प्रवासाचे प्रिस्क्रिप्शन

डॉ. अविनाश भोंडवे 
गुरुवार, 17 जानेवारी 2019

कव्हर स्टोरी : पर्यटन विशेष
 

आजमितीला पर्यटन हा भारतीयांच्या आयुष्यातला एक महत्त्वाचा हिस्सा बनला आहे. कधी कामानिमित्त, तर कधी केवळ सुटी एन्जॉय करण्यासाठी, कधी मित्रमंडळीसोबत जगातील काही वेगळ्या जीवनाला निरखण्यासाठी  छोट्या-मोठ्या सहली काढण्याकडे भारतीयांचा कल वाढत आहे. केवळ देशांतर्गत सहलीवर नव्हे, तर विदेशात सुटी व्यतीत करणाऱ्या भारतीयांच्या प्रमाणातही मोठी वाढ झाल्याचे दिसून येते. एकेकाळी फक्त श्रीमंतांचीच सद्दी समजला जाणारा परदेश प्रवास आता मध्यमवर्गीयांच्यादेखील आवाक्‍यात आला आहे.
या प्रवासासाठी पासपोर्ट-व्हिसापासून ऑफिसमधल्या रजेपर्यंत आणि कुठले एक्‍झॉटिक कपडे घालायचे इथपासून परदेशात कुठे काय विकत घ्यायचे इथपर्यंत सर्व गोष्टींची जय्यत तयारी अगदी डोळ्यात तेल घालून केली जाते. मात्र या साऱ्या लगबगीत एका गोष्टीकडे दुर्लक्ष होते, ते म्हणजे पर्यटन काळातील आपले आरोग्य.

पर्यटनपूर्व तपासणी
प्रवासाला जाण्याचा निर्णय घेण्यापूर्वी आपल्या आरोग्याची तपासणी डॉक्‍टरांकडून करून घ्यावी. प्रवासात तब्येत बिघडली, तर तुम्हाला तर त्रास होतोच, पण तुमच्या सोबत असलेल्या तुमच्या कुटुंबीयांच्या आणि मित्र-परिवाराच्या प्रवासातल्या आनंदावर विरजण पडू शकते. अशावेळेस संपूर्ण प्रवास रद्द करून परत घरी परतण्याची वेळदेखील येऊ शकते. केवळ परदेशातल्याच नाही तर आपल्या देशातल्या प्रवासातही हे महत्त्वाची असते.  

  • पन्नाशी उलटलेल्या व्यक्तींनी आपला रक्तदाब, रक्तातील साखर, हिमोग्लोबिन तपासून घ्यावे.
  • अतिशय दुर्गम किंवा पहाडी प्रदेशात तुम्ही जाणार असाल, तर श्वसनसंस्थेच्या आणि फुफ्फुसांच्या तपासण्या कराव्यात. लडाख, मानसरोवर, अमरनाथ किंवा अरुणाचल प्रदेश अशा ठिकाणी गेल्यावर श्वासोच्छवासाचा गंभीर त्रास उद्‌भवू शकतो.
  • प्रवासात जर खूप उंचावर चढायचे असेल तर पन्नाशी उलटलेल्या व्यक्तींनी हृदयविकार तज्ज्ञांकडून इसीजी, टू-डी-एको, स्ट्रेस टेस्ट करून घ्याव्यात. वैष्णोदेवीसारख्या खूप पायऱ्या चढाव्या लागणाऱ्या ठिकाणी हृदयविकाराचा झटका येऊन पर्यटक दगावण्याच्या घटना नेहमीच घडतात.
  • तुमच्या आजारांविषयी तुमच्या फॅमिली डॉक्‍टरांना माहिती असते. त्यामुळे या आजारांच्या प्रतिबंधक उपायांची माहिती आणि तुम्हाला जरुरी असणाऱ्या औषधांची यादी डॉक्‍टरकडून घ्यावी. 

