आडवाटेवरची लेणी

ओंकार वर्तले
गुरुवार, 17 जानेवारी 2019

कव्हर स्टोरी : पर्यटन विशेष
अजिंठा-वेरुळची लेणी जगाच्या नकाशावर पोचली असली, तरी अशी अनेक लेणी महाराष्ट्रभर आहेत. सह्याद्रीच्या कडेकपारीत प्राचीन काळापासून दडलेली लेणी हे आपल्या महाराष्ट्राचे अस्सल सांस्कृतिक वैभव आहे. सह्याद्रीच्या अपरिचित लेणींविषयी...अजिंठा-वेरुळची लेणी जगाच्या नकाशावर पोचली असली, तरी अशी अनेक लेणी महाराष्ट्रभर आहेत. सह्याद्रीच्या कडेकपारीत प्राचीन काळापासून दडलेली लेणी हे आपल्या महाराष्ट्राचे अस्सल सांस्कृतिक वैभव आहे. सह्याद्रीच्या अपरिचित लेणींविषयी...

महाराष्ट्राला तर सह्याद्रीच्या रूपानं मोठा नैसर्गिक ठेवाच मिळाला आहे. या ठेव्याला इतिहासही मोठा आहे. उन्हाळा, पावसाळा, हिवाळा या तीनही ऋतूत हा सह्याद्री वेगवेगळा भासतो. त्याचे हे वेगळेपण हेच त्याचे वैशिष्ट्य बनून राहिले आहे. या रांगेवर विराजमान असणारे गड किल्ले, दऱ्या खोऱ्या, अभयारण्ये जंगले, पशू पक्षी जीवन, वनस्पती जीवन, निसर्गशिल्पे, प्राचीन मंदिरे हे सारं काही मंत्रमुग्ध करणारं आहे. प्रत्येक वयोगटासाठी या सह्याद्रीत काही ना काही वाढून ठेवलंय. फक्त आपली नजर शोधक हवी. त्यामुळेच सह्याद्रीकडे अनेक इतिहासकारांची पावले तर वळतातच, पण याव्यतिरिक्त निसर्गप्रेमी, संशोधक, पक्षीतज्ज्ञ, अभ्यासक, विद्यार्थी हेही सह्याद्रीवर फिरताना आढळतात.

महाराष्ट्राचा सांस्कृतिक, भौगोलिक आणि ऐतिहासिक वारसा सांभाळणाऱ्या सह्याद्रीवर अशीच एक नवलाई पाहायला मिळते. ही नवलाई म्हणजे लेणी! सह्याद्रीच्या काळ्याकभिन्न पत्थरात माणसाच्या हातून निर्मिली गेलेली सुंदर कलाकृती म्हणजे या लेणी. अगदी निसर्गानेही या निर्मितीचे कौतुक करावे अशीच. सह्याद्रीत अशा लेणी बऱ्याच ठिकाणी पाहायला मिळतात. या लेण्यांच्या निर्मितीचा इतिहासही मोठा रंजक आढळतो. बहुतेक लेणी या प्राचीन घाटवाटांवर खोदलेल्या आढळतात. महाराष्ट्राचे सह्याद्रीमुळे प्रामुख्याने दोन भौगोलिक भाग पडतात. एक म्हणजे कोकण आणि दुसरा देश म्हणजेच घाटमाथ्यावरील सर्व भाग. प्राचीन काळी या दोन भागांमधूनच दळणवळण आणि व्यापार चालत असे. अनेक राजसत्तांचे व्यापारी मार्ग या सह्याद्रीच्या पोटातूनच जास असे. परंतु हा मार्ग आणि प्रवास म्हणावा तसा सोपा नसे. सह्याद्रीची आडवी प्रचंड भिंतीची चढाई, किर्रर्र जंगल, वाटमारीचे भय, भरपूर पाऊस यामुळे या प्रवासात आश्रयाची किंवा विश्रांतीच्या ठिकाणांची गरज या लेणींच्या निर्मितीने पूर्ण झाली. कालांतराने या लेणींमध्ये उपासनेचेही व्यवस्था निर्माण करण्यात आली. या लेणी निर्माण करण्यात जसा कलावंतांचा हात होता तसाच तो राजसत्तेचाही होता. विविध राजसत्तांनी त्यांच्या प्रमुख दळणवळणाच्या मार्गावरच या लेणी निर्मिल्या. आज कालौघात भलेही या लेणींचे महत्त्व आपल्या दृष्टीने शून्य असेल, पण या साऱ्या कलाकृती म्हणजे महाराष्ट्राचा सांस्कृतिक ठेवाच आहे. तो आपण जपला पाहिजे.

