लोणच्याचे विविध प्रकार

प्रिया प्रकाश निकुम
सोमवार, 4 मार्च 2019

लोणचे विशेष
 

आवळ्याचे लोणचे  
साहित्य : एक किलो मोठे आवळे,२५० ग्रॅम मीठ, २५० ग्रॅम तेल. १० ग्रॅम मोहरीची डाळ, १०० ग्रॅम लाल तिखट ( थोडे कमी चालेल) ४ चमचे ओवा, ४ चमचे जिरे,५० ग्रॅम सैंधव
कृती : आवळे जरा कोचवून दहा मिनिटे वाफवून घ्यावेत. जिऱ्याची कच्चीच पूड करावी. चमचाभर तेलात ओवा जरा परतून घ्यावा. मोहरीची डाळ बाजारात मिळते ती मोठी असते. थोडा वेळ उन्हात ठेवून जरा कुठावी. त्यात अर्धा वाटी पाणी घालून फेसावी व त्याची गुळगुळीत पेस्ट करावी. या फेसलेल्या मोहरीत सर्व मसल्याच्या पुडी, तिखट व हळद घालावी. मीठ सैंधव मिसळावे. एका स्वच्छ बरणीत तळाला थोडे मीठ घालावे. त्यावर थोडे आवळे घालावे. त्यावर मसाल्याचा एक थर द्यावा. त्यावर पुन्हा आवळ्याचा थर व त्यात पुन्हा मसाल्याचा थर द्यावा. शेवटचा थर मसाल्याचा असू द्यावा. तेल कडकडीत तापवून गार करावे व या मिश्रणावर ओतावे ७-८ दिवस ती बरणी दिवसा उन्हात ठेवावी पंधरा दिवसानंतर हे लोणचे वापरु शकता.

करवंदाचे लोणचे
साहित्य : एक किलो करवंद, शेंगदाणे, एक चमचा हळद, एक मोठा चमचा मीठ, एक चमचा मिरची पावडर, तेल आवश्‍यक तेवढे
कृती : संपूर्ण करवंद धुऊन उन्हात सुकवून भांड्यात भरावीत. शेंगदाणे अर्धवट बारीक करावे आणि हळद, मीठ व मिरची बरोबर भांड्यात टाकावे. त्यात इतके तेल टाकावे, की करवंद भिजतील व १०-१५ दिवस उन्हात ठेवावे. रोज त्यास हलवत राहावे. हे लोणचे बरेच दिवस टिकते.

कारल्याचे लोणचे
साहित्य :  चारशे ग्रॅम कारली, ४-५ चमचे मीठ, अर्धी वाटी लोणच्याचा मसाला,२ लिंबे
कृती : कारली सोलून त्याच्या पातळ चकत्या कराव्या, त्यांना दोन चमचे मीठ चोळून एका फडक्‍यात बांधून साधारण एक तास पोळपाटाखाली दाबून ठेवाव्यात. तासानंतर त्या फोडी एका तसराळ्यात घ्याव्यात. सुटलेले पाणी घेतले नाही तरी चालेल. त्यात लोणच्याचा मसाला, चमचे मीठ घालून कालवावे. लिंबाचा रस काढून त्यावर घालावा. दोन दिवसानंतर खायला घ्यावे. महिनाभर हे लोणचे फ्रीजमध्ये ठेवल्यास टिकते.

फ्लॉवर-गाजराचे लोणचे
साहित्य :  एक किलो कॉलीफ्लॉवर,५०० ग्रॅम गाजरे, १०० ग्रॅम आले, १०० ग्रॅम लाल सुक्‍या मिरच्या (कमी तिखट असलेल्या), एक जुडी पुदिना, २५ ग्रॅम दालचिनी, २०ग्रॅम मिरी, २० ग्रॅम लवंगा (थोड्या कमी चालतील), ५ कप व्हिनीगर, २५० ग्रॅम गूळ, २५० ग्रॅम तेल, २५० ग्रॅम मीठ, ५० ग्रॅम लसूण
कृती : कॉलीफ्लॉवर स्वच्छ करून बारीक चिरावा. पाने व मधला दांडोरा टाकून द्यावा किंवा सूपमधे उपयोग करावा. गाजराच्या इंचभर लांबीच्या पातळ व बारीक कापट्या चिराव्या. धुतलेली भाजी पातळ फडक्‍यावर पसरून कोरडी होऊ द्यावी. पुदिन्याची पानेखुडावी. आले किसावे व लसूण सोलावी. लाल मिरच्यासह आले-लसूण-पुदिना थोडेसे व्हिनीगर घालून बारीक वाटावे. लवंगा, दालचिनी व मिरी यांची कुटून बारीक पूड करावी. गुळात उरलेले व्हिनीगर घालून जाड पाक करावा व बाजूला ठेवावा. भाज्यांचे तुकडे, वाटलेला मसाला, कुटलेली पूड व मीठ एकत्र मिसळावे. एका रुंद तोंडाच्या बरणीत भरावे. त्यावर गुळाचा गार झालेला पाक ओतावा व चांगले वळावे. चौपदरी दादरा बांधून ७-८ दिवस बरणी उन्हात ठेवावी. रोज सकाळी हलवावी. संध्याकाळी घरात आणून ठेवावी. आठवड्यानंतर लोणचे वापरण्यास हरकत नाही. मात्र बरणी कोरड्या जागी ठेवावी.

