केल्याने तीर्थाटन

पांडुरंग पाटणकर
शुक्रवार, 12 जानेवारी 2018

पर्यटन
रोजच्या धावपळीतून आणि धकाधकीतून निवांत वेळ काढून भटकायला सगळ्यांनाच आवडते. आयुष्यातले ताणतणाव कमी करण्यासाठी फिरायला जाणे हितकारक असते हे आता शास्त्रीयदृष्ट्यादेखील सिद्ध झाले आहे. कोणाला अनवट वाटा, मंदिरे धुंडाळायला आवडतात तर कोणाला समुद्र किनाऱ्यावर शांत बसून रहाणे आवडते. कोणाला हिमशिखरे साद घालत असतात तर कोणाला आफ्रिकेतल्या जंगल सफारी...
प्रत्येक जण आपल्या आवडीनुसार पर्यटनाचे विविध प्रकार निवडत असतो. हे लक्षात घेऊन अलास्कापासून सह्याद्रीपर्यंतच्या अागळ्या-वेगळ्या पर्यटन स्थळांची माहिती आम्ही या अंकात दिली आहे. पर्यटनाचे विविध रंग उलगडून दाखवणारा विशेषांक...

निसर्ग आणि मनुष्य यांना जोडणारा आनंदाचा सेतू म्हणजे पर्यटन असं म्हटलं जात. ती निसर्गदेवता मूर्तीरुपात प्रकट झाली की ते होते धार्मिक पर्यटन. म्हणून दोन्ही उद्देशाने भटकंती केली की ‘आनंदाच्या कोटी, साठवल्या आम्हा पोटी’ असं होऊन जातं. सुदैवाने अशी शेकडो निसर्गरम्य ठिकाणे महाराष्ट्रात व त्याला चिकटून असलेल्या चारही राज्यात आहेत. नुसत्या महाराष्ट्राचे ‘धार्मिक पर्यटन’ करायचे म्हटले तरी असंख्य ठिकाणे पाहण्यासारखी आहेत. ‘तीर्थरूप महाराष्ट्र’   झाला तर येथे देवीची साडेतीन शक्तीपिठे आहेत. अष्टविनायकांची मांदियाळी आहे. बारा ज्योतिर्लिंगातील पाच ज्योर्तिलिंग मराठवाडा व मध्य महाराष्ट्रात येतात. औदुंबर-नरसोबाची वाडी अशी दत्तस्थाने आहेत. दशावतारातील नृसिंह स्थाने आहेत आणि परशुराम, राम-कृष्णासह अनेक स्थानिक देव देवतांची जागृत स्थाने नागपूरपासून खाली गोव्यापर्यंत व मुंबई-नाशिकपासून अगदी नांदेडपर्यंत पहुडलेली दिसतात. ज्योतिर्लिंगातील पुण्याजवळचे भीमाशंकर पहायला गेलो तरी तेथील किर्रऽऽऽ झाडीतील ‘गुप्त भीमाशंकर’ आणि पहाडाच्या टोकांवरील ‘बॉम्बे पॉइंट’ पाहू गेल्यास निसर्गाचा मनोरम आविष्कार दृष्टी खिळवून टाकतो. तेथून दिसणारा कोथळगड, गोरख मच्छिंद्रगडाचे डोंगरसुळके तिकडच्या ‘ट्रेकिंग’ची आस लावून जातात. शिवाय भोरगिरी, खांडस-भीमाशंकर सारखे दमदार ‘ट्रेक्‍स’ आहेतच. मराठवाड्यातील औंढ्यानागनाथ (नांदेडपासून ६४ कि.मी.), परळी वैजनाथ आणि वेरूळ नजीकचे घृष्णेश्‍वर ही ज्योतिर्लिंगे पाहू गेल्यास नांदेडचे सचखंडा गुरुद्वारा, कंधारचा विशाल भुदुर्ग, परळीजवळची मूळ शक्तिपीठ अंबेजोगाई व वेरूळ-अजिंठ्याचे दैवी शिल्पलावण्य पहायलाच हवे. देवीच्या शक्तीपीठातील तुळजापूर आणि कोल्हापूर सहज पाहिली जातात. पण माहुरगडची श्री रेणुका आणि नाशिककडची वणीची सप्तश्रुंगी (अर्धपीठ) ही स्थाने पहायला आवर्जून जावे लागते. सप्तश्रुंगी समोरचे रवळ्याजावळ्या आणि मार्किंडा किल्ले ट्रेकर्सना साद घालतात. तर माहुरगडाकडील रेणुका, दत्तमंदिर आणि अनसूया ही तीनही स्थाने रिक्षा-जीपने जाण्यासारखी आहेत. पायथ्याच्या माहूर गावातील कपिलेश्‍वर वगैरे धर्मशाला छान आहेत. व तेथील पांडवलेणी, महानुभव केंद्रस्थान आणि वस्तुसंग्रहालय पहायलाच हवे. ज्योतिर्लिंगातील महाराष्ट्रातील पाचवे स्थान त्र्यंबकेश्‍वर म्हणजे पर्यटकांसाठी पर्वणीच आहे. खुद्द त्र्यंबकगड किल्ला व ब्रह्मगिरी पर्वत देखणे आहेतच. पण सपाटीवरील गंगाद्वार, श्री निवृत्तिनाथ समाधी व त्र्यबंकेश्‍वराचे शिल्पजडीत भव्य मंदिर आवर्जून पहायला हवे. 

