योग्य आहाराची त्रिसूत्री 

डॉ. विनय गोऱ्हे
सोमवार, 9 मे 2022

पेट केअर

कुठल्याही प्राण्याच्या आहाराकडे योग्य पद्धतीने लक्ष देणे आवश्यकच असते. आपल्या घरातील पाळीव प्राण्याचा आहार योग्य संतुलित असावा, पौष्टिकतेने परिपूर्ण असावा आणि त्याचबरोबर गरजेपेक्षा जास्त नसावा. प्राण्यांच्या योग्य आहाराची ही त्रिसूत्री आहे.

पाळीव प्राण्यांच्या  आहाराकडे लक्ष देणे महत्त्वाचे असते. ‘एखादा भाकरीचा तुकडा ठेव बरं...’  ही रीत कालबाह्य झाली आहे, असे आपण म्हणू शकतो. पाळीव प्राण्यांसाठी  त्यांचे विशेष अन्न आता उपलब्ध आहे. अगदी श्वान पिल्लांच्या वाढीसाठी पिल्ले पोटात असल्यापासून ते ती वयस्कर होईपर्यंत त्यांच्या ब्रीडनुसार निरनिराळे अन्न बाजारात उपलब्ध आहे.  श्वान पिल्लू जन्मल्यापासून २१ दिवसांपर्यंत आईच्या दुधावर असते. काही कारणास्तव पिल्लाला आईचे दूध मिळाले नाही, तर त्या एकवीस दिवसांसाठी ‘फर्स्ट मिल्क’ उपलब्ध आहे. त्याचे काही प्रमाण ठरलेले असते, ते पाळून बाटलीने पिल्लांना भरवावे लागते. जर काही गावांत ते उपलब्ध नसेल तर गायीचे दूध दिले जाते. एकवीस दिवसांनंतर स्टार्टर फूड  देण्यात येते. ते प्रत्येक ब्रीडनुसार विशिष्ट वयापर्यंत देऊ शकतो. त्यानंतर अॅडल्ट फूड आणि ठरावीक घरगुती पदार्थ देण्यास योग्य असते.

बरेचदा लोकांचा श्वानांना घरगुती अन्न देण्याकडे कल असतो, मात्र यामुळे आहार असंतुलित होण्याची शक्यता असते. उदा. कॅल्शियमचे प्रमाण कमी होऊन फॉस्फरसचे प्रमाण वाढते. पौष्टिकतेच्या कमतरतेमुळे अनेक तक्रारी उद्‍भवू शकतात. या गोष्टींचा  विचार करता सुरुवातीच्या काळात तरी कमर्शियल डॉग फूड देणे हितकारी ठरते. श्वानांच्या दृष्टीने एकसारखा आहार कंटाळवाणा नसतो.  मनुष्याप्रमाणे आहारात विविधता आणि निरनिराळ्या चवींची प्राण्यांना गरज वाटत नाही.  घरी अन्न देताना श्वानाला किती आणि कोणत्या पौष्टिक घटकांची गरज आहे, याची नेमकी कल्पना नसल्याने जास्त किंवा कमी आहार दिला जाऊ शकतो.  याचा परिणाम श्वानांच्या शरीरयष्टीवर दिसून येतो. श्वानाची योग्य शरीरयष्टी ओळखायची असेल तर सोपा मार्ग म्हणजे, श्वानाच्या बरगड्या हाताला जाणवल्या पाहिजे, मात्र डोळ्यांना दिसता कामा नयेत. बरगड्या दिसल्या  तर तो बारीक आहे आणि हाताला जाणवल्या नाहीत तर तो जाड आहे हे ओळखावे.

कमर्शियल डॉग फूड बनविताना श्वानाची  शरीरयष्टी, वय, ब्रीड, जबड्याचा आकार, दात, कोणत्या आकाराचे पदार्थ त्यांना खाण्यासाठी सोपे असतील, कोण-कोणत्या पौष्टिक घटकांचा समावेश गरजेचा असेल  या गोष्टींचा विचार केला जातो. वयानुसार किती अन्न देणे योग्य असेल, हेदेखील निश्चित केलेले आहे. काही श्वानांचा खाण्याचा वेग जास्त असल्याने त्यांच्या अन्नाचे  दाणे पोकळ ठेवलेले असतात, किंवा खाण्याचा वेग नियंत्रित ठेवण्यास मदत करणारे फूड बाउलही मिळतात. डॉग फूड किती प्रमाणात आणि किती वेळेस द्यायला हवे, हे समजावून घेऊन त्याचे अनुकरण करणे अत्यंत गरजेचे आहे, अन्यथा श्वानाला लठठ्पणा, जुलाब, उलट्या असे आजार होतात.

