‘रॉकीज-जॅस्पर नॅशनल पार्क'

राधिका टिपरे 
गुरुवार, 17 जानेवारी 2019

कव्हर स्टोरी : पर्यटन विशेष
कॅनडातील रॉकीज पर्वतरांगांमध्ये विस्तारलेल्या एका निसर्गरम्य जंगलातील भटकंतीचा अनुभव... 

कॅनडा देशातील "एडमंटन' या अतिउत्तरेकडील शहरात पोचून अजून चार दिवसही झाले नव्हते. पण मुलाला मात्र मला कधी एकदा जॅस्परच्या जंगलात घेऊन जाईन असं झालं होतं. कारण त्याला माझे जंगल प्रेम ठाऊक आहे ना...! आई आणि बाबांना घेऊन जॅस्परच्या जंगलात जायचं म्हणून त्याने जय्यत तयारी केली होती. कारण जंगलात कॅंप करून राहायचे होते. त्यासाठी अगदी सहाजण झोपू शकतील असा मोठा तंबू खरेदी करण्यापासून, कॅंप स्टोव्ह, कॅंप मॅटस्‌, स्लिपिंग बॅग्ज... अशा गोष्टी अनेक गोष्टींची तयारी करण्याची त्याची धडपड चालू होती. जॅस्परच्या जंगलात, कॅंम्पिंग करून राहण्याचा हा अनुभव खूप वेगळा असणार होता. कारण या पाश्‍चात्त्य जगात जगण्यातली आनंद घेण्याला खूप महत्त्व दिलं जातं. जगण्यासाठी आवश्‍यक त्या प्रत्येक गोष्टीकडे गरज म्हणून पाहिलं जातं आणि त्यानुसार सर्व सोयी हजर केल्या जातात. याचा अनुभव मी या पाच दिवसांच्या जंगलातील वास्तव्यादरम्यान घेतला. 

जॅस्पर नॅशनल पार्क कॅनडाच्या अल्बर्टा राज्यात किंवा प्रोव्हीन्समध्ये येते. रॉकीज किंवा रॉकी माऊंटन रेंज या पर्वतमालेच्या अंगाखांद्यावर लाखो स्क्वेअर किलोमीटर्स क्षेत्रामधे कोनीफेराचे जंगल पसरलेले आहे. या संपूर्ण जंगलाचे अनेक विभागात नामकरण केलेले असून त्यातील "जॅस्पर राष्ट्रीय उद्यान' अतिशय प्रसिद्ध आणि अप्रतिम सुंदर जंगलाने व्यापलेले आहे. कॅनेडियन रॉकीजमधील आकाराने सर्वांत मोठे राष्ट्रीय उद्यान असणाऱ्या जॅस्परविषयी लिहीण्यापूर्वी रॉकीज या पर्वतमालेबद्दलची थोडी माहिती जाणून घ्यायला हवी. 

रॉकीज पर्वतमाला ही उत्तर अमेरिका खंडातील एक अतिशय महत्त्वाची पर्वतरांग असून साधारणपणे चार हजार आठशे किमी लांब पसरलेली आहे. कॅनडा देशाच्या उत्तर-पश्‍चिम भागात असलेल्या ब्रिटिश कोलंबिया या राज्याच्या सर्वांत उत्तरेकडील प्रदेशात सुरू होणारी ही पर्वतरांग खाली अमेरिकेच्या न्यू-मेक्‍सिको राज्यापर्यंत पोचलेली आहे. त्यामुळेच या पर्वतरांगेला आंतरखंडीय किंवा ट्रान्सकॉन्टिनेंटल पर्वतमाला असे म्हणतात. या पर्वतमालेच्या वेगळेपणामुळे आणि भौगोलिक अस्तित्वामुळे दोन्ही देशांमध्ये अप्रतिम निसर्ग सौंदर्याची लयलूट झालेली आहे. वर्षातील आठ महिने या भागात प्रचंड प्रमाणात बर्फ असते. स्प्रिंग आणि समर म्हणजेच आधी येणारा वसंत आणि त्या पाठोपाठ येणारा उन्हाळा हे चार महिनेच काय ते येथील हिरवळ खुललेली असते. एडमंटन शहरसुद्धा वर्षातील आठ महिने बर्फाच्छादितच असते. 