दुर्दैवाने आज मोजक्‍याच लेणींना प्रसिद्धी मिळून त्या पर्यटकांच्या नकाशावर आल्या. पण आजही सह्याद्रीच्या कडेकपाऱ्यांत कितीतरी दुर्लक्षित लेणी आहेत. ज्या अजूनही सर्वसामान्य लोकांपर्यंत पोचल्या नाहीत. हेही तसं चांगलंच म्हणायला हरकत नाही. कारण मुंबईतील एलिफंटा, घारापुरी, पुण्याजवळील कार्ला-भाजे, औरंगाबादजवळील अजिंठा वेरूळ. येथील गर्दीचा लोंढा पाहिला किंवा येथील जागांना आलेले बाजारी स्वरूप पाहिले, की या लेणींकडे जाणे नकोसे वाटते. मुळात लेणी हा प्रकारच मुळी आस्वाद घेण्यासारखा आहे. लेण्यांचे भौगोलिक स्थान, त्यामधील कलाकुसर, स्थापत्य हा विषयच मुळी निवांतपणे पाहण्यासारखा असतो. अशा गजबजाटात हे पाहणे म्हणजे केवळ अशक्‍यच. या कोलाहलापासून दूर राहिलेल्या काही लेणी मात्र हा आनंद निश्‍चितपणे आपणाला मिळवून देतात. याच पंक्तीतल्या काही लेणी पाहू.

बेडसे लेणी
पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्‍याच्या पश्‍चिमेला असणारी ही लेणी बऱ्यापैकी दुर्लक्षित आहे. मावळ तालुक्‍याला निसर्गाच वरदान लाभले आहे. तुंग-तिकोना, लोहगड, विसापूर, राजमाची अशा गडकोटांनी समृद्ध बनलेल्या या परिसरात ही बौद्ध लेणी हजारो वर्षांपूर्वी निर्मिली गेली आहेत. पुणे-मुंबई जुन्या महामार्गावरील कामशेत या गावावरून साधारण १५ किमी अंतरावर बेडसे नावाचे गाव लागते. या गावातूनच लेणीकडे जाणारी वाट आहे. पुरातत्त्व खात्याने या लेणीपर्यंत जाण्यासाठी सुरेख पायऱ्या बांधल्या आहेत. पायऱ्यांपासून साधारण अर्ध्या तासातच आपण या लेणींपाशी पोचतो. चैत्यगृह, चैत्यविहार, पाण्याच्या टाक्‍या, अर्धवट अवस्थेत कोरलेले स्तूप असा हा लेणीचा भाग आहे.. यातील चैत्यगृह हे खूपच सुंदर असून या लेणींच्या मधोमध कोरलेले आहे. या चैत्यगृहाचा व्हरांडासुद्धा खूपच सुंदर असून या व्हरांड्यात आपल्याला एकूण चार अष्टकोनी आकाराचे खांब दिसतात. यातले दोन कडेचे खांब अर्धे भिंतीत असून अर्धे बाहेर आले आहेत. मधल्या दोन खांबांची कलाकुसर मात्र पाहण्यासारखी आहे. या खांबांच्या पुढेच चैत्यगृहाचे प्रवेशद्वार लागते. या द्वारावरती फुलांची नक्षी आणि शेजारील दगडी जाळी म्हणजे कलाकुसरीचा अप्रतिम नमुनाच! आतमध्ये दगडी स्तूप दिसतो. चैत्यगृहानंतरच्या शेजारचा विहारही पाहण्यासारखा आहे. ही लेणी पाहायला तासभर पुरतो. या लेणीचं वैशिष्ट्य म्हणजे येथे असणारी शांतता, निसर्गाचे सान्निध्य आणि सर्वांत महत्त्वाची म्हणजे स्वच्छता, कुटुंबकबिल्यासहीत एकदा तरी वेळ काढून पाहावी अशी ही लेणी आहे. यात शंकाच नाही.

