आनंदकंद ऐसा हा हिंददेश माझा 

नंदिनी आत्मसिद्ध 
गुरुवार, 21 फेब्रुवारी 2019

पोटपूजा
 

खाद्यपदार्थांची नावं हा एक रोचक विषय आहे. त्यातही अनेकदा गमती होतात. आपण ज्याला ‘शंकरपाळे’ म्हणतो, ते खरं तर ‘शकरपारे’ किंवा ‘शक्करपारे’ आहेत. पारे म्हणजे तुकडे. साखरेचे तुकडे, अशाप्रकारे या पदार्थाचं वर्णन या शब्दात आहे. पण मराठीत ते चक्क झाले ‘शंकरपाळे.’ उगाच भगवान शंकराशी हा पदार्थ जोडला गेला. शिवाय आपण शंकरपाळे गोड आणि खारे वा मसालेदार वा तिखट अशा चवींचेही करतोच. पूर्वी बायका आपल्या नवऱ्याचं नाव उघडपणे घेत नसत, तेव्हा मग शंकर नावाच्या माणसाच्या बायकोनं जर शंकरपाळे केले, तर ती म्हणे, ‘आज तिकडचे पाळे केले आहेत...’ असा गमतीदार किस्सा वाचला होता. काही पदार्थांना वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे शब्द असतात. उदाहरणार्थ, मूगडाळ हलवा, म्हणजे खरं तर मूगडाळीचा शिराच. तिकडं उत्तरेकडं कोणत्याही शिऱ्याला ‘हलवा’ असंच म्हणतात. तसं तर आपल्याकडं अनेक प्रकारचे हलवे केले जातात. रवा, कणीक, गाजर, बीट, दुधी, लाल भोपळा इत्यादी. हा ‘हलवा’ शब्द कुठून आला, कल्पना नाही. पूर्वी वाटायचं, हा पदार्थ करताना खूप हलवावं लागतं, म्हणून ‘हलवा’ म्हणत असावेत... पण हिंदी बेल्टमध्ये कुठं ‘हलाना’ म्हणतात? मग मध्यंतरी असं वाचनात आलं, की अरबी भाषेत ‘हलवा’ या शब्दाचा ‘सुंदर’ किंवा ‘गोड’ असा अर्थ आहे. हा हलवा बहुधा तिथूनच आला असणार. शिवाय ‘हलवाई’ हा शब्द तिथलाच. गोड पदार्थ बनवणारे, ते हलवाई, अशी याची व्याख्या. हुमायूनच्या काळात मुस्लिम हलवाई समूह इराणमधून त्याचे सैनिक म्हणून भारतात आले. आजही पाकिस्तानात आणि भारतात उत्तरेकडं बहुधा प्रत्येक शहरात एखादा तरी हलवाई मोहल्ला असतोच. हा शब्द मराठीतही रुळला आहेच. त्याशिवाय का ‘हलवायाच्या घरावर तुळशीपत्र’ ही म्हण मराठीत निर्माण झाली? मधु म्हणजे मध हा मधुर असतो, म्हणून या चवीला मधुर म्हणतात. तर मधुरला आपण मराठीत गोड म्हणतो. गोड आला गुळापासून. संस्कृतात गूळ या शब्दाला ‘गुड’ असं म्हणतात. ‘गोड’ हा शब्द त्यापासूनच आला असणार. शिवाय साखर तशी तुलनेनं जरा नंतरच्या काळात सामान्य घरांमधून रुळली. खरंच आहे, की पूर्वी इथं घरोघरी पक्वान्नासाठी गूळच वापरला जात असे. आजही अनेक घरांमधून पुरण, खरवस, शिरा असे बरेच पदार्थ आवर्जून गुळाचेच केले जातात. पक्वान्न म्हणजे, तसं कुठलाही पदार्थ, जो शिजवला आहे. पण आपण पक्वान्न हा शब्द गोडधोडासाठीच तसा वापरतो. तर संस्कृतमध्ये गोड पदार्थ म्हणजे ‘मिष्टान्न.’ स्थानिक भारतीय भाषांमधून असलेला दुसरा ‘मिठाई’ हा शब्द ‘मिष्ट’पासूनच तयार झाला. मराठीत आपण कधी कधी म्हणतोच की, हा चहा किंवा हा लाडू ‘अगदी गोड मिट्ट’ आहे. शब्दांचा प्रवास कसा आणि कुठवर होतो, ही एक मौजच आहे. 