मिरचीचे लोणचे
साहित्य : एक किलो लांबट हिरवी मिरची, २ वाट्या मोहरीची डाळ, अर्धा चमचा मेथीची (कच्ची) पूड, दीड चमचा हळद, हिंग, २ ते ३  वाट्या मीठ, १२ लिंबांचा रस, एक वाटी तेल
कृती : एका मध्यम आकाराच्या परातीत किंवा ताटात मोहरीची डाळ, मेथीपूड, हळद व हिंग घालावे. लहान पातेलीत तेल कडकडीत तापवावे.धूर दिसेपर्यंत तापले, की परातीतल्या सर्व  मिरच्या सोडून सर्व साहित्य ओतावे व झाऱ्याने ढवळावे. मसाला एकत्र कालवला गेला, की गार होऊ द्यावा. मिरच्या धुऊन फडक्‍यावर कोरड्या होऊ द्याव्यात. त्यांचे आपल्या आवडीनुसार बेताचे तुकडे करावे. मिरची यंत्रात बारीक केली तरी बिघडत नाही. त्यात ४ चमचे वगळून बाकीचे मीठ मिसळावे. गार झालेल्या मोहरीच्या डाळीचा मसाला घालावा. उन्हात ठेवलेल्या बरणीत तळाला २ चमचे मीठ घालावे. बरणी गार असावी. त्यात मिरच्या व मसाला कालवून भरावा. वरून दोन चमचे मीठ घालावे. दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी बारा लिंबाचा रस काढून लोणच्यात घालावा. लिंबाच्या साली फेकून देऊ नयेत. सालीचेही चवदार लोणचे बनवता येते.

मिक्‍स व्हेजिटेबल लोणचे
साहित्य : एक किलो कोबी. १ किलो गाजर. एक किलो मटार, एक किलो शालजम, १०० ग्रॅम लाल मिरची, सरसो तेल, ५० ग्रॅम हळद, २५० ग्रॅम मीठ, १०० ग्रॅम व्हिनेगर, २५० ग्रॅम गूळ
कृती : सर्व भाज्या ( मटार सोडून ) धुऊन मध्यम आकारात कापाव्यात. त्यानंतर उकळल्या पाण्यात टाकाव्या व थोड्याशा शिजल्यानंतर उतरवून पाणी काढून उन्हात सुकवाव्या. नंतर सर्व मसाले वाटून मिसळावे तसेच गुळात व्हिनेगरमध्ये टाकून गरम करून तेलही त्यात टाकावे. सर्व वस्तू व्यवस्थित मिक्‍स करुन बरणी मध्ये भरून उन्हात ठेवावे. चार दिवसात लोणचे तयार होईल. यात तुम्हाला आवडतील त्या भाज्या वापरू शकता.

पांढरे कांदे व कैरीचे लोणचे
साहित्य : दोन वाट्या पांढरे कांद्याच्या उभ्या फोडी,३ वाट्या कैऱ्या उभ्या फोडी,चवीनुसार मीठ, तिखट, साखर व हळद 
कृती : कांद्याच्या व कैरीच्या फोडी एकत्र कराव्यात. त्यात मीठ, तिखट, साखर व हळद घालावी. बरणीत भरून दर दोन दिवसांनी हलवावे. छान रस सुटतो तेलाशिवाय केलेले लोणचे चवीला छानही लागते.

