महूद जलक्रांतीची लोकचळवळ 

महेंद्र महाजन 
सोमवार, 22 एप्रिल 2019

उपक्रम
गरज ही शोधाची जननी असते हेच महूदकरांनी सिद्ध केले. स्थानिक प्रश्‍नांवर स्थानिक उत्तर शोधत मॉडेल व्हिलेजच्या दिशेने महूदची वाटचाल सुरू आहे. पाण्याविषयीच्या जागृतीमधून जलसंधारणामध्ये कर्तृत्व सिद्ध करत या गावाने ‘नॅशनल वॉटर ॲवॉर्ड‘ला गवसणी घातली आहे. सोळा हजार लोकसंख्येच्या गावात लोकसहभागाची उभी राहिलेली चळवळ, तिचा सांगोला, पंढरपूर, माळशिरस तालुक्‍यांतील २३ गावांमध्ये झालेला विस्तार, सामाजिक एकोपा असे विस्तारलेले क्षितिज, त्याविषयी...

दुष्काळ जणू पाचवीला पुजलेला. त्यातून मुक्ती मिळवण्यासाठी काय करायचे? या प्रश्‍नाने २५ खेड्यांची बाजारपेठ असलेल्या महूद (ता. सांगोला, जि. सोलापूर) या गावचे शेतकरी, ग्रामस्थ चिंतित होते. पंचवीस वर्षांपूर्वी खळखळ वाहणाऱ्या कासाळ ओढ्याचा नाला झाल्याने गावच्या अर्थकारणाला मोठा धक्का बसला होता. अखेर सरपंच बाळासाहेब ढाळे, उपसरपंच दिलीप नागणे, तत्कालीन ग्रामविकास अधिकारी शंकर मेटकरी, ॲड. धनंजय मेटकरी यांच्यासह ग्रामपंचायत सदस्यांच्या जोडीला अंकुश चव्हाण, दत्ता आसबे, दादासाहेब कांबळे, सुभाष ढाळे, धीरज जाधव, कैलास खबाले, संतोष खडतरे, जयवंत नागणे, गोविंद नागणे, बाळासाहेब बाजारे आदींनी पुढचे पाऊल टाकले. ‘जलयुक्त शिवार अभियाना’तून शिवार हिरवाकंच करण्याच्या कृतिशील कामाला सुरवात केली. 

वहितीखाली ५२ हेक्‍टर 
जलयुक्त शिवार अभियानातून जीवनदायिनी कासाळ ओढ्याचे पुनरुज्जीवन करण्याच्या कामाचा श्रीगणेशा झाला. सुरुवातीला तरुणांनी स्वतःच्या पैशातून जेसीबी यंत्र ओढ्यात उतरवून ओढ्यातील गाळ काढण्याच्या कामाची सुरुवात केली. सोलापूरचे तत्कालीन जिल्हाधिकारी रणजित कुमार, सांगोल्याचे तत्कालीन तहसीलदार श्रीकांत पाटील यांनी एक जेसीबी यंत्र उपलब्ध करून दिले. कृषी विभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी एक दिवसाच्या वेतनातून एक जेसीबी यंत्र उपलब्ध करून दिले. अशा पद्धतीने सहा जेसीबींची धडधड ओढ्यात सुरू झाली. कामाला सुरुवात झाल्याच्या तिसऱ्या दिवशी रयत शिक्षण संस्थेचे विभागीय अध्यक्ष संजीव पाटील यांनी डॉ. विलास खांडेकर, रंभाजी पाटील यांच्यासह कामाची पाहणी केली अन्‌ रयत शिक्षण संस्थेने अडीच लाखांची मदत पोच केली. मग मात्र उत्साह दुणावलेल्या तरुणांनी मागे वळून पाहायचे नाही असे म्हणत कामाचा वेग वाढवला. जिल्हा अधीक्षक रणजित कुमार, कृषी अधिकारी बसवराज बिराजदार, कृषी उपसंचालक रवींद्र माने, पंढरपूरचे तत्कालीन उपविभागीय कृषी अधिकारी शिवराज ताटे यांनी जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टच्या निधीपैकी वीस लाखांचा निधी आर्ट ऑफ लिव्हिंगच्या माध्यमातून गावाच्या कामासाठी मंजूर केला. तोपर्यंत गावातून दहा लाखांची लोकवर्गणी जमा झाली होती. चार पोकलॅनद्वारे गाळ उपसण्यास सुरुवात करण्यात आली होती. हा गाळ शेतकऱ्यांनी नेऊन शेती सुपीक केली. ५२ हेक्‍टर क्षेत्र वहितीखाली आले. शेतासाठी लायक नसलेला गाळ ओढ्याच्या दोन्ही काठावर बांधासारखा संरक्षित करत ओढ्याची हद्दनिश्‍चिती केली गेली. दरम्यान, सरकारी यंत्रणेकडून ५ किलोमीटर ओढ्याच्या पुनरुज्जीवन प्रकल्पासाठी नेमका किती खर्च येऊ शकतो याचा अंदाज घेण्यात आला होता. ८८ लाखांपर्यंत खर्च अपेक्षित होता. एवढी मोठी रक्कम ऐकल्यावर कामाचा वेग मंदावून पुढे पडणारी पावले थबकणे स्वाभाविक होते. प्रत्यक्षात तसे घडले नाही. ३५ लाख रुपयांमध्ये दीड महिन्यात ५ किलोमीटर ओढ्याच्या पुनरुज्जीवनाचे काम पूर्ण झाले. पुण्याचे सुनील जोशी, राजेंद्र वाघमारे, कृषी विभागाचे शशिकांत महामुनी, संतोष चौधरी यांनी विविध जबाबदाऱ्या सांभाळल्या. मोठ्या लोकसंख्येच्या गावात लोकचळवळ उभी राहू शकत नाही या समजाला महूदकरांनी दिलेले हे कृतिशील उत्तर मानायला हवे. 

