चंद्रगडावरचे अग्निदिव्य! 

प्रांजल वाघ
गुरुवार, 17 जानेवारी 2019

कव्हर स्टोरी : पर्यटन विशेष
 

नुकताच घेतलेला नवा कोरा गो-प्रो कॅमेरा वापरण्याची उत्सुकता आणि जावळी खोऱ्याने फार पूर्वीपासून घातलेली मोहिनी स्वस्थ बसू देईना. मग मुंबईहून मी आणि पुण्यातून अजय आणि पंकज असे तिघे निघालो. निबिड जावळीच्या कुशीत वसलेला चंद्रगड पाहायचा असा बेत ठरला. "रवीला सोबत घेऊनच चंद्रगडावर जा'! असे पुण्यातील दोस्त ओंकार ओक याने बजावले होते. त्याच्या आज्ञेचा मान राखीत आम्ही रवीला आमच्या आगमनाची आगाऊ सूचना देऊन ठेवली. त्यानेही लगेच चंद्रगड दाखवण्याची आणि रात्रीच्या भोजनाची व्यवस्था करण्याची कबुली दिली. रवींद्र मोरे ऊर्फ रवी हा ढवळे गावातील तरणाबांड, रांगडा गडी! दिसायला जितका काटक तितकाच चिवट अन बलवान! जावळीच्या खोऱ्याचा पक्का माहीतगार. इथलं पान अन पान ठाऊक असलेला हा गडी उत्तम मार्गदर्शक तर आहेच, पण त्याला कलेची जाण आहे आणि आश्‍चर्य म्हणजे तो एक उत्तम पखवाज वादक आहे! 

सुभेदार तानाजी मालुसरेंचं उमरठ हे गाव मागे टाकून आम्ही जेव्हा ढवळे गावाचा रस्ता धरला, तेव्हा सूर्य अस्ताला जाऊन आकाशात लख्ख चंद्रकोर विराजमान झालेली होती. रस्त्यातले खड्डे चुकवत आणि खड्ड्यात लपलेला रस्ता शोधत आम्ही सावधपणे,संथ गतीने गाडी हाकत होतो. अनेक तास अंधारात दिशाहीन प्रवास केल्यावर, ढवळे गावात आम्ही दाखल झालो तो रवी स्वागतासाठी समोर उभा ठाकला! रात्रीचे जेवण उरकून, झोपण्यासाठी मंदिराकडे निघालो असता पिठूर चांदण्यात चंद्रगडाची अंधूक आकृती नजरेत भरली! युगानुयुगे ढवळे घाटाचा संरक्षक म्हणून उभा असलेला हा दुर्गपुरुष आजही सतर्क राहून पहारा देत होता! उद्या याच्या छाताडाला भिडायचे होते! सकाळच्या चढाईची मानसिक तयारी करता करता थकलेले शरीर अंथरुणावर टाकले आणि इतरांच्या घोरण्यात माझ्या घोरण्याने कधी सूर मिसळले कळलंच नही! 

दुसऱ्या दिवशी पहाटे पटापट आवरून, सगळा गाशा गुंडाळून गाडीत कोंबला आणि रवीच्या घरी निघालो. रवी तयार होताच. थंडीत सकाळचा गरम गरम चहा पोटात गेला तसे बरे वाटले. कप खाली ठेवताच रवी म्हणाला, निघायचं का? आम्ही तयार होतोच. उन्हं वर यायच्या आत माथा गाठायचा होता. जणू याच प्रश्नाची वाट पाहत असल्याप्रमाणे उत्तरलो, चला! 

थोडं पुढे गेल्यावर रवीने माझ्याकडे उदबत्तीचा पुडा आणि पाण्याची बाटली दिली. हे काय? हे कशासाठी? न कळून मी विचारलं. 