‘शकरपारे’मधला ‘शकर’ साखर या अर्थाचाच शब्द आहे. पाहिलं तर लक्षात येतं, की जगातल्या अनेक भाषांमधून साखर या शब्दाला असलेले प्रतिशब्द ‘साख्रर’ला जवळचे आहेत. संस्कृतात शर्करा, अरबी-फ़ारसीत शकर, इंग्रजीत शुगर, जर्मन भाषेत त्सुकर, डच भाषेत सुइकर, झेकमध्ये सुक्र, इत्यादी. हिंदीत मात्र ‘चीनी’ म्हणतात. रताळ्याला हिंदीत रतालू आणि शकरकंद असे शब्द आहेत, तर इंग्रजीत स्वीट पोटॅटो. इथं शकरकंद म्हणजे साखरेचा कंद असा अर्थ आहे. (जर हा फ़ारसी शब्द धरला, तर साखरेची क्‍युब असा अर्थही होऊ शकेल.) पण हा कंदाचाच एक प्रकार आहे. बटाट्याला अधिक चांगला पर्याय म्हणून रताळ्याकडं बघितलं जातं. रताळ्यासारखा कंदासारखा दिसणारा आणि एक कंद म्हणजे गराडू. त्याच्या चकत्या करून त्यांना चाट मसाला लावून काप व फोडी करून त्या तळल्या जातात. हे गराडू म्हणजे माळवा-इंदूरची खासियत आहे. इंदूरला जागोजागी गराडू तळून विकले जातात. थंडीत उष्णतेपासून बचाव करणारा हा पदार्थ आहे. तसंच त्यात कॅल्शिअम, लोह व इतर अनेक खनिजद्रव्यं व वेगवेगळी जीवनसत्त्वंही असतात. असाच एक कंद म्हणजे कोनफळ अथवा कोंदफळ. कोनफळाशिवाय उंधियो ही गुजराती पद्धतीची भाजी पूर्ण होत नाही. आतून त्याला सुंदरसा जांभळा रंग असतो. त्याचे काप छान लागतात. इंग्रजीत याला ‘याम’ म्हणतात. अर्थात याम्‌ या गटात इतरही बरेच कंद मोडतात. तर टॅपॉइका या कंदाच्या चिकापासून सागो किंवा साबुदाणा बनवला जातो. उपवास तर साबुदाणा खिचडीशिवाय होतच नाही. भारतात तमिळनाडूत साबुदाणा मोठ्या प्रमाणावर तयार होतो. पण त्याचा वापर मात्र तमिळनाडूत फारसा होत नाही. मात्र आपल्याकडं साबुदाणा तयार केला जातो, तो अतिशय अस्वच्छ परिस्थितीत. त्याचे व्हिडिओ इंटरनेटवर बघायला मिळतात. हल्ली त्यामुळं साबुदाणा खाण्याची जरा भीतीच वाटते... 

वेगवेगळे कंद आपल्याकडं उकडून मीठ लावून खाल्ले जातात किंवा त्याचे काप, भाजी, कबाब केले जातात. अळकूड किंवा अळूची मुळं आवडीनं खाल्ली जातात. त्यालाच आरबी, आरवी किंवा अरुर, मुंडल्या अशीही नावं आहेत. अळकुडाची भाजी परतून, रश्‍शासारखी अशी वेगवेगळ्या प्रकारांनी केली जाते. गाजर, सुरण, बीट, करंद किंवा कडूकंद, कणगर असे कितीतरी प्रकारचे कंद आहारात असले पाहिजेत. यातले काही कंद पावसाळी भाज्यांप्रमाणे हंगामी असतात. कंदमुळांमध्ये चोथा व तंतुमय घटक जास्त असल्यामुळं पचनक्रिया सुधारते. कंद नुसते उकडून व मीठ लावून खाल्ले तरी चालतात. असे तेलविरहित कंद आहारात असले, तर शरीराला उपकारच आणि आनंददायी ठरतात. माणसाला निसर्गाच्या जवळ नेणारा आहार म्हणजे कंदाहार... 

