स्वराज्याचा बुलंद पहारेकरी 

डॉ. अमर अडके, दुर्गअभ्यासक, गडकोट संवर्धन समिती सदस्य  
गुरुवार, 17 जानेवारी 2019

कव्हर स्टोरी : पर्यटन विशेष
 

पौर्णिमेच्या रात्री शिडीच्या वाटेने खांडसहून पश्‍चिमेच्या बाजूने भीमाशंकर चढताना, उजव्या हाताच्या पारगडापासून ते सिद्धगडाच्या डोंगररांगेपर्यंत चंद्रप्रकाशात निथळणारी सह्याद्रीची ती गिरीशिखरे, किती सुंदर दिसतात हे शब्दांत सांगणे कठीण आहे. उत्तररात्रीच्या पहिल्या प्रहरी डोक्‍यावरच्या चंद्रप्रकाशात न्हाऊन निघालेली ती शिखरे अक्षरशः वेड लावतात. सिद्धगडाच्या बालेकिल्ल्याचा कातळ अशा चंद्रप्रकाशात अधिकच खुलून दिसतो आणि सिद्धगड माचीवरचा चंद्रचांदण्यांच्या सोबतीचा मुक्काम ही एक रोमांचकारी अनुभूती असते. त्याच अनुभूतीच्या ओढीने आज सिद्धगडाकडे निघालो होतो... 

... भर दुपार होती. सिद्धगड माची लवकर गाठायची होती. कारण सिद्धगड माचीपर्यंत पोचणे म्हणजे कमीतकमी चार-पाच तासांची दरीतली उतरंड आणि पुन्हा चढाई होती. 

एकदा मनात आले, की खाली उतरण्यापेक्षा साखरमाची डाव्या हाताला ठेवून काकडमाळ नावाच्या जंगलातून थेट सिद्धगडच्या पहिल्या दरवाजापाशी पोचावे. पण रात्रीच्या मुक्कामाचे साहित्य, जेवणाचा शिधा खालीच होता. तो घेण्यासाठी उतरणे भाग होते. मग कारवीच्या वाळलेल्या काठ्यांमधून, मातीच्या घसाऱ्यावरून, वाळलेल्या तटातट तुटणाऱ्या गवतामधून, सुकलेल्या ओढ्यांमधून उतरायला सुरवात केली. ‘धापडपाडा’ या छोट्याशा वाडीच्या दिशेने आणि फुफाट्याच्या रस्त्याने तेथे पोचलो. या कच्च्या रस्त्याने वाहन वस्तीपर्यंत आले होते. शिधा आणि मुक्कामाचे सामान पाठीवर चढविले आणि गडपायथ्याच्या सिद्धगड पाडा या वाडीत पोचलो. चित्रातल्यासारखी वाडी.

खरेतर या वाडीतली सगळी माणसे पूर्वी सिद्धगड माचीवर राहात होती. आता बहुतांश या वाडीत राहतात. काही जणांची घरे अजूनही माचीवर राबती आहेत. 

एव्हाना दिवस मावळतीकडे झुकू लागला होता. वर पोचेपर्यंत अंधार होणारच होता पण होईल तितक्‍या लवकर वर पोचणे आवश्‍यक होते. एकतर दिवसभराच्या कष्टप्रद चढाई-उतराईमुळे दमछाक झालीच होती आणि अजूनही माचीपर्यंत दोन तासांची दमविणारी चढण होती. एवढे करून वर पोचल्यावर अन्न शिजवायचे होते. 

भीमाशंकरच्या पश्‍चिम पायथ्याच्या या दऱ्या-खोऱ्यात महादेव कोळी समाजाची वस्ती जास्त आहे. शिवकाळात या अरण्यपुत्रांनी स्वराज्याप्रती असामान्य योगदान दिले. 

