घरोघरची किमयागारी... 

नंदिनी आत्मसिद्ध 
गुरुवार, 31 जानेवारी 2019

पोटपूजा
 

‘तो  अगदी पडवळासारखा आहे आणि त्याची बहीणही चवळीची शेंग आहे नुसती’, ‘ती टोमॅटोसारखी टमटमीत आहे नाही!’, ‘तिला बघितलं की भोपळ्याची आठवण येते’, ‘तिचा स्वभाव एकदम फटाकडा आहे, लवंगी मिरचीच जणू!’, ‘काही लोकांच्या जिभेवरच जणू साखर असते, नाही?’, ‘त्यांचं बोलणं अगदी मधाळ असतं’...खाण्याच्या पदार्थांचा उल्लेख असा प्रत्येकच भाषेत अनेकदा सहज केला जातो. मानवी स्वभावाची वैशिष्ट्यं आपण किती सहजपणे अन्नघटकांना, फळाफुलांना, पक्ष्यांना, प्राण्यांना आणि आपल्या देवदेवतांनाही चिकटवत असतो! बघितलं तर निरनिराळ्या भाषांमध्येही हेच दिसून येतं. 

इंग्रजीतली काही भाज्यांची नावंच बघूया. भेंडीला म्हणतात, ‘लेडी फिंगर.’ कारण ती कधी स्त्रीच्या लांबसडक (किंवा कधी आखूडही,) बोटांसारखी असते. दुधीला इंग्रजीत ‘बॉटल गोर्ड’ असा शब्द आहे. दुधीच्या उभट बाटलीसारख्या आकारावरून तो पडला आहे. पडवळ सापासारखा दिसतो, म्हणून या भाषेत त्याला म्हणतात, ‘स्नेक गोर्ड’, तर गिलक्‍याला, म्हणजेच घोसाळ्याला ‘स्पाँज गोर्ड’ आणि शिराळ्याला किंवा दोडक्‍याला ‘रिड्‌ज गोर्ड’ म्हणतात. हेच दोडकं हिंदीत होतं, ‘तुरई.’ ‘गोर्ड’चा उच्चार ‘गुअड’ असाही काही ठिकाणी केला जातो. ‘ॲपल गोर्ड’ म्हणजे आपण ज्याला ढेमसं म्हणतो, ती भाजी. ढेमशाकडं पाहिल्यावरच, एखाद्यानं ढिम्मपणे ठिय्या मारण्याची आठवण येते अगदी! या बसक्‍या आकारावरूनच बहुधा हे नाव या भाजीला पडलं असावं! हिंदीत त्याला ‘टिंडा’ म्हणतात. तांत्रिकदृष्ट्या लाल भोपळा हाही याच प्रकारात मोडतो. आपल्याकडं लाल भोपळ्याला ‘गंगाफळ’, ‘काशीफळ’ अशीही नावं आहेत; गंगेच्या काठी ही भाजी मोठ्या प्रमाणात होत असते, त्यावरून ही नावं पडली आहेत. 

जरा लांबट वा गोल आकाराचं, कठीण सालाचं आणि जे सालासकट खाल्लं जात नाही, ते फळ म्हणजे गोर्ड, अशी याची शब्दकोशातली व्याख्या आहे. गंमत वाटते, नाही? पण खरंच आहे, की आपण ज्या गोष्टी भाज्या म्हणून सेवन करतो, त्यांना वनस्पतीशास्त्राच्या परिभाषेत ‘फळ’ अशी संज्ञा आहे. यात मग काकडी, टोमॅटो यासारख्या अनेक ‘भाज्यां’चा समावेश होतो. म्हणूनच असं गमतीनं म्हणतात, ‘टोमॅटो हे फळ आहे, याची माहिती एखाद्याला असणं, हे ज्ञान आहे; तर फ्रूट सॅलडमध्ये टोमॅटोचा वापर न करणं, हे शहाणपण आहे...’ 

भाषेची एक गंमत असते. काही शब्द एका भाषेत ज्या अर्थी वापरले जातात, ते दुसऱ्या भाषेत वेगळ्याच अर्थी वापरले जातात. फळं अन्‌ भाज्यांबाबतही हे लागू पडतं. आपण ज्याला ‘कोहळा’ म्हणतो, त्याला उत्तरेकडं हिंदी भाषेत ‘सीताफल’ म्हणतात. तर तिथं ‘सीताफळा’ला ‘शरीफा’ म्हणतात. सीताफळ हे मूळ आतल्या गराच्या रंगावरून ‘सितफल’ किंवा अंगच्या गुणधर्मावरून ‘शीतफल’ असावं. पण ते बनलं सीताफळ आणि मग त्याच्यासारख्या बिया व गर असल्यानं इतर फळांना ‘रामफळ’, ‘लक्ष्मणफळ’ अशी नावं दिली गेली. पैकी रामफळ बाहेरून वेगळं दिसतं, पण लक्ष्मणफळ हे सीताफळासारखंच फिकट हिरवट रंगाचं असतं, पण त्याचे डोळे स्पष्ट व बाहेर आल्याप्रमाणं नसतात. त्याचीही चव रामफळाप्रमाणं सीताफळाच्या जवळ जाणारीच असते. 

