रेपन्न साली शेर्पा तेनसिंग नोर्गे व एडमंड हिलरी यांनी पहिल्यांदा एव्हरेस्टचा माथा गाठला. या घटनेने गिर्यारोहण जगताला गती देणारी कलाटणी दिली. आपणही हा शिखरमाथा गाठू शकतो, या विचाराने जगातील गिर्यारोहकांचा ओढा दरवर्षी एव्हरेस्टकडचा वाढतच गेला. पुढच्या काळात एव्हरेस्ट मोहिमा हे नेपाळच्या अर्थव्यवस्थेचा प्रमुख भाग झाल्या अन सुरू झाला एव्हरेस्ट चढाई मोहिमांचा न संपणारा, न थकणारा प्रवास. एकोणीसशे शहाण्णव साली कॅम्प ४वर, समुद्रसपाटीपासून आठ हजार मीटरहून अधिक उंचीवर वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे मोठा अपघात झाला. एव्हरेस्ट शिखर चढाईच्या इतिहासातील हा सर्वात दुर्दैवी अपघात होता. या अपघातामुळे १९९६च्या एव्हरेस्ट मोहिमांवर परिणाम झाला. काही मोहिमा थांबल्या, स्थगित झाल्या.. मात्र चढाईचा ‘मोसम’ चालू राहिला. नेपाळच्या अर्थव्यवस्थेला चालना देणारे व गिर्यारोहकांच्या मर्यादांना आव्हान देणाऱ्या ‘एव्हरेस्ट’वर मानवी पाऊल पडतच राहिले. या प्रवासाला पहिली खीळ बसली ती २०१४ साली.

 दरवर्षी मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून ते जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत एव्हरेस्ट शिखर चढाईसाठी अनुकूल असणारी ‘वेदर विंडो’ उपलब्ध होते. ही वेदर विंडो म्हणजे वर्षातील असे काही दिवस जेव्हा एव्हरेस्ट शिखरमाथ्यावर वाहणाऱ्या वाऱ्याचा वेग हा नेहमीपेक्षा कमी असतो. अशा वातावरणात चढाई करता येऊ शकते, म्हणून गिर्यारोहक मुख्यत्वे एप्रिल- मे महिन्यात शिखर चढाईसाठी नेपाळला येतात. मीदेखील २०१४ साली एव्हरेस्ट शिखर चढाई करण्यासाठी नेपाळमध्ये एव्हरेस्ट बेस कॅम्पवर होतो. ‘वेदर विंडो’च्या काही आठवडे आधीच बेस कॅम्पवर चढाईची लगबग सुरू होते. सर्व संघ आपले टेंट्स बेसकॅम्पवर लावतात. शेर्पा मंडळी वरच्या कॅम्प्सवर जाऊन चढाईची इतर तयारी करतात. बेस कॅम्पवरील दिवसाची सुरुवात अगदी पहाटे म्हणजे सकाळी चार किंवा त्याच्या आधीच होते. 

अशाच एके दिवशी वरच्या कॅम्पवर जाण्यासाठी काही शेर्पा पहाटेच रवाना झाले. बेस कॅम्पहून कॅम्प १वर जाणारा मार्ग हा अतिशय खडतर आहे, अगदी शिखरमाथ्याजवळच्या चढाईस तोडीस तोड. ‘खुंबू आईसफॉल’ असे या मार्गातील खडतर जागेचे नाव. काहीजण तर याला ‘डेथझोन’असेच म्हणतात. काही हजार टन वजन असलेले, अस्थिर असे आईस ब्लॉक्स, सोबतीला हिमभेगांमुळे पडलेल्या काही हजार फूट खोल दऱ्या अशा भागातून गिर्यारोहकांना चढाई करावी लागते. बरं ही चढाई शक्यतो पहाटे, ऊन पडण्याआधी करावी लागते. त्यामुळे बर्फ वितळण्याआधी तुम्ही ‘डेंजर झोन’मधून बाहेर पडून वरच्या भागात जाता. अन्यथा अस्थिर हिमभाग कोसळून अपघाताची शक्यता बळावते. हा खुंबू परिसर इतका अस्थिर आहे की ज्या मार्गाने शिडी टाकून, अथवा दोर टाकून चढाई केली असेल, तोच मार्ग परत येताना तसाच असेल अशी शाश्वती नाही. अगदी जीव मुठीत धरून येथे चढ-उतार करावी लागते. कसलेले गिर्यारोहक म्हणून ओळख असलेले शेर्पादेखील खुंबू आईसफॉलमधून चढ-उतार करताना देवाचा धावा करतात. 