लहान वयात श्वानांना चार ते पाच वेळा अन्न द्यावे लागते. त्यांचे वय वाढते तसे ते कमी करावे लागते. पिल्लू एक-दीड वर्षाचे झाल्यावर रोज सकाळी आणि संध्याकाळी दिलेले अन्नही पुरेसे असते. काही कुत्रे एका वेळच्या आहारावरदेखील राहू शकतात. श्वानांच्या खाण्याच्या वेळा निश्चित असणे आवश्यक आहे; त्यानुसार त्यांना बाहेर फिरण्यासाठी किंवा शौचासाठी घेऊन जाता येते. श्वानाने जर जेवणानंतर लगेच उड्या मारल्या तर पोटाला पीळ पडून पोटफुगी होण्याची शक्यता असते . व्यायाम किंवा खेळ खाण्याच्या आधीच  करणे योग्य आहे.   

श्वानांना शिकवताना त्यांना चांगल्या सवयी लावण्याकरता बक्षीस म्हणून डॉग ट्रीट देताना, त्या डॉग ट्रीट  भरपूर पोषक तत्त्वांनी बनवलेल्या असतात, हे लक्षात ठेवणे गरजेचे आहे. त्यामुळे त्या जास्त दिल्या गेल्यास श्वानांना त्रास होतो. अगदी ढोबळ मानाने  सांगायचे झाल्यास एकावेळेस दोन ते तीन ट्रीट दिवसातून तीन वेळा देणेच योग्य आहे.

*** 
मांजराच्या  आहारात गरजेची असणारी पोषक तत्त्वे बाकी पाळीव प्राण्यांच्या मानाने वेगळी असतात. मांजरांना  प्रथिने आणि चरबीयुक्त अन्न जास्त, तर कर्बोदके कमी असलेले अन्न लागते. त्यामुळे त्यांच्यासाठी आहार बनवतानादेखील या गोष्टींचा विचार केला जातो. मांजरदेखील कमर्शियल फूडवर उत्तम जगते. त्यांच्या वयानुसार संतुलित पौष्टिक  घटक  असलेले वेगवेगळे कॅट फूड उपलब्ध असते.  त्यात  काही अमिनो आम्ले असतात. ही अमिनो आम्ले इतर कशातून मिळत  नाहीत. मांजराने केलेल्या ताज्या शिकारीतून तिला टॉरिन नावाचे अमिनो आम्ल मिळते. टॉरिन अन्य कशातूनच मिळत नसल्याने कॅट फूड किंवा औषधांमार्फतच द्यावे लागते. ते न मिळाल्यास मांजरांना हृदयविकार  होऊ शकतात. त्यांच्या खाण्याच्या वेळा ठरलेल्या नसतात,  दिवसभर त्या त्यांच्या मनाप्रमाणे थोडे-थोडे खातात. खाण्याच्या वेळा ठरवता न आल्याने  मांजरांमध्ये लठ्ठपणा जास्त प्रमाणात दिसून येतो. त्यामुळे त्यांना मधुमेह होण्याची शक्यता असते. यासाठी संतुलित आहार गरजेचा ठरतो. कॅट फूडमध्ये भरपूर पोषक पदार्थ  असल्याने कमी प्रमाणही  पुरेसे असते. घरचे  अन्न देताना दूध न देता दही किंवा ताक द्यावे. उकडलेले चिकन, मासे आणि अंडीही चालतात. 