या पर्वताशिखरांच्या दऱ्याखोऱ्यातून हिरवाईने भरलेले सपाट प्रदेश आहेत. तसेच निलमण्यांगत चमचम करणारे अनेक देखणे तलाव आहेत. अगणित नद्या आहेत, सुंदर धबधबे आहेत, अनेक अवघड बर्फाच्छादित शिखरे आहेत. अनेक ग्लेशियर आहेत. घनदाट जंगलातून भटकंती करण्यासाठी अगणित पायवाटा म्हणजेच ट्रेल्स निर्माण केले आहेत. (जॅस्परमध्ये अंदाजे हजार किमीचे ट्रेल्स, अर्थात भटकंतीच्या पायवाटा तयार केलेल्या आहेत.) नद्यांच्या काठावर काही जागांची निवड करून त्या ठिकाणी कॅंपची सोय केलेली आहे. यासाठी दर दिवसाचे राहण्यासाठीचे भाडे द्यावे लागते. अगदी कडाक्‍याच्या थंडीतही लोक कॅंपींग करून राहायला येतात. मात्र या दिवसात सगळीकडे केवळ आणि केवळ पांढरे शुभ्र बर्फ आणि स्नो असतो. पण याकाळात पदभ्रमंतीसाठी न येता दुनियाभरातील लोक स्कीईंग करायला येतात. स्कीईंग करण्यासाठी पर्वतांच्या उतारावरील झाडे तोडून त्याठिकाणी स्की स्लोप्स, किंवा स्किईंगसाठीचे उतार तयार ठेवलेले असतात. 

कॅनेडियन रॉकीजच्या अल्बर्टा राज्यात येणाऱ्या आकाराने प्रचंड, विस्तीर्ण जंगलांची विभागणी ‘जॅस्पर नॅशनल पार्क, बांफ नॅशनल पार्क, यो हो नॅशनल पार्क, ग्लेशियर नॅशनल पार्क, माऊंट रॅव्हेलस्टोक नॅशनल पार्क, कूटनी नॅशनल पार्क आणि वॉटरटण लेक्‍स नॅशनल पार्क अशी नावे असलेल्या विविध राष्ट्रीय उद्यानांमध्ये केलेली आहे. मात्र नावे वेगळी असली, तरी जंगल मात्र एकच आहे. जंगलाचे रूपही साधारण सर्वत्र सारखेच आहे. 

यापैकी जॅस्परबद्दल बोलायचे, तर कॅनडातील, रॉकीज पर्वतमालेतील या सर्व राष्ट्रीय उद्यानापैकी हे सर्वांत मोठे आणि जगप्रसिद्ध उद्यान आहे. या उद्यानाची स्थापना १९०७ मध्ये करण्यात आली. जॅस्पर हावेस यांचे नाव या जंगलाला दिले गेले, कारण त्या काळात या दुर्गम भागात त्यांचे ट्रेडींगचे दुकान असायचे. १९८४ मध्ये या जंगलाला युनेस्कोतर्फे जागतिक वारसा स्थळाचा दर्जा दिला गेला. तत्पूर्वी हा सर्व भूप्रदेश "फिट्‌झह्यूज' या नावाने सर्वसामान्य भूप्रदेश म्हणूनच ओळखला जात होता. तसेही अवाढव्य कॅनडा देशाची लोकसंख्या फार कमी आहे. त्यामुळे "रॉकीज' मध्ये आजही अतिशय कमी लोकवस्ती आहे. त्यामुळे मैलोमैल प्रवास केला तरी वस्ती नजरेस पडत नाही. सरळसोट पसरलेला चकाचक गुळगुळीत रस्ता आणि दोन्ही बाजूला फक्त आणि फक्त घनदाट वृक्षराजी, एवढेच काय ते नजरेला सुख देत असते. 