अठरा एप्रिल २०१४च्या सकाळी याच खुंबू आईसफॉलमधून चढाई करत काही शेर्पा मंडळी वरच्या कॅम्पवर निघाली होती. त्या दिवशी सकाळी सातपर्यंत सामान्य दिवस होता, मात्र अचानक जोराचा आवाज झाला. एखादा डोंगरच खाली कोसळावा असा तो आवाज  होता. बेस कॅम्पला असलेले सर्वच जण आपआपल्या टेंटच्या बाहेर आले. मोठा हिमप्रपात (अॅव्हलांच) झाल्याचे स्पष्ट दिसत होते. लोला फेस भागातून आलेला हा प्रपात असावा, असे जाणवत होते. या घटनेनंतर बेसकॅम्पवर अतिशय चिंतेचे वातावरण होते, कारण ३०-३५ शेर्पा सकाळीच चढाईसाठी वर गेले होते. यातली बहुतांश शेर्पा मंडळी हिमप्रपातात अडकली. नेमके काय झाले आहे हे आम्हाला खाली कळत नव्हते. बेस कॅम्पवर असणाऱ्या ‘एचआरए’च्या क्लिनिकमध्ये हालचाली सुरू झाल्या. पहिली बातमी आली की अनेक शेर्पा मंडळी या हिमप्रपातात जखमी झाली आहेत. त्यांना मदतीची गरज आहे. रेस्क्यूसाठी लगोलग हेलिकॉप्टर तयार केले गेले. काही शेर्पा मंडळी खुंबू खोऱ्याकडे निघाली. आम्ही सर्व गिर्यारोहक ‘एचआरए क्लिनिक’ला एकत्र जमू लागलो. कारण जखमी शेर्पांवर पहिले उपचार येथेच होणार होते. जसजसा दिवस जाऊ लागला तसतसे एक-एक जखमी शेर्पाला खाली आणले जाऊ लागले. घिरट्या घालत हेलिकॉप्टर आले की काळजात धस्स होई. त्या दिवशी संध्याकाळपर्यंत रेस्क्यू मोहीम चालू होती. तब्बल १६ शेर्पांनी यात जीव गमवला होता, तर नऊ शेर्पा अपंगत्व येईल इतके जबर जखमी झाले होते.  बरं ही सर्व मंडळी कसलेली होती. त्यांना गिर्यारोहणाचा प्रदीर्घ अनुभव होता. यातील कित्येक जणांनी एव्हरेस्ट शिखरमाथ्यावर एकापेक्षा अधिकवेळा यशस्वी चढाई केली होती. त्यांच्यासाठी खुंबू आईसफॉल चढाई मार्ग काही नवीन नव्हता. अशा शेर्पांनादेखील आव्हान देणारा हिमप्रपात झाल्याने बेसकॅम्पवर चिंतातुर वातावरण होते. या घटनेमुळे अनेकांचे संसार उद्‍ध्वस्त झाले होते. एकाच घरातील दोन भाऊ, एकाच गावात राहणारे शेजारी अशांचा या दुर्घटनेत दुःखद मृत्यू झाला होता. शेर्पांनी, त्यांच्या कुटुंबांनी या घटनेचा इतका धसका घेतला होता की शिखर चढाई, हे गिर्यारोहण नकोच अशी भावना तयार होत होती. बेस कॅम्पवर असणाऱ्या सर्वच शेर्पांना शिखर चढाई करण्यात, मोहीम पुढे चालविण्याची इच्छा नव्हती. आपल्या मित्रांना गमावल्याचे दुःख होते. सरतेशेवटी २२ एप्रिल रोजी, घटनेच्या चार दिवसांनंतर त्या वर्षीच्या एव्हरेस्ट चढाई मोहिमांना तेथेच थांबवण्यात आले व दुःखद अपघातात बळी पडलेल्या शेर्पांना आदरांजली वाहण्यात आली. 

त्यावर्षीच चढाई मोसमाचा पूर्णविराम जारी झाला असला, तरी अनेक शेर्पांच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. खरेतर दोन महिन्यांच्या या चढाई मोसमामध्ये वर्षभराची पुंजी जमविणाऱ्या शेर्पांसाठी गिर्यारोहण, एव्हरेस्ट मोहिमाच ‘सबकुछ’ होते. मात्र जिवाच्या भीतीने पुन्हा त्या ‘डेथ झोन’मध्ये जाण्याची बहुतांश शेर्पांची मनस्थितीच नव्हती. या अपघातामुळे, धक्क्यामुळे काही शेर्पांनी गिर्यारोहण सोडले ते कायमचेच.. यात अनेक दिग्गज शेर्पादेखील होते. फुर्बा ताशी शेर्पासारख्या २१वेळा विश्वविक्रमी माऊंट एव्हरेस्ट शिखर चढाई केलेल्या शेर्पानेदेखील २०१४ सालचा अपघात अन २०१५ साली नेपाळमध्ये झालेल्या दुर्दैवी भूकंपानंतर गिर्यारोहणातून निवृत्ती स्वीकारली. खरेतर २२व्यांदा एव्हरेस्ट चढाई करून त्यावेळचा ‘सर्वाधिक वेळा माऊंट एव्हरेस्ट चढाई करण्याचा विश्वविक्रम’ फुर्बा ताशीला करता आला असता, मात्र २०१४च्या अपघातामुळे पुन्हा ‘एव्हरेस्ट’ करण्याची इच्छाच राहिली नव्हती. फुर्बा ताशीच्या मार्गावर त्यावर्षी अनेक गिर्यारोहक शेर्पा गेले. पुढील मोहिमांच्या वेळी त्यांची कमतरता मात्र सर्वांना जाणवत राहिली. त्या वर्षी एव्हरेस्ट चढाईचा मोसम शेर्पांनी व माझ्यासारख्या तमाम गिर्यारोहकांनी मध्यावरच सोडला. त्यावर्षी एकही शिखर चढाई होणार नाही, किंबहुना कोणीच शिखर चढाई करणार नाही, असेच चित्र होते. मात्र, २३ मे रोजी चीनच्या उद्योजिका वांग जिंग यांनी आपल्या पाच शेर्पा साथीदारांच्या समवेत शिखर चढाई केली. त्यांनी मात्र हेलिकॉप्टरच्या मदतीने थेट ६४०० मीटरवर वसलेले कॅम्प २ गाठले व तेथून पुढे चढाई केली. कॅम्प १च्या खाली असलेल्या खुंबू खोऱ्याच्या त्या वाटेलादेखील गेल्या नाहीत. त्यांच्या या चढाईवर अनेकांनी टीका केली. त्यांची शिखर चढाई ही नैतिकतेला धरून नव्हती, असे अनेकांचे मत होते. ही एकमेव चढाई वगळता, त्यावर्षी खऱ्या अर्थाने कुणीच एव्हरेस्ट चढाई केली नाही.

संबंधित बातम्या