सांगतो, लागेल वर!, इतकंच बोलून तो पुढे चालू लागला. मी ते सामान पिट्टूमध्ये टाकलं आणि त्याच्या मागोमाग निघालो. चंद्रगडाच्या दिशेने आमची पावले वळली तेव्हा डोंगरापलीकडे तांबडं फुटायला लागले होते. समोर आकाशात चंद्रगड चढला होता. जंगलाने वेढलेला हा छोटेखानी किल्ला त्याची दुर्गमता दाखवून देत होता. गावातील शेतांमधून, जमीन तुडवीत आम्ही निघालो आणि आघाडीला रवी! थोड्याच वेळात गर्द झाडीत आम्ही शिरलो तशी थंडी अधिक जाणवू लागली. एखाद्या चपळ वाघासारखा रवी जावळीच रान कापीत चालला होता. इथलं झाड अन झाड, दगड अन दगड तोंडपाठ असलेला हा निष्णात वाटाड्या झपाझप पावलं टाकीत, नागमोडी वाट पायाखाली टाकत आम्हाला म्हसोबाच्या खिंडीकडे घेऊन चालला होता. सुमारे अर्ध्या तासात म्हसोबाच्या खिंडीत पोचून थोडी विश्रांती घेतली. म्हसोबाच्या खिंडीतून सुरू होणार होता तो चंद्रगडाचा खरा, आव्हानात्मक चढ! 

सुमारे सत्तर डिग्री अंशात वर चढणारा, दमवणारा, त्या थंडीतही घाम काढणारा आणि कारवीची झाडी, सुकलेलं गवत यांनी नटलेला असा हा उभा चढ! हा गड जरी छोटा असला तरी तो जिंकून घेणे मात्र अतिशय कठीण होते कारण गडाला जावळीच्या जंगलाचे नैसर्गिक कवच लाभलेले आहे. या गडावर येणाऱ्या वाटा दोन आणि दोन्ही वाटा म्हणजे अंगावर येणारे उभे चढ ! शत्रू हा चढ चढताना आधीच अर्धमेला झालेला असतो. अन्‌ मग वर मोजकीच शिबंदी जरी असली, तरी हे चढणारे शत्रू बाणाने टिपणे म्हणजे शेतातील बुजगावणी टिपण्याइतके सोपे! पसरलेली जावळी अन्‌ त्यात उभा असलेला हा अभेद्य, दुर्गम गड पाहिल्यावर लक्षात येते ते या प्रदेशाचे लष्करी महत्त्व. अफझलखानाला बुडवायला महाराजांनी हाच प्रदेश का निवडला हे तेव्हा कळते आणि त्या महामानवाच्या द्रष्टेपणासमोर आपण नतमस्तक होतो. 

सुमारे पाऊण तासाने तो उभा चढ पार करून, आम्ही जसे शेवटच्या कातळटप्प्याकडे पोचलो तसे बेभान वारा आणि तळपणारा सूर्य यांनी आमचे जोरदार स्वागत केले आणि मुबलक प्रमाणात "विटामिन डी.' आम्हाला मिळू लागले! 

इथून एक छोटे प्रस्तरारोहण करून आम्ही चंद्रगड ऊर्फ ढवळ्या किल्ल्यात प्रवेश केला. गडाचा माथा सुकलेल्या सोनेरी गवताने भरून गेला होता. सहज मनात कल्पना येऊन गेली. दुरून जर आज याचे कोणी दर्शन घेत असेल, तर हा ढवळ्या डोंगर एखाद्या साधूसारखा दिसत असेल. जणू खंडोबाच्या पिवळ्या जर्द भंडाऱ्याने माखलेले विशाल कपाळ, अनिर्बंध वाढलेल्या जटा, राकट कणखर शरीर असा हा साधू कठोर तपस्या करीत शतकानुशतके ऊन, पाऊस, वारा साऱ्यांना तोंड देत उभा आहे! अढळ आणि अचल! 

चंद्रगडावर प्रवेश करताच काही अंतरावर एक सुंदर घडीव नंदी आढळतो, अन्‌ त्याच्या बाजूलाच दगडात खोदलेले भले मोठे शिवलिंग दिसते. पिंडीच्या बाजूला एक दगडी दिवा आहे. तोदेखील नवीन असल्यासारखाच भासतो. रवीने सकाळी निघताना माझ्या जवळ एक पाण्याची बाटली आणि अगरबत्तीचा पुडा दिला होता तो यासाठीच. त्याने लगेच पिंडीच्या आजूबाजूला असलेला पाला-पाचोळा काढून, पाण्याने पिंडी धुवून साफ केली, अगरबत्त्या पेटविल्या, दगडी पणतीत दिवा लावला आणि ढवळेश्वराला भावपूर्ण नमस्कार केला. इथल्या लोकांची ढवळेश्वरावर खूप भक्ती. दरवर्षी इथे जत्रा भरते. हजारो गावकरी या पिंडीचे दर्शन घेण्यासाठी बऱ्याच दूरवरून येतात. 