पाळीव प्राण्यांना दूध द्यावे की नाही असा बऱ्याच जणांचा प्रश्न असतो. काही प्रजाती, उदाहरणार्थ गावठी श्वान, दूध पचवू शकतात काहींना मात्र, उदाहरणार्थ जर्मन शेफर्ड, गोल्डन रिट्रिव्हर यांना, लॅक्टोज इन्टॉलरन्सचा त्रास असतो. श्वानांपेक्षा मांजरांमध्ये हा त्रास अधिक प्रमाणात आढळून येतो. आश्चर्य म्हणजे आपल्या देशात बऱ्याच मांजरी दूध पितात आणि त्यांना आयुष्यभर त्रासदेखील होत नाही. पाश्चात्त्य देशात मात्र कुठल्याही मांजराला दूध दिले जात नाही.

श्वानांना आणि मांजरींना, प्रामुख्याने कमर्शियल फूड देत असाल तर पिण्यासाठी पाणी सतत समोर ठेवावे. घरचे अन्न देताना  काही पदार्थ देणे योग्य नसते व ते मुळीच देऊ नयेत. त्यामुळे नेमके काय द्यावे आणि काय देऊ नये, हे तज्ज्ञांकडून समजावून घ्यावे.

पक्ष्यांसमोर कायम अन्न ठेवावे लागते. त्यांच्या वेळा ठरलेल्या नसतात. मुळात पक्ष्यांना किती खावे याची जाणीव असते त्यामुळे, त्यांना आहारामुळे आजार होण्याची शक्यता कमी असते. लव्ह बर्ड््सना राळे दिले जातात, कोथिंबीर आणि पालकाच्या काड्याही देतात. एखाद्यावेळेस जर त्यांनी राळे खाल्ले नाहीत, तर ते कुंडीत लावावे काही दिवसात त्याचे गवत येते. ते गवत त्यांना आवडतेही आणि त्यांच्या प्रजनन क्षमतेसाठीही ते उपयोगी असते. त्यांच्यासाठीही बाहेर तयार अन्न मिळते. पक्ष्यांनाही काही व्हिटॅमिन्स औषधांमार्फत दिली जातात. 

माशांसाठी प्रामुख्याने बाजारात उपलब्ध असणारे  फिश फूड दिले जाते. ऑस्कर, अर्वाना फिशसारख्या काही माशांना दुसरे छोटे मासेच खाऊ घालावे लागतात. भूक लागली की मासे पाण्याच्या वरच्या बाजूला येतात. ते दिवसातून दोन ते तीन वेळा खातात. मासे जन्मतः सगळे खायला लागतात त्यामुळे त्यांच्या आहारात फारसे बदल करावे लागत नाहीत. 

ससा पूर्णपणे शाकाहारी प्राणी आहे, मात्र किती खावे याची जाणीव नसल्याने ससे खूप खातात. अतिरेक झाला की  त्यांना त्रासही होतो. त्यामुळे त्यांच्या खाण्याकडे लक्ष ठेवावे लागते. ते हिरव्या भाज्या, फळभाज्या, फळे खातात. पक्षी, मासे आणि ससे यांच्या आहाराच्या गरजा फार काटेकोर नसतात यामुळे थोडे फार इकडे तिकडे झालेले चालते. या पाळीव प्राण्यांची आहाराबाबत फारशी वेगळी देखभाल करावी लागत नाही. 

कुत्रा बदल स्वीकारणारा प्राणी आहे त्यामुळे तो शाकाहारी आणि मांसाहारी दोन्ही असू शकतो. संपूर्ण शाकाहारी आणि घरगुती आहारावरही  उत्तम आयुष्य जगणाऱ्या श्वानांचीही उदाहरणे आहेत. 

पाळीव प्राण्यांमध्ये अपघात होण्याचीदेखील शक्यता असते. असे अपघात टाळण्यासाठी  अगदी लहान बाळाप्रमाणे त्यांची काळजी घ्यावी लागते. 

आपल्या घरातील पाळीव प्राण्याच्या आहाराकडे लक्ष देणे आणि तो संतुलित ठेवण्याबद्दल पशुवैद्यांचा सल्ला घेणे महत्त्वाचे असते.
(लेखक  ज्‍येष्ठ पशुतज्‍ज्ञ आहेत.)
(शब्दांकन: लेखादिव्येश्वरी चंद्रात्रे)

संबंधित बातम्या