दक्षिणेतील मंदिरे

वृषाली उंद्रे-देशमुख 
गुरुवार, 26 एप्रिल 2018

पर्यटन
‘सकाळ साप्ताहिक’मध्ये पर्यटन या सदरासाठी लेख पाठविण्याचे आवाहन वाचकांना करण्यात आले आहे. या आवाहनाला प्रतिसाद देताना वाचकांनी पाठविलेले लेख प्रसिद्ध करीत आहोत. 

दक्षिणेकडील मंदिरे पाहण्यासाठी म्हणून आम्ही मैत्रिणी ट्रिपला निघालो. तशी सुरवात कन्याकुमारीपासून झाली. पूर्ण कन्याकुमारी दर्शनात आम्ही सूर्योदय, विवेकानंद स्मारक, तिरुवल्लूवर स्मारक, दत्त मंदिर, वॅक्‍स म्युझियम, गांधीधाम जेथे गांधीजींच्या अस्थी ठेवल्या होत्या. कन्याकुमारी देवीचेही दर्शन घेतले. तीन समुद्राच्या संगम असलेल्या त्या ठिकाणी विवेकानंदांनी ध्यानासाठी निवडलेले हे ठिकाण अगदी योग्य होते. त्यांचे स्मारक पाहताना ध्यानाच्या हॉलमध्ये आपण जेव्हा शांत बसतो तेव्हा एक वेगळी अनुभूती येते. संध्याकाळी आपण तेथील सनसेट पाहतो तेव्हा निसर्गाचा अप्रतिम आविष्कार पाहून मन आनंदित झाले. 

कन्याकुमारीहून रामेश्‍वरला जाताना आपण सूचिंद्रम मंदिर पाहतो. तिथे ब्रह्मा, विष्णू, महेशाच्या रूपातील शिवाचे दर्शन घेतो. खूप मोठा मंदिर परिसर. मंदिरातील मोठमोठे खांब जे एका एका दगडात निर्माण केलेले आहेत. त्या काळातील स्थापत्य कलेचा हा उत्कृष्ट नमुना आहे. शिल्प कलाकृती, त्यातून ठराविक पद्धतीने त्या खांबावर मारल्यावर येणाऱ्या सुरांचे बोल ऐकून थक्क होऊन जातो.  दोन्ही बाजूंनी सम अंतरावरच बांधलेले खांब व त्यावरील कला पाहून डोळे दिपून जातात. तेथून रामेश्‍वरचे दर्शन घेण्यासाठी पहाटे पाच वाजता मंदिरात पोचलो. रामनाथ स्वामींचे दर्शन, त्यानंतर समुद्रस्नान, बावीस कुंडांचे स्नान, विधी व श्रीरामेश्‍वराचे दर्शनाने मन आनंदी होते. हे मंदिर अतिभव्य आहे. बाहेरच्या भागामध्ये बाराशे खांब, त्यावरील अप्रतिम कलाकुसर, अतिकोरीव काम करुण मूर्ती खांबावर कोरलेल्या आहेत. हे मंदिर विक्रम बाहूराजा, तिरुमल्लै सेतूपती व अन्य राजांनी बांधलेले आहे. काशीयात्रा येथे आल्याशिवाय पूर्ण होऊ शकत नाही, असे मानले जाते. रामेश्‍वरहून आम्ही मदुराईला मीनाक्षी मंदिरामध्ये पोचलो. मंदिराच्या चारी बाजूंना उंच व अतिसुंदर खांब आहेत. दोन खांबावर वैश्‍य धनंजय व नगराचे निर्माते कुलशेश्‍वर पांड्य यांच्या मूर्ती आहेत. खांबावर पांडव, सुग्रीव, द्रौपदीची शिल्पे आहे. मनोवेधक शिल्पकला व भित्तीचित्रांमध्ये श्री मीनाक्षी देवीच्या लग्नसोहळ्याची, शिव व विष्णूंची मोहक रुपे आहेत. पश्‍चिमेकडील कोपऱ्यात दिव्यांची रांग, अष्टशक्ती मंडप हे द्रविडी, तमिळी संस्कृतीची साक्ष देतात.  

