तेलाविना लोणची

उमाशशी भालेराव
सोमवार, 4 मार्च 2019

लोणचे विशेष
लोणचे म्हटले, की त्यात भरपूर तेल हवेच, असे आपल्याला वाटते. पूर्वी फ्रीज नव्हता, तेव्हाचे लोणचे वर्षभर टिकवण्यासाठी भरपूर मीठ व भरपूर तेलाचा वापर होत असे. पण आता फ्रीजच्या जमान्यात तेलाविना अथवा अगदी कमीतकमी तेलाचा वापर करून आपल्याला लोणची टिकवता येतात.

सबंध लिंबाचे पारंपरिक लोणचे 
साहित्य : एक डझन लिंबे, अर्धी वाटी लाल तिखट पूड, एक ते दीड वाटी मीठ, १ चमचा मेथी पूड, १ चमचा हिंग पूड, २ चमचे हळद.
कृती : लिंबे स्वच्छ धुऊन, पुसून कोरडी करून घ्यावीत. भरल्या वांग्याला पाडतो त्याप्रमाणे चार चिरा पाडाव्यात. तिखट पूड, मीठ, मेथी पूड, हिंगाची पूड, हळद सर्व एकत्र कालवून हा मसाला लिंबात भरावा. अशी भरलेली लिंबे बरणीत घालून त्यावर थोडे मीठ पसरावे. लिंबे चांगली मुरेपर्यंत मधूनमधून हलवावीत. खार जास्ती हवा असल्यास तीन-चार लिंबाचा रस लोणच्यात घालावा. लिंबे चांगली मुरल्यावर लोणचे खाण्यास घ्यावे.

पारंपरिक ढोले लिंबू
साहित्य : एक डझन लिंबे, पाव किलो मीठ.
कृती : एक लहानसा मातीचा माठ अथवा मडके घ्यावे. लिंबे स्वच्छ धुऊन, पुसून सबंधच त्यात घालावीत. त्यावर मीठ घालून, झाकण ठेवून उन्हात ठेवावे. माठ अगर मडके लिंबे खालीवर होतील अशा रीतीने रोज हलवावे. असे अंदाजे दोन महिने करावे. लिंबांना सुरकुत्या पडतील व मिठात छान मुरतील. हे लोणचे औषधीही आहे. पित्तावर हे चांगले औषध आहे.

कैरीचे गोड लोणचे
साहित्य : एक किलो कैऱ्या, दीड वाटी मोहरीची डाळ, पाव वाटी लाल तिखट पूड, २ चमचे मेथी पूड, २ चमचे हिंग पूड, २ चमचे हळद, २ वाट्या साखर (अथवा गूळ), वाटी-दीड वाटी मीठ.
कृती : कैरीची साल पूर्णपणे काढून बारीक फोडी कराव्यात. मोहरीची डाळ थोडे पाणी घालून बारीक वाटून घ्यावी. मोहरीचा वास नाकात चढेपर्यंत घुसळून घ्यावे. नंतर त्यात तिखट, मीठ, हळद, साखर (अथवा गूळ), मेथी पूड, हिंग पूड सर्व कालवावे. त्यात कैरीच्या फोडी घालाव्यात. (हवे असल्यास एक चमचा तेलात मोहरी, हिंग, हळद घालून फोडणी करून ती गार झाल्यावर लोणच्यात घालावी.) हे लोणचे साखर वा गूळ विरघळेपर्यंत काही दिवस बाहेर ठेवून नंतर फ्रीजमध्ये ठेवावे. हे आंबटगोड लोणचे मोहरीच्या वासामुळे फार स्वादिष्ट लागते.