मुगाचा हलवा 
साहित्य :
दोन वाट्या बिन सालीची मूगडाळ, अर्धा ते पाऊण वाटी तूप, दीड वाटी दूध वा पाणी अथवा दोन्ही निम्मं निम्मं एकत्रितपणे, पाऊण वाटी साखर, स्वादासाठी वेलची पूड, हलव्यात घालण्यासाठी आवडीनुसार बदाम-पिस्ता-काजूचे तुकडे. 
कृती : डाळ लालसर रंगावर एकसारखी भाजून घ्यावी. जळू देऊ नये किंवा खूप गडद रंगावर भाजू नये. गार झाल्यावर मिक्‍सरमध्ये वा ग्राइंडरवर जाडसर दळून त्याचा रवा काढून घ्यावा. जाड बुडाच्या पातेल्यात वा कढईत तूप घालावं आणि हा मुगाचा रवा खमंग भाजावा. भाजून झाल्यावर त्यात पाणी व दूध हळूहळू घालावं. घालताना सारखं ढवळत राहावं. गुठळ्या होऊ देऊ नये. तसंच खाली लागू देऊ नये. झाकण ठेवून दोन-तीन वेळा वाफ आणावी. लागलं तर थोडं दूध वा पाण्याचा हबका मारावा. शिजून फुलल्यासारखा वाटला, की त्यात साखर घालावी. पुन्हा झाकण ठेवून अधूनमधून हलवावं आणि वाफ आणावी. शिजून मोकळा झाला, की वेलची घालून वाडग्यात काढावी. मुगाचा चविष्ट आणि रंगतदार हलवा तयार आहे. वर बदाम-काजूचे काप पसरावे. 
पर्यायी सूचना : डाळ किंवा मूगडाळीचा केलेला रवा दोन तास दुधात भिजवून ठेवूनही हा हलवा केला जातो. डाळ अर्थातच जाडसर वाटून घ्यायची असते. तर ही मूगडाळ काहीजण कच्चीही भिजवतात. पाणी अजिबात न घालता नुसतं दूध घालून केलेला हलवा अधिक छान लागतो. पण स्निग्ध पदार्थ कमी खायचे असतील, तर दूध वा खवा न घालता, साधं पाणी घालूनही हलवा केला तरी तो बरा लागतो. साखरेबरोबर यात काहीजण खवाही घालतात किंवा यात साय घोटूनही घालू शकता. याच पद्धतीनं चणाडाळीचाही हलवा केला जातो. तो चवीला तसा आपल्या पुरणाच्या जवळचाच लागतो.

दलियाची खीर 
साहित्य : गव्हाची भरड किंवा दलिया, थोडं पाणी, दूध, खवलेला नारळ, गूळ, स्वादासाठी वेलची, जायफळ, तसंच भिजवलेल्या बदामाचे काप. 
कृती : गव्हाचा दलिया पाणी घालून कुकरमध्ये भाताबरोबर उकडून घ्यावा. नंतर तो एका कढईत व पातेल्यात काढून त्यात नारळ व गूळ घालून शिजत ठेवावं. शिजताना गूळ विरघळेपर्यंत हलवत राहावं. लागू देऊ नये. त्यात जायफळ उगाळून वा पूड करून घालावी. तसंच बदामाचे काप घालावेत. शेवटी दूध घालून खीर तयार करावी. 
पर्यायी सूचना : कुकरमध्ये दलिया शिजवताना त्यात किंचित तेल घालावं, म्हणजे तो घट्ट गोळा न होता, मोकळा शिजतो. दलियाची खीर करताना, त्यात जवाचा दलियाही वापरू शकता. नारळ घातला नाही तरी चालतं. स्वादासाठी या खिरीत थोडी दालचिनीची पूडही घालावी. गुळाऐवजी साखरही चालेल, पण गुळाची चव अधिक चांगली लागते. गूळ व साखर कमी घालून, थोडी खाकरेची पावडर, तसंच खजुराचे तुकडेही घालू शकता. 

कढीपत्त्याची चटणी 
साहित्य : वाडगा भरून कढीलिंबाची पानं, अर्धा वाटी सुक्‍या खोबऱ्याचा कीस, पाव वाटी तीळ, तेवढंच दाण्याचं कूट, दोन सुक्‍या लाल मिरच्या, चमचाभर आमचूर पावडर, चवीनुसार मीठ व साखर, छोटा चमचाभर हिंग पावडर, थोडंसं तेल. 
कृती : या चटणीत कढीपत्त्याचं प्रमाण जास्त असावं. कढीपत्त्याची पानं जरा सुकवून घ्यावी. नंतर ती थोड्या तेलात भाजावीत. सुकं खोबरं व तीळ भाजून घ्यावेत आणि त्यातच दाण्याचं कूट व हिंग पावडर घालावी. तापलेल्या तेलात लाल मिरची घालावी व लगेच गॅस बंद करावा. म्हणजे मिरची काळपट होणार नाही. सर्व गार झाल्यावर त्यात चवीनुसार मीठ, साखर व आमचूर पावडर घालून मिक्‍सरवर बारीक करावी. 
पर्यायी सूचना : या चटणीत आमचूर पावडरीऐवजी थोडी चिंचही घालता येईल. तसंच आवडत असेल, तर चमचाभर धणे भाजून तेही घालता येतील. ही चटणी ब्रेड सॅंडविचमध्येही घालता येते, तसंच या चटणीचा वापर आमटीतही करता येतो. 
 

संबंधित बातम्या