रंगावरून आठवलं. नारिंग आणि संत्रं यांच्यात साम्य आहे. त्यामुळं त्यांची गल्लत केली जाते. 

ही फळं एकाच कुळातली आणि सख्खी भावंडंच आहेत म्हणा! पण ऑरेंज, म्हणजे संत्रं हे हाताला जरा पोकळ लागतं नि ते रंगानं पिवळ्यावर जाणारं असतं. तर किनो किंवा किनू हे बाहेरून अधिक गडद रंगाचं आणि गुळगुळीत व भरीव असतं. मॅंडारिन ऑरेंज असंही त्याला नाव आहे. त्याला नारिंग म्हणतात आणि त्या रंगाला नारिंगी. फ़ारसी भाषेत ‘नारेंजी’ रंग म्हणतात, पण संत्र्याला मात्र ‘पोर्तुगाल’ म्हणतात, कारण ती तिकडून येतात वाटतं. इराणमध्येही संत्री व तत्सम रसदार फळं होतात. खरं तर मुळात ‘पोर्तुगाल फ्रूट’ म्हणजे आपला पपनस आणि हिंदीतलं चकोतरा. शिवाय पपनसाला पॉमेलो असंही एक नाव इंग्रजी भाषेत आहे. शॅडॉक नावाचं फळ आणि संत्रं यांच्या संकरातून त्याचा जन्म झाला. ते ‘ग्रेपफ्रूट’ म्हणूनही ओळखलं जातं. ग्रेपफ्रूट आतून पांढुरकं व लाल, तसंच गुलाबी, असं दोन्ही रंगांचं असतं. वजन कमी करण्यास याचं सेवन उपयोगी पडतं. पण हे फळ जपूनच खावं, ते अति प्रमाणात खाऊ नये. कारण त्यातील काही रसायनांचा विपरीत परिणाम होऊ शकतो. लिंबाच्या वंशातली ही सारी रसदार फळं परस्परांपासून तशी चवीला व स्वादाला वेगळी, तरीही एकाच तऱ्हेची आहेत. त्यांची ओळख यामुळंच अशी एकमेकांत मिसळलेली आहे. लिंबावरून आठवण झाली, ती पुन्हा संत्र्याचीच. कारण बंगालीत संत्र्याला ‘कमला लेबू’ असं फार सुंदर नाव आहे. बंगाली लोक तर नुसतं कोमला (कमला), असाच संत्र्याचा उल्लेख करतात. संत्रं जर अख्खं सोललं तर ते दिसतंच उमललेल्या कमळासारखं... बंगालमध्ये संत्र्याची बर्फी, खीर, पुडिंग, आंबटगोड चटणी असे बरेच पदार्थ केले जातात. तसं तर मोसंबं किंवा मुसुंबंही याच कुळातलं. फ़ारसीत त्याला म्हणतात ‘लिमू शिरीन’, म्हणजे गोड लिंबू. मोसमी फळ, म्हणून मोसंबं असं याचं नाव पडलं... भारतात होणारं ईडलिंबू हे आकारानं मोठं लिंबू, अतिशय औषधी समजलं जातं. महा निंबू, जंबिरा अशीही त्याची नावं आहेत. लोणच्यासाठी ईडलिंबू वापरतात. 

फळं आणि भाज्यांच्या जगात आपण जितके रमू तितकं त्यात हरवून जायला होतं. त्यांच्याशी मैत्री केली, तर त्यात आपलाच फायदा असतो. मग ते कडू कार्लं असो, की आंबटढोण लिंबू असो. जीवनातल्या सगळ्या रसांचा आणि सत्त्वांचा परिपोष आपल्या आहारातल्या भाज्या आणि फळं करत असतात. म्हणून शक्‍यतो आवडनिवड असली, तरी नावड न ठेवता, सगळ्याचा अधूनमधून तरी आस्वाद घ्यावा. ज्या गोष्टी विशिष्ट स्वरूपात खाल्ल्या जात नाहीत, त्या वापरून नेहमीपेक्षा जरा वेगळा पदार्थ करून बघावा. नाकं मुरडणाऱ्या बऱ्याचजणांना न आवडणारं आपण काही खातोय, याचा वासही लागत नाही. चवही कळत नाही. कल्पनाशक्तीला चालना दिली, की सुचतात असे पदार्थ. माझ्या मैत्रिणीची आई, आपली मुलगी पोळ्या फार खात नाहीत, म्हणून पोळी कुस्करून, चुरा जरा तव्यावर कुरकुरीत करायची आणि एखाद्या उसळीत खाली घालून वर कांदा-शेवेनं सजवून तिला द्यायची. लेक आनंदानं ही ‘मिसळ’ खायची. भाकरी कधी कधी मुलांना आवडत नाही, तर बाजरी-ज्वारीच्या पिठात मेथी-पालक इत्यादी घालून थापून वडे तळून करावेत. अशा तऱ्हेनं डोकं चालवलं, म्हणजे खाण्याबाबत कटकट असणाऱ्यांच्या पोटात सगळं काही जातं... नेहमी नेहमी त्याच त्या चवीचं खाऊन कंटाळाही येऊ शकतो. करणारीलाही त्यात नावीन्य वाटत नाहीच. म्हणून स्वयंपाकघराच्या प्रयोगशाळेत अधूनमधून नवीन पदार्थ करावेत. असे पदार्थ खाताना नि बघतानाही छान वाटतं. प्रत्येक घरातलं स्वयंपाकघर म्हणजे जणू किमयाघरच! 