लसीकरण 
 भारतातल्या काही भागात आणि निरनिराळ्या देशात, वेगवेगळ्या प्रकारच्या संसर्गजन्य आजारांच्या काही साथी सुरू असतात. या आजारांपासूनच आपले रक्षण आधीच व्हावे, म्हणून लसीकरण करून घेणे आवश्‍यक असते. त्यामुळे आपण जाणार आहोत त्या देशात त्यावेळेस एखाद्या आजाराची साथ चालू आहे किंवा कसे? याची माहिती घ्यावी. 
आफ्रिकन सफारीसाठी जाताना मलेरिया, डेंग्यूचा मोठ्या प्रमाणात साथी असतात. अमेरिकेतील काही राज्यांमध्ये श्वसनसंस्थेच्या आजारांची, तर काही ठिकाणी टायफॉईडची साथ असते. एकुणात पाहता परदेशी जाताना किंवा देशांतर्गत प्रवास करताना- हिपॅटायटिस ए, हिपॅटायटिस बी, टायफॉईड आणि पॅराटायफॉईड, मेनिंगोकॉकल डिसीज, यलो फीवर, रेबीज, जॅपनीज एन्केफेलायटिस अशा आजारांच्या लसी त्या त्या देशातील आजारांनुसार घ्याव्या लागतात.
लसीकरणाचा परिणाम होऊन त्या आजाराची प्रतिकारशक्ती शरीरात निर्माण व्हायला साधारणतः दोन ते तीन महिने लागतात. त्यामुळे प्रवासाच्या आधी चार ते सहा महिने लसीकरण करून घ्यावे. अन्यथा त्या लसींचा परिणाम सुरु न झाल्याने त्या निरुपयोगी ठरतात. 
काही देशांत विशिष्ट आजारांचे लसीकरण अनिवार्य असते. आपण त्या लसी घेतल्याचे त्या लसीच्या बॅच नंबरसह नोंदवलेले डॉक्‍टरांचे सर्टिफिकेट घेणे अनिवार्य असते. उदाहरणार्थ, आफ्रिकन देशांमध्ये जाण्याअगोदर ‘यलो फीवर’ची लस तर हाज यात्रेसाठी सौदी अरेबियाला जाताना पोलिओ व मेनिन्गोकॉकल लस आणि त्यांचे सर्टिफिकेट असावे लागतेच. 

आवश्‍यक औषधे
प्रवासाला जाताना औषधांचा एक वेगळा डबा न्यावा. त्यात तीन प्रकारची औषधे असावीत. 
    तुम्हाला नेहमी चालू असतील अशी औषधे, उदा. रक्तदाब, मधुमेह, संधिवात वगैरे. 
    तुम्हाला एखादा साधाच त्रास वरचेवर होत असेल तर त्यासाठी आवश्‍यक असलेली औषधे. औषधांची यादी तुमच्या फॅमिली डॉक्‍टरकडून घ्यावी. 
    याशिवाय सर्दी, खोकला, ताप, अंग दुखणे, उलटी, मळमळ, जुलाब, गाडी लागणे, डोके दुखणे, छातीत जळजळणे, चक्कर येणे अशा प्रकारच्या साध्या पण प्रवासात हमखास होणाऱ्या त्रासांसाठी असलेली औषधे.
ही सर्व औषधे नेण्यासाठी एम.बी.बी.एस. डॉक्‍टरांच्या लेटरपॅडवर त्यांची सही, शिक्का असलेले प्रिस्क्रिप्शन आवश्‍यक असते. ही औषधे विकत घेऊन तशीच बॅगेत नेली तर विमानतळावरच ती नेण्यापासून तुम्हाला रोखले जाऊ शकते. भारतातच ही औषधे लगेचच्या यादीत जाहीर करावी लागतात. परदेशात भारताप्रमाणे कुठल्याही मेडिकलमध्ये जाऊन तुम्ही कोणतीही औषधे खरेदी करू शकत नाही. ती खूप महागही पडतात. त्यामुळे भारतातूनच ही औषधे सोबत ठेवावी. या औषधांमध्ये नार्कोटिक्‍सयुक्त औषधे नसावी कारण अनेक देशांत ती बेकायदेशीर समजली जातात. या औषधांची बॅग तुम्ही प्रवासात जवळ बाळगावीत. कारण अनेकदा औषधे घेतलेली असतात, पण त्यांची बॅग सिटी टूर करताना हॉटेलच्या रूममध्ये ठेवली जाते किंवा बसच्या सामानाच्या कप्प्यात राहते आणि वेळेला काहीच मिळत नाही.  

