पिकनिक रेसिपीज

राजश्री बिनायकिया
गुरुवार, 17 जानेवारी 2019

कव्हर स्टोरी : पर्यटन विशेष
फार पूर्वीपासून प्रवासाला जाताना खाद्यपदार्थ घरातूनच तयार करून घेऊन जाण्याची पद्धत होती. आधुनिक काळातही पिकनिकला, गावाला जाताना लागले तर असावेत म्हणून दोन-चार पदार्थ घरून करून नेले जातात. हे पदार्थ वेळेवर उपयोगी पडतात असा प्रत्येकाचा अनुभव आहे. अशाच प्रवासत उपयोग पडणाऱ्या पदार्थांच्या रेसिपीज...

राघवदास लाडू
साहित्य : बारीक रवा दोन वाटी, दूध १ वाटी, साजूक तूप १ वाटी, पिठीसाखर दीड वाटी, वेलची पूड १ टीस्पून, बदाम, काजू तुकडे १ टेबल स्पून, पातळ साजूक तूप १ टेबल स्पून, खवा २०० ग्रॅम.
कृती : रव्यात दूध व पातळ तूप घालून ते एकत्र करावे व काही वेळ एका भांड्यात दडपून ठेवावे. (मोगरी देणे असे या प्रक्रियेस म्हणतात.) अर्ध्या तासाने मिक्‍सरमधून रवा कोरडाच काढावा व तुपात भाजावा. थोडा रवा ही स्वतंत्र भाजावा. सर्व थंड झाल्यावर त्यामध्ये उरलेले साहित्य टाकून मिश्रण चांगले मिक्‍स करावे. नंतर लहान आकाराचे लाडू वळावेत.

कोरमा पुडी
साहित्य : मूग डाळ किंवा मटकी डाळ अर्धी वाटी, गव्हाचे पीठ १ वाटी, बाजरीचे पीठ अर्धी वाटी, बेसनपीठ पाव वाटी, मिरची पावडर १ टेबल स्पून, धने जिरे पूड २ टीस्पून, हिंग पाव टीस्पून, कोथिंबीर धुवून बारीक चिरलेली १ टेबल स्पून, २ टेबल स्पून तेल, हळद, चवीनुसार मीठ, तेल पुडी भाजण्यासाठी.
कृती : मुगाची डाळ किंवा मटकी डाळ थोडी ओबडधोबड मिक्‍सरमधून वाटून घ्यावी. (कोरडीच) नंतर २ कप पाण्यात ओबडधोबड वाटलेली डाळ भिजत ठेवावी. (१५ ते २० मिनीट), भिजवलेली डाळ व इतर सर्व साहित्य व्यवस्थित मिक्‍स करावे. मध्यम घट्ट पीठ मळून घ्यावे. पिठाचे छोटे छोटे गोळे करावे. मध्यम ते पातळ लाटून तव्यावर मध्यम आचेवर पराठे भाजावे. कच्चे ठेवू नये.
    प्रवासात नेताना दही, गूळ, लोणचे याबरोबर घ्यावे. या कोरमा पुडी ३ ते ४ दिवस छान राहतात. (मिक्‍स डाळीही वापरू शकता.)

चिझी बाईट्‌स
साहित्य : ३ वाटी मैदा, दोन-तीन टोमॅटो, सोडा, पाव टीस्पून बेकिंग पावडर, मिरपूड, मीठ चवीनुसार, तळण्यासाठी तेल, १ टीस्पून जिरेपूड.
कृती : टोमॅटो वाफवून घट्ट रस काढून घ्यावा. तो रस गाळून घ्यावा. मैदा, बेकिंग सोडा व बेकिंग पावडर चाळून घ्यावी. त्यामध्ये किसलेले चीज, मीठ, मिरेपूड, जिरेपूड घालावे. गरजेनुसार टोमॅटोचा रस घालून मैदा घट्ट भिजवून घ्यावा. अर्धा तास झाकून ठेवावे. नंतर पिठाच्या पोळ्या लाटून शंकरपाळ्याप्रमाणे छोटे छोटे तुकडे कापावेत. तेलात सोनेरी रंगावर तळून घ्यावा. (बच्चे कंपनीचा आवडता पदार्थ)

कुरकुरीत कारले
साहित्य : कारल्याचे गोल स्लाईस २ वाटी, पातळ चिरलेला कांदा १ वाटी, मिरची पूड, जिरेपूड, मीठ, चवीनुसार आमचूर पूड, १ टीस्पून पिठीसाखर चवीनुसार, तळण्यासाठी तेल.
कृती : कारल्याच्या स्लाईसला मीठ लावून १५ ते २० मिनीट ठेवावे. नंतर दोन्ही हातांच्या तळव्यामध्ये कारली स्लाईस दाबून पाणी काढून टाकावे. तेल गरम करून त्यामध्ये कांद्याच्या स्लाईस कुरकुरीत होईपर्यंत तळावेत. नंतर कारल्याच्या स्लाईसपण तळून घ्यावे. नंतर तळलेला कांदा व कारली स्लाईस मिक्‍स करावे. त्यावर लाल मिरची पूड, जिरेपूड, मीठ, पिठीसाखर, आमचूर पावडर टाकून मिश्रण व्यवस्थित मिक्‍स करावे.