रवीने आजूबाजूच्या परिसराची ओळख करून दिली. महाबळेश्वर, आर्थर सीट, ढवळे घाट, रायरेश्वर, नाखिंदा, प्रतापगड यांनी जणू चंद्रगडाला वेढा दिला होता. जिथे नजर फिरेल तिथे सह्याद्री उभा ठाकला होता. आमच्या मागे दूर ढवळे गावातील घरटी दिसत होती. रायरेश्वराच्या पायथ्याशी असलेल्या गर्द झाडीत उगम पावलेली ढवळी नदी त्या रानातून वळणदार वाट काढीत ढवळे गावाजवळून खळाळत वाहत होती. चंद्रगड लहान असला तरी इथून बरंच मोठा प्रदेश नजरेच्या टप्प्यात येतो. बहुधा ढवळे घाटावर नजर ठेवण्यासाठी या किल्ल्याचा उपयोग केला जात होता! चंद्रगडावर तसे फारसे अवशेष नाहीत. 

शिवलिंग मागे टाकून पुढे एक छोटा प्रस्तर चढलो, की आपला प्रवेश बालेकिल्ल्यात होतो. गवतात लपलेली तटबंदी शोधली तरच नजरेस पडते. तीच गत वाड्याच्या अवशेषांची. त्या काळी लढाऊ अवस्थेत हा गड कसा असेल याची कल्पना करणे काही वेळा कठीण होऊन बसते इतकी बिकट परिस्थिती आज चंद्रगडावर आहे! गडाचा दुसरा दरवाजा उत्तरेस आहे. इथे दगडी पायऱ्या उतरून गेलो, की एक दरवाजा लागतो. त्या दरवाज्यातून पुढे गेलात, की लागते ते चंद्रगडाचे उत्तर टोक. इथे एक भक्कम बुरूज उभा आहे. विशेष म्हणजे इथे अगदी कड्याला लागून, बुरुजाच्या आत एक पाण्याचं टाक खोदलेले आहे. इथले पाणी पिण्याजोगे आहे. इथे सावलीत थोडे विसावलो, थोडेसे पाणी प्यायलो आणि या टाक्‍यातले हिरवेगार पाणी बाटल्यांत भरून घेतले आणि मग निघालो परतीच्या वाटेवर! 

अजय आणि मी फोटो काढत बालेकिल्ल्यावर मागे राहिलो. पंकज आणि रवी उतरून पुढे निघून गेले. माझे फोटो काढून झाले अन मी जाण्यासाठी वळलो तसे मला हवेत धूर तरंगताना दिसू लागला. मनात शंकेची पाल चुकचुकली, निरभ्र आकाश असताना इथे धुकं किंवा ढग येणं शक्‍य नही. पण मग धूर कसा आला? वणवा तर लागलं नसेल? म्हणून मी अजयला हाक मारली, 'अजय, तो बघ तो धूरंच आहे का?' 'हो रे, धूरंच दिसतोय, बहुतेक दिव्यामुळे आग लागली वाटतं' अजय म्हणाला. क्षणभर एकमेकांकडे पाहिले अन अजय उद्गारला, वाघ्या, पळ! गडावरच्या सुक्‍या गवताने पेट घेतला होता आणि ठिणगीचे रूपांतर वणव्यात झाले! आम्ही तिथून तीरासारखे सुटलो. झपाझप बालेकिल्ल्याचा प्रस्तर उतरून माचीवर आलो तर आगीच्या मधोमध पंकज आणि रवी थांबलेले. त्यांच्या पर्यंत पोचलो आणि रविला विचारलं, 'आग कशी लागली?' ती आग पिंडीजवळच्या दिव्याने लागली किंवा अगरबत्तीमुले गावात पेटले असे काही सांगेल असं मला वाटलं होतं. पण त्याने गुगलीच टाकला, 'पेटवलं गवात' हे ऐकून माझ्या तोंडून शब्दच फुटेनात. मी आ वासून उभा राहिलो. शेवटी एकदाचे शब्द सापडले, 'अरे पण कशाला? आपण आहोत न गडावर? आणि आम्ही तर आग लावली तेव्हा वर बालेकिल्ल्यावर होतो, अडकलो असतो मग? गवात पेटवायची गरजच काय? 'अहो आम्ही नेहमी पेटवतो! आता जत्रा सुरू होईल आणि लोक येतील. म्हणून साफसफाई करायला पेटवतो आम्ही' , रवीने समजावण्याचा प्रयत्न केला. 