लहान मुले
लहान मुलांच्या बाबतीत त्यांचे लसीकरणाच्या नोंदी असलेले कार्ड सोबत असायलाच लागते. मोठ्यांप्रमाणेच लहान मुलांची औषधे बालरोगतज्ज्ञांकडून सही करून घेतलेल्या प्रिस्किप्शनसह सोबत बाळगावी. कृत्रिम दुधाची पावडर, पॅसिफायर सोबत बाळगावे. विमान आकाशात उडताना तसेच विमानाचे लॅण्डिंग होताना, बाळाच्या तोंडात पॅसिफायर द्यावे. परदेशात प्रवास करताना चाइल्ड सेफ्टी सीट्‌सचा वापर करावा.

गरोदर स्त्रिया
भारतातील विमान कंपन्या गरोदर स्त्रियांना साधारणपणे  ३२ आठवडे (आठ महिने) पूर्ण झाले असल्यास त्यानंतरच्या काळात हवाई प्रवास नाकारतात. काही कंपन्या ३५ आठवड्यांपर्यंत परवानगी देतात. सात महिने पूर्ण झालेल्या गरोदर स्त्रीला विमान आकाशात असताना प्रसूतीवेदना सुरु झाल्या तर मोठा बाका प्रसंग निर्माण होतो, त्यामुळे त्याबाबत यथायोग्य नियोजन करावे. 
परदेशप्रवास करताना लागणारा दीर्घ काळ लक्षात घेतला तर २४ ते ४८ तासांचा हवाई प्रवास गरोदर स्त्रीला आणि तिच्या पोटातील बाळाला धोकादायक ठरू शकतो, त्यामुळे साधारणतः सहाव्या महिन्यानंतर विमानप्रवास टाळावा. देशांतर्गत प्रवासाबाबतीतही  रेल्वे किंवा बसचा दीर्घकालीन प्रवास आठव्या महिन्यानंतर टाळणे श्रेयस्कर ठरते.

प्रवासातील आहार

  • देशातील अथवा परदेशातील प्रवासात जेवणाअगोदर हात स्वच्छ धुवायला विसरू नये, कारण त्यातूनच जंतूसंसर्ग होतो. सर्दी खोकल्याचे आणि पोटाचे आजार त्यामुळेच होतात. 
  • सहसा शिजवलेले ताजे अन्न खावे. परदेशात मासे आणि सलाड्‌स खाणे टाळावे. कारण बहुसंख्य भारतीयांना या खाद्यपदार्थांमुळे अंगावर पुरळ उठण्याचा नाहीतर पोट बिघडण्याचा त्रास होऊ शकतो. 
  • आईस्क्रीम आणि दुधाचे पदार्थ टाळावेत. 
  • रस्त्यावरचे अन्न खाऊ नये. 
  • पाणी प्यायचे असेल तर मिनरल वॉटरचा आग्रह धरावा.
  • पोहण्याच्या तलावातच पोहावे इतरत्र पोहणे टाळावे. प्रवासादरम्यान पोहायची तयारी असेल तर आपला स्वतःचा कॉस्च्युम बाळगावा. तलावावर ठेवलेले कपडे वापरू नयेत.