जॅस्पर उद्यानात निसर्गसौंदर्याची लयलूट तर आहेच, पण या जंगलात वन्यजीवनही भरपूर प्रमाणात आहे. मुख्य म्हणजे जगप्रसिद्ध ग्रेझली अस्वलांचे वास्तव्य या जंगलात आहे. त्यांच्या जोडीला काळी अस्वले, तपकिरी रंगांची अस्वले, मूस हे दांडग्या आकाराचे हरीण, एल्क हरणे, साधी हरणे, जंगली बकऱ्या, पहाडावर असणाऱ्या ‘माऊंटन गोट्‌स' असे वैविध्यपूर्ण वन्यजीवन असून त्यांची संख्या प्रचंड प्रमाणात आहे. जोडीला लांडगे, कोल्हे, कायोटी, बिव्हर, साळिंदर हे प्राणीही आहेत. पण ही जंगले निरुपद्रवी असतात. म्हणजे आपल्याकडील जंगलात असणारे वाघ, बिबटे, हत्ती असे हल्ला करणारे प्राणी नसतात, शिवाय विषारी किडे, विंचू आणि साप, सरडे नसल्यामुळे बिनधास्तपणे जंगलात वावरता येते. फक्त ग्रेझली आणि काळी अस्वले यांच्यापासून दूर राहावे लागते. खरं तर ही अस्वले आपणहून कुणाच्या वाटेला जात नाहीत. पण अन्नाच्या वासाने कॅंपजवळ येतात आणि समोरासमोर आले तर हल्ला करण्याची शक्‍यता असते. म्हणून काही झाले तरी कुठल्याही प्रकारचे खरकटे कॅंपच्या आजूबाजूला टाकायचे नसते. काही झाले तरी सर्व खरकटे, उरलेले अन्न बंदिस्त कचरापेटीतच टाकावे लागते. अन्नाचे पदार्थ आणि सामान रात्री झोपण्यापूर्वी कारमध्ये ठेवून कार बंद करावी लागते. 

उन्हाळ्यात खळाळणाऱ्या नद्यांतून कयाकींग, रॅफ्टींग आणि तलावातून बोटींगचा आनंद तर घेता येतोच. एवढे सगळे खेळांचे प्रकार असूनही कुठे आरडाओरडा नाही, वेडेवाकडे प्रकार नाहीत. या लोकांना स्वच्छतेचे बाळकडूच दिले जाते. अशा या सुंदर जॅस्पर नॅशनल पार्कमध्ये कॅंप करण्यासाठी म्हणून आम्ही उभयता, आमचा मुलगा सारंग आणि सहा वर्षाचा नातू आर्यन यांच्याबरोबर, बाहेर पडलो. सारंगने दार्जिलिंग येथील "नेहरू माऊटेंनियरींग इन्स्टिट्यूट' बेसिक कोर्स केलेला असल्यामुळे त्याला कॅंपिंगची तयारी कशी करायची हे चांगलेच ठाऊक होते. मुळात नातवाच्या संगतीने हे सगळं काही अनुभवायचे असल्यामुळे मन अधिकच आनंदून गेले होते. एडमंटन शहरापासून जॅस्परच्या हद्दीपर्यंत पोचायला साडेचार ते पाच तासांचा वेळ लागला. वाटेत फक्त एक लहानसे गाव लागले तेवढेच. बाकी दुतर्फा सर्वत्र गर्द हिरवाईच होती. मात्र अचानक पाऊस कोसळायला लागला. त्यामुळे पहाडात पाऊस लागणार असे वाटले. टेंट तर वॉटरप्रुफ असतो. पण जेवणखाण करण्यासाठी डोक्‍यावर काही छत्र असायला हवे म्हणून ताडपत्री सारखे काहीतरी घ्यायला हवे हे सारंग विसरलाच होता. मग वाटेतील त्या गावात थांबून मोठे प्लॅस्टिक घेतले. "वाबासो' नावाच्या कॅंपवर आमचे आरक्षण होते. नॅशनल पार्कच्या जवळ पोचल्यानंतर लक्षात आले, की सुदैवाने जॅस्परच्या जंगलात पाऊस नव्हता. एकमात्र खरे आहे, इथे पावसाचा काही भरवसा नसतो. कधीही येतो. म्हणजे दोन दिवसातून एकदा कधीतरी पाऊस येऊन जातोच. 

वाबासोचा कॅंप निळंशार पाणी असलेल्या ऍथाबास्का नदीच्या काठावर आहे. आपल्याकडे जशी मनाली,मसुरी, नैनिताल ही गावं हिलस्टेशन्स म्हणून प्रसिद्ध आहेत, तसेच जॅस्पर हे लहानसे गाव आहे. जंगलाच्या मध्यात वसलेलं. अतिशय टुमदार आणि प्रचंड देखणं...! मुख्य म्हणजे खूप महत्त्वाचे रेल्वे जंक्‍शनही आहे. रेल्वेमुळे जॅस्परच्या जवळ असलेले मेती हॉट वॉटर स्प्रिंग शोधले गेले. त्यामुळे जॅस्पर गाव वसले असं म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही. आमचा कॅंप जॅस्परपासून तीस पस्तीस किमी अंतरावर होता. 