महाराष्ट्रातील अष्टविनायक यात्रेकरिता एस.टी. महामंडळाची दोन दिवसांची स्वतंत्र सहल आहेच. पण यातील प्रत्येक गणेशस्थानाजवळ पाहण्यासारखी अनेक पर्यटनस्थाने आहेत. त्यांची यादी करायचे झाल्यास थेऊरनजीकचे शिल्पजडीत भुलेश्‍वर, मोरगावनजीक खंडोबाची जेजुरी, सासवड व पुरंदर किल्ला, नव्याने झालेले केतकावळे बालाजी मंदिर, लोणी भापकर, बारामती व सोमय्याचे कारंजे, सिद्धटेक गणेशानजिकचा पेडगावचा भुदुर्ग व राशीनची जगदंबा, रांजणगावाकडील निघोजचे रांजणखळगे व मोराची चिंचोली, पाबळ, तुळापूर, ओझरच्या गणपतीनजीक शिवनेरी-नारायणगड किल्ले व भीमाशंकर आणि खोदडची महाकाय दुर्बीण, पालीच्या बल्लाळेश्‍वरला गेल्यावर तेथील सोपा व सुंदर सरसगड तर महाडला जाताना कर्नाला अभयारण्य व किल्ला यांची बेगमी करता येईल. 

कोकणची भूमी तर तमाम पर्यटकांच्या मर्मबंधातील नाजूक ठेवच आहे. खास तेथील ‘अष्टविनायक’ निवडायचे झाल्यास गणपतीपुळ्यापासून २ कि.मी. अंतरावरील गणेशगुळे (गलबतवाल्यांचा गणपती) हेदवीचा दशभुजा गणेश, गुहागरचा उफराटा गणपती, आंजर्ले येथील कड्यावरचा गणेश, लोटेपरशुरामच्या रम्य निसर्गातील श्रीगणेश, आंबोलीचा गणपती (ता. दापोली) व सोनगाव येथील (ता. चिपळूण) बर्वे यांचा गणपती निवडता येतील. ते पहात असताना जागोजागचे सुंदर समुद्रकिनारे, नारळी पोफळीच्या बागा आणि इतर मंदिरे डोळ्यांना तृप्त करतील. मध्य कोकणातील दिवेआगर, हरिहरेश्‍वर, बाणकोट, वेळास, केळशी-उटंबर, आसूद-मुरुड अशी नावे जरी उच्चारली तरी मन उल्हसित होते. आचाऱ्याचा रामेश्‍वर आणि गावपळण, कुणकेश्‍वराची गुहा, कोटकामत्याची भगवती, उमाड्याचा महादेव अशी आणखी कितीतरी निसर्गरम्य ठिकाणे व तेथील विविध देवदेवतांची मंदिरे डोळ्यांपुढे येतात. सिंधुदुर्ग-मालवण हे तर आणखी सुरम्य ‘प्रकरण’ आहे. शिवकाळापासूनचे येथील सागरी किल्लेही आवर्जून पाहण्यासारखे आहेत. 