गडदची दुर्गेश्‍वरी
खेड तालुका आणि मावळ तालुक्‍याच्या सीमेवर अगदी आडवाटेवर असणारं ‘गडद’ हे गाव भामा-आसखेड या धरणाच्या शेजारीच वसलेले आहे. पावसाळ्यात येथील निसर्ग म्हणजे स्वर्गच जणू उघडलेले दारच ! उन्हाळ्यातही येथील अदाकारी काही कमी नाही. म्हणूनच कुठल्याही ऋतूत या भामा नदीच्या खोऱ्यात आलो, की मन अगदीच प्रसन्न होऊन जातं. गडद हे गाव तासुबाई डोंगराच्या कुशीतच पहुडलेले आहे. आणि विशेष म्हणजे याच रांगेतल्या एका 
डोंगराच्या पोटात दुर्गेश्‍वरची लेणी लपलेली आहे. या लेणीवर जाण्यासाठी जवळपास शंभर पायऱ्या या कातळातच कोरलेल्या असून ९० अंशाच्या कोनामध्येच आपल्याला चढायला लागतात. या पायऱ्या पार करून जाणे म्हणजे मोठे अग्निदिव्य आहे. अक्षरशः थरकाप उडवणाऱ्या आणि रोमांचित करणाऱ्या या पायऱ्यांची चढाई मात्र अविस्मरणीय अशीच आहे. पायऱ्यांमधील एक जागा तर अंगावर काटा आणणारीच आहे. कारण काटकोनात वळणाऱ्या एका ठिकाणी एक पायरी जवळपास नष्टच झाली आहे. स्थानिक लोक या पायरीला ‘तुटकी पायरी’ म्हणून ओळखतात. हा टप्पा ओलांडताना थोडी जास्तच काळजी घ्यावी लागते. हे सर्व थ्रिल अनुभवून आपण लेणींच्या समोर येतो. येथून वर बघितल्यावर जणू काही कातळाचा कडाच आपल्या अंगावर येतो की काय असे वाटते.
काहीशी अर्धवट असलेल्या या लेणी आहेत. जवळपास पाच पायऱ्या उतरून आपण एका खोलीत प्रवेश करतो. येथेच उखळ आणि धान्याची साठवण करणारी जागा आणि एका खोली दिसते. या खोलीच्या आजूबाजूला पाण्याच्या काही टाक्‍या दिसतात. याच्या शेजारीच दुर्गेश्‍वराचे म्हणजेच शंकराची पिंडी असलेलं मंदिर, समोर दीपमाळ आणि प्रवेशद्वाराच्या जवळच वाघोबाचे शिल्प तसेच आतल्या बाजूला नागाची कोरलेली प्रतिमा दिसते.