का कुणास ठाऊक पण सकाळपासून बरोबर असणारा भालचंद्र वाटाड्या थकल्यासारखा वाटत होता. त्याची माघारी गावी ‘उचल्या’ला जायची इच्छा होती. मी बळेबळेच त्याला वर येण्यासाठी तयार केले. सिद्धगड माचीची वाट जरी मळलेली असली तरी रात्रीचा अंधार आणि मधल्या दोन ओढ्यांपाशी हरविलेली वाट याचा विचार करून आणखी एक स्थानिक माणूस बरोबर घ्यावा असे ठरवले. मग आम्हाला गोपाळ भेटला, मूळचा माचीवरचा पण आता खालीच राहणारा. सिद्धगडासह परिसरातल्या डोंगरदऱ्यांचा खडान्‌खडा माहीतगार, आमच्याकडचे सामान बघून गावकऱ्यांनी आणखी दोन माणसे बरोबर दिली 
आणि मावळतीच्या साक्षीने पाठीवरच्या ओझ्यासह आम्ही सिद्धगडाची माची चढू लागलो. 

संध्याकाळचे शांत जंगल काही वेगळीच अनुभूती देते. हळूहळू काळोखात बुडत जाणाऱ्या डोंगरदऱ्या, डोंगर शिखरे आणि झाडे, मग वर आकाशात लुकलुकणाऱ्या चांदण्या सोडल्या तर फक्त अवतीभवती अंधार आणि अंधारच. पायाखालच्या पाचोळ्याचा आवाजच काय तो सोबतीला असतो. मन कातर होते. 

दिवसभराची दमछाक, त्यात माचीपर्यंतचा चढही दमविणाराच! एक - दोन सहकाऱ्यांच्या पायांनी आणि शरीरांनी संप पुकारला. त्यांच्यात चैतन्य भरून त्या काळोखातून चढाई करत सिद्धगडाच्या पहिल्या दरवाजापाशी पोचलो. आता माचीवर जाण्याचा चढ संपला. आता २०-२५ मिनिटांत माचीच्या वस्तीवर जंगलवाटेने पोचायचे.. 

अजून बरेच सहकारी मागे होते, पण वाडीत पोचून स्वयंपाक तयार करणे आवश्‍यक होते. बरोबरच्या सवंगड्यांसह वाडीत पोचलो. डोंगराच्या खांद्यावरची इवलीशी वाडी. नमुनेदार पारंपरिक घरे, क्वचित लाइट-टीव्ही वगळता कसलाही आधुनिकतेचा स्पर्श नाही. डोंगराच्या अंगाखांद्यावरच्या अशा वाड्यांमधले जेवण आणि मुक्काम याचा आनंद काय वर्णावा! गावकऱ्यांशी मिसळून गेलो, सहकाऱ्यांनी स्वयंपाकाची तयारी सुरू केली, आम्ही त्यांचे मदतनीस. 

धापडपाडा किंवा सिद्धगड पाड्यापासून सिद्धगडाच्या पहिल्या दाराशी आले की चढ संपला. मग नरमाता मंदिर डावीकडे ठेवून येणारी मातीची प्रशस्त वाट थेट वाडीत पोचते. पहिल्यांदा उतरत्या कौलाची दगडात बांधलेली प्राथमिक शाळा, मग वाडी आणि शेवटी बारामाही पाण्याची दगडी बांधीव विहीर अशी ही डोंगराच्या कुशीतली सिद्धगडाच्या माचीवरची वस्ती. 

आम्हाला वाडीवर येऊन एक तास झाला. स्वयंपाकाची चूल तर पेटली होती पण चहाचा स्टोव्ह मागे राहिला होता. इतक्‍यात शाळेकडून आवाज येऊ लागला. भालचंद्रबरोबर मागे राहिलेले सर्वचजण येऊन पोचले. आल्या आल्या त्यांनी पथारीच अंथरली आणि पाय अंगणातल्या मांडवाच्या वाशाला लावून ताणून दिली ते थेट जेवायलाच उठले. 