मिश्र भाज्यांचे लोणचे
साहित्य : फ्लॉवर, मटार, गाजर, तोंडली, १०-१२ हिरव्या मिरच्या, आल्याचे बोटाएवढे २ तुकडे, ओली हळद उपलब्ध असल्यास थोडे तुकडे, अर्धी वाटी मोहरीची डाळ, पाऊण वाटी मीठ, १ चमचा मेथी पूड, १ चमचा हिंग पूड, २-३ लिंबांचा रस, पाव वाटी व्हिनेगर.
कृती : फ्लॉवर, गाजर, तोंडली यांचे लहान तुकडे करून घ्यावेत. मटार सोलून घ्यावेत. सर्व भाज्या प्रत्येकी अर्धी वाटी घ्याव्यात. भाज्यांचे तुकडे आधण पाण्यात घालून लगेच बाहेर काढावेत व कापडावर पसरून, पुसून कोरडे करून घ्यावेत. मिरच्या धुऊन, पुसून बारीक चिरून घ्याव्यात. आले, ओली हळद यांचे बारीक तुकडे करावेत. सर्व एकत्र करून त्यात मीठ, मोहरीची डाळ, मेथी पूड, हिंग पूड व लिंबाचा रस घालून कालवावे. शेवटी व्हिनेगर घालावे. व्हिनेगर घालावयाचे नसल्यास आणखी दोन-तीन लिंबांचा रस घालावा. तयार झालेले लोणचे बरणीत भरून फ्रीजमध्ये ठेवावे.

आवळ्याचे लोणचे
साहित्य : एक डझन आवळे, अर्धी वाटी मोहरी डाळ, पाव वाटी तिखट, १ चमचा मेथी पूड, अर्धा चमचा हिंग पूड, अर्धा चमचा हळद, ४-५ चमचे मीठ.
कृती : आवळे कुकरमध्ये उकडून घ्यावेत. गार झाल्यावर फोडून मधली बी काढून टाकावी. आवळ्याच्या छान पाकळ्या होतील. मोहरी डाळ मिक्‍सरमधून थोडी फिरवून घ्यावी. मोहरी डाळ, इतर सर्व साहित्य व आवळ्याच्या फोडी एकत्र कालव्यात नंतर लोणचे बरणीत भरून फ्रीजमध्ये ठेवावे. (वाटल्यास एक-दोन चमचे तेलाची फोडणी त्यावर घालावी. घातली नाही, तरी हे लोणचे छान लागते.)

मिरची-लिंबू लोणचे
साहित्य : एक डझन लिंबे, १५-२० ताज्या हिरव्या मिरच्या, २ चमचे मोहरी डाळ, १ तुकडा आले, अर्धा चमचा मेथी पूड, अर्धा चमचा हिंग पूड, १ चमचा हळद, ५-६ चमचे किंवा चवीनुसार मीठ. 
कृती : दहा लिंबांच्या बारीक फोडी कराव्यात. दोन लिंबांचा रस काढावा. मिरच्या स्वच्छ धुऊन, पुसून त्यांचे बारीक तुकडे करावेत. आल्याचेही बारीक तुकडे करावेत. सर्व एकत्र करून त्यात मोहरी डाळ, मेथी पूड, हिंग पूड, हळद, मीठ सर्व कालवावे व त्यावर लिंबाचा रस घालावा. दोन-तीन दिवसांनी लोणचे मुरल्यावर मग फ्रीजमध्ये ठेवावे.

टोमॅटोचे कमी तेलातील लोणचे 
साहित्य : एक किलो पिकलेले ताजे लाल टोमॅटो, १०-१२ हिरव्या मिरच्या, १०-१२ लसूण पाकळ्या, बोटभर लांबीचे आल्याचे दोन तुकडे, ४-५ चमचे लाल तिखट, मीठ, ३ चमचे जिरे पूड, दीड कप व्हिनेगर, २ चमचे हळद, २ चमचे तेल.
कृती : प्रथम आले, लसूण, मिरच्या यांचे तुकडे करून घ्यावेत. त्यापैकी अर्धे तुकडे मिक्‍सरमध्ये वाटून घ्यावेत. उरलेले तसेच ठेवावेत. टोमॅटो स्वच्छ धुऊन बारीक फोडी कराव्यात. एका पातेल्यात २ चमचे तेल घालून प्रथम वाटण परतावे. नंतर इतर सर्व जिन्नस व टोमॅटोच्या फोडी घालाव्यात व व्हिनेगर घालून सर्व घट्ट होईपर्यंत शिजवावे. सतत ढवळावे. हे लोणचे फ्रीजमध्ये खूप दिवस टिकते.