गणपती-गडद
ठाणे जिल्ह्याच्या पूर्वेला आणि पुणे जिल्ह्याच्या खेटून असणाऱ्या दुर्ग धाकोबाच्या कुशीत गणपती-गडदची लेणी बसली आहे. प्राचीन असे नाणेघाट आणि दत्त्याघाट, जीवधन किल्ला, दुर्ग धाकोबा अशा इतिहासाने नटलेल्या या भूगोलाच्या परिघात गणपती-गडदचे सौंदर्य आणखीनच फुलले आहे. माळशेज घाटाच्या ठाणे जिल्ह्याच्या बाजूने एक फाट मुरबाड तालुक्‍यातल्या पळू-सोनावळे या गावात जातो. या गावातूनच वाटाड्या घेऊन या लेणीकडे कूच करायचे. साधारण दोन तासात आपण खडी चढाई करून या लेणींमध्ये प्रवेश करतो. आडव्या कोरलेल्या या समूहात एकूण सात लेणी आहेत. यातील मुख्य लेणी ही दुमजली असून तीवर जाण्यासाठी पायऱ्या कोरलेल्या आहेत. या लेणीच्या प्रवेशद्वारपट्टीवर गणेशाची प्रतिमा कोरलेली दिसून येते. या गणेशपट्टीमुळेच या लेणीला गणपती-गडद असे नाव पडले असावे. या लेणीचा सभामंडप हा बराच मोठा असून, हा पाहताना अष्टविनायकमधील लेण्याद्रीची आठवण आल्याशिवाय राहत नाही. या सभामंडपात देखील दोन नक्षीकामाने भरलेले गोलाकार खांब दिसतात. यावरची कलाकुसरही तत्कालीन स्थापत्यशास्त्र चुणूक दाखविल्याशिवाय राहत नाही. या खोलीतच एका बाजूला देवदेवतांच्या मूर्त्या ठेवलेल्या दिसून येतात. या लेणीच्या दोन्ही बाजूला देखील अनेक लेण्या अर्धवट अवस्थेत खोदलेल्या दिसून येतात. तसेच पाण्याच्या टाक्‍याही दिसतात.
निसर्गात डोंगरदऱ्यात फिरणाऱ्यांसाठी ही लेणी म्हणजे भटकंतीचं उत्कृष्ट ठिकाणच म्हटलं पाहिजे. गणपती गडद लेणीला भेट देण्यासाठी दोन ऋतू उत्कृष्ट आहेत. पहिला म्हणजे पावसाळा. या ऋतूत या लेणीसमोर स्वर्गच अवतरतो असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. अर्धवर्तुळाकार असलेल्या या लेणीसमुहासमोरूनच मोठा धबधबा कोसळत असतो. दुसरा काळ म्हणजे उन्हाळ्यातल्या चांदण्या रात्रीचा. नाईट ट्रेकिंगला येथे मुक्काम करण्यासारखा आनंद नाही.

कांब्रे लेणी
पुणे जिल्ह्याच्या पश्‍चिमेला असणारे मावळ हे भटक्‍यांसाठी ओळखीचे ठिकाण आहे. या मावळात पवन, नाणे आणि आंदर अशी तीन मावळ वसली आहेत. यापैकीच आंदरमावळात कांब्रे नावाचे गाव आहे. या गावात येण्यासाठी पुणे मुंबई जुन्या महामार्गावरील कान्हे गावावरून टाकवेवरून कांब्रे गाव जवळ करायचे किंवा लोहमार्गाने कान्हे रेल्वे स्टेशनवरून देखील टाकवेला जाता येते. परंतु रेल्वेपेक्षा स्वतःची गाडी असणे जास्त सोईस्कर ठरते. कांब्रेत गेल्यानंतर एका उंच डोंगराच्या पोटात आडवी खाच दिसते. याच आडव्या दगडाच्या खाचेत खोदलेली लेणी स्पष्टपणे दिसायला लागते. गावातूनच एक पायवाट लेणीकडे जाते. लेणीच्या खाली दाट झाडी आहे.. ही झाडी पार करून आपण थेट लेणीच्या खाली येतो. या लेणीच्या खाली आलो, की मग आपली परीक्षा सुरू होते. कारण लेणीकडे जाण्यासाठी कातळाची पायवाट पूर्णपणे नष्ट झालेली दिसून येते. म्हणूनच सुरवातीचा टप्पा पार करण्यासाठी प्रस्तरारोहण करण्याशिवाय कुठलाही पर्याय शिल्लक राहत नाही. पण हे दोराशिवाय शक्‍य आहे. हाताच्या आधारानेच हा टप्पा काळजीपूर्वक पार करावा लागतो. हा टप्पा पार केला, की मग तुम्ही या लेणीदर्शनाच्या परीक्षेत उत्तीर्ण ! पुढे दगडातील खाचांमुळे प्रवास जलद होतो. अन आपण थेट लेणीसमोर हजर होतो. मान वर करून उंच पाहिले, की लेणीचा हा कातळ अक्षरशः आपल्या अंगावरच आल्यासारखा वाटतो. अर्धवर्तुळाकार असलेल्या या कातळात कांब्रे लेणी एका रेषेत कोरलेली दिसते. या लेणीत जाण्यासाठी एक अद्‌भुत आश्‍चर्य आपली वाट पाहत उभे असते. हे आश्‍चर्य म्हणजे लेणीत जाण्यासाठी दगडाचा आरपार खोदलेला बोगदा. हा बोगदा पार करून आपण विहाराच्या खोलीसमोर हजर होतो. दगडात कोरलेल्या खोलीसमोरच धान्याचे उखळ दिसते. याच्या शेजारीच पाण्याची टाकीदेखील आहे. याच्याजवळच सारीपाटाचा खेळही खाली जमिनीवर कोरलेला दिसून येतो. त्या काळातही असे मनोरंजनात्मक आणि विरंगुळ्यासाठी असे खेळ खेळले जायचे याचे हे उदाहरण. ही लेणी काहीशी अवघड या श्रेणीतील असल्यामुळे फक्त ट्रेकर्सच येथे येऊ शकतात.

