लसीकरण अत्यंत गरजेचे

डॉ. विनय गोऱ्हे
सोमवार, 25 एप्रिल 2022

 पेट केअर

प्रत्येक लसीकरण झाल्यानंतर त्याचे प्रमाणपत्र घेणे, तसेच  कुठली लस घेतली? कधी घेतली? ती लस कालबाह्य होण्याची तारीख काय होती? त्या लशीचा बॅच नंबर काय होता? या सगळ्याची नोंद प्रत्येक पेट पॅरेंटने ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. भविष्यात प्राण्या-पक्ष्याला कोणताही आजार झाल्यास, त्यावर उपचार करतानाही माहिती अतिशय महत्त्वाची आणि उपयुक्त असते.

पाळीव प्राण्यांसाठी अगदी ते एका महिन्याचे असल्यापासून वेगवेगळ्या जीवघेण्या रोगांना रोखणाऱ्या लशी उपलब्ध असतात. श्वान पिल्लू आईच्या पोटात असतानादेखील काही लशी दिल्या जातात. पाळीव प्राणी विविध संसर्गजन्य विषाणूंच्या संपर्कामध्ये येऊ शकतात. यामुळे काही जीवघेणे रोग होण्याची शक्यता असते. अशावेळी लस दिलेली असल्यास प्राण्यांवर केल्या जाणाऱ्या औषधोपचाराचाही लगेच गुण येतो आणि आजार बरा होण्यास मदत होते. प्राण्यांमधील काही आजार गंभीरही असतात,  मात्र त्याची लक्षणे वेळीच लक्षात आल्यास आणि लसीकरण केलेले असेल तरच अशा आजारातून मुक्त होणे शक्य होते. 

या लशींमध्ये निष्क्रिय किंवा कमकुवत विषाणू असतात. यामुळे प्राण्यांच्या शरीरात संरक्षणात्मक अँटीबॉडीज तयार होतात. लस दिल्यानंतर जर प्राण्यांना एखाद्या संसर्गजन्य विषाणूमुळे काही आजार झाला तर त्या विषाणूच्या विरोधात लढण्यासाठी अँटीबॉडीजचा उपयोग होतो. प्राण्यांचे लसीकरण हे प्राण्यांमधील रोगप्रतिकार शक्ती वाढवण्याचे सर्वोत्तम साधन आहे. इतर कोणत्याही उपायांनी प्राण्यांमधील रोगप्रतिकार शक्ती वाढू शकत नाही. आणि मग साथीच्या रोगांना प्राणी बळी पडू शकतात. यामुळे पाळीव प्राण्यांच्या लसीकरणाकडे मुळीच दुर्लक्ष करू नये. 

श्वानांमध्ये पिल्लू सहा आठवड्यांचे झाले की त्याला पहिली लस दिली जाते. त्यानंतर दर २१ दिवसानंतर ते पिल्लू पाच महिन्यांचे होईपर्यंत पाच लशी देण्यात येतात.  श्वानांमध्ये रोगप्रतिकार शक्ती तितकीशी चांगली नसल्याने त्यांना आठ ते नऊ वेगवेगळे घटक असलेली एक लस दर वर्षी लस द्यावीच लागते. ही  प्रत्येक लस देण्याआधी प्राण्यांना जंताचे औषध दिले जाणेही (deworming) गरजेचे असते. हे लसीकरण सुरक्षित असते आणि याचे कुठलेही मोठे साइड इफेक्ट नसतात. या लशींव्यतिरिक्त ‘पोस्ट बाईट’ नावाचे एक लसीकरण असते, लसीकरण न झालेला श्वान जर दुसऱ्या श्वानाला  चावला तरच या पोस्ट बाईट लसीकरणाची गरज भासते. या लशीचे तीन डोस असतात. संपूर्ण लसीकरण झालेला श्वान जरी कोणाला चावला ती त्या पासून कोणताही आजार होण्याचा धोका नसल्याने श्वानांचे लसीकरण अत्यंत गरजेचे असते. 

मांजरांमध्ये पहिली लस दीड महिन्याने देण्यात येते आणि त्यानंतर २१ दिवसांनी तीन वेगवेगळ्या लशी देण्यात येतात. सध्या ‘कॅट फ्लू’ नावाच्या आजाराची साथ सुरू असल्याने या आजारावरील लस प्रमुख्याने दिली जाते, मांजरींमध्येदेखील पोस्ट बाईट लस असते. एखाद्यावेळी मांजर जर चावली तर व्यक्तीला रेबीज प्रतिबंधक लस घ्यावी  लागते. 