त्रिचन्नापल्लीमध्ये श्रीरंगम, जंबुकेश्‍वर मंदिर पाहिले. श्रीरंगम येथे पहुडलेली विष्णूची मूर्ती आहे. त्यापुढे पार्वतीची मूर्ती आहे व इतर मंदिरे येथे आहेत. ते सर्व मंदिरामध्ये मोठे मंदिर वाटले. त्याला एकवीस गोपुरे (द्वारे) आहेत. वैकुंठद्वार उत्तरेला आहे. जंबुकेश्‍वर मंदिराची आख्यायिका अशी, की एक हत्ती दररोज झाडाच्या बुडाला पाणी घालायचा. पार्वतीही तेथे पूजा करावयाची. तेथे खोदण्यात आले. शिवलिंग सापडले. मंदिर बांधले. सध्याही त्या मंदिराच्यावर जांभळीचे अतिप्राचीन झाड आहे. त्याला वर्षांतून एकच फळ येते. ते लिंगावर पुजारी वाहतात. म्हणून त्याला जंबुकेश्‍वर हे नाव देण्यात आले. श्रीराम, सीतामाई, लक्ष्मण यांचेही मंदिर येथे आहे.

तंजावरला बृहडेश्‍वराचे मंदिर चोल राजाचे वंशज राजा राजेश्‍वर यांनी बांधले. आधी शिवलिंग स्थापन केले. नंतर मंदिर बांधले. घुमटावरील दगड हा ८० टन वजनाचा आहे. हा मंदिर परिसर सत्तावीस एकरांचा आहे. पाच द्वार आहेत. पहिले द्वार मराठी बांधकाम शैलीतील आहे.  कुंभकोकणमला येथील अहीरेश्‍वराचे मंदिर प्राचीन आहे. अतिप्राचीन शिल्पकलेचा अस्सल नमुना येथे पाहावयास मिळतो. प्रत्येक खांब हा वेगळ्या कलाकृतींनी कोरला आहे. पुरातत्त्व विभागाने याला जागतिक दर्जा दिला आहे व ते कोणत्या काळातील आहे यावर संशोधनही चालू आहे. त्यानंतर चिदंबरमचे नटराजाच्या रूपातील महादेव मंदिराचे दर्शन घेतले. अतिभव्य मंदिर, चार द्वारे, रंगीत कलाकुसर, सुंदर तलाव येथे आहे. त्यानंतर पाँडेचरीला अरविंद बाबू आश्रम पाहिला. तेथून महाबलीपूरमला आलो. ब्रह्मा, विष्णू, महेश, पार्वतीने बाल गणेशाला मांडीवर घेतलेली मूर्ती तेथे स्थापन केलेल्या आहेत. पल्लव राजांच्या बांधलेल्या अनेक मंदिरांपैकी हे एक आहे. दगडांवर दगड रचून महाबलीपुरमचे मंदिर बांधले आहे. १७८४ मध्ये आलेल्या त्सुनामीत अनेक मंदिरे पाण्यात गेली. तेथेच थोड्या अंतरावर पंचरथ आहे. तेथील लेणी कृष्ण चरित्रावर आधारित आहेत. पल्लव व चोल राजांच्या वंशजांनी अनेक मंदिरे बांधलेली आहेत. 

दक्षिणेतील मंदिराचा परिसर हा खूप मोठा असतो. शिल्पकृती अजोड, अतिसुंदर, विलोभनीय आहेत. बऱ्याच मंदिरामध्ये समोर मोठमोठे नंदी एकाच दगडात बनविलेले आहेत. अति स्वच्छता, द्रवीडीयन संस्कृतीचे कडक रीतिरिवाज, श्रद्धामय वातावरण वाखाणण्याजोगे आहे. प्रत्येक मंदिरात प्रथम गणपती व कार्तिकेयची मंदिरे आहेत. प्रत्येक मंदिरातील समईंच्या प्रकाशाने एक वेगळी श्रद्धामय, शांततामय अनुभूती येते. खरोखरच शिल्पांचे, उत्तम कारागिरीचे वैभव येथे पाहता येते.

संबंधित बातम्या