पद्मावती लेणी
पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्‍यातील आंदर मावळात असलेली पद्मावती लेणी हे ठिकाण असेच काहीसे अपरिचित आणि अनवट आहे. या लेणीसाठी तालुक्‍यातीलच वडगाव हे गाव गाठायचे. येथूनच एक रस्ता तळेगाव एमआयडीसीला जातो. या रस्त्याने आंबळे गावावरून निगडे गाव गाठायचे. या निगडे गावाच्या मागील बाजूस असलेली डोंगराची एक प्रचंड आडवी भिंत आपले लक्ष वेधून घेते. या भिंतीच्या बरोबर मध्यभागी लेणीच्या खुणा दिसून येतात. याच दिशेने चालत आम्ही मोकळ्या पटांगणातून गर्द झाडीत शिरलो. येथून दहा मिनिटांतच आपण तीव्र आणि अंगावर येणाऱ्या चढाईपाशी येतो. ही वाट अत्यंत घसाऱ्याची आहे. या वाटेच्या बाजूलाच कारवीची दाट झाडे आहेत. या झाडांचाच आधार घेत आणि सावकाश चढत आपण एका लोखंडी शिडीपाशी येतो. ही शिडी पार केली, की कातळ कोरीव पायऱ्या लागतात. असे विविध टप्पे पार करून आपण लेणीपाशी येतो. येथे आपल्याला एक मोठा विहार दिसतो. आणि याच्या शेजारीच पाण्याच्या टाक्‍या दिसतात. विहाराचे छत आणि खोल्या बऱ्यापैकी रुंद असून सुरवातीला धान्याच्या उखळीची छिद्रे दिसतात. या विहाराच्याच समोर पाण्याचे एक मोठे टाके आहे. त्यात पाणी नाही. हे सारे पाहत पुढे गेलो, की एक देवळाची घुमटी दिसते. हीच ती पद्मावती देवी ! आतमध्ये देवीचा तांदळा असून समोर पितळी घंटा दिसतात. या घुमटाशेजारी पाण्याच्या आणखी टाक्‍या दिसतात. देवीच्या मूर्तीसमोर नतमस्तक झालो, की आपली या लेणीची सफारी पूर्ण होते. 
अशा या अपरिचित लेण्या. बहुतेकांना माहितीही नाहीत. परंतु येथे येण्यासाठी स्थानिक वाटाड्या आणि ट्रेकिंगची माहिती असणे जरुरीचे आहे. हे सारे सोपस्कार पार पाडले, की तुमची भटकंती अविस्मरणीय होईल यात शंका नाही.
 

संबंधित बातम्या