पाणी महत्त्वाचे! 
प्रादेशिक नळपाणीपुरवठा योजनेतून गावाला पाणी मिळत असले, तरीही पाणी पुरत नव्हते. गावच्या पाण्याचे संकट सहा महिन्यांनी पुढे ढकलले गेले. एक हजार हेक्‍टरसाठी शाश्‍वत पाण्याची उपलब्धता झाली. ओढ्याच्या पुनरुज्जीवनाचे काम सुरू असताना अतिक्रमण केलेल्या शेतकऱ्यांचे काय करायचे, असा घोर यंत्रणांपुढे होते. पण गावात नेमके उलटे घडले. अतिक्रमित तुकड्यापेक्षा पाणी महत्त्वाचे मानून शेतकऱ्यांनी स्वतःहून अतिक्रमण निर्मूलनाला मदत केली. हे कमी काय म्हणून पाणी साठवण्यासाठी भले मोठे नैसर्गिक भांडे तयार झाले. पण वरुणराजा हजेरी लावत नाही म्हटल्यावर पवित्र रमजान महिन्यात मुस्लीम बांधवांनी ओढ्यात नमाज पठण करत वरुणराजाची आराधना केली. सांगोल्याचे ज्येष्ठ आमदार डॉ. गणपतराव देशमुख, खासदार विजयसिंह मोहिते-पाटील, जिल्हा परिषदेच्या तत्कालीन अध्यक्ष जयमाला गायकवाड, आमदार दत्तात्रेय सावंत, माजी आमदार दीपक साळुंखे, तत्कालीन उपजिल्हाधिकारी दिनेश भालेराव आदींनी ग्रामस्थांचे कौतुक केले. ‘हे तर नदीचे पुनरुज्जीवन...’ अशी प्रतिक्रिया नोंदवली गेली. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनीही लोकसहभागाचे कौतुक केले. आंतरराष्ट्रीय जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्र सिंह यांच्या हस्ते कामाचे लोकार्पण करण्यात आले. त्यांच्या हस्ते फलोत्पादन कामांचा श्रीगणेशा झाला. लोकसहभागाच्या महूद पॅटर्नची प्रेरणा घेऊन कटफळ (ता. सांगोला) आणि कोळेगाव (ता. माळशिरस) येथील ग्रामस्थांनी कासाळ ओढ्याच्या पुनरुज्जीवनाचे काम लोकसहभागातून सुरू केले होते. 