एव्हाना आगीची उष्णता आम्हाला जाणवू लागली होती. आणखी काही काळ इथे थांबलो तर आगीपासून वाचणे अशक्‍य झाले नसते आणि आम्ही त्या वणव्यात अडकून पडलो असतो. त्यामुळे तिथून पळ काढणे क्रमप्राप्त होते. आणखी हुज्जत घालत बसणे म्हणजे शब्दशः आगीत उडी मारण्यासारखे होते! 

इतक्‍यात रवी म्हणाला, 'जायचं का झपकन?' 'आता इथे बसून काय शेक घ्यायचा का?,' असे विचारायचे फार मनात आलं होतं पण आमच्या मनातल्या गोष्टी मनातच राहणार. चला, इतकंच मी बोलू शकलो आणि आम्ही तीरासारखे सुटलो. वेळ न दवडता आम्ही आग नसेल तिथून पुढे पुढे जात राहिलो न एकदाचे त्या आगीतून बाहेर पडलो. मागे वळून पाहिले तर काही क्षणांपूर्वी मी आणि अजय जिथे उभे होतो तिथेच बालेकिल्ल्याने पेट घेतला होता! नशिबाने माझ्या डोक्‍यावर असलेल्या गो-प्रो कॅमेऱ्यात याचे चित्रीकरण केले होते. 

जलदगतीने आग पसरत चालली होती त्यामुळे आम्हाला त्याहून अधिक वेगाने डोंगर उतरायचा होता. त्यामुळे आवश्‍यक ती काळजी घेऊन आम्ही प्रस्तर उतरलो, चंद्रगडाचा तो घसारा असलेला उभा उतार उतरलो आणि म्हसोबाच्या खिंडीत येऊन विसावलो! तिथून आकाशात चढलेला, ज्वालांनी वेढलेला चंद्रगड नजरेत येत होता. वणव्याने अर्धा डोंगर खाऊन टाकला होता. आम्ही जर वर थांबलो असतो तर कोणास ठाऊक काय झाले असते आमचे? विचार करून देखील अंगावर सरसरून काटा आला. असे न करण्याबाबत रवीला थोडं समजावलं आणि परत ढवळे गावात आलो. त्याच्या घरी थोडेसे चहापान केले आणि त्याचा निरोप घेतला. ढवळे गावातून निघालो तसा चंद्रगड मागे पडत चालला पण मनात हे विचारचक्र सुरूच होतं. नशीब बलवत्तर म्हणून आज सहीसलामत वणव्यातून बाहेर पडलो. पण हे असे अनेक ठिकाणी आपण पाहतो. पावसाळा ओसरला. की हिवाळ्यात अशा आगी सर्रास लागलेल्या दिसतात. गावकऱ्यांची समजूत अशी, की शेती सुरू करण्याआधी गवत जाळल्याने माती शुद्ध होते. पण त्याचे दुष्परिणामच जास्त आहेत! वास्तविक अशा आगीत अनेक झाडांचे, प्राण्यांचे, पक्षांचे मृत्यू होतात. बेफिकिरीने लागलेल्या वणव्यात मोठे वृक्ष जाळून खाक झालेले पण पहिले आहेत. एका झाडाचे वृक्षात रूपांतर व्हायला अनेक वर्ष लागतात पण अशा लावलेल्या आगींमुळे ही झाडे क्षणार्धात जमीनदोस्त होतात. दिवसेंदिवस कमी होत चाललेल्या जंगलांना इजा पोहोचवण्यात या असल्या आगीचा वाटा मोलाचा आहे. 
आम्ही नशीबवान म्हणून या अग्निपरीक्षेतून सुखरूप बाहेर पडलो. पण तिथे जावळीच्या खोऱ्यात जळणारी ती झाडं मनाला चटका लावून गेली!

फोटो फीचर

संबंधित बातम्या