बालपणापासून अक्राळविक्राळ चेहऱ्याच्या उग्र नरसिंहाची गोष्ट ऐकलेली असते. श्री विष्णूंच्या या नरसिंह अवताराची अनेक मंदिरे भारतातच नव्हे तर मूलतान (पाकिस्तान), मुक्तिनाथ (नेपाळ), इंडोनेशिया, कंबोडिया अशा अनेक देशात आहेत. आपल्या कऱ्हाडजवळचे कृष्णेच्या काठावरील कोळे नरसिंहपूर (ज्वाला नरसिंहपूर), नीरा-भिमेच्या संगमावरील इंदापूरनजीकच नीरानरसिंहपूर येथील भव्य मंदिर व मूर्तीशिवाय अकोट, रामटेक, एरकी, अंजनगाव, गणेशपूर (वर्धा), तिरोडा, थुगाव (१२ मीटर उंचमूर्ती), परतवाडा, पुसद, भद्रावती, पैठण, पोखरणी, राहेर, सावखेड, हिप्परगा, अंबेजोगाई, गंगाखेड, तुळजापूर, तेर इत्यादी ठिकाणची नरसिंह स्थानेही वेधक आहेत. 

पर्यटन आणि धार्मिकता यांचा सुरेख संगम साधणारी काही नितांत रमणीय ठिकाणे अलीकडच्या काळात महाराष्ट्रात उभी राहिलेली आहेत. त्यातील पैठणचे संत ज्ञानेश्‍वर उद्यान, शेगावचे आनंदसागर उद्यान अशा काही ठिकाणांचा उल्लेख करणे आवश्‍यक आहे. त्यातील संत ज्ञानेश्‍वर उद्यान ३०० एकर क्षेत्रावर उभे राहून पर्यावरण रक्षण करीत आहे. तर आनंदसागर उद्यान ३५० एकर क्षेत्रावर उभे राहून तेथील पाण्याचे दुर्भिक्ष संपवित आहे. निसर्ग संतुलन राखणाऱ्या वनस्पती-पशू-पक्षांना अभय देत आहे. शेगावला त्यांनी ६० एकर क्षेत्रावर पावसाचे व इतर पाणी साठवून ‘रेन वॉटर हार्वेस्टींग’चा आदर्शभूत प्रकल्प उभा केलेला आहे. बायोगॅस, सौरऊर्जा असे आनुषंगिक प्रकल्प जोडीला आहेतच. 

सख्खा शेजारी गुजरात
नाशिक-त्र्यंबकेश्‍वरचे धार्मिक पर्यटन करता करता जरा वर सरकले की सीमेवरील गुजरातचे एकमेव ‘हिलस्टेशन’ सापुतारा पाहता येईल. नाशिकपासून ते ८० कि.मी. अंतरावर तर वणीच्या स्पतश्रृंगी देवस्थानापासून अगदी जवळ ४० कि.मी. अंतरावर आहे. मुक्कामासाठी गुजरात पर्यटनाचेच ‘तोरण हॉटेल’ छान आहे. गुजरात-महाराष्ट्र हे पूर्वी मुंबई राज्यात एकत्र असल्याने ‘सख्खे शेजारी’ म्हणायचे. कृष्ण चरित्रातील द्वारका, सुदामपुरी (पोरबंदर), ‘रणछोडरायां’चे डाकोर ही क्षेत्रे जेवढी भावविभोर करतात तेवढेच श्री. दत्तगुरुंचे महन्मंगलस्थान गरुडेश्‍वर (श्री वासुदेवानंद सरस्वती-टेंबेस्वामी यांचे समाधीस्थान) व गिरनार पर्वत इतिहासाचा साक्षी सोरटी सोमनाथ, उत्तुंग पर्वतराजीतील श्री. अंबाजी माता मंदिर, जैनांचे पावागड आणि पलिताणा अशी ठिकाणेही मनाचा ठाव घेतात. निखळ पर्यटनासाठी यांच्या आजूबाजूची ठिकाणे म्हणजे शिवाजी महाराजांनी लुटलेले सुरत, सयाजीराव गायकवाडांचे संस्थांनी बडोदा शहर व डभोईचा भूदुर्ग, जुनागड, पोर्तुगीजांच्या पाऊलखुणा दाखविणारे दीव-दमण, गुजरातच्या वैशिष्ट्यपूर्ण ‘शिल्पजडीत’ खोल विहिरी, अहमदाबाद (कर्णावती)ची ‘स्मार्ट सिटी’ गांधीनगर व अक्षरधाम मोढेराचे आरसपानी सूर्यमंदिर अशीही सुंदर ठिकाणे पाहता येतील.   

