सोबतीही, जबाबदारीही...

डॉ. विनय गोऱ्हे
सोमवार, 11 एप्रिल 2022

विशेष

घरात एखादा पाळीव प्राणी असणे हा एक सुखकर अनुभव असला, तरी तो निव्वळ मजेचा भाग नाही, तर ती एक खूप मोठी जबाबदारीही आहे. अनेकदा या जबाबदारीची  जाणीव लोकांना नसते, त्यामुळे पाळीव प्राणी असणे त्रासदायकदेखील होऊ शकते. यासाठी प्राणी पाळण्याआधी काही गोष्टींचा विचार प्रत्येकाने करणे गरजेचे आहे.

लहानपणापासून मला प्राण्यांची खूप आवड होती.  विशेषतः कुत्रा आणि मांजर. बारावीनंतर मी मेडिकल फील्डमध्ये जायचे ठरवले व मुंबईतील पशुवैद्यकीय  महाविद्यालयात प्रवेश घेतला; तेव्हापासून कधीच माघार घेतली नाही. आज गेल्या ३५  वर्षापासून एक पशुवैद्यक तज्ज्ञ म्हणून कार्यरत आहे. प्राण्यांची आवड असल्याने नेहमीच मला माझ्या आवडीचे काम करायला मिळाले. प्राण्यांसोबत काम करणे अतिशय इंटरेस्टिंग गोष्ट आहे.  विशेषतः पाळीव प्राणी आपल्याला ज्याप्रकारे प्रतिसाद देतात तो अनुभव सुखकर असतो.   

घरात पाळीव प्राणी असल्याने कुटुंबातील लोकांना आजार होऊ शकतात, अशी शंका बरेचदा लोकांच्या मनात असते. मात्र असे नाही.  योग्य काळजी आणि पेट ट्रेनिंग असेल तर असे काही होत नाही. तुमचा पेट तुमच्या कुटुंबाचा सदस्य आणि तुमचा सहचर होऊन नक्कीच  राहू शकतो.  याची अनेक उदाहरणे समाजातही आहेत. आधी ज्यांच्याकडे पाळीव प्राणी आहेत त्यांना ‘पेट ओनर’ असे संबोधले जात होते. अलीकडच्या काळात मात्र ‘पेट पॅरेन्ट’  किंवा ‘पेट सिबलिंग’ म्हटले  जाते. फोनवरही बोलताना ‘माझा कुत्रा’ किंवा ‘माझी मांजर’ असं न म्हणता ‘मी ‘रॉकी’ची  आई बोलते आहे,’ असे अगदी सहज सांगितले जाते. अनेक घरांत लोक अगदी आपल्या मुलाप्रमाणे पाळीव प्राण्यांना सांभाळतात, आणि त्यांना त्यातून आनंदही  मिळतो. अलीकडच्या काळात, गेल्या काही वर्षांमध्ये झालेल्या  या बदलावरून आपण नक्कीच हे म्हणू शकतो, की पाळीव प्राणी हादेखील कुटुंबांमधला एक महत्त्वाचा घटक झालेला आहे. 

घरात असा एखादा सहचर असण्याचे अनेक फायदेदेखील आहेत. रक्तदाब, नैराश्य, एकटेपणा असे त्रास असणाऱ्या व्यक्तींना त्यामुळे मदत होते. दिवसातील थोडा वेळ जरी त्यांनी पाळीव प्राण्यासोबत घालवला तर त्यांचा मानसिक ताण कमी होतो. अनेकांकडे फिश टॅंक असतात. मासे शांत असतात, त्यांचा कुठलाही आवाज नसतो, पण त्यांचे रंग, पाण्यात होणारी त्यांची हालचाल बघून काही क्षणातच आपले मन शांत होते. उत्तम वर्तन असलेला कुत्रा (fully trained dog) देखील आनंद देऊन जातो. आपण सांगतोय  ते त्याने ऐकणे आणि आपले बोलणे समजून त्यावर त्याचा प्रतिसाद देणे, हे  नकळत आपल्याला हसवून जाते.  आमच्या घराजवळ एक बाई राहतात, त्यांच्याकडे एक पोपट आहे. तो कधीच पिंजऱ्यामध्ये नसतो. कित्येकदा त्या घरातली कामे करत असताना तो त्यांच्या खांद्यावर किंवा डोक्यावर बसून राहतो.. या छोट्या अगदी निरागस गोष्टींतून अनुभवता येणारे सुख काही निराळेच असते. आपण जेवढा जीव लावू त्यापेक्षा अधिक प्रेम आणि आनंद हे प्राणी आपल्याला निःस्वार्थी भावनेने देऊन जातात. 

आधी म्हटल्याप्रमाणे  घरात एखादा पाळीव प्राणी असणे हा एक सुखकर अनुभव असला, तरी तो निव्वळ मजेचा भाग नाही, तर ती एक खूप मोठी जबाबदारीही आहे. अनेकदा या जबाबदारीची  जाणीव लोकांना नसते, त्यामुळे पाळीव प्राणी असणे त्रासदायकदेखील होऊ शकते. यासाठी प्राणी पाळण्या आधी काही गोष्टींचा विचार प्रत्येकाने करणे गरजेचे आहे. 

सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे, तुमच्याकडे त्या प्राण्यासाठी वेळ आहे का? कारण कोणत्याही पाळीव प्राण्याकडे पुरेसे लक्ष देण्यासाठी, त्यांची काळजी घेण्यासाठी, जेवणाच्या वेळा पाळण्यासाठी वेळ देणे गरजेचे आहे. दुसरे म्हणजे तुमचे घर कुठे व किती मोठे आहे यानुसार कोणता प्राणी घरात असावा, याचा विचार करावा. त्याचप्रमाणे कुटुंबात अगदी लहान आणि अतिवयस्कर सदस्य आहेत का? हा मुद्दादेखील कोणता प्राणी पाळावा, या प्रश्नाच्या उत्तरातला महत्त्वाचा मुद्दा ठरू शकतो. शेवटची आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पैसा! कोणत्याही पाळीव प्राण्याच्या देखभालीचा खर्च हा कमी अधिक प्रमाणात असतोच. तुमची आर्थिक परिस्थिती लक्षात  घेऊन कोणता प्राणी पळायचा याचा निर्णय घेणे आवश्यक ठरते. कारण जर तुम्ही गोल्डन रिट्रिव्हर सारख्या ब्रीडचा कुत्रा पाळत आहात तर त्याला वेगळा विशिष्ट आहार देणे  गरजेचे असते, त्यासाठी महिन्याला दहा ते बारा हजारांचा  खर्च देखील येऊ शकतो. त्याचबरोबर लसीकरण, आजारी पडल्यावर औषध उपचारांसाठीदेखील खर्च असतो. या सर्व गोष्टींचा विचार करणे आणि पाळीव प्राणी घेण्याआधी एका पशुवैद्याचा सल्ला घेणे गरजेचे आहे.  

पाळीव प्राणी तुमचा सोबती, सहचर, कुटुंबाचा एक सदस्य होतो, आनंदही देतो, मात्र त्याची काळजी आणि जबाबदारी घेणे तुमचे कर्तव्य आहे.  

(लेखक पशुवैद्य  आहेत.)
(शब्दांकन: लेखादिव्येश्वरी चंद्रात्रे)

संबंधित बातम्या