कॅंपच्या ठिकाणी प्रत्येक कॅंपरला काही ठरावीक जागा दिलेली असते. त्या जागेत तंबू लावता येतो, गाडी पार्क करायला जागा असते. शिवाय जेवणखाण करण्यासाठी एक लाकडी बाकडे असते. गोल आकाराचे लोखंडी चूल्हाण असते ज्यात कॅंपफायर करता येते. चारपाच तंबूसाठी एक कॉमन टॉयलेट असते. जिथे गरमपाणी, वॉशबेसीन असते. तोडलेल्या लाकडांचा ढीग असतो. 

कॅनडा आणि अमेरिका या देशामध्ये आर.वी. हा एक प्रकार फार प्रसिद्ध आहे. हे आर.वी. प्रकरण म्हणजे चार चाकावरचे लहानसे घर. या चिमुकल्या घरात सगळ्या सोयी असतात. अंघोळ, टॉयलेट, झोपण्यासाठी बेड या सोयी असतातच... पण लहानसे किचनही असते. आपले सामान घेऊन या मोठ्या गाडीने कुटुंब प्रवासाला निघतात. या आरवीसाठी वेगळे कॅंपसाईट असतात. पाणी भरून घेण्याची सोय असते. टॉयलेटची टाकी साफ करून घेण्यासाठी जागोजागी सोय असते. या आरवी महाग असतात. शिवाय हवं असेल तर भाड्यानेही मिळतात. त्यामुळे कितीतरी कुटुंबं सायकली,कयाक, लहान बोट आणि आपली कुत्री बरोबर घेऊन, या आरवी मधून प्रवासाला बाहेर पडतात. काहीवेळा कारला जोडायच्या आरवी पण असतात. अशावेळी आरवी कॅंपच्या ठिकाणी ठेवून, गाडीने आजूबाजूची स्थळं पाहायला जाता येते. 