ज्वारीच्या इडल्या आणि टोमॅटोचं रस्सम 
साहित्य : इडलीसाठी - तीन वाट्या ज्वारी, १ वाटी उडीद डाळ, पाणी, किंचित मेथीपूड (हवी असल्यास वापरा), चवीसाठी मीठ. 
टोमॅटोच्या रस्समसाठी - चार लालबंद दळदार टोमॅटो, कढीपत्ता, तेल, मोहरी, जिरं, हिंग, मिरीची पूड, चवीसाठी आवडीनुसार मीठ, साखर, कोथिंबीर. 
कृती :  इडली - ज्वारी व डाळ सहा-सात तास पाण्यात भिजवावी. नंतर उपसून पाणी घालून वाटून घ्यावी. इडलीसाठी लागते तितपत रवाळ वाटावी. चिमूटभर मीठ मिसळून रात्रभर झाकून ठेवावी. सकाळी किंचित मेथीपूड आणि चवीनुसार मीठ घालून हलवून घ्यावी. इडलीपात्रात घालून इडल्या कराव्या. 
रस्सम : टोमॅटो उकडून घ्यावे आणि गार झाल्यावर मिक्‍सरमधून फिरवून घ्यावे. पाणी घालून सार तयार करावे. त्यात मीठ, साखर घालावी आणि गरम करावी. फोडणी करून त्यात मोहरी, जिरं, हिंग, कढीपत्ता घालावा आणि सुकी मिरची घालून फोडणी तयार करावी. ती टोमॅटोच्या रस्सममध्ये घालावी. चवीनुसार मीठ, साखर, मिरपूड घालावी आणि एक उकळी आणावी. आवडीनुसार कोथिंबीर चिरून यात घालावी. इडलीबरोबर सांबार तर नेहमीच केलं जातं. हे फक्त टोमॅटोचं साधं रस्समही छान लागतं. टोमॅटोचं रस्सम आणि खोबऱ्याच्या चटणीबरोबर ज्वारीच्या इडल्या खायला द्याव्या. 
पर्यायी सूचना : याचप्रकारे नाचणी वापरूनही इडली चांगली होते. ज्वारी व नाचणीबरोबर थोडे तांदूळ वा पोहे घातले तरी चालतं. तांदूळ न घालताही इडली उत्तम होते. सालीसकट उडीद डाळ घेतल्यास अधिक चांगलं व या इडलीला वेगळा रंगही येतो. इडलीच्या पिठात थोडं किसलेलं गाजर, फरसबी अशा भाज्याही थोड्या प्रमाणात घालू शकता. तर रस्सममध्ये सुकी मिरची न घालता अर्धा चमचा तिखटही घालता येईल. नुसत्या मीरपुडीचं रस्समही चवदार होतं. फोडणीत तीळही घालता येतील. रस्सम करताना बारीक चिरलेला टोमॅटो फोडणीला घालून, मिश्रण जरा घोटून घेऊनही रस्सम करता येईल. मिक्‍सरमधून नाही काढलं तरी चालतं. पण बऱ्याचजणांना खाताना टोमॅटोची सालं आलेली आवडत नाहीत.

संक्रांत स्पेशल - तिळाची चटणी 
साहित्य : वाटीभर तीळ, पाव वाटी शेंगदाणे, कढीपत्त्याची सावलीत सुकवलेली वाटीभर पानं, अर्धी वाटी चिवड्याचं डाळं, तिखटाची पूड, मीठ, हवी असल्यास चवीनुसार साखर, चमचाभर तेल. 
कृती : तीळ, डाळं व दाणे खमंग भाजून घ्यावे. गॅस बंद केल्यावर कढीपत्त्याची वाळलेली पानं त्यात टाकावी. वेगवेगळं चमचाभर तेल, चवीनुसार मीठ व साखर घालून मिक्‍सरमधून भरड वाटून घ्यावं किंवा खलबत्त्यात कुटून घ्यावं. खमंग चटणी तयार. 
पर्यायी सूचना : या चटणीत थोडी चिंच वा आमसूलही चांगलं लागतं. आवडत असल्यास चटणीत लसूणही घालू शकता. इडलीबरोबर खायला ही चटणी बरी वाटते. डब्यात द्यायची असली, तर एका इडलीचे चार, याप्रमाणं इडल्यांचे तुकडे करून, तुकड्यांवर भरपूर चटणी भुरभुरून त्यावर तेल घालून खालीवर हलवून द्यावं.

संबंधित बातम्या