गाजराचे लोणचे
साहित्य : दोन वाट्या गाजराचे तुकडे, १०-१२ लसूण पाकळ्या, पाव वाटी मोहरीची डाळ, पाव वाटी तिखट, ४-५ चमचे मीठ, पाव चमचा मेथी पूड, अर्धा चमचा हिंग पूड, पाव चमचा हळद, अर्धी वाटी लिंबाचा रस.
कृती : लसूण ठेचून घ्यावा. (अथवा जाडसर वाटून घ्यावा.) नंतर लसूण, गाजराच्या फोडी व इतर साहित्य एकत्र कालवून वर लिंबाचा रस घालावा. थोडे मुरल्यावर फ्रीजमध्ये ठेवावे. बरेच दिवस टिकते. तिखटाचे प्रमाण आवडीप्रमाणे कमीजास्त करावे. (याच प्रमाणे मुळ्याचे, काकडीचे लोणचेही बनवता येते.)

आल्याचे गुलाबी लोणचे
साहित्य : तुकडे केलेले कोवळे आले, लिंबू, मीठ.
कृती : आले कोवळेच असावे. त्याच्या फोडींवर लिंबू पिळावे व चवीपुरते मीठ घालावे. काही वेळाने नैसर्गिक गुलाबी रंग येतो. हे लोणचे करावयास सोपे व दिसायला मात्र छान असते. चवही लज्जतदार असते. तोंडाला रुची आणते.

खारकांचे लोणचे
साहित्य : दोन वाट्या खारकांचे बारीक केलेले तुकडे, खारकांचे तुकडे बुडतील इतका लिंबाचा रस, १ वाटी मनुका, अर्धी वाटी आल्याचा कीस, १ चमचा पादेलोण (काळे मीठ), चवीनुसार साधे मीठ, अर्धी ते एक वाटी साखर.
कृती : मनुका निवडून धुऊन घ्याव्यात. एक बरणी घेऊन त्यात लिंबाच्या रसात खारकांचे तुकडे, मनुका व इतर सर्व साहित्य घालावे. खालीवर करून ठेवावे. मुरल्यावर खाण्यास घ्यावे. हे लोणचे उपवासासही चालते.

व्हिनेगर मिरची
साहित्य : एक वाटी ओल्या ताज्या हिरव्या मिरचीचे मोठे तुकडे, दीड वाटी व्हिनेगर, पाव वाटी मीठ.
कृती : मिरच्यांचे मोठे तुकडे करावेत. रात्री कोमट पाण्यात थोडे मीठ घालून त्यात हे तुकडे घालावेत. सकाळी हे तुकडे चाळणीत ओतून, पाणी निथळून घ्यावे. नंतर एका तासाने व्हिनेगरमध्ये मीठ घालून त्यात मिरच्यांचे तुकडे बुडवून ठेवावेत. या मिरच्या खूप दिवस टिकतात व हिरव्यागार राहतात.

व्हिनेगर कांदे
साहित्य : एक डझन सुके छोटे कांदे, कांदे बुडतील इतके व्हिनेगर, कांद्यात भरण्यासाठी मीठ, तिखट, हळद, हिंग, थोडी मेथी पूड.
कृती : कांदे सोलून त्यांना चार चिरा पाडाव्यात. मीठ, तिखट, हिंग, हळद, मेथी पूड सर्व एकत्र कालवून या कांद्यांमध्ये भरावे. कांदे बुडतील इतक्‍या व्हिनेगरमध्ये हे भरलेले कांदे बुडवून ठेवावेत. (गरज वाटल्यास आणखी थोडे मीठ घालावे.) थोड्या दिवसांनी हे कांदे छान मुरतात. मुरल्यानंतर खाण्यास घ्यावे.

संबंधित बातम्या