पुनरुज्जीवनाची क्षेत्रीय स्थिती 

  • महूदचे भौगोलिक क्षेत्र - ४ हजार ५४७ हेक्‍टर. 
  • महूद शिवारातील लागवडीखालील क्षेत्र - ४ हजार ५८ हेक्‍टर. 
  • तेवीस गावांची लोकसंख्या - ७६ हजार २९६. 
  • तेवीस गावांचे भौगोलिक क्षेत्र - ३६ हजार २७४ हेक्‍टर. 
  • तेवीस गावातील वनक्षेत्र - १ हजार ३५३ हेक्‍टर. 
  • तेवीस गावातील कोरडवाहू क्षेत्र - ११ हजार ७७ हेक्‍टर. 
  • बेचाळीस किलोमीटर पुनरुज्जीवनात उपसला जाणारा गाळ - २८ लाख ३८ हजार ६७९ घनमीटर. 
  • गाळामुळे २३ गावांच्या शिवारात नव्याने लागवडीखाली येणारे क्षेत्र - ४७३ हेक्‍टर.

टाटा ट्रस्टचा बूस्ट 
कासाळ ओढ्याचे माथा ते पायथा असे पुनरुज्जीवन करण्यासह वृक्षारोपणाचा सल्ला डॉ. राजेंद्र सिंह यांनी दिला होता. या कामासाठी सहकार्य करण्याचे पत्र त्यांनीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिले. मुख्यमंत्र्यांनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसकडे प्रस्ताव पाठवला आणि ‘टाटा ट्रस्ट’ने सहा कोटी मंजूर करून चळवळीला बूस्ट दिला. सांगोला, माळशिरस, पंढरपूर या तीन तालुक्‍यातील याच कासाळ ओढ्याचे ४२ किलोमीटरपैकी २७ किलोमीटर पुनरुज्जीवनाचे काम पूर्ण झाले आहे. टाटा ट्रस्टने यंदाच्या उन्हाळ्यात उरलेले १५ किलोमीटर पुनरुज्जीवनाचे काम पूर्ण करण्याचे नियोजन केले. या कामासंबंधीच्या करारासाठी जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी महूदच्या सरपंच, उपसरपंचांना मुंबईत बोलावले होते. जलसंधारणमंत्री राम शिंदे यांनाही कामाची माहिती देण्यात आली आहे. पंढरपूरचे उपविभागीय कृषी अधिकारी रवींद्र कांबळे हे निरनिराळ्या योजना या भागामध्ये पोचवण्यासाठी विशेष सहभाग देतात. गावाने जलयुक्त शिवार अभियानातील स्पर्धेत सहभाग नोंदवला आहे. मग आता एवढ्यावरच थांबायचे काय? असा प्रश्‍न स्वाभाविकपणे तयार होतो. महूदकरांचे त्यावरही ‘नाही’ असेच उत्तर असून शाश्‍वत पाण्याच्या उपलब्धतेतून पीकपद्धतीत बदल करण्यास सुरुवात केली आहे. विहीर, बोअर पुनर्भरण करत छतावरील पावसाचे पाणी जमिनीत मुरवण्यास सुरुवात झाली आहे. ओढ्याच्या दोन्ही काठावर वृक्षारोपण आणि पर्यटन स्थळांचा विकास व त्याचजोडीला शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून डाळिंबासाठी शाश्‍वत बाजारपेठेची उपलब्धता, प्रक्रिया उद्योग यासाठी महूदकरांनी प्रयत्न सुरू केले आहेत. कृषी संचालक प्रल्हाद पोकळे, पुण्याचे कृषी सहसंचालक दिलीप झेंडे यांच्याशी शेतकऱ्यांचा संवाद सुरू झाला आहे. सोलापूरचे जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनीही ग्रामस्थांना प्रोत्साहित केले आहे. केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते नॅशनल वॉटर ॲवॉर्ड हा सन्मान ग्रामस्थांनी दिल्लीत स्वीकारला. जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टच्या निधीतून हे मोठे काम उभारल्याबद्दल गडकरी यांनी ग्रामस्थांच्या पाठीवर शाबासकीची थाप दिली. 

संबंधित बातम्या