गाडी लागणे
अनेकांना बसमध्ये, बोटीत, विमानात बसल्यावर उलट्या व्हायला लागतात. याला ‘मोशन सिकनेस’ म्हणतात. असा त्रास ज्यांना होतो, त्यांनी प्रवासाआधी तीन तास खूप जास्त जेवण करू नये, मर्यादित आहार घ्यावा. प्रवासादरम्यान हलके अन्न घ्यावे. प्रवासात मद्यपान, शीतपेये टाळावीत. हवाई प्रवासादरम्यान वाचन करणे किंवा टी.व्ही., व्हिडीओ पाहणे यामुळे गरगरल्यासारखे होते, उलट्या  होतात. शक्‍य असल्यास सीट सरकवून मागे रेलून बसावे. विमानातील हवेचा ब्लोअर सुरू ठेवावा. हवाई प्रवासात काहींचे कान दुखतात आणि कानात आवाज येतात. त्याकरिता विमान आकाशात झेपावण्यापूर्वी आणि लॅडिंग करण्यापूर्वी पाणी पिणे, गिळणे, चुईंगम खाणे किंवा वारंवार तोंड उघडण्याची क्रिया करावी. तोंड बंद ठेवून, नाक बंद ठेवून, नाकाद्वारे श्वास बाहेर सोडण्याचा प्रयत्न करावा. नाक बंद असेल तर नेझल स्प्रेचा वापर करावा.

सर्वसाधारण इअर प्लग्सपेक्षा फिल्टर्ड इअर प्लगचा वापर करावा. प्रवासाला निघताना ते बरोबर घ्यायला विसरू नये. 

काही जणांना पायांच्या रक्तवाहिन्यात रक्ताच्या गुठळ्या (थ्रॉम्बोसीस) निर्माण होण्याची शक्‍यता असते. हा त्रास गंभीर ठरू शकतो. या प्रवासाच्या आधी असा त्रास झालेला असेल तर डॉक्‍टरांच्या सल्ल्याने ॲस्पिरीन घ्यावे. सपोर्ट स्टॉकिंग्ज व सॉक्‍सचा वापर करावा विमानाच्या खुर्चीत बसल्यावर पाय सतत ताणून सरळ करणे, गुडघे ताठ करणे, तळपाय, पायाची बोटे, गुडघे हलवत राहणे असे व्यायाम करावेत. दर तासाला पाच मिनिटे टॉयलेटपर्यंत फिरून यावे. याशिवाय भरपूर पाणी प्यावे, सैल कपडे घालावेत. विमानातल्या प्रवासात शूज घालणे टाळावे. पाय दुमडून बसू नये.

भारतात काढलेला आरोग्यविमा परदेशात आजारी पडल्यास उपयोगी नसतो. साहजिकच बऱ्याच विमा कंपन्यांनी पर्यटनाच्या दृष्टीने अगदी पाच दिवसांइतक्‍या कमी कालावधीचा आरोग्य विमा उपलब्ध केला आहे. त्याचा वापर करावा. उदा. दुर्दैवाने परदेशात इस्पितळात दाखल होण्याची वेळ आली तर तुमच्यावर अतिरिक्त आर्थिक बोजा पडणार नाही. याकरता आंतरराष्ट्रीय प्रवासी आरोग्यविम्याचा जरूर वापर करावा. दीर्घकालीन आजार विमा घेताना आधीपासून असलेले आजार आणि त्रास त्यात प्रामाणिकपणे नमूद करावेत.

नेहमीच्या पठडीपेक्षा वेगळा आनंद मिळवण्यासाठी, काही तरी वेगळे अनुभवण्यासाठी किंवा रीलॅक्‍स होण्यासाठी पर्यटन केले जाते. आरोग्याबाबत त्यात काळजी घेतल्यास हा आनंद अबाधित राहू शकतो.

संबंधित बातम्या