कॅंपवर पोचल्यानंतर आधी तंबू लावायचे काम तातडीने हाती घेतले. नातू लुडबूड करत आपल्या वडिलांना मदत करत होता. चुल्हाणात लाकडे टाकून जाळ करायचा होता. पण पाऊस पडून गेला असल्यामुळे लाकडं ओलसर होती. त्यासाठी फायर स्टार्टर वापरून मग लगेच आग पेटवता येते. आम्हाला हे सारंच नवीन होतं. त्यामुळे मी आपली कॅंप चेअरवर बसून आराम करत होते. मजा येत होती. घरी कुठे असलं सुख मिळतं...? तासाभरात सगळं मार्गी लागलं. मग घरातून निघताना करून घेतलेलं पोळी भाजीचं जेवण जेवलो. त्यानंतर नव्यानं खरेदी केलेल्या कॅंपसाठीच्या लहानशा, गॅस शेगडीवर सारंगने मला हवी तशी कॉफी करून दिली. तंबूच्या चोहोबाजूने उंच पाईनचे वृक्ष होते. सोप्यातील सोपं काम म्हणून मी नातवासाठी दोन झाडांच्यामध्ये ‘हॅमॉक' (झोका) बांधले होते. तो त्यावर झोके घेत होता. आणि मी निसर्गाचा आस्वाद घेत कॉफीचे घोट घेत तिथे शांतपणे बसून होते. या दिवसात कॅनडाच्या या भागात सूर्य रात्री नऊ-साडेनऊ वाजेपर्यंत मावळतच नाही. त्यामुळे आठ साडेआठ झाले तरी भरपूर सूर्यप्रकाश होता. म्हणून कॅमेरा उचलला आणि नदीच्या बाजूला गेले. रॉकी पर्वत रांगेची शिखरे, निळंशार पाणी घेऊन जाणारी नदी आणि निळंभोर आकाश... उंच उंच कोनीफेराचे उभे जंगल... दुसरं काय हवं होतं? तेवढ्यात ओळखीचा आवाज ऐकू आला. वूडपेकरचा आवाज होता तो. मग लक्षात आलं, एका झाडाच्या मध्यावर गोल भोक तयार करून त्यानं घरटं तयार केलं होतं, त्यात पिलं दिली होती. नर,मादी आळीपाळीनं चोचीत धरून आणलेली किडामुंगी पिलांना भरवत होते. छान फोटो मिळाले. सुधीरने तंबूच्या आत सर्वांसाठी अंथरूण तयार केले. आम्ही उभयता उबदार अंथरुणातच झोपणार होतो. कारण स्लिपींगबॅगमध्ये झोपणं जड गेलं असतं. धडधड पेटणाऱ्या कॅंपफायरच्या आजूबाजूला कॅंपचेअर्सवर बसून शेकोटीची ऊब मिळवत बराच वेळ बसून राहिलो. परदेशात राहणाऱ्या मुला नातवाचा असा सहवास मिळायला मध्ये दोन अडीच वर्षांचा काळ गेला होता. त्यामुळे मी ते क्षण काळजात साठवत होते. असो, त्या रात्री सगळं सामान आवरून गाडीत ठेवून मग टेंटमध्ये झोपून गेलो. पक्षांच्या किलबिलाटानेच जाग आली. आम्ही आटोपून निघालो. त्याचदिवशी आम्ही जवळच असलेला ऍथाबास्का वॉटरफॉल पाहिला. फार उंच नसलेला परंतु सुंदर असलेला हा धबधबा पाहताना, तिथे चालण्यासाठी केलेल्या सुंदर पायवाटांवरून आपल्याला जंगलाच्या आत खोलवर भटकंतीसाठी जाता येते हे पाहून हेवा वाटत होता. जॅस्परमधे बऱ्याच कॅंप साइट आहेत. आम्हाला आणखी दोन दिवस तिथेच राहायची इच्छा होती. त्यासाठी कॅंप शोधायला काही वेळ भटकलो. हनीमून तलावाकाठी असलेला कॅंप मला फार आवडला. दुसरे दिवशी लवकर त्या कॅंपवर पोचायचे ठरवून जॅस्पर गाव पाहायला गेलो. अतिशय सुंदर आणि टुमदार घरे असलेले देखणे जॅस्पर फार फार आवडले. परत येताना वाटेत रस्त्याच्या कडेला ब्लॅक बेअर लहान लहान झाडांवरील बेरी खात मजेत बसलेले होते. रहदारीचा त्याच्यावर अजिबात परिणाम होत नव्हता. मात्र त्याच्या तिथं रस्त्याच्या कडेला बसण्यामुळे रहदारीवर चांगलाच परिणाम झाला होता. शेवटी पोलिसही आले आणि तेही फोटो काढायला लागले. बऱ्यापैकी फोटो मिळाले. 

दुसऱ्या दिवशी शांत, सुंदर हनीमून तलावाच्या काठी असलेल्या कॅंपमध्ये जाऊन हवी तशी जागा शोधली आणि कॅंपिंग केले. पुन्हा टेंट मांडला... चीज सॅंडविच कॉफी असा नाश्‍ता केला. कॅंप फायरच्या चुल्हाणावर गरम गरम भाकरी, ठेचा घालून कांद्याचे पिठले बनवले. लंचसाठी डबे भरून घेतले आणि मेलाईन तलाव पाहायला गेलो. हा तलाव अतिशय सुंदर होता. सर्व बाजूंनी बर्फाच्छादित शिखरांनी वेढलेला, आणि घनदाट जंगलाने नटलेला हा तलाव आणि त्याच्या पाण्याच्या विविध छटांचे रंग पाहून डोळे निवाले. तलावाच्या काठावर पिठले भाकरीचे पिकनिक पार पाडले. सून परदेशी असल्यामुळे नातवाला अजून आपल्या पद्धतीच्या जेवणाची फारशी सवय झालेली नाही. त्याच्यासाठी वेगळं काहीतरी करावं लागायचं. दुसऱ्या दिवशीची सकाळ मी हनीमून लेकच्या काठी शांतपणे बसून घालवली. 