टोमॅटोचे गोड लोणचे
साहित्य : चार ते पाच टोमॅटो,२ चमचे तेल, पाव चमचा मोहरी, पाव चमचा जिरे,२ चिमट्या हिंग, पाव चमचा हळद, अर्धा चमचा तिखट, ३ चमचे दाण्याचे कूट,१ चमचा मीठ
कृती : टोमॅटोच्या चार किंवा आठ फोडी चिराव्या, कल्हईच्या मध्यम पातेल्यात तेल तापले, की मोहरी, जिरे व हिंग व हळद घालून त्यावर टोमॅटो घालावे. जरा अवसडून किंवा अलगद ढवळून मंद आचेवर शिजू द्यावेत. वर पाण्याचे झाकण ठेवावे, ८-१० मिनिटांनंतर दाण्याचे कूट, तिखट, मीठ व गूळ घालून पुन्हा ढवळावे दोन उकळ्या आल्या, की खाली उतरावे. ३-४ दिवस फ्रीजमध्ये ठेवले तर टिकते. सॉसऐवजी देखील वापरता येते.

वांग्याचे लोणचे
साहित्य : साडेसातशे ग्रॅम लहान आकाराची गोल वांगी, १० लसूण पाकळ्या, आले, १५ लाल मिरच्या, ११५ मिली व्हिनीगर, ५ चमचे मोहरीची डाळ, १ चमचा हळद, १२५ ग्रॅम गूळ, ६ मोठे वेलदोडे, दालचिनी, ४ लवंग, १० मिऱ्याचे दाणे, ६मोठे चमचे तेल, अर्धा चमचा मोहरी, ५ चमचे मीठ
कृती : आले-लसूण बारीक वाटून घ्यावे. लाल मिरच्या चमचाभर व्हिनीगरमधे बारीक वाटाव्यात. गुळ व्हिनीगरमध्ये विरघळवून ठेवावा. वांगी धुऊन पुसून ठेवावी. व त्यांचे १ सें.मी. जाड काप चिरून ठेवावे. कल्हईच्या पातेल्यात तेल तापले, की मोहरी व हळद घालून त्यावर आले-लसूण तांबूस होईपर्यंत परतावी. त्यात वांग्याचे काप घालून हलक्‍या हाताने पातेलीत घालून अवसडावे. वांगी मंदा आचेवर शिजू द्यावीत. एकीकडे वेलची, लवंगा, दालचिनी व मिरी यांची बारीक पूड करावी. वांगी मधूनच एकदोनदा झाऱ्याने अलगद ढवळावीत. वांगी शिजली, की गुळाचे मिश्रण घालावे. दाटसर रस होईपर्यंत शिजवावे. नंतर लवंग-दालचिनी इत्याचीची पूड घालावी. मोहरीची डाळ व मीठ घालावे. खाली उतरवून लोणचे गार होऊ द्यावे. नंतर काचेच्या बरणीत भरून ठेवावे. हे लोणचे आठ-दहा दिवसांपेक्षा जास्त टिकत नाही.

लिंबाचे गोड लोणचे
साहित्य : पाच किलो लिंबू, २०० ग्रॅम काळी मिरची, १०० ग्रॅम मोठी वेलची, ५०० ग्रॅम जिरे,१०० ग्रॅम प्रत्येकी दालचिनी, तेजपान, जावित्री, ५० ग्रॅम लवंग, ५ नग जायफळ, १०० ग्रॅम सिरका,३ कि. साखर, ५०० ग्रॅम आले, ४०० ग्रॅम सेंधा मीठ, १०० ग्रॅम  काळे मीठ, ५०० ग्रॅम आले. 
कृती : मोठ्या आकाराचे लिंबू घ्यावेत. धुऊन पुसून उन्हात सुकवावे नंतर चार चार खापा या प्रकारे कापाव्या की त्या एका बाजूने जोडलेल्या राहतील. आले सोलून बारीक करावे. सर्व मसाल्यांना अर्धवट कुटून घ्यावे. नंतर त्यात साखर व व्हिनेगर मिळवून लिंबामध्ये भरून लिंबाना बरणीत ठेवावे व बरणीस चांगल्या बंद करून उन्हात ठेवावे. १०-१५ दिवसात लोणचे तयार होइल.

तोंडल्याचे लोणचे 
साहित्य : एक वाटी कोवळी तोंडली, १ टेबलस्पून मोहरी, अर्धा टी स्पून हळद, पाव टी स्पून हिंग, चवीनुसार मीठ, एका लिंबाचा रस.
कृती : एका तोंडल्याच्या चार फोडी कराव्यात. मोहरी बारीक वाटावी. उंच काठाच्या ताटात वाटलेली मोहरी, मीठ, हळद, हिंग, लिंबाचा रस घालावा आणि चांगले फेसावा. त्यात तोंडल्याच्या फोडी घालाव्यात. हे लोणचे २ ते ४ दिवस फ्रीजमध्ये ठेवल्यास टिकेल. शक्‍यतो ताजेच खावे.

संबंधित बातम्या