भारताचे हृदयस्थान मध्य प्रदेश
रामचरित्राची सुरवात अयोध्येत होऊन मध्यप्रदेशातील चित्रकूट-जबलपूर अशी ठिकाणे घेत महाराष्ट्रातील रामटेक पंचवटीतून दक्षिणेकडे प्रवाहित होते. येथील उज्जैन भारतातील सर्वांत प्राचीन नगर असून प्रत्येक कल्पात ते अस्तित्वात राहणार म्हणून त्याला ‘प्रतिकल्पा’ असेही नाव आहे. येथील नर्मदा व तापी या परमपवित्र नद्या अनेक तीर्थक्षेत्रे काठावर धारण करुन पुराण काळापासून अनेक घटनांच्या साक्षी आहेत. येथील ‘नर्मदा परिक्रमा’ तीर्थयात्रा तर सर्वतोमुखी निनादत आहे. महाकवी कालिदासाची लाडकी नगरी उज्जैनमध्ये बारा ज्योतिर्लिंगांपैकी अत्यंत महत्त्वाचे महांकाळेश्‍वर मंदिर आहे व तेथील कुंभमेळा जगप्रसिद्ध आहे. तेथून वाहणारी क्षिप्रा नदी अमृतसरिता मानतात व ‘‘सिद्धी प्राप्ती इति क्षिप्रा’’ असे तिचे माहात्म्य आहे. भारतातील सर्वांत जास्त ऐतिहासिक व सांस्कृतिक पर्यटनस्थळे मध्यप्रदेशात एकवटलेली आहेत. याचे विशाल पठार विंध्य व सातपुडा या पर्वतात पसरलेले असून त्यांच्याइतकी पर्यटनस्थळांची विविधता कुठेच आढळत नाही. जगभरात कुठे नाही असे खजुराहोसारखे अप्रतिम शिल्पलावण्य येथे आहे. व भीम बेटका (भोपाळपासून ४५ कि.मी.) सारखी पुराणपाषाणकालीन (स्टोन एज’ लाख वर्षांपूर्वीची आदिमानवाची शैलगृहे व चित्रकारीही येथे अस्तित्वात आहे. येथील पंचमढीसारखे वेगळ्या डोंगररांगांचे ‘हिलस्टेशन’ डोळ्यांना सुखावून जाते. तर जबलपूरकडील संगमरवरी पाषाणातून वाहणारी नर्मदामैय्या डोळ्यांचे पारणे फेडते. सांचीचे वैशिष्ट्यपूर्ण बौद्धशिल्प व मांडूच्या अवाढव्य किल्ल्यातील ‘हिंडोल महल’ सारखी अद्वितीय शेकडो बांधकामे पाहणाऱ्याला मंत्रमुग्ध करुन टाकतात. महाराष्ट्रकन्या झाशीची राणी हिचा बुलंद इतिहास जागृत करणारा झांशीचा किल्ला, ग्वाल्हेरचा देखणा किल्ला, ओरछा व दतियाचा अद्‌भुतरम्य महाल, संगीत सम्राट तानसेनची समाधी शिवपुरीतील सिंदिया राजेंची छत्री, राणी दुर्गावतीचा अवाढव्य शिळेतील मदनलाल किल्ला, अशी शेकडो ठिकाणे पाहताना भान हरपून जाते. हे सारे पाहून थकल्यावर विश्रांतीला येथे बांधवगड, कान्हा किसलिंगसारखी घनदाट अभयारण्ये आहेतच. 

‘एव’ गुणविशिष्ट’ बहुरंगी पर्यटन हे तीर्थयात्रा साधता साधता सहज करता येईल असे आहे.