खोबरे कोथिंबीर चटणी
साहित्य : दोन वाटी सुकलेले खोबरे कीस, अर्धी वाटी कोथिंबीर (धुवू नये पुसून घ्यावी), हिरवी मिरच्या २ ते ३, मीठ, साखर चवीनुसार, आवडत असल्यास लसूण पाकळ्या ८ ते १०.
कृती : प्रथम खोबरे मिक्‍सरमध्ये ओबडधोबड वाटून घ्यावे. त्यामध्ये मिरची तुकडे, लसूण, मीठ, साखर, कोथिंबीर मिक्‍स करावे. नंतर मिक्‍सर थांबून थांबून फिरवावा. चटणी खूप बारीक करू नये. पाणी वापरू नये. ही चटणी ५ ते ६ दिवस टिकते. प्रवासात दही मिक्‍स करून वापरता येते. याचा उपयोग सॅंडविचमध्ये पण करता येतो.

कोथिंबीर पराठा
साहित्य : एक गड्डी (धुवून बारीक चिरलेली कोथिंबीर), २ टेबल स्पून तीळ, जिरे धणे पूड १ टेबलस्पून, मिरची पूड, मीठ चवीनुसार, अर्धी वाटी तेल, अंदाजे गव्हाचे पीठ, १ वाटी बेसन पीठ.
कृती : बारीक चिरलेली कोथिंबीर एका भांड्यात घ्यावी. त्यामध्ये मीठ टाकून ठेवावे व तेलसुद्धा टाकावे. मिश्रण मिक्‍स करावे. हे मिश्रण दोन तास ठेवावे. नंतर त्या मिश्रणात मावेल तेवढे गव्हाचे पीठ व बेसनपीठ टाकावे. नंतर वरील सर्व साहित्य टाकावे. थोडा पाण्याचा हात लावावा. (जिरे धणे पूड, मिरची पूड, तीळ) मिश्रण व्यवस्थित मिक्‍स करावे. मिश्रण मळून घ्यावे. नंतर लगेच त्याचे छोटे छोटे पराठे लाटावेत व तव्यावर खरपूस भाजावेत. बाजूने तेल सोडावे. हे पराठे आठ दिवससुद्धा राहतात. (पाण्याचा कमी वापर असल्यामुळे)

चुरमुऱ्याचे लाडू
साहित्य : जाडसर कणीक चार वाट्या, पिठीसाखर ३ वाट्या, कणीक भिजवण्यास लागेल तेवढे दूध, ३ वाटी तूप, वेलची पूड ३ टीस्पून, आवडीनुसार ड्रायफ्रूट, बेदाणे, चारोळे.
कृती : चवीपुरते मीठ टाकून व २ टेबल स्पून तूप टाकून कणीक दुधात घट्ट भिजवावी. एक तासानंतर पिठाचे लहान लहान मुटके करून तळून घ्यावेत. खमंग तळावेत. नंतर सर्व मुटके मिक्‍सरमधून काढावे. सर्व मुटके जाडसर काढावेत. खूप बारीक करू नयेत. नंतर त्यात पिठीसाखर, बेदाणे, वेलदोडे पूड, ड्रायफ्रूट घालून मिक्‍स करावे. नंतर तूप गरम करून घालावे व लाडू वळावेत.

तिखट पुऱ्या
साहित्य : कणीक चार वाट्या, अर्धी वाटी ज्वारी पीठ, अर्धी वाटी बेसन पीठ, पाव वाटी बारीक रवा, जाडसर ओवा, जिरे पूड २ टीस्पून, २ टेबल स्पून तीळ, मिरची पूड, मीठ चवीनुसार, मोहनसाठी तेल ४ टेबल स्पून गरम, तळण्यासाठी तेल, हळद (आवडीनुसार बारीक चिरलेली कोथिंबीर)
कृती : कणकेत ज्वारी पीठ, बेसन पीठ, रवा, मिरची पूड, ओवा, जिरेपूड, हळद, मीठ, तीळ, कोथिंबीर, गरम तेलाचे मोहन घालून घट्ट पीठ भिजवावे. अर्ध्या तासाने एकसारख्या आकाराच्या पुऱ्या लाटून गरम तेलात तळाव्यात.
टीप : पालक पेस्ट वापरून या पुऱ्या करता येतील. पीठ मळताना पाणी कमी वापरावे. 

फोटो फीचर

संबंधित बातम्या