नातू बोलवायला आला. "सनवाप्ता' हा धबधबा पाहायला जायचे होते. म्हणून सर्वकाही नेहमीप्रमाणे आवरून निघालो. कॅंपवर आंघोळीची सोय नसते. त्यामुळे जॅस्पर टाऊनच्या पुढे काही अंतरावर असलेल्या "हॉट वाटर स्प्रिंग' या जागी गेलो. येथे सल्फरयुक्त गरमपाण्याचे झरे आहेत. तेथून हे पाणी स्वीमिंग टॅंक मध्ये आणून तेथे पर्यटकांना डुंबण्यासाठी सोय केलेली आहे. मात्र त्यासाठी फी भरावी लागते. मेती स्प्रिंग्जमधे मस्तपैकी वेळ घालवून परत वाटेवरील जॅस्पर गावात थांबलो. गाडीत पेट्रोल भरायचे होते. कारण दुसरे दिवशी बांफ नॅशनल पार्क पाहून एडमंटनला पोहोचायचे होते. पर्यटकांना माहिती देणाऱ्या, जॅस्परमधील माहिती केंद्रात चक्कर मारायची होती. त्यावेळी पार्किंगच्या जागी एक भलीमोठी मोटारसायकल बाजूलाच लावलेली होती. कॅरीयरवर सामान होते. दोन्ही बाजूला सामान लावलेले होते आणि हेल्मेट घातलेली एक स्त्री बाजूलाच उभी होती. ती व्हॅंकुव्हरपासून जॅस्परच्या जंगलात भटकायला एकटीच आली होती. पुढील तीन आठवडे ती वेगवेगळ्या ठिकाणी कॅंप करून एकटीच राहणार होती. विशेष म्हणजे ती क्‍युबेक शहरात राहते. ती व्हॅंकूव्हरपर्यंत विमानाने आली होती. तिने आपली मोटरसायकल ट्रान्सपोर्टने मागवून घेतली होती. तिचे वय होते छप्पन. मला तिचे इतके कौतुक वाटत होते, की सांगता सोय नाही. आणि इथे मी...! पुण्याच्या ट्रॅफीकला घाबरून ड्रायव्हिंगच बंद केलं...! 

कॅंपवर पोचायला रात्र झाली. जॅस्परच्या जंगलातील कॅंपिंगची ती शेवटची रात्र होती. गेलो आणि तंबूत शिरून झोपी गेलो. सगळे जण दमले होतोच. शिवाय गरम पाण्याच्या स्प्रिंगवॉटरमधे स्नान झाल्यामुळे अंग सुस्तावलं होतं. दुसरे दिवशी सकाळी उठून कॅमेरा घेऊन हनीमून तलावाच्या काठी पोचले. तेथे एक जर्मन जोडपे भेटले. ते जर्मनीहून कॅनडात विमानाने आलेले होते. त्यांच्यासह त्यांची नऊ महिन्यांची तान्ही मुलगी होती. दोघे नवराबायको पुढील वर्षभर सायकलने प्रवास करून कॅनडा देश पाहून मग अमेरिकेच्या सॅनफ्रॅन्सीस्कोपर्यत पोचणार होते. नवऱ्याच्या सायकलच्या पाठीमागे छोटी बाबागाडी जोडलेली होती. प्रवास करताना त्यात त्यांची तान्हुली ठेवलेली असायची. त्या बाबागाडीसकट त्याला आपली सायकल चालवावी लागायची. बरोबर कॅंपिंगचे सामान सायकलवर बांधलेले होते. हे सर्व पाहून जीव थक्क झाला. इकडच्या तरूणाईचं जगण्याचे वेगळेपण पाहून वाटलं हे अशा प्रकारचं आयुष्य जगण्यासाठी पुन्हा एकदा तरूण होऊन नव्यानं भरारी घ्यावी ! त्या जोडप्याचा फोटो घ्यावासा वाटला. त्यांनीही आनंदाने आपल्या कन्येसह आणि सायकलींसह उभे राहून फोटो काढू दिले. माझं मन अजूनही तेथून निघायला तयार नव्हतं. पण मनात सगळं साठवून मी त्या नितांत सुंदर जागेचा निरोप घेतला. जॅस्पर उद्यानाला लागूनच बांफ हे राष्ट्रीय उद्यान आहे. त्यातील काही महत्त्वाची स्थळं पाहायची होती. या आगळ्यावेगळ्या भटकंतीमुळे मन संतृप्त झाले होते हे सांगणे न लगे.    

फोटो फीचर

संबंधित बातम्या