कानडाऊ विठ्ठलू कर्नाटकू
महाराष्ट्र आणि कर्नाटक हे प्रांत पंढरपूरच्या विठू माऊलीमुळे एकमेकांना जुळ्या भावंडासारखे जोडले गेलेले आहेत. कर्नाटकचे ‘टुरिझम डिपार्टमेंट’ आस्थेवाईकपणे पर्यटकांना मदत करण्यास तत्पर असल्यामुळे इकडची सहल आनंददायी होते. शिवाय येथील पर्यटनस्थानांची विविधता पाहता इतका समृद्ध प्रांत दुसरा नाही असेच वाटते. पंढरपूरचे विठ्ठल मंदिर इकडचा होयसाळ राजा विष्णूवर्धनने बांधले. तसेच त्यांनी कर्नाटकातही बेलूर-हलेबिडूसारखी बेजोड शिल्पमंदिरे उभारली. विजापुरचा गोलघुमट आणि शिल्पकेलची आणखी उत्तुंग शिखरे आपल्याला बदामी-ऐहोळ-पट्टद्‌कल-हंपी येथे पाहता येतात. कर्नाटकाला चांगला सव्वातीनशे किलोमीटर्स लांबीचा समुद्रकिनारा लाभला असून त्यावर कारवार, गोकर्ण महाबळेश्‍वर, मुर्डेश्‍वर, भटकळ, उडुपी, मालपे, अरवंथे असे सुंदर किनारे व मंदिरे यांची मांदियाळीच आहे. या मुलखात चक्क ६० नद्या असून त्यांच्यावर विविध ठिकाणी जोग फॉल्स, मागोद, शिवगंगा, सातोडी, बनवासी, ऊंछाली, सहस्त्रलिंग असे नयनरम्य धबधबे आहेत. जैन धर्मीयांचे पवित्रस्थान श्रवणबेळगोळ व धर्मस्थळ (मेंगलोरच्या पूर्वेस ६८ कि.मी.) ही पहायलाच हवीत. पण त्याच बरोबर कर्नाटक आंध्र सीमेवरील श्री. राघवेंद्रस्वामींचे ‘मंत्रालय’ ही चुकवायला नको. चिकमंगळूर पासून ९० कि.मी. अंतरावरील आद्य शंकराचार्यांचा शृंगेरी मठ व तेथील विद्याशंकर शिल्पमंदिर अखिल भारतीयांचे प्रेरणास्थान आहे. थंड हवेचे केमनगुंडी चिकमंगळूरहून ५५ कि.मी. अंतरावर आहे. थंड हवेची ठिकाणे म्हटले की इकडची ‘कुर्ग व्हॅली’ दक्षिणेचे काश्‍मीर म्हणून नावाजलेली आहे. तेथील मडकेरी हे ठिकाण मंगलोरहून १३५ कि.मी., म्हैसूरपासून १२५ कि.मी. अंतरावर आहे. म्हैसूर तर कर्नाटकच्या शिरपेचातील सोनेरी मुगुटच आहे. बंगलोर या राजधानीच्या बागांनी नटलेल्या शहरापासून ते १४० कि.मी. अंतरावर आहे. म्हैसूरच्या चामुंडा पहाडावरील देवीचे दर्शन, राजवाडा, वृंदावन गार्डन्स, श्रीरंगपट्टनम, प्रचंड नंदीमूर्ती सारेच पाहण्यासारखे आहे.

तिरुपती बालाजीचा आंध्र प्रदेश
व्यंकटेश बालाजी हा अखिल भारतीयांचे दैवत आहे. बाराही महिने जगभरातून भाविक येथे दर्शनाला येत असतात. त्यांच्या सोयीसाठी दर्शनाची ऑनलाइन बुकिंग व्यवस्था करण्यात आलेली आहे. त्यांची वेबसाइट ःhttpः//ttdsevaonline.com आहे. पुण्यात ‘साम टुर्स’ व इतरत्र त्यांनी अधिकृत प्रतिनिधी नेमलेले असून त्यांचेकडेही आरक्षण करता येते. तिरुपती बरोबरच श्रीशैलम, नागार्जुनसागर आणि रामोजी सिटी पाहण्याचीही व्यवस्था केली जाते. त्यांच्या पर्यटन विभागाची वेबसाइट ः www.tourisminap.com आणि ईमेल पत्ता aptdc@satyam.net.in, aptourism@hotmail.com इकडे येताना रेल्वेने आल्यास रेनीगुंठा स्टेशनवर उतरून बसने तिरुपती जवळ आहे. बालाजीशिवाय व वर उल्लेखिलेल्या मंत्रालयाशिवाय आंध्रमध्ये आलमपूर येथे चालुक्‍यकालीन शिल्पमंदिरे, लेपाक्षी (बंगळूरहून १०० कि.मी.) भद्राचलम, मेडक (अवाढव्य प्रार्थनामंदिर-चर्च), श्री सत्यसाईबाबांचे पुट्टर्थी, महानंदी (जिल्हा कर्नुल), अरसवल्ली (सूर्यमंदिर) भगवान नरसिंहाचे अहोबिलम (जि. कर्नुल), जैनांचे कोलनुपका मंदिर, इत्यादी अनेक धार्मिक स्थळे आहेत. हैदराबाद, विशाखापट्टणम, विजयवाडा, अमरावती, वरंगळ, राजमहेंद्री अशा मोठ्या शहरात मुक्काम ठेवून गोवळकोंडा, वरंगळ सारखे प्रेक्षणीय किल्ले, बेलमसारख्या पुरातन गुहा व कोरीव लेणी, सालारजंग सारखी अद्वितीय वस्तुसंग्रहालय, बोटॅनिकल व झूलॉजीकल पार्कस, ऐतिहासिक राजवाडे अशा अनेक गोष्टी तीर्थाटन करता करता पाहता येतील.

फोटो फीचर

संबंधित बातम्या