एव्हाना स्वयंपाक तयार झाला होता. दिवसभराच्या श्रमामुळे भूक तर कडकडून लागली होती. बोरवाडीच्या दिशेने वर चढणाऱ्या सहकाऱ्यांशी संपर्क झाला होता. नुकतीच त्यांनी चढाईला सुरवात केली होती. किमान दीड ते दोन तास त्यांना वर यायला लागणार होते. त्यामुळे वरच्या लोकांनी जेवण करून घ्यायचे असे ठरले. शेवग्याच्या शेंगांची आमटी आणि व्हेज पुलाव असा बेत. सगळ्यांनी आडवातिडवा हात मारला. आवरा आवरी करून बहुतेक जण झोपी गेले. आम्ही काही जण विहिरीवर भांडी घासायला गेलो. उजवीकडून बॅटऱ्यांचे झोत आणि बोलण्याचे आवाज येऊ लागले. आवाज ओळखीचेच होते. बोरवाडीच्या कठीण चढाच्या वाटेने येणारे उरलेले सहकारी येऊन पोचले. 

मग पुन्हा एक खास पंगत, गप्पा.. नंतर आकाशाच्या छताखाली चांदण्याच्या शामियान्यात, डोंगराच्या कुशीतली झोप असा विसावा वर्णनाच्या पलीकडचा आहे. 

डोंगरावरच्या गार वाऱ्याने डोळा कधी लागला कळलेच नाही. भल्या पहाटे कोंबड्याच्या आरवण्याने जाग आली. पाहतो तो नुकतेच चार वाजले होते. पहाटेचा गारवा जाणवत होता. पुन्हा झोप काही येईना. उठून आवरू लागलो. माझ्या हालचालीने एकेकाला जाग येऊ लागली. पाच वाजेपर्यंत बहुतेक जण उठले. सगळ्यांची आवराआवर, बांधाबांध होईपर्यंत सात वाजले. पोहे आणि चहाचा बेत साकारला होता. असे सगळे जमेपर्यंत आठ वाजले, आता घाई करणे आवश्‍यक होते. कारण सिद्धगडाचा घसाऱ्याचा चढ चढायचा होता आणि तोही पूर्वेच्या बाजूने! त्यामुळे उन्हं तापण्यापूर्वी किमान माथ्यावर पोचायला हवे होते. सिद्धगडाच्या बालेकिल्ल्याची चढाई तशी अवघडच. घसाऱ्यामुळे आणखी जिकिरीची. महाराष्ट्रातल्या अवघड बालेकिल्ल्यांपैकी एक. त्यात साधूच्या गुहेपर्यंत थोडीफार झाडी. पण पुढे आडवे कातळ, घसारा आणि टोकदार पानांची काटेरी झुडपे, कालच्या चढाईच्या अनुभवामुळे आज मंडळी सावध होती. त्यामुळे सूचना कमी घ्याव्या लागत होत्या, पण मनात तणाव होताच. कस लावणाऱ्या चढाईने कळकळणाऱ्या उन्हात अखेर गडमाथ्यावर पोचलो आणि आनंदाने जल्लोष केला. ‘बोला शिवाजी महाराज की जय...’ घामजलेले सारे चेहरे दुर्गम चढाईच्या सांगतेने इतके आनंदले होते, की त्यांच्या चेहऱ्यावरचे समाधान पाहातच राहावे असे होते. 

गडमाथा, विस्तृत पठारभर वाळलेले गवत, पठाराचा विस्तार उत्तर - दक्षिण. दक्षिणेच्या बाजूला पाण्याची प्राचीन अशी अनेक टाकी. उत्तरेला एक-दोन जोती आणि टोकाला फडकणारा भगवा. डोक्‍यावर तापणारे ऊन असले तरी अवघे पठार भटकलो. कोणत्याही किल्ल्याच्या माथ्यावरून सभोवतीचा आसमंत न्याहाळणे हा एक रोमांच असतो. आपल्या सभोवती दूर क्षितिजापर्यंत डोंगराच्या रांगा आणि वाड्यावस्त्यांचे एक सुंदर निसर्गचित्र असते. 