पक्ष्यांमध्ये रानीखेत किंवा मानमोडी नावाचा एक महाभयंकर रोग आहे. हा आजार असल्यास पक्ष्याची मान मोडल्यासारखी दिसते मानेला  काही आधारच राहत नाही आणि ते मान वेडी-वाकडी फिरवत राहतात.  या आजारावरील लसीकरण शक्यतो पोल्ट्री फार्ममध्ये करण्यात येते, कारण तेथे प्रत्येक पक्ष्याला स्वतंत्रपणे पकडून लस देणे सहज शक्य होते.  या आजारावरील लस लव्हबर्ड, आफ्रिकन लव्हबर्ड आणि कबुतरांनाही देऊ शकतो. कबुतरांमध्ये  देवी (pox) हा आजार आढळतो, त्यावरदेखील लस उपलब्ध आहे. ती वेळेत दिल्याने कबुतरांचे या आजारापासून रक्षण होऊ शकते.    

अन्य सर्व लशींप्रमाणेच प्राण्यांना देण्यात येणाऱ्या लशीही कोल्ड स्टोरेजमध्ये ठेवाव्या लागतात. काही कारणास्तव लशींसाठी आवश्यक असलेले तापमान काटेकोरपणे ठेवले गेले नाही तर लशीचा गुण येत नाही. अशी लस देऊनदेखील न दिल्यासारखीच असते. दुकानातून लस घेतल्यानंतर ती दवाखान्यात घेऊन जाईपर्यंतदेखील ती आईस-पॅकमध्ये व्यवस्थित ठेवणे गरजेचे असते. याकरिता शक्यतो माहितीच्या, विश्वासू ठिकाणीच पाळीव प्राण्या-पक्ष्यांचे लसीकरण पूर्ण करावे. प्रत्येक लसीकरण झाल्यानंतर त्याचे प्रमाणपत्र घेणे, तसेच कुठली लस घेतली? कधी घेतली? ती लस कालबाह्य (expire) होण्याची तारीख काय होती? त्या लशीचा बॅच नंबर काय होता? या सगळ्याची नोंद प्रत्येक पेट पॅरेंटने ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. भविष्यात प्राण्या-पक्ष्याला कोणताही आजार झाल्यास, त्यावर उपचार करतानाही माहिती अतिशय महत्त्वाची आणि उपयुक्त असते. पाळीव प्राणी हे कुटुंबाचे सदस्य असतात. त्यांच्या संपूर्ण लसीकरणाचे योग्य ती खबरदारी घेणे प्रत्येक पेट पॅरेंटचे कर्तव्य आहे. 

काहीवेळा लसीकरण करताना त्या पाळीव प्राण्यांची प्रकृती, वय, वैद्यकीय इतिहास आणि जीवनशैलीचा विचार करून मगच लसीकरणचा निर्णय घेतला जातो. बूस्टर डोस देण्याचा निर्णयदेखील पशुवैद्य त्या प्राण्यांच्या आरोग्याच्या स्थितीनुसार घेतात. 

पाळीव प्राण्यांमध्ये आढळणाऱ्या  वेगवेगळ्या नव्या आजारांवरील लसीकरणावरही सातत्याने संशोधन सुरू असते. आपल्या कुटुंबातील पाळीव प्राण्याची देखभाल करताना योग्य पशुवैद्याकडून नव्याने लक्षात येणाऱ्या या आजारांचीही माहिती घेणे गरजेचे आहे.      

लक्षात ठेवा - पाळीव प्राणी आणि  पेट पॅरेंट या दोघांनाही त्रास होऊ नये, यासाठी प्राण्यांचे वेळीच लसीकरण करणे आवश्यक आहे.

SUGGESTED VACCINATION SCHEDULE        
AGE      VACCINATION FOR DOGS    VACCINATION FOR CATS
6 wks    7 in one / 8 in one    Cat Flu
9 wks    7 in one / 8 in one    Cat Flu
12 wks    Rabies + Parvo virus    Rabies
16 wks    7 in one / 8 in one    Cat Flu
19 wks    7 in one / 8 in one    Cat Flu
Annual Revaccination     7 in one / 8 in one + Rabies    Cat Flu and antirabies

 

(लेखक पशुवैद्य  आहेत.)

(शब्दांकन: लेखादिव्येश्वरी चंद्रात्रे)

संबंधित बातम्या