आता परतीची वाट. घसाऱ्याचा चढ चढण्यापेक्षा उतरणे अवघड. जमिनीला भिडलेली नजर सुटता कामा नये. शरीराबरोबर मनाचाही कस. जपून उतरत होतो. एव्हाना सगळ्यांकडचे पाणी संपले होते. अखेर साधूच्या गुहेपर्यंतचा अवघड उतार संपला, गुहेच्या वरच्या अंगाला पाण्याची दोन टाकी. त्यातल्या दक्षिणेकडच्या टाक्‍यातले पाणी पिण्यायोग्य. बारमाही पाणी, थंडगार आणि चविष्ट पाण्याचे आकंठ प्राशन म्हणजे काय याची अनुभूतीच घेतली. 

पुन्हा वाडीपर्यंतची उतरण कमी घसाऱ्याची आणि झाडीतली. गर्द वृक्षांच्या छायेतून वाडीत शाळेजवळ पोचलो. मोहिमेच्या आनंदाचे उधाण अनुभवले. 

आता वाडीचा निरोप घेणे क्रमप्राप्त होते. खरेतर एक रात्रीचा मुक्काम. पण का कुणास ठाऊक वाडी जवळची वाटत होती. एक अनामिक नाते निर्माण झाले होते. 

सकाळीच बरेचसे सामान आवरले होते. उरलेले सामान, भांडीकुंडी बांधली आणि काफिला जांगुर्ड्याच्या दिशेने परतीला लागला. नारमाता मंदिरापर्यंत आलो. मंदिरात देवीचा तांदळा आहे. मूर्ती नाही. मंदिराबाजूच्या अनेक वीरगळी, सतीशीळा, भग्नमूर्ती आणि इतर भग्न अवशेष आहेत. नारमाता पंचक्रोशीचे श्रद्धास्थान. नारमाता किंवा तांदळामाता मंदिरापाशी परतीला डावी आणि उजवीकडे दोन रस्ते आहेत. डावीकडचा रस्ता काल आलेला सिद्धगड किंवा थापड पाड्यातून पहिल्या दरवाजाने आत येणारा आणि उजवीकडचा एक देखणा अवघड तीव्र उताराचा दोन कातळ कड्यांमधल्या नळीतला, साहसाला आमंत्रण देणारा. त्याला ‘जाक्रमाता घाट’ असे म्हणतात. वाट तीव्र उताराची, जागोजाग पाण्याच्या वाळलेल्या प्रवाहांमधून जाणारी, दगड-गोट्यातली तुटलेल्या शिळांमधून उतरणारी, घनदाट जंगलातली आणि ऋतूमुळे दमट उकाड्याची.. या उताराच्या वाटेने सिद्धगडच्या पायथ्याशी उतरलो ते एका धुळीच्या रस्त्यावर हा रस्ता म्हणजे जांगुर्डे धरण ते स्वतंत्र्य सैनिक भाई कोतवाल स्मारक इथपर्यंत जाणारा, जंगलखात्याच्या अखत्यारीतला रस्ता. 

तीव्र उकाड्याने हैराण झालेले आम्ही जांगुर्डे धरणाच्या पाण्यात यथेच्छ डुंबलो. जलाशयाच्या पलीकडे असणारा अवाढव्य सिद्धगड त्याचे जांगुर्डे धरणाच्या पाण्यात पडलेले देखणे प्रतिबिंब.. काय विलोभनीय दृश्‍य. आम्ही सगळे डोळे फाडफाडून सिद्धगडच्या माथ्याकडे पाहात होतो. काही तासांपूर्वी आकाशात शिरलेल्या त्या उत्तुंग डोंगरमाथ्यावर आम्ही होतो. आमचा विश्‍वासच बसत नव्हता. सह्याद्रीच्या त्या उन्नत माथ्याला वंदन केले, पाण्यातून बाहेर आलो. भात पिठल्यावर ताव मारला. 

भीमाशंकरच्या त्या डोंगररांगांना साष्टांग दंडवत घातला आणि साऱ्यांचा निरोप घेऊन परतीच्या प्रवासाला निघालो. पण मान सारखी वळत होती त्या डोंगररांगा दृष्टीआड होईपर्यंत, गोरखगड सिद्धगडापासून आम्ही दूर दूर जात होतो. पण मन मात्र अजून त्याच गिरिशिखरांवर रेंगाळत होते. 

फोटो फीचर

संबंधित बातम्या